दादाभाई नौरोजी 1892मध्ये ब्रिटनच्या संसदेत निवडून गेले तेव्हा

दादाभाई नौरोजी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिनयार पटेल
    • Role, इतिहासकार

1892 मध्ये दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या संसदेत निवडून गेले होते, म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षांपूर्वी. हे कसं घडलं? या ऐतिहासिक घटनेचं आजच्या लेखी काय महत्त्व आहे?

दादाभाई नौरोजी यांचा आज 4 सप्टेंबर जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने दादाभाई नौरोजींच्या ब्रिटीश संसदेतील कामगिरीची माहिती देणारा हा लेख पुन्हा देत आहोत.

लाईन

दादाभाई नौरोजी (1825-1917) ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे पहिले आशियाई नेते होते. पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.

आज जगभरात विविध संकटांनी डोकं वर काढलेलं असताना नौरोजींच्या कार्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. आपल्या प्रगतिशील राजकीय इच्छाशक्तीमुळे दादाभाईंचं आयुष्य इतिहासातल्या काळ्या पर्वातही आशेचा किरण होता.

मुलींच्या शिक्षणावर भर

दादाभाईंचा जन्म मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात झाला. फ्री-पब्लिक स्कूलिंग योजनेअंतर्गत त्यांचं शिक्षण झालं. लोकांची सेवा करणं हेच सार्वजनिक शिक्षणाच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असं त्यांना वाटायचं.

लहान वयातच प्रागैतिक विचारांनी त्यांना आकर्षित केलं. 1840 मध्ये दादाभाईंनी मुलींसाठी शाळा उघडली. कर्मठ पारंपरिक विचारसरणीच्या पुरुषांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वत:ची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. काळाच्या पुढचा विचार करणारं द्रष्टेपण त्यांच्या अंगी होतं.

पाच वर्षातच मुंबईतली ही मुलींची शाळा विद्यार्थ्यांनी गजबजली. यामुळे दादाभाईंच्या विचारांना प्रोत्साहनच मिळालं. त्यांनी लैंगिक समानतेचा मुद्दा मांडला. महिलांना या जगात खुलेपणाने जगण्याचा, आपल्या विचारानुसार कृती करण्याचा, अधिकार आणि कर्तव्यं निभावण्याचा समान अधिकार आहे, असं दादाभाईंनी त्यावेळी म्हटलं होतं.

दादाभाईंच्या प्रयत्नामुळेच मुलींच्या/महिलांच्या शिक्षणाप्रति देशातील लोकांचा असलेला दृष्टिकोन बदलला.

ब्रिटन साम्राज्याच्या विचारांना आव्हान

1855 मध्ये दादाभाई पहिल्यांदा ब्रिटनला गेले. तिथली प्रगती पाहून ते अवाक झाले. आपला देश इतका मागास आणि गरीब का, असा विचार त्यांच्या मनात आला.

ब्रिटनच्या आर्थिक प्रगतीमागे वसाहतवाद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुढची दोन दशकं त्यांनी यासंदर्भात आर्थिक विश्लेषण केलं. वसाहतींच्या माध्यमातून आर्थिक प्रगती, या विचाराला त्यांनी आव्हान दिलं. त्यांनी आपल्या अभ्यासातून ब्रिटिश विचारसरणी परिस्थितीच्या उलट विचार करत असल्याचं सिद्ध केलं.

दादाभाई नौरोजी

फोटो स्रोत, Courtesy: Dinyar Patel

त्यांच्या मते ब्रिटिश सरकार "भारतीयांचं शोषण करून" त्यांना मृत्यूच्या दिशेने लोटत आहे. दादाभाईंच्या या भूमिकेमुळे अनेक ब्रिटिशांनी त्यांच्यावर देशद्रोही आणि निष्ठाहीन असल्याचा आरोप केला. ब्रिटनच्या वसाहती देशांमध्ये राहिलेला एखादा माणूस अशी भूमिका कशी घेऊ शकतो, याचं त्यांना आश्चर्य वाटलं.

साम्राज्यावादाविरोधात विचार असणाऱ्या ब्रिटनमधील लोकांना दादाभाईंच्या विचारांनी बळच मिळालं. साम्राज्यवादामुळे वसाहती देशांमधील "पैसा कसा बाहेर गेला" यासंदर्भात दादाभाईंनी केलेलं लिखाण युरोपीयन विचारवंत तसंच अमेरिकेतील प्रगतिशील नेते विल्यम जेनिंग्ज ब्रायन तसंच कार्ल मार्क्स यांच्यापर्यंतही पोहोचलं.

ब्रिटनच्या संसदेपर्यंत

भारतात असलेली गरिबी हीच दादाभाईंच्या ब्रिटनच्या संसदेत प्रवेश करण्यामागची महत्त्वाकांक्षा होती. ब्रिटनच्याच एका वसाहतीतून आल्यामुळे त्यांना ब्रिटनच्या संसदीय निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार होता, मात्र त्यासाठी त्यांना ब्रिटनमध्ये वास्तव्य करणं क्रमप्राप्त होतं.

आयर्लंडच्या राष्ट्रवादी विचारांच्या धर्तीवर दादाभाईंना असं वाटायचं की ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर हॉलच्या माध्यमातून भारताने राजकीय परिवर्तनाची मागणी करावी.

भारतात अशी व्यवस्था आणि विचार नव्हता. त्यामुळे त्यांनी मग 1886 मध्ये होलबोर्न इथून आपल्या राजकीय मोहिमेला सुरुवात केली. मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

दादाभाई नौरोजी

फोटो स्रोत, COURTESY: DINYAR PATEL

पण ते खचले नाहीत. पुढच्या काही वर्षात त्यांनी भारतीय राष्ट्रवाद आणि ब्रिटनमधील प्रगतिशील विचारांच्या आंदोलकांना एकत्र आणलं. महिलांना मताधिकार मिळण्याच्या भूमिकेचे ते कडवे समर्थक बनले.

आयर्लंडचं स्वत:चं सरकार असावं, अशी भूमिका त्यांनी घेतली. आयर्लंडच्या संसदेत निवडून जाण्याच्या ते अगदी जवळ होते. श्रम आणि समाजवादाची त्यांनी कास धरली. भांडवलशाहीला त्यांनी विरोध केला आणि कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला.

भारतात तात्काळ सुधारणांची गरज आहे, हे ब्रिटनमधल्या मोठ्या वर्गाला पटवून देण्यात दादाभाई यशस्वी झाले. महिलांना मतदानाचा अधिकार, कामगारांना आठ तास काम करण्याचा नियम, अशा सुधारणांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांना कामगारांचं, त्यांच्या नेत्यांचं, कृषी क्षेत्रातील धुरीण, महिला चळवळ तसंच चर्चमधील पाद्री लोकांचा पाठिंबा मिळाला.

मात्र ब्रिटनमधले सगळेच जण त्यांच्या कामावर, भूमिकेवर खूश नव्हते. काहीजण त्यांची 'कार्पेटबेगर' आणि 'हॉटेनटॉट' (आफ्रिकन आदिवासींची एक जमात) अशी हेटाळणी करायचे. ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड सॅलिसबरी यांनी दादाभाईंची "काळा माणूस" अशी निर्भत्सनाही केली होती. त्यांना ब्रिटनमधील नागरिकांची मतं मिळवण्याचा अधिकार नाही, असंही सॅलिसबरी म्हणाले होते.

मात्र ब्रिटनच्या संसदेत निवडून जाण्यासाठी जितकी मतं लागतात, अगदी तेवढ्याच लोकांपर्यंत दादाभाईंना पोहोचण्यात यश आलं. 1892 मध्ये दादाभाई लंडनमधल्या सेंट्रल फिन्सबरी इथून अवघ्या पाच मतांनी निवडून आले. त्यांच्या अशा निसटता विजयामुळे त्यांना 'दादाभाई नॅरो-मेजॉरिटी' असंही म्हटलं जाऊ लागलं.

दादाभाई नौरोजी
फोटो कॅप्शन, नौरोजींच्या समर्थनासाठी ट्रेड यूनियनने काढलेलं एक पोस्टर

जराही वेळ न दवडता दादाभाईंनी ब्रिटनच्या संसदेसमोर आपली भूमिका मांडली.

ब्रिटन शासन "दुष्ट" कारभार करत असून, ते भारतीयांना गुलामांप्रमाणे वागवतात, असं त्यांनी सभागृहाला स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यामुळे कायद्यात्मक बदल करून भारतातील प्रशासन भारतीयांच्या हाती देण्यासाठी ते प्रयत्न करत होते, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

बहुतांश संसदपटूंनी त्यांच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. 1895 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि यावेळी दादाभाईंना पराभवाला सामोरं जावं लागलं.

कठीण काळातही निर्धार कायम

हा दादाभाईंच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण कालखंड होता. 1890च्या दशकातली शेवटची वर्षं आणि 1900चा सुरुवातीचा काळ यावेळी ब्रिटिश शासन अधिक क्रूर झालं.

दुष्काळ आणि उपासमारीमुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. भारतातील राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्तींना त्यांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आल्याचं वाटत होतं, परंतु दादाभाईंनी हार मानली नाही.

दादाभाई नौरोजी

फोटो स्रोत, courtesy: dinyar patel

आपली भूमिका पुढे रेटण्यासाठी दादाभाईंनी कामगार, अमेरिकेतील साम्राज्यवादविरोधी, आफ्रो-अमेरिकन तसंच कृष्णवर्णीय ब्रिटिश आंदोलनकर्त्यांचा पाठिंबा मिळवला. भारताला स्वराज्याची आवश्यकता असून, देशातला पैसा बाहेर जाण्याची प्रक्रिया थांबवायला हवी, यावर ते ठाम होते.

साम्राज्यवादासंदर्भात केलेल्या चुका सुधारण्याची ही संधी आहे, असं दादाभाईंनी ब्रिटनचे पंतप्रधान हेन्री कँपबेल-बॅनरमन यांना सांगितलं. दादाभाईंचे शब्द आणि विचार जगभरातल्या नेत्यांच्या मुखी रुळले. युरोपातील समाजवादी, आफ्रो-अमेरिकन माध्यमं, भारतीय तसंच गांधीच्या दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी स्वीकारले.

स्वराज्य ही धाडसी मागणी होती. मानवी इतिहासातील सगळ्यात शक्तिशाली साम्राज्याकडून एखादा कमकुवत देश सत्ता कशी मिळू शकतो?

(Naoroji: Pioneer of Indian Nationalism याचं प्रकाशन मे 2020 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि हार्पर कॉलिन्स इंडियाने केलं होतं)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)