बोंबीलला 'बॉम्बे डक' हे नाव कसं मिळालं? मुंबई, बोंबील, पारशी या त्रिकुटाचं नातं

फोटो स्रोत, Meher Mirza
- Author, मेहेर मिर्झा
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
मुंबई, पारशी आणि बोंबील या त्रिकुटाचं मेतकूट कसं जुळलं?
मी लहान होते तेव्हा जून महिना कधी येईल असं व्हायचं. मे महिन्यांत उन्हाच्या झळांनी जीव नकोसा झालेला असे. त्यानंतर जून महिन्यात मॉन्सूनचे ढग मुंबईवर जमू लागत. मग एके दिवशी विजा चमकत, पाऊस सुरु होई आणि उन्हाळा संपत असे.
जून महिन्यातच आमची शाळा सुरु झालेली असे. नवी पुस्तकं दप्तरात भरून मीसुद्धा शाळेत जायला लागे.
पण याच महिन्यात आमच्यासारख्या पारशांच्या घरामध्ये बॉम्बे डक म्हणजे बोंबिलांचं आगमन होई. बोंबील पकडायला खूप सोपे असतात आणि पावसाळ्यात भरपूर मिळतात.
आज आपण भारत आणि पारशी आणि बॉम्बे डक म्हणजे बोंबिल यांचं नातं जाणून घेणार आहोत.
इराणमधून स्थलांतर
19 व्या शतकामध्ये पारशांची (झोराष्ट्रीयन) संख्या मुंबईत वाढली. पारशी उद्योजकांनी इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत पाश्चिमात्य शिक्षण आणि चालीरिती यांचा स्वीकार केला. पारशी लोक भारतीय राजकारण आणि उद्योगात एकदम वरच्या पदांवर गेले.

फोटो स्रोत, Getty Images
व्यापार उद्योगामध्ये त्यांचं महत्त्व वाढलं. त्या वाढत्या प्रभावाचा उपयोग करुन त्यांनी गरिबांसाठी शाळा, कॉलेज आणि रुग्णालयं तयार केली. पारशी लोक चतुर उद्यमी होते. त्यांनी मुंबईत इराणी हॉटेलं काढली. इराणी हॉटेलांत सर्व जाती-धर्माच्या लोकांना खाणं मिळत असे.
भारतीय उपखंडातील सर्व संस्कृतींचा परिणाम पारशी पदार्थांवरही झाला. त्यांच्या खाद्यपदार्थांवर इस्लामपूर्व इराणचा प्रभाव तर आहे तर गुजरात-गोवा आणि कोकण किनाऱ्यावरील पदार्थांचाही प्रभाव आहे. इंग्लंड आणि नेदरलँडचाही या पदार्थांवर प्रभाव दिसून येतो.
भारतातील समुद्र किनारे विशेषतः गुजरात किनारपट्टीमुळे पारशी जेवणात माशांचा समावेश झाला.

फोटो स्रोत, Getty Images
आता आम्ही पारशी लोक छामनो म्हणजे पापलेट, बोई म्हणजे मुलेट, कोळंबी, लेवटी म्हणजे मड हॉपर, भिंग, रावस, बांगडा खातो आणि बॉम्बे डक म्हणजे बोंबीलही खातो.
बदक नव्हे मासा
बॉम्बे डक हा एक मासा आहे. म्हणजेच बोंबील. मुंबई आणि जवळपासच्या समुद्रात तो मिळतो. गुलाबी जिलेटिनसारख्या काहीशा कुरुप असणाऱ्या या माशाला हे नाव कसं मिळालं हे एक रहस्यच आहे.
मराठीत त्याला बोंबील म्हणतात. कदाचित इंग्रजांची जीभ बोंबील म्हणण्याइतपत वळत नसेल म्हणून कदाचित त्यांनी या माशाचं इंग्रजीत नवं बारसं केलं असेल.
मराठी मच्छिमार 'बॉम्बिलतक' असं ओरडून बोंबील विकत त्यामुळे कदाचित त्याचं इंग्रजीकरण असं झालं असावं.

फोटो स्रोत, Getty Images
हे 'बॉम्बे डक' नाव पडण्याचं एक कारण ब्रिटिश-पारशी लेखक 'फारुख धोंडी' यांनीही दिलं आहे.
मेल रेल्वेमधून सुकवलेले बोंबील मुंबईतून देशातल्या इतर शहरांमध्ये जात असत. त्या ट्रेन्सच्या बोगीला बॉम्बे डाक असं म्हटलं जात असे त्यामुळे कदाचित बॉम्बे डक असं नाव त्या माशला मिळाला असावं असं फारुख धोंडी म्हणतात.
या माशावर मुंबईच्या मिश्रसंस्कृतीनं भरपूर प्रेम केलं आहे. मुंबईच्या मूळनिवासी लोकांपैकी एक म्हणजे मच्छिमार बोंबिलांना मीठ लावून उन्हात वाळवतात.
सुक्या माश्यांना एकप्रकारचा उग्र दर्प येतो. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले नसावेत असं इंग्रजांना सुरुवातील वाटे. नंतर मात्र तेसुद्धा बोंबीलप्रेमी झाले.
कसे शिजवायचे बोंबील आणि कसे खायचे?
या सुकवलेल्या माशांना मॉन्सूनच्या काळात खातात. त्याची आमटी केली जाते किंवा तळून डाळभातबरोबरही खाल्ले जातात. कोळी लोक हा मासा ताजाताजाही खातात. त्यासाठी ते झणझणीत कोळी मसाले वापरतात. किंवा अर्धवट सुकवलेले बोंबील नारळाच्या दुधाबरोबर शिजवतात.

फोटो स्रोत, Meher Mirza
पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर मासे खाणाऱ्या बहुतांश समुदायांच्या खाण्यामध्ये बोंबिलांचा समावेश आहे.
पूर्व भारतात त्याला व्हिनेगरमध्ये बुडवून तळतात. तसंच झिंग्यांबरोबरही ते शिजवले जातात.
महाराष्ट्रातील काही लोक त्याला भाजीसारखं शिजवतात. तर काही समुदाय हिरव्या भाजीबरोबर आणि चिंचेबरोबर, मसाला घालून शिजवतात.
बोंबिलांचा आमच्या पारशांशी संबंध नाही हे खरं पण त्यांनी आमच्या स्वयंपाकघरात महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे हे मात्र निश्चित.
बोंबिलांनी फक्त आमच्या जेवणाच्या ताटांमध्येच नाही तर आमच्या गाण्यांमध्येही स्थान मिळवलंय. त्याला आम्ही बूमला म्हणतो. पारशांमध्ये हे नाव चांगलंच प्रचलित आहे.
आजीच्या हाताची चव
माझ्या बाबांचं लहानपण मुंबईच्या उत्तरेला 215 किमी अंतरावरच्या बिलिमोरा या गुजरातमधल्या शहरामध्ये गेलं होतं.
ते सांगायचे, माझी आजी सुके बोंबील निखाऱ्यांवर भाजायची. ते तुटायला लागले की निखाऱ्यावरुन उतरवायची.
ते भाजलेले सुके बोंबील माझ्या डोक्यात अजूनही आहेत. मुंबईत गॅस स्टोव्हवर भाजलेल्या माशाला ती धुराची चव येऊ शकत नाही.
सुक्या बोंबिलाची चव मिळवण्यासाठी माझ्याकडे तारापुरी लोणच्यासारखे दुसरेही मार्ग आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
बोंबिलांपासून केलेल्या या लोणच्याचा एक चमचा डाळ-भाताची चव वाढवायला पुरेसा आहे.
'तारी मा सुक्खा बूमला' ही बॉम्बे डक शिजवलेली एक डिश आहे. यामध्ये ताडी, गूळ, व्हिनेगर आणि सुक्या मिरच्या घालून तयार करतात.
ताज्या बॉम्बे डकपासून ग्रेव्ही असलेलं एक लोणचंही बनवलं जातं. कधीकधी त्याला 'खारा बुमला' म्हणून खाल्लं जातं. त्याला ग्रेव्हीसह कांद्यासकट वाढलं जातं आणि भाताबरोबर हा पदार्थ खातात.
मला सर्वात जास्त लिंबाचा रस आणि हळद लावून तेलात तळण्यासाठी वाट पाहात बसलेले ताजे बोंबील आवडतात. त्यांना रव्यामध्ये घोळवून तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळलं जातं.
अशा प्रकारे तळलेले बोंबील 'चोखा नी रोटली' म्हणजे तांदळाची भाकरी आणि 'गोर केरी नू अचार' म्हणजे कैरीच्या लोणच्याबरोबर नाश्त्याच्यावेळेस खातात.
...आणि फारच भूक लागली तर मटण खिमा, अकुरी (अंडा बुर्जीचा पारशी अवतार) किंवा तळलेली लेवटीसुद्धा खाल्ली जाते.
इराणी कॅफे
हे खासप्रकारचे बोंबील खाण्यासाठी तुम्हाला एखाद्या पारशी घराचं मेजवानीसाठी आमंत्रण मिळालं पाहिजे. किंवा मुंबईतल्या प्रिन्सेस व्हिक्टोरिया अँड मेरी म्हणजे पीव्हीएमसारख्या जुन्या क्लबचं आमंत्रण मिळालं पाहिजे. नाहीतर तुम्हाला थेट ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टोरंट या प्रसिद्ध इराणी हॉटेलला गाठावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
1923 साली सुरु झालेल्या पीव्हीएम रेस्टोरंटच्या मोठ्या डायनिंग हॉलमध्ये महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि महात्मा गांधींचे फोटो लावण्यात आले आहेत.
पारशी स्टाइलचे बॉम्बे डक खाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसलेलं हे मुंबईतलं एकमेव ठिकाण आहे.
इथं बोंबील बाहेरुन खरपूस होईपर्यंत तळले जातात त्यामुळे आतमध्ये मात्र ते मुलायम राहातात. मुंबईतल्या पारशी नसलेल्या इतर हॉटेलात बोंबिलांचा काटा काढून त्यांना कुरकुरीत होईपर्यंत तळलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
या रेस्टोरंटमध्ये ग्राहकांना गेली अनेक दशके बोमन कोहिनूर या पारशी मालकांना भेटण्याची संधी मिळत असे. ब्रिटिश राजघराण्याचे ते विशेष चाहते होते. रेस्टोरंटमध्ये त्यांनी विल्यम आणि केट यांचा फोटोही टांगला होता. नुकतेच वयाच्या 97 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते मला मी डचेस ऑफ केंब्रिजसारखी दिसते असं ते म्हणायचे. (खरं तर असं मुळीच नाहीये.)
पारशांचं मत्स्यप्रेम
बोंबिलावर पारशांचं प्रेम अनेक शतकांपासून आहे. 1795मध्ये पारशी व्यापारी शेठ कावसजी यांनी मुंबईच्या गव्हर्नरला 500 किलो सुके बोंबील आणि 30 सुके पापलेट भेट दिले होते.
नौरोजी फ्रेमजी यांनी 1883 मध्ये लिहिलेल्या "बॉम्ब्लोइस" या पाककृतींच्या पुस्तकात बोंबील शिजवण्याचे दोन प्रकारही सांगितले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्यामध्ये सुक्या बोंबिलाचं चिंच, आलं-लसूण आणि कांद्याच्या पेस्टसह केलेलं कालवण आणि दुसऱ्यामध्ये सुक्या बोंबिलाला मिरचीबरोबर तळून त्यात हळद, कोथिंबिर, चिंचेचा कोळ आणि हिरव्या मिरचीसकट शिजवणं असे प्रकार दिसून येतात.
1975 साली पारशी संगीतकार मीना कावा यांनी पारशांच्या बोंबीलप्रेमावर एक गाणं ही संगीतबद्ध केलं होतं.
बॉम्बे डक नावाच्या या गाण्याचे बोल होते, "हिअर इज अ स्टोरी सिंपल, ऑफ अ डक विथ अ लिटल डिंपल, ही इज दि स्ट्रेजेंस्ट लिटल डक, धिस लिटल डकी नेवल क्लक्स"
आपली स्वयंपाघरं संस्कृतीच्या वाहक असतात. आपलं जेवण आपली ओळख असते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पारशी जेवणाकडं पाहिलं तर हेच दिसून येतं? आमच्या समजाचं जगभर फिरणं. स्थानिक हवामान आणि संस्कृतीला आत्मसात करण्याची प्रवृत्ती, आमचं वेगळेपण... हेच ना.
दरवर्षी मुंबईल्या उन्हाच्या झळांची जागा जेव्हा मॉन्सूनचे ढग घेतात तेव्हा माझ्या जीवाची तगमग थोडी कमी होते. मी एकदम लहानपणची मेहेर होऊन जाते. तेव्हा हातात बोंबील भरलेली ताटली घेऊन डोलायची अगदी तश्शीच....
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








