कोरोना लॉकडाऊन : भिवंडीतील सेक्सवर्कर्सनी हाती घेतली पाटी, गिरवतायेत इंग्लिशचे धडे

अनेकींना लॉकडाऊनमध्ये परत जायला घर नाही

फोटो स्रोत, Pravin Thakre

फोटो कॅप्शन, अनेकींना लॉकडाऊनमध्ये परत जायला घर नाही.
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मला त्या साहेबांनी काय विचारलं माहीत नाही. मी पण उत्तर चिकटवून दिलं, 'I don't know, I don't care'.

"ते साहेब माझ्या चेहऱ्याकडे बघतच राहिले. मला विचारलं, 'बुढी, तूच आहेस ना?' मला त्या दिवशी फार भारी वाटलं. सगळ्यांना फोन करून सांगितलं की, मी एका साहेबांना इंग्लिश बोलून गप्प केलं. सामनेवाला चूप हो गया. मैं जीत गई!"

आयुष्यभर शोषण आणि अपमान सहन करण्याऱ्या राणी खान यांच्या चेहऱ्यावर हा प्रसंग सांगताना लहान मुलासारखा आनंद असतो. राणी आणि त्यांच्या सोबतच्या काही महिला सध्या लॉकडाऊमध्ये इंग्लिश शिकतायत. यात काय नवीन म्हणाल, तर राणी खान आणि त्यांच्यासोबत इंग्लिश शिकणाऱ्या महिला सेक्सवर्कर आहेत.

त्यांना भेटले तो दिवस न विसरण्यासारखा. पावसाळ्याचे दिवस असले तरी एखादा दिवस असतोच ना प्रचंड उकाड्याचा आणि उन्हाचा... तशाच दिवशी भिवंडीला गेले होते.

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतच होता, धाकधूक होतीच मनात. हनुमान टेकडीच्या भागात पोहोचले आणि वाटलं परत फिरावं.

अत्यंत चिंचोळ्या गल्ल्या, अपुरा प्रकाश घाणीचं साम्राज्य, गर्दी आणि बिनघोर मास्क न लावता फिरणारी माणसं... भिवंडीतल्या रेडलाईट भागात आले होते मी.

भिवंडीतल्या रेडलाईट भागातील गल्ल्या

फोटो स्रोत, Pravin Thakre

फोटो कॅप्शन, भिवंडीतल्या रेडलाईट भागातील गल्ल्या.

देहविक्रय करणाऱ्या महिला समाजातला सगळ्यांत शोषित आणि दुर्लक्षित वर्ग आहे, हे कोव्हिड-19च्या संकटाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं. या काळात त्या कशा जगतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न मागेच केला होता आणि तेव्हा दिसलेली परिस्थिती भयंकर होती.

'मदतीच्या यादीत आम्ही सगळ्यात खाली'

अनेक देहविक्रय करणाऱ्या महिलांनी सांगितलं होतं की, मदत करायला पण कोणी आमच्याकडे येत नाही. सगळ्यांच्या यादीत आम्ही सर्वांत खाली असतो. सेक्सवर्करही माणसं आहेत, त्याही उपाशी मरतायत या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हे कोणीतरी समजून घ्यायला हवंय.

कोरोना
लाईन

"हर मिनिटों में बदलते है आदमी यहा लेकिन, नही बदलती तकदीर हमारी," त्यांच्यातल्याच एकीने बोलून दाखवलं.

हनुमान टेकडीचा रेडलाईट भाग जवळपास रिकामा झालेला आहे. हाच कशाला, देशातल्या सगळ्यांच रेडलाईट भागांमध्ये शांतता आहे. सेक्सवर्कर्सचा व्यवसाय ठप्प असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे पानटपरीवाले, छोटे मोठे दुकानदार सगळ्यांवरच परिणाम झालाय. या भागातही सगळंच बंद आहे.

"अनेक महिला घर सोडून गावी गेल्यात. इथे राहून तरी काय करतील? कोरोनाचा धोका आहेच, भरीस भर म्हणून जेवणाखाण्याचे वांधे," माझ्यासोबत असलेला स्वयंसेवक नागराज सांगत होता. अनेक खोल्यांना असलेली कुलुपं याची साक्ष देतच होती.

संकटातली संधी

मग मागे राहिलेल्या सेक्सवर्कर्स काय करतात आता? "सुरुवातीला तर भांड भांड भांडल्या," याच भागात श्री साईसेवा ही स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या स्वाती सिंग (खान) हसत हसत उत्तरतात.

"इथे रोज भांडणं व्हायची आधी. आम्हाला अनेकदा मध्ये पडावं लागलं. यातत्या महिलांचाही दोष नाही, त्यांची मानसिकताच तशी झाली आहे आणि आता काम बंद आहे, सगळीच अनिश्चितता आहे. घरी पैसे पाठवता येत नाहीत, हातात पैसे नाहीत. अनेकींना तर परत जायला घरच नाही," स्वाती म्हणतात.

भिवंडीमधल्या रेड लाईट एरियामधली एक महिला सेक्सवर्कर

फोटो स्रोत, Pravin Thakre

फोटो कॅप्शन, भिवंडीमधल्या रेड लाईट एरियामधली एक सेक्सवर्कर.

अशात कोंडमारा होणाऱ्या मनाचा स्फोट झाला नाही तर नवलच. पण एक दिवस असा उजाडला की, इथल्या महिलांनी ठरवलं आपणच एकमेकींना मदत करायची. हातात वेळ तर बराच होता. मग काय करायचं... ठरवलं इंग्लिश शिकायचं.

इथल्या अनेक जणींनी कधी शाळेची पायरीही चढली नाहीये. लिहायला-वाचायला येत नाही, काम अशा प्रकारचं. सतत त्रास पाचवीला पुजलेला... कधी गुंडांचा त्रास, कधी सरकारचा तर कधी आणखी कुणाचा.

आजारी असतानाही व्यवसाय बंद करण्याची मुभा नाही, तो बंद पडला अचानक असा ते कोरोना व्हायरसच्या संकटामुळे.

इंग्लिश शिकायचं ठरवलं

फोटो स्रोत, Pravin Thakre

सुरुवातीचे काही दिवस अडचणीत गेल्यानंतर मग तिथल्या सेक्सवर्कर्सनीही हे 'न्यू नॉर्मल' मान्य केलं. हातातल्या रिकाम्या वेळेचं काय करायचं असा प्रश्न पडल्यानंतर त्यांची अनेक दिवसांची जुनी इच्छा उफाळून आली - आपल्याला फर्राटेदार इंग्लिशमध्ये सही करता यावी ही.

मग जमवाजमवीला सुरुवात झाली. राणी खान सांगतात, "आम्हाला औषधं आणायची झाली तरी लोकांकडून लिहून घ्यावं लागतं किंवा कोणी लिहून दिलं तर हे काय विचारावं लागतं. बँकेत गेलो तरी तीच गत. किती दिवस लोकांवर अवलंबून राहाणार, म्हणून ठरवलं लिहायला वाचायला शिकायचं."

याकामी त्यांनी मदत घेतली स्वाती सिंग (खान) यांची. पुस्तकं, चाररेघी वह्या, पेन्सिल या सगळ्यांची व्यवस्था तर झाली, पण या महिलांना शिकवणार कोण असा प्रश्न निर्माण झाला.

लकी लामा याच भागात सेक्सवर्कर आहेत. त्या सातवीपर्यंत इंग्लिश शाळेत शिकल्यात त्यामुळे त्या शिकवू शकतील असं वाटलं. पण सुरुवातीला लकी या महिलांना शिकवायला तयार नव्हत्या.

"मला वाटलंच नाही की या महिला इथे येऊन बसतील, शिकतील. त्यामुळे सुरुवातीला मलाही रस नव्हता. पण राणीमाँ सतत येऊन सांगायची, समजावायची मग मी तयार झाले."

एका 10X10च्या खोलीत अभ्यास चालतो.

फोटो स्रोत, Pravin Thakre

फोटो कॅप्शन, एका 10X10च्या खोलीत अभ्यास चालतो.

आता या इंग्लिश क्लासमध्ये 12-15 विद्यार्थिनी आहेत. त्यांची अभ्यासाची जागा म्हणजे एक 10 बाय 10ची खोली. त्या खोलीत गेलं तरी तिथली विदारकता जाणवेल. दोन पलंगांमध्ये एका पडद्याचा आडोसा. शेअरिंगमध्ये राहाणाऱ्या या महिला, यांना व्यवसाय करायचा असला तरी त्याच खोलीत करणं आहे, म्हणून एक तकलादू आडोसा.

पलंगाखाली आयुष्याची सगळी मिळकत, खोलीत एक आरसा, पडद्यामागून डोकावणारे लहान मुलांचे कुतहलमिश्रीत चेहरे आणि तिथेच 'A फॉर अॅपल, B फॉर बॉल...' घोकणाऱ्या या महिला.

याआधीही इथल्या महिलांना भाषा शिकवण्याचे प्रयत्न झाले होते, पण ते यशस्वी ठरले नाहीत. "इथे अनेक NGO येऊन गेले. पण आम्हाला थोडा हात द्यायचे आणि मध्येच आमचा हात सोडून निघून जायचे. असं अनेकदा झालं, मग कोणावर विश्वासच राहिला नाही. पण आता आम्हीच आहोत एकमेकींना. त्यामुळे आता आम्ही शिकू," लकी म्हणतात.

सगळेच आपल्याला सोडून देतात, फसवतात याचं शल्य त्या महिलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं. त्यांचं दुःख व्यक्त करायला एक कविता म्हणून दाखवतात. त्यातलं एक वाक्य दुःस्वप्नासारखं छळत राहातं.

'हम भी तो देते हैं जय हिंद का नारा, क्या हम भारत की बेटी नही?ओ समाज के रखवालो, क्या इसका जवाब दे पायेंगे आप?'

18 वर्षांच्या मुलीपासून 50-60वर्षांच्या बायकांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. कित्येक जणींना या व्यवसायात येऊन अनेक वर्षं झाली असतील, पण तरीही आजही आपल्याकडे लोकांनी, घरच्यांनी, समाजाने पाठ फिरवली याचं दुःख तेच राहातं.

एखाद्या माणसाला आपल्या लहान लहान इच्छा पूर्ण करण्यासाठी किती झगडावं लागतं, याचं जिवंत उदाहरण. फक्त सही इंग्लिशमध्ये करता यावी म्हणून या महिलांचा हा सगळा आटापिटा. आपल्यालाही आपलं नाव इंग्लिशमध्ये लिहिता यावं इतकीशी इच्छा पूर्ण करायला राणी खान यांना पन्नाशीपर्यंत वाट पाहावी लागली.

"आम्ही काय मर्जीने आलो का व्यवसायात? बाहेर पडायचं म्हटलं तर काय येतं आम्हाला, कोणी काही शिकवायलाही तयार नाही, मग आम्ही याच चिखलात मरायचं का? त्यापेक्षा जे करायचं ते आमचं आम्हीच करू," राणी निग्रहाने सांगतात.

आता या महिलांना इंग्लिश शिकायला मजा येतेय.

'हॅलो, हाऊ आर यू? माय नेम इज धीस,' अशी लहान-लहान वाक्यं मोठ्या धिटाईने म्हणून दाखवतात. 'जॉनी-जॉनी...'ची कविता म्हणतात. चाररेघी वहीमध्ये मन लावून अक्षरं गिरवतात. एखादीचं स्पेलिंग चुकलं की, ती दाताखाली जीभ चावते, लकी टिचर डोळे वटारतात आणि बाकीच्या खुदुखुदू हसतात.

बालवाडीच्या चिमण्या आणि यांच्यात काहीही फरक वाटत नाही.

तकसो

फोटो स्रोत, Pravin Thakre

माणसामाणसात तसा फरक नसतोच. निघताना त्या घरातल्या आरशात बघून मी माझे केस नीट करते, घाम पुसते, पावडर लावते. त्यात आरशात कधी लकी, कधी राणी, कधी रिना कधी डॉली बघते, केस विंचरते आणि पावडर लावते. फरक फक्त नजरेचा असतो.

निघताना प्रश्न येतोच मनात आता काही महिन्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू होईल, मग या शिक्षणाचं कसं? "धंदा तो होगा चालू, लेकिन सिखना नही छोडेंगे. दिन में 1 घंटा तो दे ही सकते है आणि जर कोणी दांडी मारली, तर कान पकडून घेऊन येऊ," लकी माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत उत्तरतात.

लोकांनी भले आम्हाला सोडलं असेल हो, पण आम्ही नाही एकमेकींना सोडणार ही भावना त्या सगळ्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसते.

खोलीमध्ये आवाज घुमत असतात, 'ये है हवालदार का डंडा, बीच हो गई लाईन, बन गया H. ये है दादाजीकी छडी और ये है दादीमाँ का हाथ, बन गया P...!'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)