कोरोनाः सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ – विजय वडेट्टीवार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, FACEBOOK/VIJAY WADETTIWAR
1) सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ - वडेट्टीवार
पुढच्या महिन्यात पगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कर्ज काढण्याची वेळ पडेल अशी परिस्थिती आहे, असं महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. पुणे मिररनं ही बातमी दिलीय.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांना मात्र त्यांनी निश्चिंत राहण्यासही सांगितलं. ते म्हणाले, "जे कोरोनासाठी काम करतायत, त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु इतरांबाबत थोडसं मागे पुढं होऊ शकतं."
चार महत्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते, असं वडेट्टीवारांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "केंद्र सरकारकडून कुठलीच मदत झालेली नाही. PM केअर फंडाला मदत करण्यास सांगणारे 'महाराष्ट्रद्रोही' आहेत."
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजूनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत, असंही वडेट्टीवार म्हणाले.
2) लॉकडाऊन काढला नाही, तर लोक गप्प बसणार नाहीत - उदयनराजे
देशात वाढवलेल्या लॉकडाऊनवर उदयनराजेंनी टीका केलीय. "लॉकडाऊन कधी उठणार? लॉकडाऊन काढला नाही, तर लोक गप्प बसणार नाहीत," असं भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, SAI SAWANT
लॉकडाऊनमुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन किती वाढवणार? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला.
"आगोदरच कोरोनामुळे जगात वातावरण विस्कळीत झालंय. आर्थिक परिस्थिती पाहिली तर चोऱ्यामाऱ्या सुरू होतील, अशी स्थिती आहे. ते काही स्वखुशीने नाही तर पर्याय नसल्याने घडेल.
ही परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे पोलिसांची कुवत पुरेशी नाहीय. जे कोणी सत्तेत असतील त्या प्रमुख मंडळींनी एकत्र बसून यावर तात्काळ तोडगा काढावा," असा सल्लाही उदयनराजेंनी दिला आहे.
3) महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपनीला परवानगी नाही - गडकरी
लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसेत झटापटीनंतर भारतानं चीनच्या 59 अॅपवर बंदी आणली. त्यानंतर आता विविध क्षेत्रात भारतानं चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, "भविष्यात बांधल्या जाणाऱ्या कुठल्याच महामार्गाच्या प्रकल्पात चिनी कंपनी नसेल. प्रकल्पाच्या लिलावातच चिनी कंपन्यांना घेतलं जाणार नाही."
भारतानं तसं धोरणं तयार करून संमत केल्याचं गडकीरांनी सांगितलं. प्रकल्पांच्या लिलावासंबंधी धोरणात सुधारणा करून, त्यात जास्तीत जास्त भारतीय कंपन्या कशा सहभागी होती, यावर लक्ष केंद्रित केलं जाणार असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.
4) उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त चाचण्यांची गरज आहे - अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांमधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात चाचण्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं मत नोंदवलं. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांमधील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना, या तिन्ही राज्यांपैकी उत्तर प्रदेशात सर्वात कमी चाचण्या होत असल्याचं निरीक्षण अमित शाह यांनी नोंदवलं.
या आढावा बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. चाचण्या वाढवण्यासाठीचे आदेश आधीच दिल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी अमित शाह यांना दिली.
5) तबलिगी जमातच्या परदेशी सदस्यांना देशाबाहेर पाठवण्याचा प्रश्नच नाही - सुप्रीम कोर्ट
ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशा तबलिगी जमातच्या परदेशी सदस्यांना देशाबाहेर पाठवण्याचा प्रश्नच नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. द हिंदूने ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीस्थित निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या मरकजला तबलिगी जमातचे परदेशातील सदस्यही उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात कोरोनाची लागण झालेले अनेकजण सापडले होते. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला होता.
तबलिगी जमातच्या सदस्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत, आम्हाला देशाबाहेर जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, व्हिसा संपल्यानंतर देशाबाहेर काढण्याचा नियम असला, तरीही गुन्ह्याची प्रक्रिया सुरू असल्यास देशाबाहेर जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नसल्याचं सुप्रीम कोर्ट म्हणालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








