मुंबई विमानतळ घोटाळाः जीव्हीके रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या पैशांमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली जीव्हीके समुहाचे प्रमुख जीव्हीके रेड्डी आणि त्यांचा मुलगा जी व्ही संजय रेड्डी यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने जीव्हीकेच्या कार्यालयात छापाही टाकला. हैदराबादमध्ये बीबीसी प्रतिनिधी दीप्ती बथिनी यांच्याशी बोलताना जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. FIR मध्ये 13 लोकांची नावं आहेत.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात 705 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डागडुजी आणि देखरेखीसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं जीव्हीके समुहाबरोबर पार्टनरशीप केली होती. या खासगी आणि सार्वजनिक भागिदारीतूनच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनी तयार झाली आहे.
2 एप्रिल 2006 रोजी या दोन्ही संस्थांमध्ये यासाठी करार झाला होता. या कंपनीत जीव्हिकेची 50.5% एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची 26% भागीदारी आहे. उर्वरित शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांकडे आहेत.
भ्रष्टाचार विरोधी कायदा, 1988 आणि आयपीसीच्या गुन्हेगारी कट आणि फसवणूक या कलमांखाली जीव्हीकेविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. जीव्हीके समुहाने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या काही अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मुंबई विमानतळाच्या विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या निधीत भ्रष्टाचार केला. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर FIR नोंदवण्यात आला आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं जीव्हीके समूह यांच्यात झालेल्या करारानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) या कंपनीला मुंबई विमानतळाचं संचालन करायचं होतं आणि या मोबदल्यात 38.7 टक्के महसूल शुल्क स्वरुपात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देणं निश्चित करण्यात आलं होतं. या कंपनीतील जीव्हीके आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या काही अधिकाऱ्याच्या मदतीने रेड्डी यांनी काही निधी इतरत्र वळवल्याचं, सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कामाची खोटी कंत्राटं 9 कंपन्यांकडे असल्याची दाखवून रेड्डी यांनी 2017-18 या कालावधीत 310 कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, या 9 कंपन्यांना कंत्राटं देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात काहीही काम झालं नाही. या बनावट कंपन्यांनी या खोट्या कंत्राटाच्या आधारे खोटं इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं. यामुळे सरकारच्या महसुलात घट झाली, असं सीबीआयचं म्हणणं आहेमुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या रिझर्व्ह फंडातील 395 कोटी रुपयही इतर कंपन्यात वर्ग केल्याचंही सीबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे 310 आणि 395 अशा एकूण 705 कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार आहे. एमआयएएलचे वाढीव खर्च दाखवूनही घोटाळा करण्यात आल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. जीव्हीके कंपनीने आपल्या हैदराबादमधल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही एमआयएएलच्या पे रोलवर ठेवल्याचंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे. एफआयआरमध्ये जीव्हीके ग्रुपवर मुंबई विमानतळाच्या रिटेल स्पेसला स्वस्त दरात भाड्याने देण्याचाही आरोप आहे. या सर्व आरोपांवर जीव्हीकेतर्फे अजूनतरी कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. जीव्हीके हैदराबाद इथला कॉर्पोरेट समूह आहे. हा समूह ऊर्जा, एअरपोर्ट, वाहतूक आणि आरोग्य विज्ञान या क्षेत्रात सक्रीय आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




