इंजिनिअर्स डे : एम. विश्वेश्वरय्यांनी जेव्हा केवळ रेल्वेच्या आवाजावरून अपघाताचा अंदाज व्यक्त केला होता..

एम. विश्वेश्वरय्या
फोटो कॅप्शन, एम. विश्वेश्वरय्या

15 सप्टेंबर. हा दिवस भारतात अभियंता दिन म्हणजेच इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो.

विश्वेश्वरय्या यांचं कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील मोक्षगुंडम या गावचं. म्हणूनच स्थानिक प्रचलनानुसार त्यांच्या नावासमोर मोक्षगुंडम हे नाव जोडण्यात येतं.

विश्वेश्वरय्या यांचे पूर्वज त्यांच्या जन्मापूर्वीच मोक्षगुंडम गावातून म्हैसूर स्टेटमध्ये स्थलांतरीत झाले. येथील कोलार जिल्ह्यात मुद्देनहळ्ळी गावात ते स्थायिक झाले.

विश्वेश्वरय्या यांचे वडील मोक्षगुंडम श्रीनिवास शास्त्री हे वैद्य आणि संस्कृतचे जाणकार होते.

श्रीनिवास आणि त्यांची पत्नी वेंकटलक्षम्मा यांना एकूण सहा अपत्ये होती. पण, विश्वेश्वरय्या 12 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं.

सुरुवातीचं शिक्षण चिकबल्लापूर येथून पूर्ण केल्यानंतर विश्वेश्वरय्या बंगळुरूला गेले. इथे 1881 साली त्यांनी बी. ए. पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं.

पुढे बाँबे स्टेटच्या सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांनी काम केलं. त्यानंतर भारतीय जलसिंचन विभागात ते नोकरीला लागले.

रेल्वेचा 'तो' किस्सा

एम. विश्वेश्वरय्या यांचा रेल्वेबाबतचा एक किस्सा सर्वत्र खूप लोकप्रिय आहे. ब्रिटिश भारतात रेल्वे रेल्वेची सुरुवात होऊन काही वर्षे झाली होती.

अशाच एका रेल्वेत बरेच इंग्रज अधिकारी प्रवास करत होते. त्याच डब्यात एक एम. विश्वेश्वरय्या गंभीर मुद्रेने बसले होते. जणू काही ते एखाद्या गहन विषयावर विचार करत बसले असावेत.

एम. विश्वेश्वरय्या

फोटो स्रोत, INDIANNERVE.COM

सावळा रंग, साधारण उंची, सडपातळ अंगकाठीचे विश्वेश्वरय्या त्यावेळी साध्या कपड्यांमध्ये होते.

तिथे बसलेले इंग्रज अधिकारी आपसांत थट्टामस्करी करत होते. समोर बसलेली व्यक्ती मूर्ख-अशिक्षित आहे, असं त्यांना वाटत होतं.

पण विश्वेश्वरय्या यांचं त्यांच्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. ते आपल्याच विचारात मग्न होते.

दरम्यान, त्या सर्वांमध्ये साध्या वेशात दिसणारे विश्वेश्वरय्या एकाएकी उठून उभे राहिले. त्यांनी रेल्वे रोखण्यासाठी असणारी साखळी अचानक ओढली.

वेगाने धावणारी रेल्वेसाखळी ओढल्यानंतर काही क्षणात थांबली.

यानंतर मात्र इतर प्रवासी विश्वेश्वरय्या यांनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. तरीही विश्वेश्वरय्या त्यांची प्रतिक्रिया ही शांतच होती.

तितक्यात, रेल्वेचे सुरक्षारक्षक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी संबंधित विश्वेश्वरय्या यांना साखळी ओढण्याचं कारण विचारलं.

यावर ते म्हणाले, "इथून पुढे काही अंतरावर रेल्वेचे रुळ उखडलेले आहेत, असा माझा अंदाज आहे."

यावर सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारलं, "तुला कसं कळलं?"

विश्वेश्वरय्या उत्तरले, "गाडीच्या वेगात फरक पडला आहे. तसंच आवाजामुळे पुढे धोका असल्याचं मला समजलं आहे."

यानंतर रेल्वेचा सुरक्षारक्षक विश्वेश्वरय्या यांना घेऊन काही अंतरावर पुढे चालत गेले. काही अंतर गेल्यानंतर तिथे रेल्वेचे रुळ उखडलेले होते. त्याठिकाणचे सगळे नट-बोल्ट आजूबाजूला अस्ताव्यस्त पडल्याचंही दिसून आलं.

योगदान

विश्वेश्वरय्या हे म्हैसूर संस्थानाचे 19वे दिवाण होते. त्यांची 1912 साली या पदावर नियुक्ती झाली होती.

दक्षिण भारतात म्हैसूर संस्थानची ओळख एक विकसित आणि समृद्ध राज्य अशी बनवण्यात एम. विश्वेश्वरय्या यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली.

रेल्वे स्थानक

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी कृष्णराज सागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर सँडल ऑईल अँड सोप फॅक्टरी, म्हैसूर विद्यापीठ, बँक ऑफ म्हैसूर यांसारख्या अनेक संस्थांची उभारणी त्यांच्या प्रयत्नांमधूनच झाली.

यामुळेच एम. विश्वेश्वरय्या यांनी 'कर्नाटकचे भगीरथ' म्हणूनही संबोधलं जातं.

वयाच्या 32 व्या वर्षी विश्वेश्वरय्या यांनी सिंधू नदीसंदर्भात एक आराखडा मांडला होता. सिंधू नदीतून सक्खर गावात पाणी कसं पोहोचवावं, याविषयीची योजना संबंधित आराखड्यात त्यांनी मांडली होती. हा आराखडा सगळ्याच अभियंत्यांना आवडला होता.

सरकारने जलसिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एक समिती बनवली होती. त्याअंतर्गत त्यांनी एक नवीन ब्लॉक सिस्टिम बनवलं.

त्यांनी धरणाचं पाणी रोखणारे स्टीलचे दरवाजे बनवून पाण्याचा प्रवाह थांबवला होता. त्यांच्या या यंत्रणेचं कौतुक ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही केलं होतं.

विश्वेश्वरय्या यांनी हैदराबाद संस्थानातील मूसी आणि एसी या दोन नद्यांचा प्रवाह रोखण्यासाठी धरणाचा आराखडा बनवला.

यानंतर त्यांना म्हैसूर येथे मुख्य इंजिनिअर म्हणून नियुक्त करण्यात आलं.

उद्योग क्षेत्र हाच देशाचा आत्मा आहे, असा विश्वेश्वरय्या यांचा विचार होता.

त्यामुळे त्यांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या सिल्क, चंदन, धातू आणि स्टील या उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी जपान आणि इटली येथील तज्ज्ञांचीही मदत घेतली.

एम. विश्वेश्वरय्या यांनी स्टेट बँक ऑफ म्हैसूर सुरू केली. त्यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर उद्योग-धंदे वाढवण्यासाठी केला. 1918 साली ते दिवाण पदावरून निवृत्त झाले.

विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाबद्दल त्यांना ब्रिटिश भारतीय साम्राज्याचे किंग जॉर्ज पंचम यांनी गौरवलं होतं. त्यांना ब्रिटिश सरकारकडून नाईट कमांडर हा किताब देण्यात आला.

तसंच 1955 साली स्वतंत्र भारतात विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)