नंदुरबार : 42 दिवस मिठात ठेवलेल्या मृतदेहाचं पुन्हा होणार पोस्टमार्टम

मुलीवर बलात्कार होऊन तिचा खून झालेला असतानाही आत्महत्येचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप करत एका बापाने मुलीचा मृतदेह 42 दिवस जतन करून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत्यूनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटून देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवल्याचं स्पष्ट झालं होतं. आता कुटुंबियांच्या मागणीनुसार मुलीचा मृतदेह पुन्हा एकदा पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
बुधवारी (14 सप्टेंबर) नंदुरबार पोलिसांनी आरोग्य पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर कुटुंबियांच्या मागणीनुसार मृतदेह पोस्टमार्टमसाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मुलीवर बलात्कार होऊनही तिचा खून झाला असताना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला, इतकंच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणीच करण्यात आली नाही, असा आरोप मृत मुलीच्या वडिलांना केला होता.
नेमकं काय प्रकरण आहे?
नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील रहिवासी आंतरसिंग काल्या वळवी यांची रंजिला ही मुलगी. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्टला ती माहेरी येत असताना तिला परिचयातील दोन व्यक्ती बळजबरीने घेऊन गेले.
काही वेळाने तिने फोन करून आपल्यावर बलात्कार झाला आहे अशी माहिती फोनवरून नातेवाईकांना दिली.
अत्याचार करणारे चौघंजण आहेत आणि ते जीवानिशी ठार मारतील अशी भीती तिने व्यक्त केली होती असंही तिने सांगितलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे.
ही बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर नंदुरबार पोलिसांनी तिच्या शवविच्छेदनाचे आदेश दिले आहेत.
काही काळातच तिने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगून देखील रंजिलाच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नाही. तिला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने तिची आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडिलांसह कुटुंबीयांनी केला आहे.

शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला. या प्रकरणात संशयित रणजित ठाकरेसह तिघांना अटक केली.
मात्र, मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असतांना पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर आंतरसिंग काल्या वळवी यांनी त्याला अग्निदाह देवुन त्याचे अंतिम संस्कार केले नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलींच्या मृतदेहाला पुरले आहे. या साऱ्या कठीण प्रसंगी खडक्याचे ग्रामस्थ देखील वळवी कुटुंबीयासमवेत भक्कम पणे पाठीमागे उभे आहेत.या 42 दिवसात रंजिलाच्या वडिलांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून आपलं गाऱ्हाणे मांडले आहे. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या कानावरही अंतिम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.
पोलिसांनी काय म्हटलं?
दरम्यान, पोलिसांनी याबाबत बोलताना तपासाच्या अनुषंगाने जे तथ्य समोर आले त्यानुसार अतिरिक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचना देखील त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहे. याचनुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहून पुर्न शवविच्छेदनाची मागणी देखील केली आहे.
"354 हे अतिरिक्त कलम लावलं आहे. आणखी काही कलमं लावण्याची तयारी आहे. मृताच्या नातेवाईंकाचं म्हणणं असेल तर तहसीलदारांनाही पत्रव्यवहार केला आहे. एक महिला आणि एक पुरुष डॉक्टर यांच्याकडून शवविच्छेदन करून घेण्यात येत आहे," असं शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी सांगितलं.
"मुलीने मरणाआधी सगळं सांगितलं आहे. माझ्यावर बलात्कार झाल्याचं तिने सांगितलं. तिने तीनजणांनी काय केलं ते सांगितलं. याचं रेकॉर्डिंग सगळीकडे आहे. तिने ठिकाणही दाखवलं. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत या मुलीवर अत्याचार करणारी जे लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. गुन्हेगारांवर कडक कारवाई होत नाही तोवर मुलीचा मृतदेह मीठ टाकून पुरून ठेवलं आहे. जोवर गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोवर तिचा मृतदेह जाळणार नाही", असं ग्रामस्थ किसन सामा वळवी यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








