लैंगिक हिंसाचार: 'पुरुषांवरही बलात्कार होतो याची मला कल्पनाही नव्हती'

फोटो स्रोत, ALEX FEIS-BRYCE
- Author, एलेनॉर लॉरी
- Role, बीबीसी न्यूज
अॅलेक्स फेईस-ब्रायस 18 वर्षांचे असताना त्यांच्यावर एका अनोळखी व्यक्तीनं एका पार्टीत बलात्कार केला होता.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतः गे असल्याचं जाहीर केलं. लहान गावातून ते शिक्षणासाठी मँचेस्टरला गेले होते.
"मला वाटतं, एखाद्या गे बारमध्ये किंवा पबमध्ये जाण्याची ती माझी दुसरी वेळ होती. माझा मित्र आणि मी काही मित्रांबरोबर होतो. त्यावेळी आम्हाला एका हाऊस पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं. मी अगदी साधा होतो आणि त्यामुळं मला संपर्क वाढवून मित्र वाढवायचे होते. त्यामुळं मी मोकळेपणाने वागत होतो. मी हाऊस पार्टीसाठी तयार झालो होतो, पण माझ्या मित्रानं ऐनवेळी विचार बदलला."
अॅलेक्सला एका ठिकाणी नेण्यात आलं, तिथं त्याला ड्रग्ज दिलं गेलं असं अॅलेक्सचं म्हणणं आहे.
"आम्ही गेलो त्या घराच्या मालकानं माझ्यासाठी एक ड्रिंक तयार केलं. ते प्यायल्यानं मला तंद्री किंवा नशा आल्यासारखं वाटू लागलं. तो मला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्यानंतर काही वेळानं तोही आला. त्यानं माझ्यावर बलात्कार केला. बेडवर माझ्यावर हल्ला झाल्यासारखं मला वाटलं."
दुसऱ्या दिवशी अॅलेक्सला जाग आली तेव्हा विचित्र अनुभव होता. अॅलेक्सनं त्याच व्यक्तिकडून लिफ्ट घेतली आणि ते पुन्हा युनिव्हर्सिटीत आले. जे काही घडलं ते पूर्ण विसरून जाण्याचा प्रयत्न त्यानं केला.
'पोलिसांत तक्रार देणंही अवघड वाटत होतं'
"पुरुषांबरोबर बलात्कारासारखं काही होऊ शकत नाही असं मला वाटत होतं. त्यामुळं माझ्याबरोबर असं काही घडलं नसेल असं मला वाटलं. असं केवळ महिलांबरोबर होऊ शकतं, असाच विचार करायला मला आजवर शिकवलं होतं. त्यामुळं याबाबत पोलिसांत तक्रार देणंही मला कठीण गेलं. कारण यावर कोणी विश्वास ठेवेल असं मला वाटतच नव्हतं," असं अॅलेक्सनं सांगितलं.
अॅलेक्स हे सध्या सर्व्हायव्हर्स युके कंपनीचे मुख्याधिकारी आहेत. ही सामाजिक संस्था बलात्कार झालेल्या किंवा लैंगिक शोषण झालेल्या पुरुष, मुलं आणि लैंगिक ओळख स्पष्ट नसलेल्यांना सहकार्य करते.

फोटो स्रोत, Getty Images
लैंगिक हिंसाचाराच्या बळी या प्रामुख्यानं महिला असतात. पण इंग्लंड आणि वेल्समधील गुन्हे सर्वेक्षणातील एका आकड्यानुसार 100 पैकी एका पुरुषाला एखाद्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला आहे. मार्च 2020 पर्यंतची ही आकडेवारी आहे.
गेल्या वर्षीच ''ब्रिटिश गुन्हेगारी जगतातील बलात्काराचा सर्वात कुप्रसिद्ध गुन्हेगार" रेनहार्ड सिनागा याला 48 पुरुषांना मँचेस्टरमधील विविध क्लबच्या बाहेरून फूस लावून त्याच्या फ्लॅटवर नेल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. अॅलेक्सही याच भागातील बारमध्ये गेला होता. सिनागा यानं पुरुषांना ड्रग्ज देऊन त्यांच्यावर अत्याचार केले होते, तसंच त्याचं चित्रणही केलं होतं.
गे आणि बायसेक्श्युअल पुरुषांना धोका?
सर्व्हायव्हर्स युकेच्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या तथ्यांचा विचार करता, एकूण स्ट्रेट पुरुष लोकसंख्येच्या तुलनेत गे आणि बायसेक्श्युअल (उभयलिंगी) पुरुषांनाच अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचारांचा अधिक धोका असतो.
505 गे आणि बायसेक्श्युअल्सच्या एका सर्वेक्षणात 47% टक्के जणांनी अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराचा अनुभव आल्याची कबुली दिली. तर जवळपास एक तृतीयांश लोकांनी त्यांच्याबरोबर काय घडलं, याबाबत बोलूच शकत नसल्याचं म्हटलं.
बहुतांश वेळा आपल्या जीवनात असलेल्या लैंगिक संबंधांमध्येच जास्त लैंगिक अत्याचार घडत असतात हे मान्य करणं महत्त्वाचं असल्याचं, अॅलेक्स सांगतात.

फोटो स्रोत, ALEX FEIS-BRYCE
"गे किंवा बायसेक्श्युअल पुरुष हे अधिक भांडखोर किंवा हिंसक असतात या विचाराला आम्हाला अधिक बळ द्यायचं नाहीये, तर आम्हाला सहमतीने संबंध ठेवता येतील अशी ठिकाणं हवी आहेत. पण गे बार, सौना, केमसेक्स (ड्रग्सच्या नशेत केला जाणारा सेक्स) अशा ठिकाणी मर्यादा ओलांडल्या जातात. विशिष्ट लैंगिक संबंधांना वाईट न ठरवता माहिती मिळवणं हा या संशोधनाचा आव्हानात्मक भाग होता."
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सातपैकी फक्त एका पीडितानं त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांत दिली. त्यातही ज्यांनी तक्रार दिली त्यापैकी 25 टक्के लोकांवर अविश्वास दाखवण्यात आला किंवा त्यांच्या तक्रारीचा गांभीर्यानं विचार करण्यात आला नाही.
"यात सहमती सर्वात महत्त्वाची आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास केमसेक्स किंवा सामान्य नसणाऱ्या शरिर संबंधांच्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारात किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तिबरोबरच्या शरिर संबंधांमध्ये बदनामी होण्याची शक्यता अधिक असते,'' असं अॅलेक्स म्हणाले. "त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये एखाद्याबरोबर लैंगिक अत्याचार झाले तरी त्याबाबत ते पोलिसांना माहिती देण्याची शक्यता कमी असते."
LGBT+ अँटी अॅब्युस चॅरिटी गॅलप ही संस्थादेखील लैंगिक शोषण किंवा हिंसाचाराचे बळी ठरलेल्यांना मदत करते.
"ज्या पद्धतीनं लैंगिक हिंसाचारावर चर्चा व्हायला हवी, किंवा त्याच्या तक्रारी करायला हव्या त्या पद्धतीनं गे आणि बायसेक्श्युअल कधीही करत नाहीत. तसंच त्यांना योग्यवेळी योग्य मदत पुरवणाऱ्या फार कमी सेवा किंवा संस्था असतात,'' असं या संस्थेच्या मुख्याधिकारी लेनी मॉरीस सांगतात.
"अशा प्रकरणांमध्ये पीडितांपैकी बहुतांश हे कधीही पुढं येऊन बोलणार नाही, हे आम्हाला संशोधनावरून लक्षात आलं आहे. त्यामुळं त्यांना कोणत्याही योग्य मदतीशिवाय स्वतःच या परिस्थितीचा सामना करावा लागेल. पण अशा अत्याचाराच्या प्रकरणातील सर्व पीडितांना हवी असलेली मदत वेळेवर उपलब्ध होईल, आणि त्यांना तिथपर्यंत पोहोचता येईल अशी परिस्थिती आपल्याला तयार करावी लागेल."

फोटो स्रोत, Getty Images
ली (नाव बदललेले) याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तो 15 वर्षांचा होता. त्यानं स्वतःला हानी पोहोचवली होती. त्या काळात तो स्वतःची लैंगिक ओळख स्वीकारण्यासाठी झगडत होता.
पण त्याठिकाणी समुपदेशन करणाऱ्या एका पुरुषानंच त्याचं वर्षभर लैंगिक शोषण केलं. त्यामुळं तो पुढची अनेक वर्ष त्या धक्क्यात राहिला.
"जवळपास दहा वर्ष गेली. या काळात मी एका वेगळ्या पातळीवर पोहोचलो. लैंगिक शोषण किंवा हिंसाचार मला अगदी सामान्य वाटू लागला होता. मी स्वतःची जराही काळजी घेतली नाही.
"मला यातून बाहेर पडायचं होतं. पण उपचार हे माझ्यासाठी अधिक त्रासदायक बनले आणि मी स्वतःसाठी आणखी मोठी समस्या निर्माण केली. या सर्वामुळं मनात खोलवर झालेल्या परिणामाचा सामना करण्यासाठी मी ड्रग्ज आणि सेक्सचा चुकीच्या पद्धतीन वापर केला."
ज्यावेळी ली यानं खरंच मदत मागितली त्यावेळी त्याच्याबरोबर लैंगिक अत्याचार म्हणावं असं नेमकं काय झालं होतं, हे त्याला स्वतःलाही कळत नव्हतं.
"त्यानं माझ्याबरोबर जे केलं त्याकडं कदाचित मी चुकीच्या पद्धतीनं पाहिलं. त्यानं हिंसा केली नाही, मला मारहाण केली नाही किंवा माझ्यावर रेपही केला नाही, त्यामुळं कदाचित माझ्याकडून पुढे जाण्यासाठी परवानगी मिळाली असावी."
आपणही जर लैंगिक अत्याचार किंवा हिंसाचाराचा सामना करत असाल तर आपल्यासाठी बीबीसी अॅक्शन लाईनवर मदत किंवा सहकार्य उपलब्ध आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








