'इंडिया' नावाला जिना यांचा विरोध का होता? त्यांनी या नावाला दिशाभूल करणारं म्हटलेलं, कारण

 जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना.
    • Author, ताबिंदा कोकब
    • Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम, इस्लामाबाद

हिंदुस्थान, इंडिया किंवा भारत… ही तीन नावं भारतासाठी वापरली जातात. अधिकृत नाव 'इंडिया' असलं तरी आता इंडियाऐवजी फक्त 'भारत' असं नाव देण्याची मागणी जोर धरत आहे.

याआधीही देशात अशी मागणी करण्यात आली आहे, पण विशेष म्हणजे फाळणीच्या वेळी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी 'इंडिया' नावावर आक्षेप घेतला होता.

त्यांनी याला दिशाभूल करणारं म्हणजे 'भ्रामक' म्हटलं.

इतिहासकार लिहितात की, सुरुवातीच्या दिवसांपासून 'भारत' या नावावरून देशभरात वेगवेगळे विचारप्रवाह होते.

ब्रिटीशांनी उपखंडातील त्यांच्या साम्राज्याला नाव देण्यासाठी 'इंडिया' हा शब्द निवडला, जो प्रत्यक्षात ग्रीक शब्द आहे.

हे नाव ब्रिटिशांनी दिलंं होतं, जी वसाहत कालखंडाची ओळख आहे, या मुद्द्यावरून संविधान सभेत त्याच्या वापरावर आक्षेप घेण्यात आला होता.

ब्रिटिशांनी दिलेलं नाव कुणीही स्वीकारणार नाही

इतिहासकार जॉन की त्यांच्या 'इंडिया: ए हिस्ट्री' या पुस्तकात लिहितात की, 'इंडिया' या शब्दावर कोणताही वाद नव्हता, कारण 'पाकिस्तान' हे इस्लामिक नाव मोहम्मद अली जिना यांनी नव्या मुस्लिम देशासाठी निवडलं होतं.

जॉन की लिहितात, "स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात 'भारत' हे चांगलं नाव होतं, कारण ' इंडिया' या शब्दावर वसाहतवादाचा खूप प्रभाव होता."

त्यांच्या मते संपूर्ण संस्कृत साहित्यात 'इंंडिया'चा उल्लेख कुठेही आलेला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. हे नाव बौद्ध किंवा जैन ग्रंथात आढळत नाही.

याशिवाय हा शब्द दक्षिण आशियातील इतर कोणत्याही भाषेत नाही.

जॉन की यांच्या मते, 'मोहम्मद अली जिना यांचा विश्वास होता की ब्रिटिश सरकारनं दिलेलं 'इंडिया' हे नाव कोणताही देश स्वीकारू इच्छित नाही.

पण त्यांचा गैरसमज दूर झाला, जेव्हा आपल्या देशाला 'इंडिया' म्हणण्याची नेहरूंची मागणी शेवटचे ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी मान्य केली.

ते पुढे लिहितात की, 'माउंटबॅटन यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना (नेहरू आणि काँग्रेस पक्ष) स्वतःला 'इंडिया' म्हणवून घेणार आहेत हे कळलं तेव्हा जिना खूप रागावले. हा शब्द वापरल्यानं उपखंडाच्या श्रेष्ठतेची भावना येते, जी पाकिस्ताननं कधीही स्वीकार केली नसती.

मोहम्मद अली जिना

फोटो स्रोत, Getty Images

इतिहासकार जॉन की यांच्या मते, मोहम्मद अली जिना यांच्या आक्षेपाचे एक प्रमुख कारण हे होतं की, मुळात सिंधू नदीच्या आसपासच्या भागाला 'भारत' म्हटलं जात असे, त्यातील बहुतांश भाग पाकिस्तानात होता.

इतिहासकार आयशा जलाल यांच्या मते, फाळणीनंतर माउंटबॅटन ' युनियन ऑफ इंडिया ' आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे गव्हर्नर-जनरल म्हणून काम करत राहण्यास तयार होते.

आयेशा जलाल लिहितात की, मुस्लिम लीगचे नेते पाकिस्तानला वेगळा आणि स्वतंत्र देश म्हणून ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल खूप घाबरले होते.

त्यांनी काँग्रेसच्या हेतूंवर अविश्वास व्यक्त केला आणि मुस्लीम लीग पक्ष हा इंडियानं 'युनियन' ही पदवी स्वीकारल्याचा निषेध करत राहिला.

इंडिया हे भ्रामक नाव आहे का?

'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दक्षिण आशियातील कायदे या विषयाचे प्राध्यापक मार्टिन लाऊ यांनी त्यांच्या 'इस्लाम अँड द कॉन्स्टिट्यूशन फाउंडेशन ऑफ पाकिस्तान' या शोधनिबंधातील एका पत्राचा संदर्भ दिला आहे.

हे पत्र जिनांच्या वतीनं भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना लिहिलं होते. या पत्रात जिना यांनी 'इंडिया' हे नाव दिशाभूल करणारं आणि गोंधळात टाकणारं असल्याची तक्रार केली होती.

सप्टेंबर 1947 मध्ये लंडनमध्ये भारतीय कलेचं प्रदर्शन भरवण्यात आलं. माउंटबॅटन यांनी मोहम्मद अली जिना यांना या प्रदर्शनाचं मानद अध्यक्ष होण्यासाठी आमंत्रित केलं.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

लाऊ लिहितात की मोहम्मद अली जिना यांनी 'इंडिया' हे नाव वापरल्यामुळं आमंत्रण नाकारलं.

त्यांनी माउंटबॅटन यांना लिहिलं की, "काही रहस्यमय कारणास्तव हिंदुस्थाननं 'इंडिया' हा शब्द स्वीकारला आहे, ही खेदाची गोष्ट आहे, जी निश्चितच दिशाभूल करणारं आणि गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे."

भारताची फाळणी होण्यापूर्वीच, 'मुस्लिम लीग'नं ''यूनियन ऑफ इंडिया' या नावावर आक्षेप घेतला होता, असं का केलं गेलं याबद्दल फारस स्पष्टीकरण दिलं गेलं नाही.

नाव बदलण्यासाठी कायदेशीर प्रयत्न

सप्टेंबर 1949 मध्ये, फाळणीनंतर दोन वर्षांनी, जेव्हा भारतीय संविधान सभेनं संविधानाच्या मसुद्यावर चर्चा सुरू केली, तेव्हा देशासाठी 'हिंदुस्थान' नावाचाही विचार करण्यात आला, पण तो नाकारण्यात आला.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये इंग्रजी आवृत्तीमध्ये 'इंडिया' आणि 'भारत' आणि हिंदी आवृत्तीमध्ये 'भारत' हे शब्द वापरले आहेत.

सर्वोच्च न्यायालय

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची इमारत

वरवर पाहता आत्तापर्यंत 'इंडिया' या नावाला खरोखरच कोणत्याही आव्हानाला सामोरं जावं लागल नव्हतं आणि ते माध्यमांमध्येही वापरलं जाऊ लागलं.

मात्र, राजकीय चढ-उताराच्या काळात इंडियाऐवजी 'भारत' हे नाव कायम ठेवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली.

'इंडिया' आता भारत होईल का?

2020 मध्येही इंडियातून देशाचं नाव बदलून फक्त भारत करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यानं न्यायालयाला सांगितलं की, 'इंडिया' हे नाव ग्रीक भाषेतील 'इंडिक' या शब्दावरून आलं आहे. हे नाव राज्यघटनेतून वगळण्यात यावं.

'भारत'चं नाव बदलून फक्त भारत असं करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये सुधारणा करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी विनंतीही याचिकाकर्त्यानं न्यायालयाला केली.

नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना

फोटो स्रोत, Getty Images

सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळताना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

भारत नाव घटनेत आधीच नमूद आहे, असं न्यायालयानं म्हटलं होतं. संविधानात 'इंडिया दॅट इज भारत' ( इंडिया म्हणजे भारत ) असं लिहिलं आहे.

सध्या भारतात ही चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. भारताच्या G-20 शिखर परिषदेच्या निमित्तानं भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी पाठवलेल्या डिनरच्या निमंत्रणावर 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असं लिहिण्यात आल्यानं त्याची सुरुवात झाली.

सध्या नावाच्या मुद्यावरून हा वाद भारतात राजकीय तणाव निर्माण करत आहे. शेवटी काय घडेल हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागेल.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)