इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक 'शक्य तिथे' एकत्र लढवणार

इंडिया

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्ल्युसिव्ह अलायन्स अर्थात INDIA आघाडी देशातील आगामी लोकसभा निवडणूक शक्य तितक्या एकत्रितरित्या लढवणार, असा निर्णय घेण्यात आला आहे.

इंडिया बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या दोनदिवसीय बैठकीस देशभरातील अनेक नेते हजर आहेत. यावेळी सदर ठराव मंजूर करण्यात आला.

यानुसार, इंडिया आघाडी शक्यतो देशभरात सर्वत्र एकत्रित निवडणूक लढवेल. त्यासाठीची जागावाटप प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल. हे काम शक्त तितके लवकर संपवण्याचं धोरण घटकपक्षांचं असणार आहे.

तसंच, आगामी काळात निवडणूक प्रचारादरम्यान सर्व पक्ष एकत्रितरित्या प्रचारही करतील आणि देशातील नागरिकांचे मुद्दे उपस्थित करतील, असंही यामध्ये म्हटलं आहे.

जुडेगा भारत, जितेगा भारत हे ब्रीदवाक्य आणि थिम घेऊन इंडिया आघाडीचा प्रचार करण्यात येईल, असंही या ठरावात सांगण्यात आलं आहे.

केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांमध्ये इंडिया आघाडी एकत्र लढवणार की नाही याबाबत एकमत होऊ शकलेलं नाही. यामुळे as far as possible प्रयत्न करण्याचं बैठकीत ठरल्याचं, चर्चेत सहभागी झालेल्या एका नेत्याने सांगितलं.

या राज्यांमध्ये काही जागांवर इंडिया आघाडी एकास एक निवडणूक लढवण्याची शक्यता तर काही जागांवर स्वबळावर यावरही बैठकीत चर्चा झाली.

प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी़ची समन्वयक समिती तयार केली आहे. यानंतर जागा वाटपासाठी प्रत्येक राज्याची समिती तयार केली जाणार.

लोगो बाबत अनेकांनी काही सूचना दिल्या आहेत यामुळे त्यात बदल केले जाणार आहेत.

कोणीही एक संयोजक ठरवला जाऊ नये अशी बैठकीत चर्चा, सामूहीक लढणार अशी सर्वांची भूमिका. अंतिम निर्णय पुढच्या बैठकीत होऊ शकतो.

समन्वय समितीची स्थापना

इंडिया आघाडीच्या मुंबई येथील बैठकीत समन्वय समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. या समितीत एकूण 13 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

समितीत महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनाही समितीत स्थान मिळालेलं आहे.

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीतील सदस्यांची नावे खालीलप्रमाणे -

  • के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस
  • शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
  • टी. आर. बालू, द्रविड मुनेत्र कळघम
  • संजय राऊत, शिवसेना (उबाठा)
  • तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दल
  • अभिषेक बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस
  • राघव चड्डा, आम आदमी पक्ष
  • जावेद अली खान, समाजवादी पक्ष
  • लल्लन सिंह, जनता दल (संयुक्त)
  • हेमेंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चा
  • डी राजा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
  • ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्स
  • महबुबा मुफ्ती, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी

इंडियाची बैठक यशस्वी – मल्लिकार्जून खर्गे

मुंबईत होत असलेली विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक यशस्वी ठरली आहे, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केलं आहे.

मल्लिकार्जून खर्गे

फोटो स्रोत, Getty Images

या बैठकीचं औपचारिक उद्घाटन मल्लिकार्जून खर्गे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते म्हणाले, “आमच्या पटना आणि बंगळुरू येथे झालेल्या दोन्ही बैठका यशस्वी ठरल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये ज्या प्रकारे इंडियावर हल्लाबोल केला, आपल्या देशाच्या नावाची तुलना एका दहशतवादी संघटनेशीही केली, तसंच गुलामीचं प्रतीकही संबोधलं, त्यावरून याचा अंदाज येऊ शकतो.”

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

ते पुढे म्हणाले, “140 कोटी भारतीय आपलं दुःख कमी होण्याच्या अपेक्षेने आमच्याकडे पाहत आहेत. आगामी काळात आमच्यावर अनेक हल्ले होतील. ही आघाडी पुढे निघेल, तशी सरकारमार्फत सूडबुद्धीची कारवाई वाढणार आहे.”

सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बैठकीनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडी दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. ते पाहून सत्ताधारी आघाडीत घबराट निर्माण झाली आहे. आमची ही आघाडी देशप्रेमींची आघाडी आहे. आम्ही आमच्या आघाडीचंही नाव इंडिया म्हणून दिलं. आता इंडियाचे विरोधी कोण आहेत, हेसुद्धा तुम्हाला माहीत आहे."

मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं, मुंबईत झालेली बैठक ही अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाले. आम्ही बंगळुरू येथे एक बैठक घेतली, त्यापूर्वी पटना येथेही झाली होती. त्यापूर्वीपासून आमची तयारी सुरू होती. सर्व जण मिळून आम्ही एक आराखडा ठरवला. त्यानंतर बैठका घेणं सुरू केलं.

एक अजेंडा ठरवून बंगळुरू आणि मुंबईत आम्ही आमचं म्हणणं स्पष्ट केलं. सर्वांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे महागाई कशी कमी करावी, बेरोजगारीविरोधात कसं लढावं.

मोदींच्या काळात 100 रुपये दर वाढवतात आणि 2 रुपये कमी करून किंमत कमी केल्याचं सांगितलं जातं. हे सरकार गरिबांच्या विरोधात काम करतं. मोठमोठ्या उद्योगपतींसोबत मिळून ते राहतात. गरीबांच्या वाट्याचे सुमारे 75 हजार कोटी रुपये त्यांनी उद्योगपतींच्या खिशात घातले. हे थांबवण्यासाठी इंडिया आघाडीचा विजय होणं आवश्यक आहे.

नितीशकुमार म्हणाले, भाजपचं काम कमी आणि गवगवा जास्त आहे. त्यांना देशाच्या इतिहासाला बदलायचं आहे, ते आपण होऊ द्यायचं नाही. प्रत्येक मुद्दा हिंदू-मुस्लीम बनवला जातो. पण देश हा सर्वांचाच आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन हा देश चालवायचा आहे. आता केंद्रात जे आहेत, त्यांचा पराभव होईल.

“इंडिया आघाडी बनल्यानंतर ही मोडण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले जातील. पक्षांमध्ये भांडण झाल्याचं पसरवलं जाईल. पण तसं काही नाही. सर्वांमध्ये एकमत आहे. सर्व जण हुकूमशाही सरकारला हरवण्यासाठी एकत्र आले आहेत.”

लालू प्रसाद यादव यांनीही आपल्या भाषणातून कार्यक्रमात रंगत आणली.

आपण सर्व जण एकत्र नसल्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतला. आपण वेगळे असल्यामुळेच ते निवडून येऊ शकले. त्यांनी विदेशातून काळा पैसा आणण्याचं खोटं आश्वासन दिलं. शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवून द्यावं, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं.

28 पक्षांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित

मुंबईतल्या ग्रँट हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. 28 पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत.

इंडिया आघाडीच्या या बैठकीत इस्रोच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला आहे.

इस्रोच्या आजी-माजी शास्त्रज्ञांचं बैठकीत अभिनंदन करण्यात आलं आहे.

"इस्रोची क्षमता आणि विस्तार करण्यासाठी सहा दशकांचा कालावधी लागला. चंद्रयान 3 च्या यशानंतर आम्ही उद्याच्या आदित्य L1 लाँचसाठाही उत्साहीत आहोत. इस्रोच्या कामगिरीमुळे समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन दृढ होण्यास मदत होईल, तरुणांनाही प्रेरणा मिळेल अशी आम्हाला आशा आहे," अशा भावना इंडिया आघाडीच्या बैठकीत मांडण्यात आल्या.

नरेंद्र मोदी सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. त्या दरम्यान ‘एक राष्ट्र एक निवडणूक’संदर्भातली घटनादुरुस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यावर इंडियाच्या बैठकीआधी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.

इंडिया आघाडीला घाबरून मोदींनी ‘एक राष्ट्र एक निवडणूक’चा घाट घातल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“आम्हाला वन नेशन वन इलेक्शन पेक्षा फेअर इलेक्शन पाहिजे. तोच आमचा नारा आहे. फेअर इलेक्शनची आमची मागणी टाळण्यासाठीच त्यांनी हा वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणला आहे. निवडणूक पुढे ढकलण्याचं हे त्यांचं षडयंत्र आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राहुल गांधी

गौतम अदानी यांच्या कंपनीत गुंतवलेला पैसा कुणाचा? राहुल गांधींचा सवाल

गौतम अदानी यांच्या कंपनीत गुंतवण्यात आलेला पैसा कुणाचा आहे? हा पैसा प्रथम भारतातून बाहेर गेला. अदानी यांच्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढवण्याच्या हेतूने हाच पैसा पुन्हा भारतात आणला गेला. या संपूर्ण प्रकरणात काहीतरी चुकीचं सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

आज (31 ऑगस्ट) राहुल गांधी हे INDIA बैठकीसाठी मुंबई येथे दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी सर्वप्रथम पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “G-20 हे भारताच्या जगातील स्थानाबाबत आहे. पण,जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी भारतासारख्या देशाने पारदर्शकता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.”

ते म्हणाले, “आजच एका वृत्तपत्रात एक बातमी आली. त्यामध्ये अदानी ग्रुपने आपल्याच कंपनीत गुप्तपणे काही गुंतवणूक केली आहे का, असा प्रश्न या बातमीतून विचारण्यात आला आहे. कोट्यवधी पैसा भारतातून बाहेर गेला. तिथून फिरवून तो परत भारतात परत आणला गेला. हा कुणाचा पैसा आहे, हा पहिला प्रश्न आहे.”

“दुसरा प्रश्न म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंट विनोद अदानी हा आहे. तो गौतम अदानी यांचा भाऊ आहे. त्यासह नासर अली शबान अली, चीनची एक व्यक्ती आहे चँग चिंग लिंग. या सर्वांची यामध्ये काय भूमिका आहे, हे स्पष्ट व्हायला हवं,” असंही त्यांनी म्हटलं.

सोनिया गांधी राहुल गांधी

फोटो स्रोत, ani

या संपूर्ण प्रकरणात काहीतरी चुकीचं सुरू आहे. आपण एक पारदर्शक अर्थव्यवस्था आहोत, असं दाखवण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचा एक उद्योगपती आपल्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करतो.

तो पैसा विमानतळ, बंदरे अशा व्यवसायांमध्ये वळवतो. या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. त्यासाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) बनवण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी मुंबईत

इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी आज मुंबईत दाखल झाले.

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चा सामना करण्यासाठी INDIA ही विरोधी पक्षांची आघाडी बनवण्यात आली आहे.

या आघाडीची बैठक मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या बीकेसी परिसरातील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीस 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

पटना आणि बेंगळुरूनंतर इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक मुंबईत होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने ही बैठक महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) हे करत आहेत.

या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी काल (30 ऑगस्ट) शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उबाठा) गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. तसंच, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तसेच शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते.

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी नेते दाखल होण्यास कालपासून सुरुवात झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येताच सर्वप्रथम मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

इंडिया बैठक

कोणते नेते उपस्थित?

देशातील 26 राजकीय पक्षांचे प्रमुख आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे अनेक नेते 31 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर आणि मुंबईतील ग्रँड हयात हाॅटेल परिसरात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

इंडिया आघाडी बैठक

फोटो स्रोत, facebook

पोलीस सुरक्षेच्यादृष्टीने काही दिवसांपूर्वी मविआच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती.

31 तारखेला मुंबईत 150 हून अधिक राजकीय नेते मुंबईत दाखल होणार आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (JDU) अध्यक्ष नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल काॅन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आणि इतर अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)