गिरनारचा इतिहास : महाभारताच्या हजारो वर्षांपूर्वी या पर्वताला जन्म देणारं असं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
गिरनार पर्वत हा जुनागडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. हा गुजरातमधील गिरिमाला पर्वतांचा समूह आहे.
गिरनार पर्वत हे हिंदूंचे पवित्र स्थान आहे आणि जैन धर्मियांच्या पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
धार्मित मान्यतांनुसार, पुराणात आणि महाभारतात वर्णन केलेल्या भगवान कृष्णाची द्वारका नगरी बुडण्याशी आणि जलमग्न होण्याशी या स्थानाचा संबंध जोडतात. मात्र, महाभारताच्या हजारो-लाखो वर्षांपूर्वी गिरनार पर्वताला जन्म देणारं असं काय घडलं? देशाचं रक्षण करणाऱ्या हिमालय पर्वतांपेक्षा गिरनार हा जुना आहे.
एका शतकाहून अधिक केलेल्या अभ्यासादरम्यान (सुमारे 1880 पासून), शास्त्रज्ञांना शास्त्रोक्त पद्धतीनं गिरनार टेकडी आणि त्याच्या सभोवतालच्या टेकड्या कशा तयार झाल्या आणि त्याचं वय किती आहे, याचा अंदाज लावता आला.
गिरनार पर्वत किती जुना आहे?
गिरनार हे सौराष्ट्रातील डोंगराळ प्रदेशातील दक्षिणेकडील टेकड्या म्हणून ओळखल्या जातात, ज्या मंग्रोल ते गिरनारपर्यंत पसरलेल्या आहे.
'विद्यापीठ ग्रंथनिर्माण मंडळा'च्या 'गुजरातचा आर्थिक आणि प्रादेशिक भूगोल' या पुस्तकात डॉ. मंजुलाबेन दवे-लेंग लिहितात की, गिरनार डोंगर 24 किलोमीटर लांब आणि साडेसहा किलोमीटर रुंद परिसरात पसरलेला आहे. या टेकड्यांची सरासरी उंची 250 ते 640 मीटर आहे.
गुरू गोरखनाथाचे शिखर सर्वात उंच आहे, त्याची उंची अंदाजे एक हजार 117 मीटर आहे. दातार शिखर 847 मीटर उंच आहे. याशिवाय अंबाजी, दत्तात्रेय, कालका आणि ओघाड ही शिखरं आहेत.
गीर प्रदेशातील इतर टेकड्यांमध्ये सासन, तुलसीश्याम आणि नंदीवेल इत्यादींचा समावेश होतो.
गॅब्रो, लॅम्प्रोफायर, लिम्बराइट, डायराइट आणि सायनाइट ते ग्रॅनोफायरपर्यंतचे खडक गिरनार आणि त्याच्या टेकड्यांमध्ये आढळतात. या दगडांचा अभ्यास करून त्याच्या वयाचा अंदाज लावता येतो.
इतिहासकार डॉ. प्रद्युम्न हे 'गिरनारचा इतिहास' अनुश्रुती (पृष्ठ-1) मध्ये लिहितात, 'पूर्वी गिरनारच्या जागी एक समुद्र होता, जो हळूहळू पुढे सरकत वेरावल पर्यंत पोहोचला. त्यामुळे आजही जुनागडमध्ये काही प्रकारच्या सागरी वनस्पती आढळतात.'

फोटो स्रोत, HTTPS://JUNAGADH.NIC.IN/
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाचे संशोधक डॉ. जॉन वेनर यांनी त्यांच्या 'गिरनार' या पुस्तकाच्या पाचव्या खंडात या पर्वताच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी विविध अभ्यासांचं संकलन केलं आहे. भूगर्भशास्त्रज्ञ अवि मुरली यांच्या मते, 'गिरनार बेसाल्ट खडकांमध्ये महाद्वीपीय अग्निज खडकांपेक्षा भिन्न गुणधर्म आहेत आणि सागरी बेसाल्टशी अनेक समानता आहेत.' एम एन बालसुब्रमण्यम आणि एनजे स्नेलिंग यांनी गिरनारच्या क्षारीय खडकांसाठी 5.7 दशलक्ष वर्षांचा कालावधी अपेक्षित धरला आहे."
जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनात ग्रेबर प्रकारातील दगडांचे नमुने 6 कोटी 36 लाख वर्षे जुने, डायराइट खडकाचे नमुने 6 कोटी 20 लाख वर्षे जुने, सायनाइट प्रकारचे नमुने 5 कोटी 83 लाख वर्षे जुने आहेत.
या भागात घडलेल्या भूवैज्ञानिक घटनांचा कालगणना वेगळ्या आहेत. गिरनार हा केवळ पर्वतच नाही तर डोंगर-टेकड्यांची एक श्रृखंला आहे. त्यामुळं त्याच्या प्रत्येक टेकड्यांचं वय वेगळं आहे.
तसंच, काही भूवैज्ञानिकांच्या अभ्यासातून अंदाजे 12 ते 20 दशलक्ष वर्षांच्या अंदाज लावला आहे. मात्र, गिरनारचं किमान वय साडेपाच लाख वर्षे असावं असा अंदाज आहे. त्यामुळं तो हिमालयापेक्षाही जुना आहे.
लाखो वर्षांपूर्वी काय घडलं?
आजूबाजूच्या भूभागापेक्षा 300 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीचा कोणताही भूभाग आणि त्यातील बहुतांश भाग उतरता , कमी किंवा अधिक उतार असलेला असतो, ज्याच्या श्रृखंलेचा वरचा (शिखर) भाग उंच असतो. त्याला पर्वत म्हणतात.
नकाशावर गुजरातचा प्रदेश 1960 मध्ये अस्तित्वात आला, परंतु भौगोलिकदृष्ट्या तो खूप जुना आहे. 'गुजरातचा आर्थिक आणि प्रादेशिक भूगोल' मध्ये डॉ. मंजुलाबेन दवे-लेंग सांगतात की एकूण 17 भूवैज्ञानिक उपविभागांपैकी गुजरातमध्ये फक्त 8 प्रकार आढळतात, त्यापैकी फक्त काही विखुरलेले आढळतात.
गुजरातमध्ये आदिजीव युग आणि द्वितीय जीव युगाचे क्षेत्र आहेत, परंतु यातील प्रथम जीवयुगातील क्षेत्र इथं आढळत नाही. याशिवाय गुजरातमध्ये टर्टियरी कालखंडाचं क्षेत्र आढळतं.
सौराष्ट्रातील मूळ खडक हे ग्रॅनाईट प्रकारचे होते, परंतु नंतर भेगा पडणे आणि त्यातून लाव्हा प्रवाह या दीर्घ प्रक्रियेमुळं बेसाल्ट प्रकारची भूस्वरूप तयार झाली. गीर आणि इतर डोंगराळ भाग ग्रॅनाइटपासून बनलेले आहेत.
गिरनार पर्वत 'लॅकोलिथ' प्रकारचा मानला जातो. 'गुजरातचा आर्थिक आणि प्रादेशिक भूगोल' मध्ये भौतिक भूगोलाचं स्पष्टीकरण देताना प्रा. कांजीभाई जसानी आणि प्रा. महेंद्रकुमार शहा सांगतात की, पृथ्वीच्या अंतर्गत उष्णता आणि दाबामुळं लाव्हा आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. फक्त बाह्य आवरणाखाली पसरतो. पण, अंतर्गत हालचालीमुळं, ते पृष्ठभागावर पर्वतासारखं स्वरूप धारण करते. त्याच्या आकारावरून त्याला 'घुमटकार' पर्वत असंही म्हणतात.
या प्रकारच्या पर्वतांमध्ये हजारो वर्षांचं हवामान, पाऊस, मातीची धूप, पाणी इत्यादींमुळे बाहेरील थर क्षीण होतात, ज्यामुळं आतील भागात उघडा पडतो आणि वितळलेल्या लाव्हाचं निरीक्षण करता येतं. गिरनार आणि आसपासच्या डोंगराळ प्रदेशात अनेक 'डाइक' ( जेव्हा मॅग्मा उभ्या भेगेमध्ये जावून त्यात घट्ट होतो तेव्हा त्याला डाइक म्हणतात.)आढळतात.
उदाहरण म्हणून आपण ट्रॅफिक सेफ्टी डिव्हाइस हेल्मेटच्या संदर्भात ही घटना समजून घेऊया. भूगर्भातील तयार लावा आणि वायू डाईकद्वारे भूगर्भातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, परंतु वरच्या आवरणाच्या ताकदीच्या तुलनेत कमी अंतर्गत दाबामुळं उद्रेक होऊ शकत नाही. तरीही ते बाहेरून प्रकट होतं. ज्याप्रमाणे हेल्मेटची झीज झाल्यानं कालांतरानं रंगाचा बाह्य थर निधून जातो आणि त्याचा आतील थर उघडा पडतो , त्याचप्रमाणे पृथ्वीच्या वरच्या थराची धूप झाल्यान लावा थर दिसू लागतो.
डेव्ह-लँग लिहितात की गुजरातचा एक मोठा प्रदेश द्वितीय जीवन युगाच्या ज्युरासिक कालखंडात, म्हणजे सुमारे 15 दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याखाली बुडल्याचं मानलं जातं आणि त्या काळातील खडक देखील गुजरातमध्ये आढळतात.

फोटो स्रोत, Getty Images
कच्छ-सौराष्ट्रातील सर्वात जुना थर ज्युरासिक काळातील आहे, तो समुद्रतळाखाली आहे. त्यावेळचे भूगर्भशास्त्र कच्छमध्येही आढळतं, म्हणून असं मानलं जातं की त्या वेळी समुद्र पश्चिमेकडे मादागास्करपर्यंत पसरला होता.
ज्युरासिक कालखंडाच्या उत्तरार्धात, मेसोझोइक युगाच्या दुसर्या टप्प्यात, किनारपट्टीच्या प्रदेशांची निर्मिती झाली आणि नंतर समुद्राचं पाणी पुन्हा भूभागावर वाढलं. दुसऱ्या बायोजीओसीनच्या (क्रिटेशियस कालावधी) शेवटच्या टप्प्यात, म्हणजे सुमारे 12 दशलक्ष वर्षांपूर्वी, कच्छ, सौराष्ट्र आणि नर्मदा खोर्यांमध्ये महासागर खूप अंतरावर गेला.
भारतात सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एक मोठी भूवैज्ञानिक घटना घडली. गुजरातसह पश्चिम भारतात भयंकर स्फोट झाला, जो दक्षिण राजस्थान ते धारवाड आणि सौराष्ट्र ते नागपूरपर्यंत पसरला. त्या वेळी, भूगर्भातून अग्निमय लावा बाहेर पडला आणि शेकडो मीटर जाडीचे सपाट थर तयार झाले. हे थर काही ठिकाणी 1800 मीटर पर्यंत जाड होते, ज्यामुळं दक्षिण भारताचं पठार तयार झालं. जे 'डेक्कन ट्रॅप' म्हणून ओळखले जातं. येथे 'ट्रॅप' हा शब्द स्वीडिश शब्द 'ट्रॅप्स' वरून आला आहे, ज्याचा अर्थ 'जिना' असा होतो. जे त्याच्या भूवैज्ञानिक स्वरूपाकडे निर्देश करतं.
जपानी संशोधक आई. कानेओका आणि एच. हरामुरा डायराइट खडकांच्या अभ्यासावर आधारित असा अंदाज आहे की डेक्कन ट्रॅपची निर्मिती 6.53 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली होती.
गिरनारमध्ये लावा प्लेटचे अवशेष सापडतात. गिरनारमध्ये प्लुटोनिक अग्निजन्य खडक देखील आढळतात. क्षितिजाच्या समांतर पसरणारा बेसल्टिक लावा टर्टियरी कालखंडापासून आणि त्यापूर्वीच्या खडकांमध्ये आढळतो. या घटनेच्या वेळेत अधिक किंवा उणे पाच दशलक्ष वर्षांची त्रुटी असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.
त्यानंतर, टर्टियरी कालखंडा दरम्यान, समुद्र पुन्हा एकदा गुजरातच्या किनारपट्टीवर फिरला आणि कच्छमधील डेक्कन ट्रॅप क्षेत्र पाण्याखाली गेला. त्यामुळं भरूच आणि सुरत जिल्ह्यांत आणि खंभातच्या आखातात खडकांचे थर आढळतात.
या भागाचा भूगोल सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी, आपण पारदर्शक काचेच्या कंटेनरमध्ये निळी पावडर घाला, पांढऱ्या पावडरने भरा. इथं निळा रंग गुजरातचा भूभाग पाण्याखाली असतानाचा काळ दर्शवतो, तर पांढरा रंग नर्मदेपर्यंत समुद्र पोहोचला होता तेव्हाचा काळ दर्शवतो.
यानंतर तपकिरी रंग काचेच्या डब्यात ठेवा. जे डेक्कन ट्रॅप काळातील लावाची पातळी दर्शवतो. नंतर भांड्याच्या काठावर पांढऱ्या पावडरचा थर लावा. जे किनारपट्टीवरील समुद्राच्या पाण्याच्या प्रतिनिधित्व करतं.
वरून पात्राकडे पाहिल्यास फक्त तपकिरी रंगाचा पहिला थर दिसतो, परंतु खाली निळा आणि पांढरा थर दबलेला असतो. या थरांच्या आधारे, संशोधक गुजरातच्या वेगवेगळ्या प्रदेशांचं वय आणि कालक्रमानुसार निष्कर्ष काढतात.
द्वारका, समुद्र आणि गिरनारमधील संबंध काय?
गिरनार पर्वताला 'गिरिवार', 'उज्जयंत' असंही म्हणतात आणि रेवंतकुंडावरील पर्वताला 'रेवंताचल' किंवा रैवतक असंही म्हणतात. त्यामुळं कृष्णाच्या द्वारकेबाबत अभ्यासकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
महाभारतातील 'मौसलपर्व' ( यादवांचं मुसळ युद्ध) , 'विष्णू पुराण' आणि 'श्रीमद भागवत महापुराण' मध्ये दिलेल्या तपशिलानुसार, हिंदू सृष्टी देवता विष्णूच्या अवतारांवर आधारित, कृष्णानं समुद्र देवाकडे 12 योजन जमीन मागितली. जी त्यांनी दिली.
अनेक जैन ग्रंथात तेजपालपूरच्या पश्चिमेला उग्रसेन गडाचा उल्लेख आहे. गिरनारच्या कुशीत असलेल्या उपरकोट किल्ल्याचंही नाव आहे, जो यादवकुळाचा अधिपती उग्रसेनशी संबंधित आहे.
'श्रीमद्भागवत महापुराण' मध्ये सांगितल्याप्रमाणं, यादवस्थळी (यादवांच मुसळ युद्ध) आणि कृष्णानं देह त्यागल्यानंतर समुद्रानं आपला द्वारकेतील राजवाडा सोडून सर्व जमीन परत घेतली. द्वारका आतापर्यंत सहा वेळा समुद्रात बुडाल्याचं स्थानिकांचं मत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुराणातील वृत्तांता नुसार द्वारकेला रैवतक पर्वतानं वेढलं होतं. सध्याच्या द्वारकेच्या आजूबाजूला डोंगर नसल्यामुळं काही इतिहासकार आणि संशोधकांनी असं मत मांडले आहे की, सध्याचं द्वारका शहर हे प्राचीन शहर आहे आणि कोडिनारजवळील मूळं द्वारका देखील एक शोध घेण्यासारखी आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण कमी झाल्यामुळं जर पंजाबमधील जालंधरमधून हिमालयाची धौलाधार पर्वतरांगा दिसत असेल तर अनेक शतकांपूर्वी द्वारकेतील उंच ठिकाणावरून गिरनार पर्वत दिसत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधुनिक द्वारका, समुद्रामधलं बेट-द्वारका, प्रभास-पाटणजवळची मूळ द्वारका आणि पोरबंदर आणि मियानी यांच्यामधली मूळ द्वारका या एकूण चार द्वारका प्राचीन नगराच्या दावेदार होत्या. पण, आत्तापर्यंतचे बहुतेक संशोधन-उत्खनन ओखामंडल क्षेत्रातील द्वारका आणि बेट-द्वारका इथं झाली असून त्याचे सकारात्मक निष्कर्ष निघाले आहेत.
जुनागड नाव किती ऐतिहासिक आहे?
गिरनारच्या पायथ्याशी वसलेल्या नगराचा उल्लेख हिंदूंच्या पवित्र ग्रंथात आणि महाभारतात आढळतो. शंभूप्रसाद देसाई यांनी त्यांच्या 'जुनागड आणि गिरनार' या पुस्तकात त्यांच्याशी संबंधित अनेक नावं आणि श्रद्धा स्थानांचा उल्लेख केला आहे:
हिंदू धार्मिक पौराणिक कथांचा संदर्भ देऊन, गिरनारच्या पायथ्याशी वसलेल्या नगराचे नाव 'करणकुब्ज', 'करणकोज' आणि 'कुवीर' असं नमूद केलं आहे. इथं करण कोण होता हे पुराणात स्पष्ट होत नाही. महाभारतात महारथी कर्णानं इथं कोणतंही नगर वसवण्याचा उल्लेख नाही.
एकेकाळी या शहराचं नाव 'मणिपूर' होतं. हे नाव कोणी दिलं, का दिलं आणि कोणत्या युगात ते लोकप्रिय होतं याबद्दल पुराण मौन बाळगून आहेत.
हे नगर आधी 'चंद्रकेतुपूर' होतं. या शहराचं नाव सूर्यवंशी राजा चंद्रकेतू याच्यावरून पडलं. 'महाभारत'च्या हजारो वर्षांपूर्वी 'रेवंत' म्हणून ओळखलं जातं. जे रेवंतक पर्वतावरून पडलं असावं. कृष्णाच्या अवतारानंतर हे शहर 'पुरतनपूर' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
गिरीनगर चंद्रगुप्त मौर्यानं वसवलं होतं जे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या आणि चौथ्या शतकात होतं. त्याचा मुलगा अशोक यानं त्याच्या आज्ञा शिळेवर कोरल्या. नंतर पुन्हा एकदा हे शहर 'चंद्रकेतुपूर' किंवा 'चंद्रगुप्तनगर' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर, जवळच्या पर्वतावर आधारित क्षेत्रासाठी 'गिरीनगर' हे नाव स्थापित केलं गेलं. अशोकाच्या शिलालेखाच्या जवळ असलेल्या शक क्षत्रप रुद्रदामाच्या शिलालेखात त्याचा उल्लेख 'गिरीनगर' असा आहे.
स्कंदपुराणाचा प्रभासखंड इसवी सनाच्या सहाव्या किंवा सातव्या शतकात लिहिला गेला तेव्हा गिरीनगरची ओळख 'जीर्णदुर्गा' अशी झाली. तिसर्या शतकात शकानं उज्जैन गमावल्यानंतर, त्यानं गिरीनगर येथे आपली राजधानी स्थापन केली आणि तिला 'सुवर्णगिरीनगर' किंवा 'नरेंद्रपूर' असं नाव दिलं.
हे नगर गिरनारच्या पायथ्याशी वसलं होतं की नाही याबद्दल देसाई निश्चित मत व्यक्त करत नाहीत, परंतु शकांच्या काळात ते त्यांच्या अधीन होतं हे निश्चित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गुप्त राजवटीत गिरीनगर हे प्रांतीय राजधानीसारखं होतं, त्याचं लोकप्रिय नाव फक्त 'नगर' होतं. चिनी प्रवासी ह्युएन त्सांग यानं 640 च्या सुमारास सौराष्ट्रात प्रवास केला आणि त्याचा उल्लेख फक्त 'नगर' या नावानंच केला आहे, ज्यापासून फार दूर नसलेले 'उज्जन' नावाचं डोंगर आहे, त्याभोवती घनदाट जंगल आहे. जे शहरापासून 10 मैल दूर होतं.
इसवी सन 662 च्या आसपास, शहरासाठी महत्त्वाचा जलस्रोत असलेले सुदर्शन तलाव फुटल्यामुळं किंवा अज्ञात कारणांमुळे लोकसंख्या स्थलांतरित झाली. 770 मध्ये वलभी साम्राज्याच्या पतनानंतर, सौराष्ट्रात अराजकता होती. भाषा, लिपी, धर्म, राज्य सभ्यता आणि संस्कृतीत आमूलाग्र बदल झाले.
'मिरते सिकंदरी' मध्ये उपरकोट बद्दल एक आख्यायिका आहे, त्यानुसार, "सोरठ प्रदेशाची राजधानी वंथळी इथं होती. वंथळी आणि (सध्याच्या) जुनागडच्या दरम्यान एक घनदाट जंगल होतं, ज्यात वन्य प्राणी होते. त्यात घोडेस्वार जाऊ शकत नव्हते. तिथं मनुष्यवस्ती नव्हती.
एकदा एक व्यक्ती मोठ्या कष्टानं जंगलात घुसला, तिथं त्याला किल्ल्याचे दरवाजे दिसले. तो परत आला आणि राजाला सांगितले. राजाने जंगल तोडलं आणि हा किल्ला मोडकळीस आला. देशातील कारागीर आणि इतिहासकारांना याबद्दल विचारण्यात आलं, परंतु सर्वांनीच याविषयी अनभिज्ञता व्यक्त केली, त्यामुळं याला 'जुनागड' म्हणजे 'जुना किल्ला' म्हणून ओळखलं जाऊ लागलं, कारण हा किल्ला कोणी आणि का बांधला हे कोणालाच माहीत नव्हतं.
राजा चंद्रचूड किंवा त्याच्या वारसांनी किल्ल्याची डागडुजी केली असावी. अशा प्रकारे 'गिरीदुर्ग' किंवा 'अपरकोट'ची पुनर्बांधणी झाली. देसाई सुचवतात की जवळचे शहर देखील पुन्हा वसवलं गेलं असावं, म्हणून ते शहर 'जीर्णदुर्गनगर' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
इसवी सन 1025 मध्ये रा'नवघनाच्या निमंत्रणावरून नगरचे मंत्री 'जिरनादुर्ग' इथं आले. कालांतरानं ते स्थानिक भाषेत 'जुनोगड', 'जुनागड' किंवा 'जुनेगड' म्हणून ओळखले जाऊ लागले.
चुडासमा राज्यकर्त्यां नंतर सल्तनत काळात मुहम्मद बेगडाच्या कारकिर्दीत त्याला 'मुस्तफाबाद' असं नाव पडलं. पण, शासकाच्या मृत्यूनंतर, जुनं नाव पुन्हा प्रचलित झालं.
नवाब, कंपनी सरकारच्या काळात आसपासचा परिसर एकत्रितपणे 'सोरठ' म्हणून ओळखला जात असे. स्वातंत्र्यानंतर हा भाग सौराष्ट्र राज्याच्या अंतर्गत आला आणि 'सोरठ जिल्हा' म्हणून ओळखला जाऊ लागला. 1959 मध्ये जेव्हा या क्षेत्राची सौराष्ट्र राज्यात पुनर्रचना करण्यात आली तेव्हा जिल्हा 'जुनागढ' म्हणून ओळखला जाऊ लागला आणि 1960 मध्ये स्वतंत्र गुजरात राज्याची स्थापना झाली, तरीही नाव तेच राहिलं. नंतर त्यातून गीर-सोमनाथ आणि पोरबंदर असे स्वतंत्र जिल्हे निर्माण झाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








