कोहिनूर हिरा लुटणाऱ्या नादिरशाहने जेव्हा स्वतःच्याच मुलाचे डोळे फोडले होते...

नादिर शाह

फोटो स्रोत, HISTORY/UNIVERSAL IMAGES GROUP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, नादिर शाह

तत्कालीन संदर्भांनुसार नादिरशहा हा एक उंच, काळ्या डोळ्यांचा रुबाबदार व दिसायला सुंदर पुरुष होता. आपल्या शत्रूंशी तो अत्यंत क्रौर्याने वर्तन करत असे आणि त्याला शरण आलेल्यांशी त्याची वागणूक औदार्यपूर्ण असे.

ही अठराव्या शतकाच्या मध्यातील गोष्ट आहे. त्या वेळी माउंट काफच्या शिखरांखाली त्या वेळचे जगातील सर्वात शक्तीशाली सैन्य ऑटोमन साम्राज्यावर आक्रमण करण्यास सज्ज होते.

या सैन्याला इतिहासकार सर्वात मोठे सैन्य म्हणतात तेव्हा ते या सैन्याची तुलना केवळ आशिया किंवा आखाती देशातील सैन्याशी नसते, तर ते युरोपातील सर्वात मोठ्या सैन्यदलाशी या सैन्याची तुलना करत असतात.

अत्यंत कमी कालावाधीत ऑटोमन साम्राज्यात इराक व सीरियापासून पूर्वेला दिल्लीपर्यंत बहुतेक युद्धांमध्ये यश प्राप्त करणारे हे सैन्य त्यांचा सेनापती असलेल्या नादिरशहाने आयुष्यभर केलेली रणनीती व प्रचंड कष्टांचा परिपाक होता.

सन 1743 पर्यंत नादिरशहा आणि त्याच्या सैन्याच्या कामगिरीची झलक इतिहासकार मायकल एक्झॉर्डीच्या या काही वाक्यांमध्ये दिसून येते.

नादिरशहाने इराणला अफगाणिस्तानच्या तावडीतून स्वतंत्र केले, ऑटोमन तुर्कांना इराणी भागातून हाकलवून लावले, विविध योजना आखून रशियाच्या सैन्याला आपल्या भागातून पिटाळले, ऑटोमन साम्राज्यावर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला आणि तो स्वतः इराणचा बादशहा झाला. अफगाणांवर त्यांच्या भागात शिरून हल्ला केला आणि ते भाग पुन्हा काबीज केले.

त्यानंतर भारतावर हल्ला केला आणि दिल्लीवर विजय मिळवला. मध्य आशियात दाखल होऊन, तुर्कमान आणि उझबेकींवर आळा घालून पुन्हा एकदा पश्चिमेच्या दिशेने निघाला आणि ऑटोमन साम्राज्याविरुद्ध लढून ती लढाई जिंकली."

मुघल साम्राज्याचा कमकुवतपणा

इतिहासकार मायकल एक्झॉर्डी लिहितात, "नादिरशहाच्या सैन्यांच्या दोन वेगवेगळ्या सेनापतींनी अफगाणिस्तान व जॉर्जिया या दोन राज्ये स्थापन केली. यावरून नादिरशहाच्या सेनेच्या सैन्यकुशलतेचा अंदाज येऊ शकतो."

असे म्हणतात की, नादिरशहा नसता तर कदाचित इराणसुद्धा नसता अफगाण, रशियन, तुर्क यांच्यात त्याचे विभाजन झाले असते. जेव्हा नादिरशहाने इराणी राज्याची सत्ता हाती घेतली तेव्हा हे विभाजन बऱ्यापैकी झालेले होते.

नादिर शाह

फोटो स्रोत, THE DURRANI EMPIRE

नादिरशहाने दिल्लीवर केलेल्या हल्ल्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीलासुद्धा मुघल साम्राज्याच्या कमकुवतपणाचे संकेत मिळाले होते. एक्झॉर्डींच्या मते, "नादिरशहा नसता तर ब्रिटिशांच अंमल अधिक विलंबाने आणि कदाचित वेगळ्या प्रकारे सुरू झाला असता किंवा कदाचित ब्रिटिशांना राज्यच करता आले नसते."

नादिरशहाचा जन्म कोणत्याही राजघराण्यात झाला नव्हता. इराणी साम्राज्याच्या राजधानीपासून दूर एका सीमेवरील भागात त्याचा जन्म झाला होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू लवकर झाला. त्यामुळे त्यांच्यामुळे जे काही विशेषाधिकार नादिरशहाला मिळण्याची शक्यता होती, तेही शक्य नव्हते.

असे असूनही, आयुष्याची पहिली तीस वर्षे उदरनिर्वाहासाठी जंगलातून लाकडे तोडून ती विकण्याचे काम करणारा नादिरशहा आपण स्वतःच उभारलेल्या जगाचा सर्वात शक्तिमान सेनापती झाला होता.

पण या योद्ध्याचा आलेखही इतर सर्वच कथांप्रमाणे एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर उतरू लागला. नादिरशहा आपल्या मुलांसाठी एक भक्कम राज्य आणि आपले सैन्य सोडून जाऊ शकला नाही.

इतिहासकार मानतात की, तसे झाले असते तर त्यांच्या सामर्थ्यशाली कुटुंबाने इराणच्या सीमा भक्कम केल्याच असत्या, त्याचप्रमाणे युरोपीय राज्यांशी स्पर्धा करण्यासाठी त्या तोडीचे आधुनिक सैन्यही तयार केले असते.

इतिहासकारांची अशीही धारणा आहे की, "अफगाणांकडून पराभव झाल्यावर पुन्हा एकदा उठून उभार राहणाऱ्या इराणने, तुलनेने कमकुवत मुघल आणि ऑटोमन साम्राज्यांमुळे निर्माण झालेली दरी भरून काढली असती. त्याचप्रमाणे शिया-सुन्नी हे विभाजन मिटवू पाहणारा परिवार युरोपाविरुद्ध इस्मामिक जगाचे झालेले पतन रोखू शकला असता."

पण असे झाले नाही. उलट नादिरशहाचा अंत ही एक शोकांतिका झाली आहे. त्याने जिंकलेल्या युद्धांपेक्षा नादिरशहाने केलेले अत्याचार व क्रौर्य व त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्याचे ढळलेले मानसिक संतुलन, याची चर्चा जास्त होते.

धोकादायक सीमाक्षेत्रात जन्म

मायकल एक्झॉर्डी यांनी त्यांच्या 'इराण : एम्पायर ऑफ द माइंड' आणि 'द स्वोर्ड ऑफ पर्शिया' या पुस्तकांमध्ये नादिरशहाच्या आयुष्यातील चढउतारांबद्दल विस्तृत लिखाण केले आहे.

त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, नादिरशहाची जन्मतारीख व जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दलचे संदर्भ फार स्पष्ट नाहीत आणि त्या संदर्भात अजून शोध घेण्याची आवश्यकता आहे.

 नादिरशहाचा जन्म इराणी साम्राज्यापूर्वी असलेल्या खुरासान प्रांताच्या उत्तरेकडील एका अत्यंत धोकादायक भागात झाला होता. त्यांच्या जन्माविषयी मतमतांतरे आहेत. पण एक्झॉर्डींनुसार 6 ऑगस्ट 1698 रोजी आणि दर्रागाज भागातील अल्लाहु अकबर पर्वतातील दस्तगर्द नावाच्या गावात नादिरशहाचा जन्म झाला होता.

तुर्की ही त्यांची मातृभाषा होती. पण त्यांनी लवकरच फारसी भाषाही शिकून घेतली होती. हा भाग खुरासानची राजधानी असलेल्या मशहदच्या उत्तरेला होता.

त्याचे वडील तुर्कमानमधील अफशर कबिल्याचे गुराखी होते. ते एका कनिष्ठ पण प्रतिष्ठित सामाजिक वर्गातील होते. ते गावाचे प्रमुखही होते.

नादिरशहाचा भूतकाळ

नादिरशहाला आपल्या भूतकाळाविषयी कायम जाणीव होती आणि बादशहा झाल्यावरही त्याने आपल्या बालपणाबद्दल कोणत्याही काल्पनिक कथा रचण्याचा प्रयत्न केला नाही.

त्याच्या दरबारातील इतिहासकाराने लिहिलेल्या टिप्पणीमध्ये "तलवारीचे स्वतःचे एक समार्थ्य असते. ती ज्या लोखंडापासून तयार झाली आहे, ते कोणत्या खाणीतून काढण्यात आले आहे, याच्याशी त्याचा संबंध नसतो.", असे नमूद केलेले आहे.

नादिरशहाच्या गोष्टीत पुढे जाण्यापूर्वी त्याच्या पहिल्या तलवारीबाबत एक विलक्षण घटना जाणून घेऊ या

जेव्हा नादिरशहाची सेना दिल्लीत भारतीयांकडून धन गोळा करत होती तेव्हा नादिरशहाने त्याच्या मुलाचे म्हणजे नसरुल्लाहचे लग्न औरंगजेबाची पणती व मोहम्मद शहाच्या भाचीशी केले. दोन्ही कुटुंबांनी नवविवाहितांना महागड्या भेटवस्तू दिल्या आणि यमुनेच्या किनाऱ्यावर भरपूर आतषबाजी केली.

परंपरेनुसार मुघल अधिकारी नवऱ्यामुलाच्या सात पिढ्यांची माहिती घेत असत. जेव्हा नादिरशहाच्या मुलाविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा तो म्हणालो, "त्यांना सांगा की तो नादिरशहाचा मुलगा आहे जो 'तलवार इब्ने तलवार इब्ने तलवार' आहे आणि सत्तर पिढ्यांपासून असाच आहे."

जन्माच्या वेळी त्याचे नाव नादिर कली ठेवण्यात आले होते. याचा अर्थ आहे 'शानवाले का ग़ुलाम'. अनेक वर्षांनंतर इमाम खली या गुराखी सरदाराचा हा पुत्र बादशहा झाला तेव्हा त्याचे नाव नादिरशहा झाले.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीला भटक्या व अर्धभटक्या गुराख्यांची लोकसंख्या इराणी साम्राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश होती, जी साधारण तीस लाख होती.

चंगेज खान

फोटो स्रोत, UNIVERSAL HISTORY ARCHIVE/UIG VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, चंगेज खान

त्यांनी फारसी संस्कृती स्वीकारली होती. पण त्यांची ओळख म्हणजे अमीर तैमूर आणि चंगेज खानशी संबंधित तुर्की-मंगोल परंपराच होत्या.

त्यांच्या घोडेस्वारांच्या अमलाखाली भागात स्थायिक झालेल्या स्थानिकांना ते आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे समजत असत.

नादिरशहा दोन भिन्न संस्कृतींमध्ये वाढला. इराणी साम्राज्याचा तुर्की भाषा बोलणारा नागरिक, ज्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका पैलूमध्ये फारसी संस्कृतीसुद्धा होती, जी इस्तांबुलपासून समरकंद व दिल्लीपर्यंत स्वीकारली गेली होती.

 वयाच्या दहाव्या वर्षी तो एक उत्तम घोडेस्वार आणि शिकारी म्हणून ओळखला जात असे. तो धनुर्विद्या व भालाफेकीतही निपुण होता. त्याच्या बालपणीच वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंब विपन्नावस्थेत गेले.

मायकल एक्झॉर्डी लिहितात की, ज्या समाजात पुरुषाविना महिला खूपच कमकुवत होते, अशा समाजात नादिरशहाची आई विधवा असूनही ती खचून गेली नाही.

इतिहासकारांच्या मते, आपल्या आईला एवढे कष्ट करताना पाहून कदाचित नादिरशहाला कायम स्त्रियांविषयी सहानुभूती वाटत असते. आपल्या भावी आयुष्यात त्याने अनेक प्रसंगी ही भावना प्रकट करूनही दाखवली.

हा प्रतिकूल काळ आणि त्या काळात त्यांची साथ देणाऱ्यांना विशेषतः आपल्या आईला व भावाला म्हणजेच इब्राहिमला तो कधीही विसरला नाही.

काही काळ तो जंगलातून लाकडं तोडत असे. ती उंट किंवा खेचरांवर लादून शहरात जाऊन ती लाकडे विकत असते. हेच त्याच्या उत्पन्नाचे साधन होते.

एक्झॉर्डी म्हणतो की, बादशहा झाल्यानंतर त्याने आपल्या लाकूडतोड्या साथीदाराचा सन्मान केला आणि त्याला म्हणाला की, "अहंकारी होऊ नको, खेचरं आणि लाकडं गोळा करण्याच्या दिवसांना कधीही विसरू नको."

त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वी त्याचे बालपण सुखात होते आणि इतर मुलांवर सत्ता गाजविण्यात गेले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र गरीबीमुळे तो आपल्या मित्रांपासून विलग झाला होता, आणि जणूकाही तो त्यांच्या बरोबरीचा राहिला नव्हता.

इतिहासकार लिहितात की, बादशहा झाल्यानंतरही आपल्या आजुबाजूच्या वातावरणात, भव्य दरबारात आणि खानदानी लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत, ही भावना कायम त्याला डाचत असे.

नादिरशहाचे इराणच्या सैन्यक्रांतीतील पहिले पाऊल

वयाच्या पंधराव्या वर्षी तो एक स्थानिक सरदार व एबियार्ड शहराचा राज्यपाल बाबा अली बेग याच्या सेवेत रुजू झाला. खुरासानमधील अधिकाऱ्यांमध्ये बाबा अली बेग हा मोठ्या पदावरील सरदार होता.

त्याने बाबा अली बेगचा बंदूकबाज म्हणून त्याच्या कामाची सुरुवात केली आणि कालांतराने तो त्याचा उजवा हात झाला.

हा असा काळ होता जेव्हा इराणमधील दुर्गम भागातही विस्फोटक शस्त्रे पोहोचली होती आणि नादिरशहाने तत्कालीन आधुनिक युद्धनीतीच्या आधारे आपल्या कारकिर्दीचा पाया रचला.

त्यानंतरच्या काळात नादिरशहाने इराणच्या लष्करी क्षमतेत क्रांती घडवून आणली.

1714-15 मध्ये एक तुर्क कबीला खुरासानच्या उत्तरेकडील सीमा पार करून राज्यात दाखल झाला. युद्ध झाले, बाबा अलीच्या सैन्याचे पारडे जड होते. शेकडो हल्लेखोरांना कैद करण्यात आले.

या विजयात नादिरशहाने महत्त्वाची भूमिका बजावली असावी, म्हणून बाबा अलीने ही बातमी इराणचा सफाविद सम्राट सुलतान हुसेन याला साम्राज्याची राजधानी इस्फाहानपर्यंत पोहोचवण्यासाठी नादिरशहाची निवड केली.

बादशहा समोर हजर राहण्याचा मान मिळण्यासोबतच नादिरशहाला शंभर तमन बक्षीस म्हणून मिळाले. इस्फाहानमध्ये जाण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता. तिथे गेल्यावर त्यांची एका वेगळ्याच जगाशी ओळख झाली.

बादशाह शाह अब्बास उरूज

फोटो स्रोत, UNIVERSAL HISTORY ARCHIVE/UNIVERSAL IMAGES GROUP V

फोटो कॅप्शन, बादशाह शाह अब्बास उरूज

"एका ऐतिहासिक उल्लेखानुसार नादिरशहासोबत दरबातील काही अधिकाऱ्यांना दुर्व्यवहार केला होता आणि त्याच्या काही वर्षानंतर नादिरशहा जेव्हा बादशहा झाला तेव्हा त्याने आपल्या दरबारातील लोकांच्या मनोरंजनासाठी या घटनेला नाटकाच्या स्वरुपात सादर करण्याचा आदेश दिला होता."

शाही वैभवाला याची देही याची डोळा पाहण्याचा नादिरशहाचा अनुभव फार चांगला नव्हता आणि त्यानंतर त्याला या श्रीमंतीची कधीही आवड लागली नाही.

त्यामुळेच तो स्वतःला त्या वातावरणात एकरुप करून घेऊ शकला नाही. दरबारातील लोक या कबिल्यातील माणसाची पारख करू शकले नव्हते.

सफविद साम्राज्याची वाटचाल वेगाने पतनाच्या दिशेने होत आहे आणि त्यांच्यासमोर उभा असलेला नादिरशहा हाच त्यांच्या साम्राज्याचा शेवटचा आधार आणि लवकरच बादशहा म्हणून त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकेल याची कदाचित त्यावेळी कोणी कल्पनाही केली नव्हती.

इराणमधील सफविद वंशाचे सर्वात महत्त्वाचे बादशहा शहा अब्बास उरुजच्या कालखंडातील एक झलक : दोनशे वर्षांहून अधिक काळ सफविद वंशाच्या बादशहाने इराणवर सत्ता गाजवली. 23 ऑक्टोबर 1722 रोजी हाच बादशहा अफगाणांकडून मागवलेल्या घोड्यावर बसून अफगाण महमूद गलजीच्या तंबूत शरण गेला.

सफविद साम्राज्याचा अंत आणि इराणवर अफगाणांचा कब्जा

इराणमधील 200 वर्षांपासून चालत आलेल्या सफविद साम्राज्याला आधीपासूनच गलजई अफगाणांनी आव्हान दिले होते आणि 23 ऑक्टोबर 1722 रोजी हाच बादशहा अफगाणांकडून मागवलेल्या घोड्यावर बसून अफगाण महमूद गलजीच्या तंबूत शरण गेला.

त्या वेळेपर्यंत मशहदजवळील कलातला आपली गढी केले होते. 1382 मध्ये हे शहर अमीर तैमूरचा गड होता.

या कब्जामुळे या परिसरातील अन्य सरदारांवर नादिरशहाचे वर्चस्व भक्कम झाले.

सन 1725-1726 पर्यंत सफविद साम्राज्याचे निर्वासित स्वयंभू बादशहा तहमास्प खली खान, इराणी साम्राज्याच्या पटावरील एक छोटेसे प्यादे झाले होते. इस्फाहान अफगाणांच्या हाती गेल्याच्या काही काळातच त्यांनी आपण बादशहा असल्याचे जाहीर केले.

 पण, तोपर्यंत शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या साम्राज्याच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील सीमांवर रशिया आणि ऑटोमन साम्राज्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. इराणी भागांवर कब्जा करण्याच्या स्पर्धेमुळे या दोन्ही मोठ्या साम्राज्यांमध्ये युद्धाचा धोका निर्माण झाला होता.

ऑटोमनचे शत्रू

या सगळ्या गोंधळात नादिरशहाचा दबदबा वाढत होता आणि त्याने तहमास्पशी मैत्रीचा संदेश स्वीकार केला.

19 सप्टेंबर 1726 रोजी नादिरशहाने आपल्या शरणागतीच्या घोषणेसह एका भव्य समारंभात तहमास्पचे स्वागत केले. यात दिवशी नादिरशहा एका क्षेत्राशी संबंधित व्यक्तीमधून राष्ट्रीय स्तरावरील सरदार गणला जाऊ लागला.

नादिरशहाने लवकरच एका युद्धात तहमास्पच्या एका मोठ्या स्पर्धकाचा परभाव करून आपले स्थान अधिक भक्कम केले आणि इराणी साम्राज्याच्या निर्वासित बादशहाचे सरसेनापती झाला.

 नादिरशहाला तहमास्प कलीखान (तहमास्पचा गुलाम) ही उपाधी देण्यात आली. बादशहाचे नाव मिळणे ही मोठ्या बहुमानाची गोष्ट समजली जात असे. नादिरशहाने त्याच वर्षी पानगळीच्या ऋतूमध्ये बादशहाला मशहदचे पवित्र शहर जिंकून दिले.

तहमास्पची ताकद वाढत चालली होती आणि याच दरम्यान रशियनांनीही आपला संपर्क वाढवायला सुरुवात केली होती. रशियनांना ऑटोमनच्या बाजूने इराणी साम्राज्यावर कारवाई करण्याबाबत खुश नव्हते.

राज्य परत घेण्याच्या शाह तहमास्प व नादिरशहाच्या प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप न करण्याची घोषणा केली. त्या दोघांना रशियन ऑटोमनच्या शत्रूच्या रुपात पाहत होते.

मशहद काबीज केल्यानंतर नादिरशहा इमाम रजाच्या कबरीवर गेला आणि जमिनीचे चुंबन घेऊन आपल्या यशसासाठी त्याचे आभार मानले. त्यानंतर त्याने त्याच्या घुमटाची सजावट वाढवली आणि एक नवा मिनार उभारला, जो उभारला, जो आजही तेथे आहे.

इमाम रजाच्या कबरीवर नादिरशाहने केली भिकाऱ्यांशी चर्चा

या त्याच्या अभिव्यक्तीने नादिरशहाचे सैन्य आणि धार्मिक मंडळी नक्कीच खुश झाली असतील.

त्या वेळी नादिरशहाचा एक किस्सा खूप प्रसिद्ध झाला होता. त्या कबरीच्या बाहेर आंधळ्याचे नाटक करणाऱ्या एका भिकाऱ्याला विचारले की, आपले डोळे बरे व्हावेत यासाठी तो कधीपासून त्या कबरीवर प्रार्थना करत आहे?. दोन वर्षे, असे तो उत्तरला. नादिरशहा त्याला म्हणाला की, दोन वर्षे प्रार्थना करूनही त्याचे डोळे ठीक होत नसतील तर त्याचा विश्वास खूपच कमकुवत आहे.

नादिरशहा त्या भिकाऱ्याला म्हणाला की, तो मजारमधून बाहेर येईपर्यंत त्याचे डोळे व्यवस्थित झाले नाहीत तर त्याचा विश्वास डळमळीत आहे, असे समजले जाईल आणि तो त्याची गर्दन छाटून टाकेल.

नादिर शाह मशहद

फोटो स्रोत, HADIS FAGHIRI/FARS NEWS/AFP VIA GETTY IMAGES

इतिहासकार लिहितात की, जेव्हा नादिरशहा थोड्या वेळाने परतला तेव्हा तो फकीर पुढे होऊन म्हणाला की, चमत्कार झाला. माझे डोळे व्यवस्थित झाले." नादिरशहा हसून म्हणाला की, विश्वास हीच गुरुकिल्ली आहे आणि तो तिथून निघून गेला.

 इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे की, सन 1726 च्या अखेरपर्यंत नादिरशहा एका कबिल्याच्या सरदारापासून ते सफविद साम्राज्याच्या पुनर्स्थापनेसाठी एक आशेचा किरण झाला होता.

शहा तहमास्पीचा पराभव

सन 1726 मध्ये मशहदच्या विजयानंतर नादिर आणि शहा तहमास्प यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला. दरबारातील व्यक्ती तहमास्पला उलटसुलट गोष्टी सांगू लागले आणि फेब्रुवारी 1727 मध्ये तो कुणालाही न सांगता मशहद सोडून निघून गेला आणि एका कुर्द शहरात पोहोचून त्याने नादिरशहाला गद्दार घोषित केले आणि संपूर्ण राज्यात नादिरशहाच्या विरुद्ळ कारवाई करण्यासाठी सैन्याची मदत मागितली.

नादिरनेसुद्धा अजिबात वेळ न दवडता मशहदमध्ये तहमास्प आणि त्याच्या सर्व मंत्र्यांची संपत्ती जप्त केली आणि आपल्या भावाला म्हणजेच इब्राहिमला म्होरक्या करून कुर्द शह खुभूषणला जाऊन त्याला वेढा घातला. थोडक्यात, तहमास्पला आपला पराभव जाणवू लागला आणि त्याने तडजोड करण्याचा निर्णय घेतला आणि 21 मार्च रोजी नवरोजच्या दिवशी उत्सवपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात मशहदला परतला. दोन आठवडे चालणाऱ्या या उत्सवादरम्यान नादिरशहाने एका कुर्द सरदाराच्या मुलीशी विवाहसुद्धा केला.

पण इतिहासकारांचे म्हणणे आहे की, तहमास्पने पराभव स्वीकारणे आणि नादिरने विवाह करणे यामुळे त्यांच्यातील मतभेद समाप्त झाले नाहीत. नादिरचे म्हणणे होते की, सफविद साम्राज्याची राजधानी इस्फाहानच्या दिशेने पुढे जाण्याआधी हेराच्या अब्दाली अफगाणांशी दोन हात करणे आवश्यक आहे, तर तहमास्प सफविद राजवंशाला बादशाही बहाल करण्यास उत्सुक होता.

नादिर शाहचा ताफा

फोटो स्रोत, UNIVERSAL HISTORY ARCHIVE/UNIVERSAL IMAGES GROUP V

आधीच्या साम्राज्याचा वारसदार आणि भविष्यातील बादशहा समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 23 ऑक्टोबर 1727 रोजी तहमास्पला पुन्हा एकदा नादिरसमोर शरणागती पत्करावी लागली. तो खूपच निराश झाला होता. अशाच एका दौऱ्यात तहमास्प हात धुण्यासाठी म्हणून तंबूच्या बाहेर निघाला आणि पळून जाण्याचा असफरल प्रयत्न केला. तो तंबूपासून जेमेतेम मैलभर अंतरावर गेला होता, तेव्हा नादिरशहा त्यांच्यापर्यंत पोहोचला.

 त्याने आपला गळा कापण्याचा प्रयत्न केला, पण नादिरशहाने वेगाने हालचाल करत त्याच्याकडून खंजिर हिसकावून घेतला. या घटनेनंतर तहमास्पने नादिरशहापासून वेगळे होण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

नादिरशहाची सेना खऱ्या हत्यारांनी सराव करायची

नादिरशहाने अखेर इतक्या बलवान सेनेची निर्मिती कशी केली? सन 1729 मध्ये नादिरशहाने मार्चमध्ये नवरोजच्या दिवशी हेरातवर आक्रमण करण्याचा अंतिम निर्णय घेतला. "ही एक महत्त्वपूर्ण मोहीम होती, ज्यात त्यांच्या संख्येने कमी असलेल्या सैन्याचा सामना आतापर्यंतच्या सर्वात शक्तीशाली शत्रूशी होणार होता."

पण त्या आधी नवरोजचा उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांची उत्तम बडदास्त ठेवली आणि घोडे व हत्यारांसमवेत मौल्यवान भेटवस्तूंचे वाटप केले.

 या व्यतिरिक्त, युद्धाच्या तयारीसाठी नादिरशहाने मोठ्या प्रमाणावर सराव सुरू केला. एका ग्रीक व्यापाऱ्याने याचे प्रत्यक्ष पाहिलेले वर्णन केले आहे.

या सरावात सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्याला, तो साधारण सैनिक असला तरी शंभर वा दीडशे सैनिकांच्या सेनापतीपदी नियुक्त करण्यात येत असे. इतिहासकारांच्या मते तो चांगल्या सेनापतींची नियुक्ती सुनिश्चित करत असे आणि पदोन्नती केवळ योग्यतेच्या आधारेच होत असे.

त्यांनी लिहून ठेवले आहे की, "सैनिक परस्परांवर वेगवेगळ्या दिशेने व प्रकारे हल्ला करत असत, सर्कल व काउंटर सर्कल तयार करत.. हल्ला करत, विखुरले जात आणि पुन्हा त्याच स्थितीत येऊन हल्ला करत."

या सरावात खऱ्या शस्त्रांचा वापर केला जात असे आणि कोणीही जखमी होऊ नये याची काळजी घेतली जात असे. घोड्यावर स्वार होऊन वेगवेगळ्या तंत्रांचा अभ्यास केला जात असे. प्रत्येक घोडेस्वार वेगवेगळ्या हत्यारांसमवेत वेगवेगळा अभ्यास करत असे."

नादिर शाह

फोटो स्रोत, HERITAGE IMAGES

नियंत्रण आणि शिस्तीमुळे युद्धात नादिरशहा आणि त्याच्या सेनापतींमध्ये इतकी एकरूपता निर्माण झाली होती की, जणूकाही ते नादिरशहाच्या मेंदूत चालेल्या विचारांनुसार हालचाल करत असत. ग्रीक व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे की, नादिरशहा स्वतः प्रत्येक सरावात सहभागी होत असे आणि युद्धातही त्याचे हेच तत्व होते.

नादिरशहा आणि तहमास्प मे महिन्यात हेरातवर हल्ला करण्यास रवाना झाले. अब्दारी अफगाणसुद्धा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपले मतभेद दूर ठेवून अल्लाह यार खानाच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. दोन्ही सेना हेरातपासून पन्नास किलोमीटर अंतरावर एकमेकांना भिडल्या.

सफविद साम्राज्याची राजधानी इस्फाहानमधून अफगाण परतले

नादिरशहाला या युद्धात विजय मिळाला. अनेक अफगाण सरदारांनी शरणागती पत्करली. तहमास्प शहा आणि त्यांच्या दरबारातील माणसे खुश नव्हती. पण नादिरशहाने या सरदारांचे स्वागत केले आणि भविष्यात अब्दाली अफगाण नादिरशहाचे विश्वसनीय सहकारी आणि सैन्याचा एक महत्त्वाचा भाग ठरले.

 या मोहिमेमुळे इराणींमध्ये विश्वास निर्माण झाला होता आणि आपले साम्राज्य परत मिळविण्यासाठी ते गलजई अफगाणांचा सामना करण्यात सज्ज होते.

29 सप्टेंबर 1729 मध्ये दोन्हीकडील सैन्य भिडले. अफगाणांचा पराभव झाला. अखेर, 9 डिसेंबर 1729 रोजी नादिरशहाने इस्फाहानच्या बाहेर एक भव्य समारंभ आयोजित करत तहमास्प शहाचे स्वागत केले. म्हणजे नादिरशहा आणि तहमास्प शहाने अफगाणांकडून सफविदची राजधानी परत घेतली.

एक्झॉर्डी लिहितात की, त्या वेळी युरोपात झालेल्या युद्धांच्या तुलनेने आशिया व आखाती भागात झालेल्या युद्धांबद्दल दस्तऐवज कमी आहेत. नादिरशहाच्या मोहिमांबद्दल लिहिणाऱ्या व्यक्ती बहुधा सैन्यातील नव्हत्या आणि त्यांच्यानुसार, नादिरशहाची तशीच इच्छा होती. कारण आपल्या युद्धाच्या तंत्राबद्दल त्याला कुणालाही माहिती होऊ द्यायची नव्हती.

नादिरशहाची सैन्यक्रांती आणि त्याचे किंमत

नादिरशहाचा सराव, विस्फोटक शस्त्रांवरील अवलंबित्व आणि कायमस्वरुपी सैन्यभरती करण्याची एक निश्चित किंमत होती. याचा अर्थ हा होता की, सैनिकांच्या सरावासाठी कायम उपलब्ध असण्याची आणि विविध प्रकारे त्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता असे. नवनवीन तंत्रे व शस्त्रास्त्रांचा लाभ घेण्यासाठी त्यांचे सैन्यासोबत असणे गरजेचे होते.

त्यांना केवळ हत्यारे देऊन घरी पाठवून देणे शक्य नव्हते. त्यांना उत्तम व वेळेवर पगार देणे गरजेचे होते. त्यातच त्यांचे कपडे, निवासी व खानपान व्यवस्था करणेही आवश्यक होते. खराब होणाऱ्या हत्यारांच्या जागी नवी हत्यारे उपलब्ध करून देणे गरजेचे होते. चांगले घोडे आवश्यक होते जे घोडेस्वार व हत्यारांचे ओझे वाहून नेऊ शकतील. त्याचप्रमाणे विस्फोटक शस्त्रांचा फायदा घेण्यासाठी मोठ्या संख्येने बंदूकधाऱ्यांचीही आवश्यकता होती.

नादिर शाहला ऑटोमन साम्राज्याकडून मिळालेली भेट

फोटो स्रोत, AHMET BOLAT/ANADOLU AGENCY VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, नादिर शाहला ऑटोमन साम्राज्याकडून मिळालेली भेट

 नादिरशहाची सेना वाढतच चालली होती. थोडक्यात, या सैन्याचा खर्च प्रचंड होता. एवढे सैन्य राखण्यासाठी नादिरशहा नेहमीच महसूल मिळविण्याच्या नवनव्या मार्गांचा विचार करत असे. म्हणूनच त्याला त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांतील लोकांवर प्रचंड कर लादलेला असे.

"सैन्य वाढविणे, सराव व विस्फोटक हत्यारांवर अवलंबित्व… खर्चात प्रचंड वाढ. युरोपात 150 वर्षांपूर्वी झालेल्या परिवर्तनासारखी ही स्थिती होती."

एक्झॉर्डीचे म्हणणे आहे की, युरोपात हे सगळे परिवर्तन आणि नव्या प्रकारची युद्धनीती तेथील शासन यंत्रणेतील सुधारणा आणि आर्थिक संसाधनांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरली. पण नादिरशहाची सैन्यक्रांती मात्र युरोपासारखे परिवर्तन घडविण्यासाठी फार काळ टिकून राहिली नाही.

नादिरशहा आणि त्याच्या मुलाचा सफविद राजकन्यांसोबत विवाह

तहमास्प शहाची इच्छा होती की, नादिरशहाने पराभूत अफगाण शासक अशरफ गलजईचा पाठलाग करावा आणि ज्या राजकन्यांना तो घेऊन गेला होता, त्यांनाही नादिरशहाने परत आणावे.

 इतिहासकारांचे म्हणणे आहे की, नादिरशहाने खूप वाटाघाटी केल्यानंतर सफविद राजकन्यांना परत आणण्यासाठी गलजई सुल्तान अशरफचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. पण त्या बदल्यात त्याने खुरासान, करमान आणि इतर काही क्षेत्रांव्यतिरिक्त संपूर्ण राज्यात कर संकलन करण्याचा अधिकार प्राप्त केला, जेणेकरून सैन्याचा पूर्ण खर्च भरून निघू शकेल.

शाह तहमास्पसोबत या तडजोडीला भक्कम करण्यासाठी अजून एक बाब निश्चित करण्यात आली होती. तहमास्पच्या दोन बहिणींशी त्याचा व त्याचा मुलगा रझा खली शाहचा विवाह होईल. नादिरशहाचा विवाह रझिया बेगमशी झाला. अशा प्रकारे नादिरशहा इराणी साम्राज्याच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील भागांचा शासक झाला आणि त्यांची आर्थिक व कायदेशीर अशा दोन्ही प्रकारच्या गरजांची पूर्तता झाली.

नादिरशहा कायम आर्थिक बाबींवर करडी नजर ठेवायचा. पुढील वर्षांमध्ये त्याने कराच्या बाबतीत अधिकारी, निरीक्षक व गुप्तहेरांचे एक जाळेच पसरवले आणि सफविद साम्राज्याच्या व्यवस्थेला अजून भक्कम केले. नादिरशहाच्या गरजा खूप जास्त होत्या. त्यामुळे कोणत्याही पूर्वचेतावनीशिवाय दुप्पट कर लादला जात असे. तो न भरल्यास कडक शिक्षा केली जात असे.

कंदाहार

फोटो स्रोत, DE AGOSTINI PICTURE LIBRARY

फोटो कॅप्शन, कंदाहार

आपली मागणी स्वीकारली गेल्यानंतर नादिरशहा 24 डिसेंबर 1729 रोजी वीस ते पंचवीस हजार सैन्य घेऊन इस्फहानहून अशरफचा पाठलाग करण्यास निघाला. शिराजच्या जवळ त्यांच्यात लढाई झाली. एकदा अफगाणांनी पूर्ण जोर लावून हल्ला केला. पण ते नादिरशहाच्या सैन्याची शिस्त व विस्फोटक शस्त्रास्त्रांचा विरोध करू शकले नाहीत. अशरफ तिथून फरार झाला. पण एका दुसऱ्या ठिकाणाहून पळून जाताना आपल्या जुन्या शत्रूंकडून तो मारला गेला.

नादिरशहाला ऑटोमन साम्राज्याच्या सुल्तान महमूदचा पहिला याची भेट : नादिरशहाचे ऑटोमन साम्राज्याविरुद्धही युद्ध झाले आणि एका क्षणी तो म्हणाला होता की, तो कंधार, बुखारा, दिल्ली आणि इस्तांबुलच्या राज्यकर्त्यांच्या गळ्यात पट्टा अडकवणार आहे. पण शांती राखण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, असा याचा अर्थ नाही.

इराणी साम्राज्याच्या पश्चिमी सीमांचा जीर्णोद्धार

ऑटोमनवर हल्ला करून इराणच्या पश्चिमेकडील सीमा पूर्ववत करण्याला नादिरचे प्राधान्य होते. त्यानंतर पुढे जात त्याने सन १७३५ मध्ये यरवानमध्ये ऑटोमन सैन्याचा पराभव केला आणि त्यांना तह करण्याची सक्ती केली. या अंतर्गत इराणच्या पूर्वीच्या सीमा पूर्ववत केल्या गेल्या आणि ऑटोमन सैन्याने माघार घेतली. सफविद साम्राज्यावर अफगाण आक्रमणाचा फायदा घेत रशियाने त्यावर कब्जा केला होता.

 सन १७३५ पर्यंत कंदाहारव्यतिरिक्त नादिरशहाने सफविद साम्राज्याचे नियंत्रण त्याच्या पूर्वीच्या सर्व क्षेत्रांमध्ये पूर्ववत केले. आणि मग, सर्व दरबारी, कबिल्याचे सरदार आणि इराणच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सहमतीने मोघनमध्ये आयोजित एका सभेत स्वतःला नवा बादशहा जाहीर केले. त्याला कोणीच विरोध केला नाही. खासगी सभेत सफविद राजेशाही कायम ठेवण्याच्या बाजूने बोलल्याबद्दल एका मुल्लाची हत्या करण्यात आली.

"त्याच्या शेवटच्या काळात जुलमी शासक म्हणून तो कुख्यात असला तरी मुल्लाच्या त्या उदाहरणाचा अपवाद वगळता, नादिरशहाने त्याच्या आधीच्या व नंतरच्या शासनकर्त्यांच्या तुलनेने जवळजवळ अहिंसेने सत्ता प्राप्त केली."

"तेही हत्या करून नाही तर युद्धनीती, प्रोपगंडा, हुशारी, सैन्याचे समर्थन आणि सर्वात जास्त म्हणजे युद्धातील यशाच्या अधारे तहमास्पला सत्तेतून खाली खेचून स्वतः बादशहा झाला."

कंधार : कंधारमध्ये जिंकल्यानंतर, नादिरशहाची नजर दिल्लीवर गेली. कारण नादिरशहाचे शत्रू असलेल्या अफगाणांना त्यांनी आश्रय दिला होता. त्याने इराणी व मोगल साम्राज्यामधील पूर्वीची सीमा पार केली, काबुलवर विजय प्राप्त केला आणि त्यांचे पुढचे लक्ष्य दिल्ली होते.

नादिरशहा दिल्लीकडे मार्गस्थ झाला

नादिरशहा सिंहासनावर बसल्यापासून साम्राज्याची पश्चिमेकडील सीमा सुरक्षित होती आणि इराणवर त्याचे पूर्ण नियंत्रण होते. या परिस्थितीत तो कंधारच्या दिशेने निघाला. या मोहिमेचा खर्च भागविण्यासाठी तिथल्या लोकांनी प्रचंड किंमत चुकवली आणि त्या देशातील अनेक भागांमध्ये अर्थव्यवस्था ठप्प झाली.

दिल्लीच्या उत्तरेकडे करनालमध्ये मोगल बादशहा मोहम्मद शहाच्या सैन्याचा पराभव करून 1739 मध्ये दिल्लीला पोहोचला. या दरम्यान काही दंगली झाल्या, ज्यात इराणी सैनिकांचा मृत्यू झाला. एक्झॉर्डी म्हणतात की, "आपल्या घरापासून दूर, मोगल साम्राज्याच्या इतक्या जवळ असताना परिस्थिती त्याच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता होती."

नादिरशहाने नरसंहाराचा आदेश दिला. यानंतर सुमारे 30 हजार लोक मारले गेले. त्यांच्यापैकी बहुतेक जण निष्पाप नागरिक होते."

 "या आधी युद्धाव्यतिरिक्त नादिरशहाने आपली सर्व ध्येये विनाकारण रक्तपात न करता साध्य केली होती. पण दिल्लीनंतर कदाचित त्याने निर्णय घेतला की, त्याचे आधीचे सिद्धांत आता तकलातू व जुने झाले आहेत.

गोष्ट अत्यंत मौल्यवान कोहिनूर हिऱ्याची

नादिरशहाने मोगल बादशहाला सिंहासनावरून पदच्युत केले नाही आणि परतताना त्याला अनेक भेटवस्तू दिल्या आणि आपल्या स्वतःच्या हातांनी त्यांच्या मुकुटामध्ये मौल्यवान दागिना जडवला. त्याच्या सार्वभौमत्वाची पुष्टी करणे, हे त्याचे उद्दिष्ट होते. मोगल बादशहा मोहम्मद शहाने त्याला त्या बदल्यात तिबेट व काश्मीरपासून समुद्रापर्यंत सिंधु नदीच्या पश्चिमी भागाता वाटा दिला. हा सौदा आधीपासूनच निश्चित करण्यात आला होता.

नादिर शाह और मुहम्मद शाह

फोटो स्रोत, HISTORY/UNIVERSAL IMAGES GROUP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, नादिर शाह और मुहम्मद शाह

नादिरशहाने दिल्लीहून मोठ्या प्रमाणावर दागिने, सोने आणि चांदीसह सिंधु नदीच्या पश्चिमेकडील सर्व मोगल भागांमध्येही भेटवस्तू प्राप्त केल्या. त्याने प्राप्त केलेल्या एकूण संपत्तीचे मूल्य सुमारे सत्त कोटी रुपये इतकी होती. फ्रान्सच्या सरकारने 1756 पासून 1763 पर्यंत चालणाऱ्या युद्धावर केल्या गेलेल्या खर्चाहून ही रक्कम जास्त होती, ज्यात ऑस्ट्रियाला देण्यात येणाऱ्या सबसिडीहून आणि समुद्रात व जमिनीवर केलेल्या युद्धाचा समावेश होता."

नादिरशहाला मिळालेल्या सर्वात प्रसिद्ध दागिन्यांमध्ये कोहिनूर, दरिया-ए-नूर आणि ताज माह नावाचे हिरे होते. त्या पुढील दशकांत याच हिऱ्यांमुळे रक्तरंजित इतिहास रचला गेला. इराणच्या पश्चिमेला होणाऱ्या लष्करी मोहिमांसाठी आवश्यक धन प्राप्त करणे हे त्याचे दिल्लीवर हल्ला करण्याचे उद्दिष्ट आहे.

युरोप व रशियातील शाही दरबारात नादिरशहाचा बोलबाला

मोगल साम्राज्याविरुद्ध विजय प्राप्त करून नादिरशहाची जगभरात असलेली ख्याती वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचली. भारतातील साधारण दोन महिने चालू असलेल्या या घडामोडी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जगातील कानाकोपऱ्यात पोहोचल्या. भारतातील युरोपियन कंपन्यांचे प्रतिनिधी आणि धर्मुगुरूंकडून नादिरशहाबद्दल अहवाल मागवून घेतला."

 एक्झॉर्डी लिहितात की, नादिरशहाच्या मोहिमा लंडनमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. ऑटोमन आणि रशियाच्या शाही दरबारांमध्ये हत्ती व दागिन्यांसह नादिरशहाने पाठवलेल्या भेटवस्तू प्राप्त झाल्या." ते पुढे लिहितात की, रशियाला पाठवण्यात आलेले दागिने आजही सेंट पीटर्सबर्ग म्युझियममध्ये सुरक्षित आहेत.

हे इथेच थांबले नाही तर काही महिन्यांनी नादिरशहाबद्दल विविध प्रकारच्या युरोपिय भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित होऊ लगाली आणि एका पिढीनंतरही किमान साक्षर लोकांना त्याचे नाव माहीत होते.

"दिल्ली हा नादिरशहाच्या आयुष्यातील सर्वोच्च बिंदू होता."

साधारण दोन महिने तिथे थांबल्यानंतर 16 मे 1739 रोजी तो तिथून निघाला.

पण दिल्लीनंतर नादिरशहाच्या गटात बंडखोरी झाली. तो आजारी पडला. क्रौर्य, राग आणि लोभ हेच त्याचे व्यक्तिमत्व झाले आणि शेवटी त्याच्याच अधिकाऱ्यांनी त्याची हत्या केली.

नादिरशहा : उदयानंतरचं पतन

भारतातून परतल्यावर नादिरशहाला समजले की त्याच्या मुलाने म्हणजे रझा खलीने सफविदचे माजी बादशहा तहमास्प आणि अब्बाल यांना यमसदनी धाडले. या व्यतिरिक्त नादिरशहाला त्याच्या मुलाचा विशाल दरबारही पसंत नव्हता. नादिरशहाने रझा खली कडून त्याचे पद परत घेतले. यानंतर पिता-पुत्राच्या नात्यात दुरावा येऊ लागला आणि आपला मुलगाच आपल्याविरुद्ध कट करत आहे, हे नादिरशहाच्या डोक्यात पक्के बसले.

भारतानंतर नादिरशहाने तुर्कस्तानमध्येही एक यशस्वी मोहीम पार पाडली आणि दागिस्तानच्या दिशेने कूच केली. पण तेथे त्यांना यश मिळाले नाही. त्यांच्या सैन्याला रसद मिळत नव्हती. तोपर्यंत नादिरशहाचे आरोग्यसुद्धा बिघडले होते. त्याला यकृताचा आजार झाला होता. याची सुरुवात मलेरियाने झाली होती आणि जास्त मद्यपान केल्याने हा आजार बळावला होता.

एक्झॉर्डी लिहितात की, यासोबत त्यांचा रागही वाढत गेला होता आणि त्यांना मानसिक समस्यासुद्धा सुरू झाली होती. या दरम्यान सन 1742 मध्ये त्यांच्या कानावर आले की, त्यांचा मुलगा रझा खली त्यांच्या हत्येचा कट रचत आहे. रझा खलीने या आरोपांचे खंडन केले पण नादिरशहाचा विश्वास बसला नाही आणि नादिरशहाने त्याचे डोळे काढून घेतले. त्यानंतर रझा खलीचा सिंहासनावर बसण्याचा मुद्दा कायमचा संपुष्टात आला.

दागिस्तान

फोटो स्रोत, BILDAGENTUR-ONLINE/UNIVERSAL IMAGES GROUP VIA GETT

फोटो कॅप्शन, दागिस्तान

"दागिस्तानमधील अपयश, आजारपण आणि आपल्या मुलाचे डोळे काढून घेतल्याचा पश्चात्ताप यामुळे मानसिक रुपाने त्याचे खच्चीकरण झाले आणि त्यातून तो कधी बाहेरच आला नाही.

एक्झॉर्डी लिहितात की, कदाचित लहानपणी त्यांनी अत्यंत गरीबी आणि सामाजिक कनिष्ठपण सहन केले होते. त्यामुळे नादिरशहासाठी त्याचे कुटुंब महत्त्वाचे होते. तोपर्यंत नादिरशासाठी त्याच्या कुटुंबातील परस्परनिष्ठा हा एक अटळ पैलू होता आणि याच विश्वासाच्या आधारे त्यांनी साम्राज्य स्थापन केले होते. पण आता तो पायाच डळमळीत झाला होता. त्यातील पूर्वीचा भक्कमपण खिळखिळा झाला होता आणि त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्य वेगाने खालावत गेले.

दागिस्तान मोहीम अयशस्वी झाल्यानंतर काही अहवालांनुसार एक एका सुस्थापित योजनेअंतर्गत, ऑटोमन इराकमध्ये कारवाईसाठी एक नवीन सैन्य तयार केले गेले, जे "त्याच्या काळातील कोणत्याही देशाचे सर्वात शक्तिशाली सैन्य" होते.

 काबुलमधून अचानक लडकानाला जावे लागले

दिल्लीमधील खराब हवामानात अनेक नद्या पार करून नादिरशहा 2 डिसेंबर 1739 रोजी काबुलला पोहोचला. सिंधच्या राज्यपालाने म्हणजेच खुदा यार खानने त्याचा मांडलिक होण्यास नकार दिला.

कदाचित खुदा यार खानला वाटले की, अफगाणिस्तानच्या बर्फाळ डोंगरांवरून सिंधच्या तापलेल्या वाळवटातून आणि मैदानी भागातील प्रवास खूपच कठीण आहे. पण नादिरशहा असा नव्हता. तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असे.

 नादिरशहा दोन महिन्यांत एक हजार मैलांचा प्रवास करून सिंधला पोहोचला आणि शेवटी खुदा यार खानला उमरकोटमध्ये अटक केली आणि त्याचा सर्व खजाना नादिरशहाने लुटला. यात इराणच्या सफविद साम्राज्याचा शेवटचा बादशहा शाह सुल्दान हुसैनचे थोडे मौल्यवान सामान होते, जे गलजई अफगाणांच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचले होते.

ऑस्ट्रिया व प्रशियामधील सात वर्षांच्या युद्धातील एक काल्पनिक दृश्य : सैन्याच्या वेतनाची नोंद ठेवणाऱ्या एका अधिकाऱ्यानुसार सन १७४३ मध्ये सुरुवातीला नादिरशहाच्या सैन्यात ३ लाख ७५ हजार सैनिक समाविष्ट होते. इतिहासकारांचे म्हणणे आहे की, ही सेना ऑस्ट्रिया व प्रशिया या युरोपातील दोन सेनांच्या एकूण संख्याबळापेक्षाही जास्त होती. पण या सैन्याचा खर्चही तेवढाच होता.

जगातील सर्वांत मोठे सैन्य

नादिरशहाने शेकडो तोफांसह आपल्या तोफखान्याला पुढे पाठवले. सैन्याच्या वेतनाची नोंद ठेवणाऱ्या एका अधिकाऱ्यानुसार सन 1743 मध्ये सुरुवातीला नादिरशहाच्या सैन्यात 3 लाख 75 हजार सैनिक समाविष्ट होते. यात शिया इराणी लोकांची संख्या खूप कमी होती. सेनेत 60 हजार तुर्कमान व उझबेक, 70 हजार अफगाण आणि भारतीय, 65 हजार खुरासानी व पिश्चिम इराणमधील 1 लाख 20 हजार आणि अझरबैजान व काफ पर्वतातील 60 हजार सैनिकांचा समावेश होता.

 दिल्लीच्या मोहिमेनंतर इराणमध्ये तीन वर्षांपर्यंत करसवलत आणि त्यामुळे होणारी आर्थिक समृद्धी आता इतिहासजमा झाली होती.

 एक्झॉर्डी लिहितात की, नादिरशहाला माहित होते की, इतक्या मोठ्या मोहिमेचा परिणाम काय होईल. पण बहुधा त्यांना आता त्याची पर्वा नव्हती. सन 1740 मध्ये बगदादची मोहीम आखली. त्या मोहिमेमुळे अडचणी अजूनच वाढत गेल्या. अर्थव्यवस्था थांबली आणि कर घेणाऱ्यांकडून बचाव करण्यासाठी लोक आपली घरे सोडून जंगलात लपून राहण्यास मजबूर होऊ लागले. अनेक जण बगदाद, बसरा आणि पूर्व भारतात प्रवास करू लागले.

अनेक निष्कर्षांनुसार, "सन 1722च्या आधीच्या तुलनेने व्यापार पाच पट कमी झाला. सन 1736 मध्ये नादिरशहाने कंधारच्या दिशेने कूच केल्यानंतर साम्राज्यात तुलनेने शांतता होती, पण कर, निराशा व समस्यांनी नव्या बंडखोरीला जन्म दिला होता.

"नादिरशहाच्या गोष्टीत सैन्य आणि त्यांच्यासाठी कर लागू करणे हा एक कायमस्वरुपी पैलू आहे."

ऑटोमन साम्राज्य हे लक्ष्य होते, पण नादिरशहाने सैन्याला माघार घेण्याचा आदेश दिला

नादिरशहाने ऑटोमन साम्राज्यात बगदाद, बसरा, सुमारा, नजफ, कर्बला आणि शत अल-अरबच्या आसपास कारवाई करण्याचा आदेश दिला. कारकुक आणि मोसुलला वेढा घालण्याचा आदेश दिला.

युद्ध लांबले जात होते आणि अचानक नादिरशहाला ऑटोमन साम्राज्याच्या सुल्तानाकडून संदेश मिळाला की, जर त्याचे सैन्य सीमेवरून मागे गेले तर तो शांततेची बोलणी करण्यास तयार आहे. हा संदेश मिळाल्यानंतर नादिरशहा 20 ऑक्टोबर 1743 रोजी आपल्या सैन्साला मोसूलवरून मागे हटण्याचा आदेश दिला, यावर इतिहासकार आश्चर्य व्यक्त करतात. बसराला अजूनही वेढा घातला होता. पण इस्तांबूलमध्ये मात्र आनंद साजरा केला जात होता.

एक तक्रार मिळाल्यावर काबुलवरून सिंधपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास करणारा तोच हा नादिरशहा होता का, असा प्रश्न सर्वांना पडला होता.

"ऑटोमन इराकमध्ये त्यांच्याकडे इतके सैन्य होते की, ज्याचे त्यांनी त्या आधी कधीही नेतृत्व केले नव्हते. यात भारतीय मोहिमांमधील अनुभवी शिपाईसुद्धा होते. एकट्या मोसूलच्या बाहेर त्यांचे किमान २ लाख सैनिक होते.

"संख्याबळाचा विचार करता हे त्यावेळचे बहुधा सर्वात शक्तीशाली सैन्य होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही." एक्झॉर्डी लिहितात की, हे म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या गळ्यात फास अडकवून गुडघे टेकायला मजबूर करणारी मोहीम होती, जसे या पूर्वी बुखारा व दिल्लीला झाले होते."

पण नादिरशहा तर 40 दिवसांचा वेढा टाकून मागे हटला.

इतिहासकार, कठीण युद्ध परिस्थिती आणि अशी अनेक कारणे देतात. पण नादिरशहासाठी हे काही नवीन नव्हते आणि त्याने अशा कठीण परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आपले स्थान तयार केले होते. त्यांच्या आजारपणाचाही उल्लेख होतो. पण ते काही नवीन नव्हते. असेही म्हटले जाते की, वेढा घालणे ही त्यांची ताकद नव्हती, त्यांना मैदानावर लढाई करणे आणि प्रत्यक्ष चाली खेळायला आवडत असते.

एक्झॉर्डी यांच्या मते त्याच्यात युद्ध करण्याची इच्छाच संपली होती. त्याला आता हे विशाल सैन्य सांभाळायणे महत्त्वाचे नव्हते.

"अशीही शक्यता आहे की हा एक योगायोग असेल. पण आधीच्या वर्षी ज्या काळात त्याने आपल्या मुलाचे डोळे काढून घेण्याचा आदेश दिला होता, त्याच काळात त्याने वेढा संपवला होता."

ते याला नादिरशहाच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट' म्हणतात. जेव्हा त्यांच्या विजय दणदणीत होण्याऐवजी शांततेत झाला.

त्याची तलवार, त्याचे सैन्य उपस्थित होते. तेही तितकेच सतर्क व भयानक आणि त्याच्या इशाऱ्यावर काहीही करण्यास तयार असलेले सैन्य होते. ऑटोमन इराकचा बराचसा भाग त्याच्या नियंत्रणाखाली होता आणि इस्तंबूलच्या दिशने पुढे जाण्याची शक्यता होती. इस्लामी जगताचे नेतृत्व त्याच्या निशाण्यावर होते. पण ज्या मुलाला तो हा सगळा वारसा देऊ इच्छित होता, त्याचाच नाश त्याने केला होता.

एके दिवशी अचानक तो आपले सैन्य आणि युद्ध मोहीम सोडून आपल्या हरमच्या काही स्त्रियांसह शिया मजारांना भेट देण्यासाठी घोडदळाचे एक छोटेसे सुरक्षा पथक सोबत घेऊन करबला आणि नजफला येथे निघून गेला.

या तीर्थयात्रांदरम्यान त्याला भेटण्यास आलेल्या ऑटोमन साम्राज्याचा एक अधिकारी त्यांना भेटायला गेला होता. त्याने लिहून ठेवले आहे की, नादिरशहा अजूनही रुबाबदार दिसत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर वयाची व मानसिक गोंधळाची लक्षणे दिसत होती. त्याचे डोळे पिवळे झाले होते आणि अनेक दात पडले होते. तो ऐंशी वर्षांचा वाटत होता.

एक्झॉर्डी लिहितात की, त्या काळात एका फ्रान्समधील धर्मगुरूनेही त्याच्यावर उपचार केले होते आणि ते म्हणाले होते की कदाचित त्याला कावीळ झालेली असू शकेल.

नादिरशहाच्या युद्धमोहिमा अजूनही समाप्त झाल्या नव्हत्या. पण आता त्याच्या गोष्टी त्याच्या नागरिकांच्या समस्या, त्यांच्यावर पडणारे ओझे व नादिरशहाच्या क्रौर्याचा पैलू भारी पडत होता.

 नादिरशहाची शेवटची रात्र

इतिहासकार हुमायूँ कोटझियन लिहितात की, सन 1746 मध्ये ऑटोमन साम्राज्यासोबत केलेल्या करारानंतर दोन्ही साम्राज्यांनी सन १६३९ मध्ये सीमा स्वीकार केल्या. पण ते लिहितात की, नादिरशहाचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

त्यांनी लिहिले की, एका बंडाला चिरडण्यासाठी सिस्तानला जातना त्याच्यात मानसिक असंतुलनाची लक्षणे दिसू लागली. नादिरशहाची वागणूक इतकी विचित्र झाली की, त्याच्या कुटुंबातील माणसांना आणि जवळच्या सहकाऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात आहे, असे वाटू लागले.

युद्ध

फोटो स्रोत, IMAGNO/GETTY IMAGES

आणि एके दिवशी नादिरशहाने आपल्याला इराणी सेनापतींकडून धोका आहे असे वाटून अब्दाली अफगाणांना आपल्या सुरक्षेची जबाबदारी दिली आणि इराणी सेनापतींना ठार मारण्याचा आदेश दिला.

19 जून 1947 च्या संध्याकाळी नादिरशहाने आपल्या सैन्यातील चार हजार सैनिकांचा सेनापती असलेल्या अहमद खान अब्दालीला बोलवून घेतले.

 एक्झॉर्डी लिहितात की, जेव्हा नादिरशहाने कंधारमध्ये विजय प्राप्त केला होता तेव्हा तरुण असलेला अहमद खान अब्दाली त्याच्या तुरुंगात कैद होता. नादिरशहामुळेच अहमद खान अब्दाली इराणी सेनेत अब्दाली या पदावर होता.

नादिरशहाने त्याला सांगितले की, त्याचे संरक्षणक त्याला ठार मारू पाहत आहेत असा संशय असल्याचे त्याने अब्दालीला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या संरक्षकांना अटक करण्याचा आणि संरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याचा आदेश दिला. पण बहुधा हे बोलणे इराणी संरक्षकांनी ऐकले.

नादिरशहाच्या इराणी पथकाने ठरवले की, त्यांच्याकडे फक्त हीच रात्र आहे. या कारवाईसाठी त्यांनी 70 विश्वासू दरबारी व अधिकाऱ्यांचा एक गट तयार केला. नादिरशहा त्या रात्री आपल्या सामान्य तंबूऐवजी चकी या आपल्या पत्नीच्या तंबूत झोपायला गेला. इतिहासकारांच्या मते त्या रात्री घडलेल्या घटनांची माहिती त्यांच्यापर्यंत चकीमुळेच समजली.

नादिरशहाने चकीला सांगून ठेवले की, तो गाढ झोपला तर त्याला जागे करावे. जेव्हा हल्लेखोर हरमच्या दरवाजावर आले तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेकांनी पुढे येण्यास नकार दिला. केवळ काही जण पुढे आले आणि त्यांना विरोध करणाऱ्या एका अश्वेत तृतीयपंथीयाला ठार केले. या गोंधळाने चकी जागी झाली आणि तिने नादिरशहालासुद्धा जागे केले. नादिरशहाने पटकन तलवार हातात घेतली. पण त्याचा पाय अडखळला आणि तो खाली पडला. त्याच स्थितीत सालार खान नावाच्या हल्लेखोराने त्याची मान व खांद्यामध्ये वार केला त्याचा हात तोडला. पण नंतर तो स्वतः वेडा झाला.

नादिरशहा जमिनीवर पडला होता. रक्त वाहत होते. त्याने उठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याने हल्लेखोरांना त्याला न मारण्याची विनंती केली. पण मोहम्मद खान नावाचा हल्लेखोर पुढे आला आणि नादिरशहाची गर्दन छाटली.

अशा प्रकारे नादिरशहाची गोष्ट एका छोट्या टोळीपासून सुरू होऊन क्रूर षडयंत्रे, सैन्याचे विजय, दिमाख, श्रीमंती, चुका, निराशा, क्रौर्य, मानसिक अस्थैर्य आणि नंतर मृत्यूमध्ये झाला."

नादिरशहाच्या मृत्यूनंतरचे दशक ही हिंसा, अराजकता आणि विनाशाची कहाणी आहे. एक्झॉर्डी लिहितात की, त्याच्या सेनेमध्ये विविध सेनापती व जातीच्या लोकांमध्ये स्पर्धेला प्रोत्साहन देत असे. पण त्याच्या मृत्यूनंतर ते एकत्र राहू शकले नाहीत. सिकंदरच्या सेनेप्रमाणे त्याची सेनासुद्धा विविध सेनापतींमध्ये वाटली गेली. त्यात एक अहमद खान अब्दालीसुद्धा होता. त्याने पुढे जाऊन दुर्रानी राज्याची स्थापनी केली.

एक्झॉर्डी लिहितो की, नादिरशहाच्या शासनकाळात त्याने बहुतांश सैनिकांना विस्फोटक शस्त्रे दिली होती आणि सरावावर व प्रशिक्षणावर भर दिला होता. युरोपात शतकभरापूर्वी ही सुरुवात झाली होती. जसजसे सैन्य वाढू लागले, तसतसा त्यांचा खर्चही वाढू लागला आणि साम्राज्याच्या यंत्रणेतही त्याने बदल केले. हे सर्व घटक ही युरोपची ओळख होती.

नादिरशहाने अजून काही काळ राज्य केले असते आणि विचारपूर्वक राज्य केले असते तर त्याच्यानंतर ही सत्ता एखाद्या सक्षम उत्तराधिकाऱ्याकडे गेली असती तर त्याच्या यशस्वी सेनेच्या खर्चासाठी इराणी प्रशासनात सुधारणा झाली असती आणि अर्थव्यवस्थाही बदलली असती, जसे युरोपमध्ये झाले होते.

त्यामुळे इराणमध्ये एक असे आधुनिक राज्य स्थापन होऊ शकले असते, जो पुढील शतकात सुरू होणाऱ्या साम्राज्यवादी सत्तांकडून होणाऱ्या हल्ल्याला सामोरे जाण्यास सक्षम असता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)