लॉटरीची तिकिटं विकून राजाने उभारला मंदिराचा 134 फूट उंच कळस, कुठे आहे हे मंदिर?

तनुमलयन मंदिर
फोटो कॅप्शन, तनुमलयन मंदिर
    • Author, एस महेश
    • Role, बीबीसीसाठी

तामिळनाडूतल्याएका मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी एका राजाने लॉटरीची तिकीटं विकून पैसे उभे करण्याचे आदेश दिले होते. तिकीटं विकून मिळालेल्या पैशातून मंदिराचा कळस दुरुस्त करण्यात आला होता.

आज तामिळनाडू राज्यात लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीवर बंदी आहे. पण 148 वर्षांपूर्वी कन्याकुमारी जिल्ह्यातील सुचिंद्रम शहरातील प्रसिद्ध थानुमालन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी लॉटरीची तिकिटं विकण्यात आली होती.

या मंदिराला स्थानुमलयन मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. देशातील 108 शैव क्षेत्रांपैकी हे एक आहे.

स्थानुमलयन म्हणजे त्रिमूर्ती. स्थान म्हणजे शिव, मलाय म्हणजे विष्णू आणि अयन म्हणजे ब्रह्मा. हे मंदिर कन्याकुमारीमध्ये पालयन नदीच्या काठावर आहे.

इतिहासकारांच्या मते, 1875 मध्ये या मंदिराच्या गाभाऱ्याच्या जीर्णोद्धारासाठी लॉटरीची तिकिटे विकली गेली होती.

134 फूट उंच कळस

इतिहासकार के. के. पिल्लई यांनी 1953 मध्ये प्रकाशित 'द सुचिंद्रम टेंपल' या त्यांच्या पुस्तकात राजगोपुरमची (कळस) उंची 134 फूट 6 इंच असल्याचं सांगितलं होतं.

तो अंदाजे 90 फूट लांब आणि 60 फूट रुंद असल्याचं पुस्तकात लिहिलं आहे. या कळसाचं वर्णन करताना असं म्हटलं जातं की, या मंदिराच्या गोपुराची स्थापत्य शैली तत्कालीन त्रावणकोर साम्राज्यातील इतर कोणत्याही शैलीपेक्षा उजवी होती.

तनुमलयन मंदिराचे राजगोपुरम
फोटो कॅप्शन, तनुमलयन मंदिराचे राजगोपुरम

संशोधक डॉ. ए. के. पेरुमल यांनी त्यांच्या 'स्थानुमलयन मंदिर' या पुस्तकात मंदिराचा इतिहास सांगितला आहे.

त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या मंदिराशी संबंधित शिलालेख मल्याळम वर्ष 720 (इसवी सन 1544) मध्ये राजगोपुरा येथे सापडले आहेत.

तत्कालीन विजयनगरचे राजे विठ्ठलार आणि त्यांच्या भावांनी मिळून या मंदिराची उभारणी केल्याचं सांगितलं जातं.

त्यानंतर 344 वर्ष मंदिराचा कळस चांगल्या अवस्थेत होता असं सांगितलं जातं. 1881 मध्ये त्रावणकोर राज्याचे राजे विसाकम यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतलं. त्याच्या पुढच्या चार वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. पेरुमल सांगतात की, 1888 मध्ये सत्तेवर आलेल्या राजा तिरुनाल यांनी मंदिराच्या शिखराची पुनर्बांधणी पूर्ण केली.

वट्टपल्ली मठाधिपती

मल्याळममध्ये वट्टम म्हणजे व्यवस्था. पल्ली म्हणजे मंदिर. वट्टपल्ली म्हणजे मंदिरातील व्यवस्था बघणारी व्यक्ती.

सुचिंद्रम तनुमलयन मंदिरात पूजा आणि समारंभ करण्याचा अधिकार वट्टपल्ली मठाधिपतींना वारसा हककाने मिळाला होता.

के. के. पिल्लई यांच्या 'सुचिंद्रम टेम्पल- ए मॅनोग्राफ' या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, सुचिंद्रम येथे कायमस्वरूपी निवासस्थान असलेल्या वट्टपल्ली मठाधिपतींना मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान रथासमोर ध्वज ठेवण्याचा अधिकार आहे. एकेकाळी मंदिराचे कुलूप, मौल्यवान वस्तू आणि भांडीही त्यांच्या ताब्यात असत.

लॉटरीची तिकिटे विकण्याचा राजाने दिलेला आदेश
फोटो कॅप्शन, लॉटरीची तिकिटे विकण्याचा राजाने दिलेला आदेश

वट्टपल्ली मठाचे सदस्य संस्कृत आणि मल्याळम व्यतिरिक्त ज्योतिष आणि वैद्यकशास्त्रातील तज्ञ असल्याचंही या पुस्तकात सांगितलं आहे.

जीर्णोद्धाराच्या निधीसाठी लॉटरी तिकिटांची विक्री

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सध्याचा कन्याकुमारी जिल्हा 1728 ते 1948 या काळात त्रावणकोर साम्राज्याचा भाग होता.

त्याकाळी सुचिंद्रम मंदिराच्या कळसाच्या बांधकामासाठी 70 हजार रुपयांची आवश्यकता होती. तेव्हा राजा अय्याम तिरुनाल हे त्रावणकोरच्या गादीवर होते.

1875 मध्ये परमेश्वर शर्मा उर्फ बच्चू हे सुचिंद्रम वट्टपल्ली मठाचे मठपती आणि त्रावणकोर राजांचे मुख्य सल्लागार होते. त्यांनी त्रावणकोरच्या राजाला सल्ला दिला की, मंदिराच्या दुरुस्तीसाठी लॉटरीची तिकिटं विकून निधी उभारता येईल.

आयुर्वेदिक डॉक्टर असलेले शिव प्रसाद सांगतात की, राजाला सल्ला देणारे परमेश्वर शर्मा हे आमचे पूर्वज होते. त्यांच्यानंतरची ही सहावी पिढी आहे.

डॉ. शिव प्रसाद सध्या सुचिंद्रम वट्टपल्ली मठात राहतात. शिव प्रसाद सांगतात, "राजाने मल्याळम वर्ष 1050 (1875) मध्ये लॉटरीची तिकिटं विकण्याची परवानगी दिली."

कळसाच्या दुरुस्तीसाठी 30 हजार रुपये सरकार कडून देण्यात येणार होते तर उर्वरित 40 हजार रुपये लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीतून जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दिवशीच्या किमतीनुसार प्रत्येक लॉटरीसाठी एक रुपया शुल्क आकारण्यात आलं होतं.

सुचिंद्रम वट्टपल्ली मठातील शिवप्रसाद यांचे वडील कलामेश्वर शर्मा हे देखील आयुर्वेदाचे तज्ञ आहेत. ते केरळमधील वैकुम भागात राहतात.

तत्कालीन राजाने लॉटरीची तिकिटं विकण्याचा आदेश मल्याळममध्ये दिला होता.

मात्र, लॉटरीची किती तिकिटं विकली गेली आणि लॉटरी कोणी जिंकली, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं ए. के. पेरुमल सांगतात.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)