'माझ्या मुलींना सोडा, हवंतर माझ्यावर बलात्कार करा' - सुदानमधील यादवी युद्धाचं भयाण वास्तव

सुदान

फोटो स्रोत, BBC/Hasan Lali

    • Author, बार्बरा प्लेट अशर
    • Role, बीबीसी आफ्रिका प्रतिनिधी, ऑमदर्मन

यादवी संघर्षामुळे सुदान कोसळण्याच्या मार्गावर आहे. तिथली परिस्थिती अत्यंत भयंकर आहे.

17 महिन्यांपासून सुरू असलेल्या क्रूर यादवी युद्धामुळे हा देश उद्ध्वस्त झाला आहे. या देशाच्या लष्करानं राजधानी खार्तुममध्ये मोठा हल्ला सुरू केला आहे. रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF)या त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या ताब्यात असलेल्या भागाला लष्करानं लक्ष्य केलं आहे.

या यादवी संघर्षाच्या सुरुवातीलाच रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF)नं खार्तुमचा बहुतांश भाग ताब्यात घेतला होता, तर नाईल नदीच्या पलीकडच्या ऑमदर्मनच्या जुळ्या शहरावर लष्कराचं नियंत्रण आहे.

सुदानच्या काही भागांवर रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF)आणि तर काही भागांवर लष्कराचं नियंत्रण आहे. मात्र, तरीदेखील अजूनही तिथे असे काही भाग आहेत, जिथे लोकं दोन्ही बाजूला जाऊ शकतात आणि जातात देखील.

अशाच एका ठिकाणी मी महिलांच्या एका गटाला भेटले. या महिला चार तास पायी चालत लष्कराच्या ताब्यात असलेल्या ऑमदर्मनच्या काठावरील किंवा परिघावरील बाजारात पोहोचल्या होत्या. कारण तिथं अन्न स्वस्त आहे.

आरएसएफच्या ताब्यात असलेल्या दार एस सलाममधून या महिला आल्या होत्या.

(सूचना: या लेखातील काही भाग विचलित करू शकतो.)

भयंकर लैंगिक अत्याचाराला तोंड देत जगणाऱ्या महिला

या महिलांशी जेव्हा मी बोलले, तेव्हा तिथलं भीषण वास्तव समोर आलं. त्यांनी मला सांगितलं की, त्यांच्या पतींनी घराबाहेर पडणं बंद केलं होतं. कारण आरएसएफच्या लोकांनी या पुरुषांना मारहाण केली, त्यांनी कष्टानं कमावलेलं पैसे त्यांच्याकडून हिसकावून घेतले किंवा त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात पैशांची मागणी केली.

"आम्ही हा सर्व त्रास सहन करत आहोत, कारण आम्हाला आमच्या मुलांची पोटं भरायची आहेत. आम्ही भुकेले आहोत, आम्हाला अन्न हवं आहे," असं त्यातील एकीनं सांगितलं.

मग मी त्या महिलांना विचारलं की, पुरुषांपेक्षा त्या सुरक्षित आहेत का? त्यांच्यावर बलात्कारासारखे लैंगिक अत्याचार होत नाहीत का?

मी हा प्रश्न विचारल्याबरोबर जणूकाही स्तब्ध झाल्या. त्या एकदम गप्पच झाल्या.

मग त्यातील एकीचा उद्रेक झाला.

ती म्हणाली, "जग कुठे आहे? तुम्ही आम्हाला मदत का करत नाही? एकीकडे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना तिच्या तोंडातून जोरजोरात शब्द बाहेर पडत होते. जणूकाही तिच्या मनात खदखदत असलेल्या आक्रोशालाच वाचा फुटली होती."

"इथं अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत. मात्र त्या याबद्दल बोलत नाहीत. त्या बोलल्या तरी त्यामुळे असा काय फरक पडणार आहे?"

आफ्रिकेतील लहान मुलं

फोटो स्रोत, BBC/Ed Habershon

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तिथल्या भयावह परिस्थितीबद्दल ती महिला पुढे सांगू लागली, "आरएसएफची माणसं रात्रीच्या वेळी काही मुलींवर रस्त्यांवरच बलात्कार करतात. जर या मुलींना बाजारातून येण्यास उशीर झाला तर आरएसएफची माणसं त्यांना पाच-सहा दिवस ठेवून घेतात."

ती बोलत असताना तिची आई हातात डोकं धरून रडत होती. तिच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर महिला देखील रडू लागल्या.

"तुमच्या जगात जर तुमची मुलगी बाहेर गेली तर तुम्ही तिला तसंच सोडाल का?" असा थेट प्रश्न तिनं मला विचारला.

"तुम्ही तिला शोधण्यासाठी जाणार नाहीत का? मग आता मला सांगा, आम्ही काय करायचं? आमच्या हातात काहीच नाही. कोणालाही आम्ही काळजी नाही. सर्व जग कुठे आहे? ते आम्हाला मदत का करत नाहीत!"

आपल्यावर, आपल्या अवतीभोवतीच्या महिलांवर, मुलींवर प्रचंड अत्याचार होत असताना कोणीच त्याची दखल घेत नाही, कोणीच मदतीला धावून येत नाही. या गोष्टीमुळे ती एका बाजूला हतबल झाली होती, तर दुसरीकडे या गोष्टीबद्दल आक्रोश देखील करत होती.

लष्कराच्या ताब्यातील भागातून आरएसएफच्या ताब्यात असणाऱ्या भागात जाण्यासाठी हा परिसर म्हणजे नैराश्याचे आगारच वाटत होते.

कारण तिथे महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना सीमा नव्हती.

अराजक आणि अत्याचारामुळे हवालदिल जनता

तिथे प्रवास करणारे सांगतात की तिथे अराजक माजलं आहे. लोकांची लूटमार होते आहे, त्यांना क्रौर्याला सामोरं जावं लागतं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचं म्हणणं आहे की या यादवी संघर्षामुळे एक कोटी पाच लाखांहून अधिक लोकांना त्यांचं घर सोडून पलायन करावं आहे.

सुदानसारख्या छोट्या देशात एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पलायन करायला लागणं यावरून तिथल्या यादवी युद्धामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची कल्पना येते.

लष्कर आणि आरएसएफमधील सत्तासंघर्षातून हे युद्ध सुरू झालं. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या या संघर्षाचं लैंगिक हिंसाचार हे एक वैशिष्ट्यं बनलं आहे. नंतरच्या काळात यात स्थानिक सशस्त्र गट आणि शेजारच्या देशांमधील सशस्त्र लढवय्ये देखील सामील झाले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकारासाठीचे उच्चायुक्त असलेले वोकर टर्क म्हणाले आहेत की 'युद्धातील शस्त्र' म्हणून बलात्काराचा वापर केला जातो आहे.

लाल रेष
लाल रेष

संयुक्त राष्ट्र संघाच्या सत्य शोधन मोहीमेत लष्कराकडून करण्यात आलेल्या असंख्य बलात्कारांची आणि बलात्काराच्या धोक्यांची नोंद करण्यात आली आहे.

मात्र असंही समोर आलं आहे की आरएसएफ आणि त्यांच्या सहकारी सशस्त्र गटांकडून मोठ्या प्रमाणात लैंगिक हिंसाचार करण्यात आला आहे. यातून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झालं आहे.

बीबीसीसोबत बोलणाऱ्या एका महिलेनं आरएसएफच्या लोकांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला.

जवळील बाजारात आम्ही तिला भेटलो. त्या बाजाराचं नाव सौक अल-हर म्हणजे 'उष्ण बाजार' असं आहे.

या यादवी संघर्षाला सुरूवात झाल्यापासून हा बाजार ऑमदर्मनच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या वाळवंटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओसाड जमिनीवर विस्तारला आहे.

या बाजारात अतिशय कमी किमतीत वस्तू मिळत असल्यामुळे गरीबांतील गरीब लोक या बाजारात येतात.

मुलींच्या रक्षणासाठी स्वत:ला नराधमांकडे सोपवणारी हतबल आई

मिरियम (हे काही तिचं खरं नाव नाही) नं दार एस सलाम मधील तिच्या घरातून पळून आपल्या भावाकडे आश्रय घेतला होता.

आता ती चहाच्या टपरीवर काम करते. ती म्हणाली, या युद्धाच्या सुरूवातीला दोन सशस्त्र माणसं तिच्या घरात शिरली आणि तिच्या दोन मुलींवर बलात्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिची मोठी मुलगी 17 वर्षांची होती तर धाकटी 10 वर्षांची.

"मी माझ्या मुलींना माझ्या मागे दडण्यासाठी सांगितलं आणि आरएसएफच्या माणसांना म्हणाले की जर तुम्हाला बलात्कारच करायचा असेल तर माझ्या मुलींवर नाही माझ्यावर करा," असं त्या भयंकर प्रसंगाबद्दल सांगताना ती म्हणाली.

ती पुढे म्हणाली, "त्यांनी मला मारहाण केली आणि मला कपडे उतरवण्याचा आदेश दिला. कपडे काढण्यापूर्वी मी माझ्या मुलींना तिथून जाण्यास सांगितलं. त्यांनी इतर मुलांना घेतलं आणि कुंपणावरून उडी मारली. त्यानंतर त्यातील एकानं माझ्यावर बलात्कार केला."

सुदानमधील परिस्थितीची तपासणी करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना आरएसएफनं सांगितलं की मानवी हक्कांचं उल्लंघन करणारे लैंगिक हिंसाचार आणि इतर प्रकारचे हिंसाचार रोखण्यासाठी त्यांनी आवश्यक ती पावलं उचलली आहेत.

मात्र लैंगिक अत्याचार, बलात्काराची असंख्य प्रकरणं आहेत आणि ती सातत्यानं होत आहेत. या सर्व अत्याचाराचा लोकांवर, समाजावर कायमस्वरुपी परिणाम होतो.

गरिबी आणि बलात्कार हेच वास्तव

फातिमा (हे तिचं खरं नाव नाही) काही झाडांच्या सावलीत एक छोट्या स्टुलावर बसली आहे. ती मला म्हणाली की ती ओमदुर्मनला जुळ्या मुलांना जन्म देण्यासाठी आली होती. तिनं इथंच राहायचं ठरवलं होतं.

ती पुढे म्हणाली, तिची शेजारी असणारी एक 15 वर्षांची मुलगी देखील गर्भवती झाली होती. तिच्यावर आणि तिच्या 17 वर्षांच्या बहिणीवर आरएसएफच्या सैनिकांनी बलात्कार केल्यानंतर तिला दिवस गेले होते.

त्या दिवशी काय घडलं याबद्दल तिनं पुढे सांगितलं की किंचाळ्या, आरडाओरडा ऐकून लोकं जागी झाली होती आणि काय झालं आहे हे पाहण्यासाठी बाहेर आली होती. मात्र त्या सशस्त्र लोकांनी त्यांना धमकावलं की जर ते त्यांच्या घरात परत गेले नाहीत तर त्यांना गोळ्या झाडल्या जातील.

सुदानमधील एक घर

फोटो स्रोत, Getty Images

दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना या दोन्ही मुलींच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराच्या, बलात्काराच्या खुणा दिसल्या. त्यांच्या मोठ्या भावाला एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं होतं.

फातिमा म्हणाली, "सुदानमधील या यादवी संघर्षात आरएसएफ सहभागी झाल्यापासून आम्ही बलात्कारांबद्दल फक्त ऐकतच होतो. आता मात्र आम्ही अगदी आमच्या शेजारीच बलात्कार झाल्याचं पाहिलं होतं."

"सुरूवातीला आम्हाला बलात्काराच्या बातम्यांबद्दल शंका वाटत होती. मात्र आता आम्हाला माहित झालं होतं की आरएसएफच्या सैनिकांनी मुलींवर बलात्कार केला होता."

आरएसएफच्या नियंत्रणात असणाऱ्या भागातील बाजारातून घरी परतण्यासाठी इतर महिला देखील गोळा होत आहेत. त्या म्हणतात की त्या अतिशय गरीब आहेत. त्यामुळे मिरियमप्रमाणे दार-एस-सलाम सोडून नवं आयुष्यं सुरू करणं त्यांना शक्य नाही.

त्यामुळे जोपर्यंत हे युद्ध सुरू आहे तोपर्यंत या भयानक परिस्थितीला तोंड देण्याशिवाय या गरीब महिलांसमोर दुसरा पर्याय नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)