रवांडा नरसंहारानंतर 30 वर्षांनी BBC पत्रकार तिच्या घरी पोहोचली आणि...

रवांडा
    • Author, व्हिक्टोरिया उवोनकुंडा
    • Role, बीबीसी न्यूज, किगाली, रवांडा

(सूचना: या बातमीतील काही भाग तुम्हाला विचलित करू शकतो.)

सामूहिक हिंसाचार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात होवो. तो सर्व मानवजातीसमोर आव्हान निर्माण करतो. माणसं पशूसारखं का वागतात आणि या प्रकारचा हिंसाचार टाळता येणं शक्य आहे का, हे प्रश्न या निमित्तानं सर्वांसमोर येतात.

रवांडातील भयानक नरसंहारामुळं आयुष्यच बदलून गेलेल्या एका किशोरवयीन मुलीची आणि तिच्यासारख्या हजारो लोकांची ह्रदयद्रावक कहाणी सांगणारा हा अनुभव :

30 वर्षांपूर्वी मी 12 वर्षांची होते. तेव्हाच मी माझं जन्मस्थळ आणि घर सोडलं होतं.

रवांडात 1994 मध्ये भयंकर नरसंहार झाला होता, त्यावेळेस मी माझ्या कुटुंबासह तिथून पळाली होती.

केनिया आणि नॉर्वेमध्ये वाढल्यानंतर, शिक्षण घेतल्यानंतर लंडनमध्ये स्थायिक झाली. माझ्या मनात नेहमीच एक विचार यायचा की, परत जाऊन आपलं घर पाहायचं का? रवांडातील लोक ठीक असतील की नाही?

त्याच विषयावर डॉक्युमेंट्री बनवण्यानिमित्त जेव्हा मला रवांडात जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी खूपच उत्साहित झाली होती.

त्याचबरोबर तिथं मला काय पाहायला मिळेल आणि त्यावर मला काय वाटेल? माझी प्रतिक्रिया कशी असेल या गोष्टीचीदेखील खूप काळजी वाटत होती.

रवांडातील घटनांचा माझ्यावर भावनिकदृष्ट्या मोठा आघात झाला. त्यामुळे मला पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस सिडऑर्डर (PTSD)चा विकार जडला आणि तो त्रास माझा आयुष्याचा भाग झाला आहे.

व्हिक्टोरिया यांचा बालपणीचा फोटो

फोटो स्रोत, VICTORIA UWONKUNDA

फोटो कॅप्शन, व्हिक्टोरिया यांचा बालपणीचा फोटो

मायभूमी सोडण्याच्या वेदना

रवांडातील अनेक नागरिकांसारखंच मीही माझ्या कुटुंबातील अनेक सदस्य गमावले आहेत.

फक्त 100 दिवसांच्या आतच हुतू जमातीतील कट्टरवाद्यांनी तुत्सी या अल्पसंख्याक जमातीतील आठ लाखांहून अधिक लोकांची हत्या केली होती.

त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांनाही निशाण्यावर घेतलं. मग ते कोणत्याही जमातीचे किंवा वंशाचे असोत.

या नरसंहारानंतर मुख्यत: तुत्सी गटांनी सत्ता हस्तगत केली होती. त्यांच्यावरदेखील बदल्यापोटी रवांडातील हजारो हुतू लोकांची हत्या केल्याचा आरोप झाला होता.

व्हिक्टोरिया

मी जेव्हा रवांडाची राजधानी किगाली येथे पोहोचली, तेव्हा माझ्या मनात भावनांचं काहूर माजलं होतं.

माझी मातृभाषा किन्यारवांडा आहे. तिथे पोचल्यानंतर आपल्या चहूबाजूला लोकांना त्याच भाषेत बोलताना ऐकून मला एक वेगळाच आनंद होत होता.

मात्र, मला आठवतं की, मी जेव्हा या शहरात होती तेव्हा इथं अराजक माजलं होतं. आमच्यातील लाखो लोक जीव वाचवण्यासाठी पळ काढत होते. जिवंत राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.

माझ्या या छोट्याशा दौऱ्याच्या वेळेस मला काही ठिकाणं पाहायची इच्छा होती.

त्यामध्ये माझी प्राथमिक शाळा आणि किगाली शहरातील माझं शेवटचं घरं होतं. याच ठिकाणी 6 एप्रिल 1994 ला मी त्या दुर्दैवी रात्री माझ्या नातेवाईकांसोबत डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते.

त्यावेळेस आम्हाला कळलं की देशाच्या राष्ट्राध्यक्षाचं विमान पाडण्यात आलं आहे. त्या रात्री आलेल्या एका फोन कॉलने आमचं सर्व आयुष्यच बदलून टाकलं होतं.

स्वत:चं घर कसं शोधलं?

माझं जुनं घर मला सापडलं नाही. चारवेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर मी हार मानली. मी नॉर्वेत माझ्या आईला फोन केला. ती मला काहीतरी मार्ग दाखवेल असं मला वाटलं.

अखेर मला घर सापडलं. घराच्या बंद गेटसमोर उभी राहिल्यानंतर उन्हं चढलेल्या आणि उष्णतेनं भरलेल्या दुपारच्या आठवणींनी माझा गळा भरून आला. दुपारच्या वेळेस आम्ही छतावर बसून गप्पा मारत असू आणि तेही निर्धास्तपणं.

आम्हाला सांगण्यात आलं की, कपड्यांचे तीन जोड घ्या. आम्ही कधीही कल्पना केली नव्हती अशा प्रवासासाठी आम्हाला एका कारमध्ये बसवण्यात आलं.

व्हिक्टोरिया त्यांच्या जुन्या घरासमोर
फोटो कॅप्शन, व्हिक्टोरिया त्यांच्या जुन्या घरासमोर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या सर्वाबद्दल आमच्यातील कोणी काही बोलल्याची किंवा तक्रार केल्याचं मला आठवत नाही. कारच्या मागील भागात मुलांना कोंबण्यात आलं होतं आणि त्या प्रसंगातदेखील आम्हाला जोराची भूक लागली होती.

सहाव्या दिवशी आमच्या लक्षात आलं की किगाली शहरात कोणतंही ठिकाण सुरक्षित नाही. यानंतर आम्ही तिथून पलायन करणाऱ्यांमध्ये सामील झालो. आम्ही हजारो लोक पायी, मोटरसायकलने, कारने, ट्रकांनी एकाचवेळी पलायन करत होतं. असं वाटत होतं की जणूकाही सर्व किगाली शहरच पलायन करत होतं.

गिसेनी येथील आमच्या कुटुंबाच्या घरी जात होतो. हा प्रदेश रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या सीमेजवळ आहे. आता त्याला रुबावू जिल्ह्याच्या नावानं ओळखलं जातं.

आता जेव्हा मी रवांडाच्या दौऱ्यावर आली होती तेव्हा इथं सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. गोळीबाराचा देखील आवाज नव्हता. रस्त्यावर पलायन करणाऱ्या लोकांचे जथ्थे नव्हते. यावेळेस वातावरण प्रसन्न होतं, छान शांत आणि सुंदर दिवस होता.

मला माझं तीन बेडरुम असलेलं घर सापडलं. याच घरात नरसंहाराच्या काळात तीन महिन्यात जवळपास 40 लोकांना आश्रय देण्यात आला होता. ते घर अजूनही उभं आहे. जुलै 1994 मध्ये आमचं घर सोडल्यापासून ते रिकामंच असतानाही उभं आहे हे विशेष.

नरसंहारातून वाचलेल्या नातेवाईकांची भेट

माझं सुदैव की, त्या भयानक नरसंहारात जिवंत वाचलेल्या माझ्या काही नातेवाईकांना भेटण्याची संधी मला मिळाली. यामध्येच ऑगस्टिन हा माझा चुलत भाऊदेखील होता. गिसेनी येथे मी जेव्हा त्याला अखेरचं पाहिलं होतं तेव्हा तो फक्त 10 वर्षांचा होता.

त्याची गळाभेट घेणं हे माझ्यासाठी जणूकाही स्वप्नवतंच होतं. त्याच्याबरोबरच्या माझ्या गोड आठवणी आहेत. आम्ही जवळच्या भाजीपालाच्या शेतात खेळायचो, पळायचो, ईस्टरच्या सुट्ट्यांचा आनंद लुटायचा. आमच्या कुटुंबावर येणाऱ्या त्या भयावह संकटाची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.

माझा चुलत भाऊ, ऑगस्टिन, आता चार मुलांचा बाप झाला आहे. मात्र भेटल्यानंतर आमचं बोलणं तिथूनच सुरू झालं जिथे ते शेवटच्या भेटीत थांबलं होतं. जणूकाही मधला काळ आमच्या आयुष्यात आलाच नव्हता. त्यावेळेस जैरे नावाने ओळखल्या जाणाऱ्या डीआर कॉंगो येथे पळून गेल्यानंतर आम्ही तिथून वेगळं झालो होतो.

रवांडा

फोटो स्रोत, VICTORIA UWONKUNDA

फोटो कॅप्शन, रवांडामध्ये नरसंहार झाला तेव्हा शाळांमध्ये इस्टरच्या सुट्ट्या सुरू होत्या.

ऑगस्टिनने सांगितलं, ''मी माझ्या आई-वडिलांशिवाय एकटाच पळून गेलो होतो. गावांमधून मार्ग काढत पुढं गेलो. तर माझे आई-वडील गिसेनी शहरातून गोमा (डीआर काँगोच्या सीमेवरील एक शहर) इथं गेले.''

त्याच्यासाठी हा सर्व प्रसंग कसा ठरला असेल, तो कोणत्या परिस्थितीतून गेला असेल, याची मी कल्पनादेखील केली नव्हती. किबुम्बा येथील निर्वासितांच्या एका प्रचंड शिबिरात आपल्या आई-वडिलांशिवाय असणारा एकटा मुलगा. आम्ही पलायन केलं तेव्हा माझ्यासोबत किमान माझं कुटुंबतरी होतं.

यात एक गोष्ट चांगली झाली होती ती म्हणजे ऑगस्टिनच्या काही जुन्या शेजाऱ्यांनी त्याच्या आईवडिलांपर्यत ही माहिती पोचवली होती. मग ते सर्व दोन वर्षं किबुम्बा इथं राहिले.

त्यांनी मला सांगितलं की, ''सुरूवातीच्या दिवसांमध्ये तिथली परिस्थिती फारच वाईट होती. त्या भागात प्लेग पसरला होता. लोकं आजारी पडत होते. या आजारात स्वच्छता आणि चांगल्या अन्नाअभावी हजारो लोकांचा मृत्यू झाला.''

'ऑगस्टिन'ची जीवनकथा बरीचशी माझ्या आयुष्यासारखीच आहे. गोमा इथं निर्वासित म्हणून घालवलेले ते सुरूवातीचे आठवडे माझ्या चांगलेच लक्षात आहेत. केनियात आमच्या कुटुंबाची कायमस्वरुपी व्यवस्था होण्याआधी गोमा इथं शहरातील रस्त्यावर मृतदेहाचं ढिग लागलेले मला आठवतात.

दोन जीवघेण्या हल्ल्यातून वाचला होता जीव

13 वर्षांची क्लॉडेट मुकारुमंजी रवांडात कित्येक हल्ल्यानंतर देखील जिवंत राहिली होती.

आत त्या 43 वर्षांच्या आहे. तिला नातवंडं आहेत. आपले अनुभव मला सांगण्यास त्या तयार झाल्या. याचबरोबर त्यांच्या जखमांसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांपैकी एकाबद्दल सांगण्यास देखील त्या तयार झाल्या.

त्यांनी ज्या हल्ल्यांबद्दल सांगितलं, त्यातील एक हल्ला आग्नेय रवांडातील न्यामाता या शहरापासून काही मीटर अंतरावरच झाला होता. आम्ही आता न्यामाता शहरातच भेटत होतो.

इथं एक कॅथलिक चर्च होतं. यामध्ये शेकडो लोकांनी आश्रय घेतला होता. मात्र चाकूने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

क्लॉडेट मुकारुमंजी
फोटो कॅप्शन, दोन प्राणघातक हल्ल्यांपासून क्लॉडेट मुकारुमंजीचे प्राण वाचले

त्यांनी सांगितलं की, ''जेव्हा त्याने माझ्यावर चाकूने हल्ला केला तेव्हा तो चर्चच्या आत उभा होता. चाकूने माझ्यावर वार करत असताना तो गात होता. त्याने माझ्या चेहऱ्यावर वार केला आणि माझ्या चेहऱ्यातून रक्त वाहत असल्याची मला जाणीव झाली.''

त्या सांगतात, ''त्याने मला पालथं झोपण्याचा आदेश दिला. मग त्याने माझ्या पाठीवर भाल्याने वार केला. त्याच्या खुणा आजदेखील माझ्या शरीरावर आहेत.''

त्यांनी पुढं सांगितलं, ''त्याने मला भाल्याने जोरात भोसकलं आणि भाला शरीराच्या आरपार गेला आहे असं समजून मला सोडून दिलं.''

आपल्या पाठीत खोलवर घुसलेल्या भाल्याला काढून टाकल्यानंतर त्या तिथून पळून गेल्या. धडपडत त्या आपल्या शेजाऱ्याच्या घरी पोचल्या. त्यानं वाटलं होतं की त्या तिथं सुरक्षित राहतील.

मात्र त्या किशोरवयीन मुलीची गाठ 26 वर्षांच्या पोलिस अधिकाऱ्याशी पडली. त्याचं नाव जीन क्लाउड नटंबारा होतं.

पोलीस अधिकाऱ्यानं केला जीव घेण्याचा प्रयत्न

नटंबारानं मला सांगितलं, ''ज्या घरात क्लॉडेट मुकारुमंजी ही 13 वर्षांची मुलगी लपली होती, त्या घराच्या मालकानं आम्हाला फोन केला. त्यानं आम्हाला फोनवर सांगितलं की तिथं 'इनयेंजी' आहे.''

'इनयेंजी' शब्दाचा अर्थ आहे 'झुरळ'. या शब्दाचा वापर हुतु कट्टरपंथींचा आणि बातम्यांमध्ये तुत्सी लोकांचं वर्णन करण्यासाठी केला जायचा.

त्यांनी सांगितलं की, ''मी पाहिलं की अंथरुणात बसली आहे. अतिशय गंभीररित्या जखमी झालेली आणि रक्तानं माखलेली. मी तिला ठार करण्यासाठी तिच्या खांद्यावर गोळी झाडली.''

''कोणालाही जिवंत न ठेवण्याचा आदेश आम्हाला देण्यात आला होता. गोळी झाडल्यावर मला वाटलं की ती मेली आहे.''

6 एप्रिल 1994 रोजी रवांडातून पळून जाणारे लोक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 6 एप्रिल 1994 रोजी रवांडातून पळून जाणारे लोक

यानंतर थोड्या वेळानं ती त्या घरातून पळून गेली आणि एकटीच भटकत राहिली. ओळखीच्या व्यक्तीची भेट होईपर्यंत ती भटकत राहिली. मग एका ओळखीच्या माणसाने तिच्या जखमांवर इलाज केला.

मुकारुमंजी आणि नटंबारा अशा लोकांपैकी आहेत ज्यांनी आश्चर्यकारकरित्या एक मार्ग शोधला आहे.

मी जेव्हा त्यांच्याजवळ गेली तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. एका झाडाच्या सावलीत ते एकत्र हसत होते. मात्र त्यांच्या हसण्यामुळं हे सिद्ध झालं की ही प्रक्रिया किती कठीण आहे.

मी त्या माजी पोलिस अधिकाऱ्याला विचारलं की त्याला ठाऊक आहे का की त्या नरसंहारात त्याने किती लोकांना ठार केलं होतं. या प्रश्नावर त्यानं मुकाट्यानं आपलं डोकं हलवलं.

नरसंहारात भाग घेतल्याबद्दल त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला 10 वर्षांहून अधिक काळाची शिक्षा सुनावण्यात आली.

तुरुंगवासात जाण्याऐवजी त्याने पश्चाताप करण्याची आणि माफी मागण्याची आणि समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्याने मुकारुमंजी यांचा शोध घेतला. सात वेळा अपील केल्यानंतर त्या त्याला माफ करण्यास तयार झाल्या.

समाजात विश्वासाचा अभाव

अॅलेक्झॅंड्रोस लॉर्डोस मनोवैज्ञानिक आहेत. त्यांनी रवांडात काम केलं आहे. ते म्हणतात की व्यक्तिगत पातळीवर उपचार सुरू करण्यासाठी सामूहिक उपचारांची आवश्यकता असते.

त्यांनी मला सांगितलं, ''हिंसाचार इतका व्यापक स्वरुपात होता की शेजाऱ्यांनी शेजाऱ्यांवर हल्ला केला आणि कुटुंबातील सदस्यांनी कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला होता. त्यामुळंच आता हेच लक्षात येत नाही की नेमका कोणावर विश्वास ठेवावा.''

मुकारुमंजी

मुकारुमंजी यांना त्यांच्या स्वत:च्या कुटुंबाची अधिक चिंता होती.

त्या सांगतात, ''मला असं वाटलं की जर मी त्याला माफ केल्याशिवायच मेली तर त्याचं ओझं माझ्या मुलांवर येऊ शकतं. जर मी मेली आणि तो तिरस्कार तसाच राहिला, तर जसा रवांडा मला माझ्या मुलांसाठी हवा आहे तशा रवांडाची निर्मिती आम्ही करू शकणार नाहीत. हा असा रवांडा असेल ज्यात मी बालपण घालवलं आहे, वाढली आहे.''

त्या म्हणतात, ''माझ्या मुलांनी या वातावरणात रहावं असा मला अजिबात वाटत नाही.''

एकत्र आणण्यासाठी प्रयत्न

वातावरण शांत करण्यासाठी तडजोडींचे अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यासंदर्भात एक महत्त्वाची योजना आहे. यात हिंसाचारातील दोषी व्यक्ती आणि त्यांनी ज्यांच्यावर हल्ला केला त्यांना जनावरांच्या माध्यमातून एकत्र आणलं जातं. रवांडाच्या समाजात हे खूप महत्त्वाचं आहे.

हिंसाचार करणारा आणि त्या हिंसेचा शिकार झालेला अशा दोघांनी एकत्र येऊन एका गाईची देखभाल करण्याची ही योजना आहे. यात त्यांनी एकमेकांबरोबर राहण्यासाठी आणि माफ करण्यासाठीच्या चर्चेत सहभागी व्हायचं असतं. ते एकत्र राहून चांगल्या भविष्याची निर्मिती करतात.

रवांडाने जमातीच्या आधारावर फूट पडलेल्या, विभागल्या गेलेल्या देशाला पुन्हा एकदा एकसंध करण्याच्या, सर्वांना एकत्र आणण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. आता जमातीबद्दल बोलणं बेकायदेशीर आहे.

व्हिक्टोरिया

फोटो स्रोत, VICTORIA UWONKUNDA

फोटो कॅप्शन, नरसंहाराच्याआधी व्हिक्टोरिया उवोंकुंडा तिच्या कुटुंबातील काही सदस्यांसह

मात्र टीकाकार म्हणतात की सरकार फारच थोडी टीका सहन करू शकतं. त्यांचं म्हणणं आहे की फारच थोडं स्वातंत्र्य आहे आणि दीर्घकालीन प्रगतीसाठी ते मारक आहे.

शांततेच्या या वाटाघाटींपर्यत पोचण्यासाठी, तडजोड करण्यासाठी आणि सध्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी रवांडाच्या नागरिकांना तीन दशकांचा कालावधी लागला. मुकारुमंजी आणि नटंबारा आता पुन्हा एकदा शेजाऱ्यांप्रमाणं एकत्र राहणार आहेत.

माझा प्रिय देश, रवांडा, जो माझ्यासाठी सदैव प्रिय आहे... तो आता मला माझं घर वाटत नाही, ही माझ्यासाठी आश्चर्यकारक भावना आहे.

मात्र या दौऱ्यात भावनिक, मानसिक पातळीवर मी त्या परिस्थितीचा स्वीकार केला आहे. त्यामुळं माझ्या जखमा बऱ्या होण्यास मदत झाली आहे.

(व्हिक्टोरिया उवोनकुंडा बीबीसीच्या पत्रकार आहेत. त्या बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवर न्यूजडेच्या प्रेझेंटर आहेत.)