युद्धग्रस्तांना जेवण पुरवणाऱ्या 7 मानवतावादी कार्यकर्त्यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू

इस्रायलच्या हल्ल्यात सात परदेशी मदत कर्मचाऱ्यांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 7 परदेशी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वर्ल्ड सेंट्रल किचन या स्वयंसेवी (WCK) संस्थेने माहिती देताना सांगितलं की, या हल्ल्यात युनायटेड किंगडम, पोलंड आणि ऑस्ट्रेलियासह विविध देशांमधील कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

वर्ल्ड सेंट्रल किचनचे संस्थापक आणि शेफ होजे आंद्रे यांनी सांगितलं की, हे कर्मचारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेले.

यावर इस्रायल लष्कराने सांगितलं की ते या घटनेची चौकशी करत आहेत.

गाझा येथील हमासच्या माध्यमांनी देखील या हल्ल्यासाठी इस्रायलला दोषी ठरवलं आहे.

गाझा येथे बीबीसीसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराने माहिती देताना सांगितलं की, मृत कर्मचाऱ्यांपैकी तीन जण परदेशी नागरिक होते. आणि त्यांचा वाहन चालक पॅलेस्टाईनचा होता. या ठिकाणाहून त्यांचे पासपोर्टही जमा करण्यात आलेत.

WCK ने आपल्या एका निवेदनात म्हटलंय की, त्यांच्या टीममधील सात जण मृत्यूमुखी पडले असून हे सर्व ऑस्ट्रेलियन, पोलिश, ब्रिटिश, पॅलेस्टिनी आणि एक अमेरिकी-कॅनेडियन नागरिक होते.

IDF च्या हल्ल्यात आमच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि वाईट वाटल्याचं संस्थेच्या सीईओ एरिन गोर यांनी म्हटलंय.

"लोकांचं पोट भरण्यासाठी त्यांनी दाखवलेला दृढनिश्चय लोकांच्या मनात सदैव लक्षात राहील. आम्ही त्यांना कधीही विसरू शकणार नाही आणि त्यांची आठवण सदैव आमच्या मनात राहील."

सोबतच या घटनेनंतर WKC ने या क्षेत्रातील आपले मदत कार्य तात्काळ थांबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांनी पुढे सांगितलं की, "मारले गेलेले लोक मध्य गाझा येथील दीर अल-बलाह गोदामातून बाहेर पडत होते. समुद्री मार्गाने गाझा येथे आणलेल्या 100 टनहून अधिक खाद्यपदार्थ उतरवून घेण्यासाठी जी टीम होती, त्यांचा ते भाग होते."

कथित हल्ल्याचे आणखी तपशील अद्याप समोर येत आहेत.

व्हाइट हाऊस राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते एड्रिएन वॉटसन यांनी म्हटलंय की, "WKC च्या सहायक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसलाय."

"मानवतावादी कार्यकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे कारण ते अत्यंत आवश्यक अशा मदतीचा पुरवठा करतात. या प्रकाराची त्वरित चौकशी करावी असं आवाहन देखील आम्ही इस्रायलला केलं आहे."

इस्रायलच्या हल्ल्यात सात परदेशी मदत कर्मचाऱ्यांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

गाझा पट्टीतील इस्रायली हवाई हल्ल्यात ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू झाल्याबद्दल ऑस्ट्रेलियाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मृतांमधील लालजावमी फ्रॅककॉम यांचाही समावेश असल्याची पुष्टी केली असून त्यांनी मृतांच्या कुटुंब आणि मित्रांप्रति आपली संवेदना व्यक्त केली आहे.

पंतप्रधान अँथनी म्हणाले की, "हे लोक गाझातील लोकांसाठी मदत पुरवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून स्वेच्छेने काम करत होते. त्यामुळे हा हल्ला पूर्णपणे अस्वीकार्य आहे."

या घटनेची संबंधित देशाने जबाबदारी घेतली पाहिजे. शिवाय भविष्यात अशी दुर्घटना घडू नये याविषयी सतर्क राहिलं पाहिजे असंही अँथनी म्हणाले.

इस्रायलच्या हल्ल्यात सात परदेशी मदत कर्मचाऱ्यांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images

पॅलेस्टाईनच्या वैद्यकीय मदत कर्मचाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, मदत कर्मचाऱ्यांनी वर्ल्ड सेंट्रल किचन (WCK) लोगो असलेली बुलेटप्रूफ जॅकेटं घातली होती.

सेलिब्रिटी शेफ असलेल्या आंद्रेस आपल्या ट्विटर पोस्ट मध्ये इस्रायली सरकारने ही अंधाधुंद हत्या थांबवावी असं आवाहन केलंय.

या संस्थेने अलीकडेच गाझावासियांसाठी शेकडो टन अन्न पुरविण्याच्या बातम्या छापून आल्या होत्या.

या बातम्यांवर टिप्पणी करताना, IDFने म्हटलंय की ते या "दुःखद घटनेची" परिस्थिती समजून घेण्यासाठी सखोल पुनरावलोकन करतील.

"सोबतच मानवतावादी मदतीचे सुरक्षित वितरण करता यावं आणि गाझामधील लोकांना अन्न आणि औषधी पुरविण्यासाठी WCK सोबत जवळून काम करता यावं यासाठी IDF व्यापक प्रयत्न करेल."

यावर यूके परराष्ट्र मंत्रालय आणि पोलिश परराष्ट्र मंत्रालयाचं मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे.