हमासचे 10,000 सैनिक मारल्याच्या इस्रायलच्या दाव्यात किती तथ्य?

इस्रायल-गाझा युद्ध

फोटो स्रोत, bbc

गाझामध्ये मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 30 हजारांच्या पुढे गेली आहे. परिणामी इस्रायलला नागरिकांच्या मृत्यूंच्या संख्येबद्दल वाढत्या चिंतेचा सामना करावा लागत आहे. तसंच 7 ऑक्टोबरनंतर हमासला संपवण्याचं जे वचन इस्रायलनं दिलं होतं, ते प्रत्यक्षात उतरत असल्याचं दाखवण्यासाठीही इस्रायलवर दबाव वाढत आहे.

बीबीसी व्हेरिफाय टीमनं इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या किती योद्ध्यांचा मृत्यू झाला याबाबतच्या दाव्यांचं परीक्षण केलं आहे.

हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हवाई हल्ल्यात 10,000 हून अधिक सैनिक, तर जमिनीवरील हल्ल्यांत जवळपास 1,200 जण मारले गेल्याचं इस्रायलच्या सैन्याचं म्हणणं आहे. 

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सातत्याने त्यांच्या रणनीतीचा बचाव केला आहे. नागरिकांचा मृत्यू कमी होण्यासाठी ते सातत्यानं हमासच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत असल्याचं म्हटलं आहे.

हमास त्यांच्या योद्ध्यांच्या मृत्यूची कोणतीही आकडेवारी देत नाही. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार हमासच्या एका अधिकाऱ्यानंं 6,000 सैनिक मारले गेल्याची कबुली दिली होती. पण, हमासने बीबीसीसोबत संवाद साधताना ही आकडेवारी नाकारली.

गाझाच्या हमास संचालित आरोग्य मंत्रालयाला जागतिक आरोग्य संघटना विश्वासार्ह मानते. पण मंत्रालय देत असलेल्या मृत्यूंच्या संख्येत नागरिक आणि सैनिक असा फरक करत नाही. पण युद्ध सुरू झाल्यापासूनच्या आकडेवारीवरून मारल्या गेलेल्यांपैकी किमान 70% महिला आणि मुलं आहेत, असं दिसून आलंय.

बीबीसी व्हेरिफायनं IDF ला हमासच्या योद्ध्यांच्या मृत्यूची गणना करण्याची पद्धत स्पष्ट करण्यास वारंवार विचारणा केली. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बीबीसीनं IDF प्रेस रिलीज आणि त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवरील संदर्भ तपासले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी, टाईम्स ऑफ इस्रायलनं IDF च्या हवाल्यानं 12,000 सैनिक मारले गेल्याची बातमी दिली. आम्ही तो आकडा IDF कडे मांडला, तेव्हा त्यांनी आम्हाला दोन उत्तरं दिली. पहिल्या उत्तरात त्यांनी हा आकडा 'अंदाजे 10,000' तर दुसऱ्या उत्तरात '10,000 पेक्षा जास्त' असल्याचं म्हटलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्रायलनं गाझामधील हमासच्या दोन तृतीयांश लढाऊ रेजिमेंट्स 'उद्ध्वस्त' केल्या आहेत, असा दावा जानेवारीच्या मध्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला होता.

पण त्यांनी मारल्या गेलेल्या सैनिकांची आकडेवारी दिली नाही. युद्धापूर्वीच्या IDF च्या एका अंदाजानुसार, गाझामध्ये हमासचे जवळपास 30,000 सैनिक होते. 

डिसेंबरमधल्या अहवालात इस्रायली सैन्यानं केलेल्या दाव्यानुसार ते 'हमासच्या प्रत्येक योद्ध्यामागे 'दोनच' सामान्य नागरिकांना मारत आहेत आणि ही गोष्ट या युद्धातल्या आव्हानांचा विचार करता अतिशय सकारात्मक आहे.'

पण 14 नोव्हेंबरला म्हणजे युद्ध सुरू होऊन महिनाभरानंतर इस्रायली सैन्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर विभागीय सैन्यानं '1,000 अतिरेकी' मारले गेले आहेत असा दावा केला होता.

पण त्याच वेळी गाझातल्या आरोग्य मंत्रालयानं 11,320 मृत्यू झाल्याचं नोंदवलं होतं म्हणजे सामान्य नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण 10:1 असं इस्रायली सैन्याच्या दाव्यापेक्षा बरंच जास्त आहे.

बीबीसी व्हेरिफायनं 7 ऑक्टोबर ते 27 फेब्रुवारी पर्यंत IDFच्या YouTube चॅनेलवर पोस्ट केलेले सर्व 280 व्हीडिओ पाहिले. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येनं सैनिक मारले गेल्याचे दृश्य पुरावे फार कमी आहेत, असं त्यात आढळून आलं.

यापैकी फक्त एक व्हीडिओ जो 13 डिसेंबर रोजी पोस्ट केला आहे, त्यात योद्ध्यांचे मृतदेह दिसत आहेत. इतर काही व्हीडिओंमध्ये योद्ध्यांवर गोळ्या झाडल्या जात असल्याचे दिसून येतं. आम्ही टेलिग्रामवरील IDF च्या मुख्य चॅनेलवर मारल्या गेलेल्या हमासच्या योद्ध्यांच्या वैयक्तिक दाव्यांची संख्या मोजण्याचा देखील प्रयत्न केला.

इथं आम्हाला 160 पोस्ट सापडल्या ज्यात योद्ध्यांच्या मृत्यूबाबत विशिष्ट संख्या नमूद केली होती. एकूण 714 मृत्यू झाल्याचं तिथं नमूद केलेलं दिसलं. पण, 247 संदर्भ असे देखील होते ज्यात 'अनेक', 'डझनभर' किंवा 'शेकडो' असे शब्दप्रयोग मारले गेलेल्यांसाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे नेमके किती जण मारले गेले याचा एक आकडा काढणं अशक्य होतं. 

कोणत्याही युद्धक्षेत्रात सैनिकांचे मृत्यू मोजण्यात अडचणी येतात. गाझामध्ये, बरेच सैनिक सामान्य पोशाख परिधान करतात. ते बोगद्याच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर भूमिगत असतात आणि बहुतेक जणांचा मृत्यू हवाई हल्ल्यांमुळे होतो.

खान युनूस शहर युद्धाआधी व युद्धानंतर

फोटो स्रोत, bbc

फोटो कॅप्शन, खान युनूस शहर युद्धाआधी आणि युद्धानंतर

गाझामध्ये IDFनं घुसखोरी सुरू केल्यापासून, हमासवर नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा आरोप लष्करानं केला आहे. पण काही तज्ज्ञांना अशी चिंता आहे की, केवळ हमासच्या प्रशासकीय रचनेचा भाग असल्यामुळे काही गैर-योद्ध्यांचाही IDF हमासचे सैनिक म्हणून गणना करत आहेत. 

किंग्ज कॉलेज लंडनमधील सुरक्षाविषयक अभ्यासक ज्येष्ठ प्राध्यापक आंद्रियास क्रिग म्हणाले की, "हमास सदस्यत्वा'साठी इस्रायलनं एक अतिशय व्यापक दृष्टीकोन बाळगला आहे. यात हमासशी संबंधित कोणत्याही संस्था, ज्यात नागरी सेवक किंवा प्रशासक यांचाही समावेश आहे."

गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील युद्धांच्या तुलनेत या सध्याच्या संघर्षामुळे महिला आणि मुलांच्या मृत्यूंच्या प्रमाणात तीव्र वाढ दिसून आली आहे.

हिंसक संघर्षांच्या बळींची नोंद करण्याचं उद्दिष्ट ठेवणारी यूकेमधील संस्था, एव्हरी कॅज्युअल्टी काउंट्सच्या कार्यकारी संचालक रॅचेल टेलर यांच्या मते,

"सध्याच्या संघर्षात नागरिक मृत्यूचे प्रमाण जास्त दिसत आहे. गाझाची जवळपास निम्मी लोकसंख्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे आणि युद्धातील मृत्यूंपैकी जवळपास 43% मृत्यू मुलांचे आहेत. टेलर म्हणाल्या की, ही आकडेवारी 'अंदाधुंद हत्या दर्शवते'.

"याउलट, 2014 मध्ये मृतांमध्ये 'लढाईच्या वयातील' पुरुषांची टक्केवारी खूपच जास्त होती, पण आज हे प्रमाण खूपच कमी आहे," असंही त्या म्हणाल्या.

गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून दररोज सरासरी 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

ऑक्टोबर ते डिसेंबर या संघर्षाच्या आधीच्या टप्प्यांच्या तुलनेत हत्येचा वेग मंदावलेला दिसतो. पण, तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की, इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्यांचं वास्तविक प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असण्याची शक्यता आहे. कारण जिथं मृत्यूंची नोंद केली जाते, अशी अनेक रुग्णालयं आता कार्यरत नाहीत.

या आकडेवारीमध्ये केवळ लष्करी हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. यात उपासमार किंवा रोगामुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश नाहीये. आंतरराष्ट्रीय मदत संस्थांसाठी ही बाब चिंताजनक आहे. जेरुसलेम येथील मानवाधिकार संघटना, बीटसेलेमने सांगितलं की, सध्याचं युद्ध इस्रायल आणि गाझा यांच्यातील मागील संघर्षांपेक्षा खूप घातक आहे.

या संस्थेचे प्रवक्ते ड्रॉर सडोट म्हणाले की, "ही अशी संख्या आहे जी आम्ही गाझा किंवा इतर प्रांतांमध्ये याआधी झालेलं युद्ध किंवा हल्ल्यांमध्ये कधीही पाहिली नाही.

"यावेळची मृत्यूची संख्या ही युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात IDF च्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाला दुजारा देते, असंही ते म्हणाले.

IDF चे प्रवक्ते म्हणाले होते की, नुकसानीच्या व्याप्तीचं अचूकतेशी संतुलन साधताना आत्ता आम्ही जास्तीत जास्त नुकसान कशामुळे होतं यावर लक्ष केंद्रित केलं आहे."