'मला बाबा म्हणून कोण हाक मारणार?' 103 नातेवाईक गमावलेल्या गाझाच्या वडिलांची कैफियत

- Author, लुसी विल्यमसन
- Role, बीबीसी न्यूज, जेरिको
गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ असंख्य लोकांना बसत आहे. अनेकांनी आपले आप्त हरवले आहेत, अनेक कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. या युद्धात झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 100 हून अधिक जणांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे.
या कुटुंबातील सदस्य असलेल्या अहमद अल गुफेरीनं बीबीसीच्या प्रतिनिधीला वृत्तांत सांगितला. अहमद सांगतात की त्यांच्या कुटुंबातील 103 सदस्यांचा बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला. याच हल्ल्यात त्यांच्या तीन गोंडस मुली आणि पत्नीचाही मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
हे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरुन अश्रू ओघळणं थांबत नाही.
ज्या दिवशी हा भयंकर हल्ला त्यांच्या घरावर झाला तेव्हा अहमद अल गुफेरी हे घटनास्थळापासून 80 किमी दूर असलेल्या जेरिको येथे अडकून पडले होते.
जेव्हा हमास आणि इस्रायलमध्ये ऑक्टोबर महिन्यात युद्ध सुरू झालं तेव्हा अहमद हे तेल अविव येथील कंस्ट्रक्शन साइटवर कमाला होते. त्यांनी गाझात आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न केला पण जागोजागी नाकेबंदी सुरू झाल्यामुळे त्यांना आपल्या घरी येता आलं नाही.
जेव्हा पण अहमद यांना आपल्या घरी फोनवरुन बोलणे शक्य असायचे तेव्हा ते फोनवरुन बोलत असत. 8 डिसेंबर रोजी त्यांनी त्यांची बायको शिरीन हिच्याशी संवाद साधला होता.
फोनवर बोलतानाच दोघेही अतिशय भावुक झाले होते. शिरीन त्यांना म्हणाली की माझ्याकडून काही चूक-भूल झाली असेल तर मला माफ करा. तो संवाद आठवून अहमद सांगतात, 'मी तिला म्हणालो असं बोलायची काही एक गरज नाही. तिचा कंठ दाटून आला होता. बहुतेक तिला लक्षात आलं की तिचा मृत्यू होणार आहे.'
त्याच संध्याकाळी त्यांच्या मामाच्या घरावर झालेल्या मोठ्या बॉम्ब हल्ल्यात त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन लहान मुली - ताला, लाना आणि नजला यांचा मृत्यू झाला.
यात अहमद यांची आई, त्यांचे चार भाऊ आणि त्यांचं कुटुंब, त्याचबरोबर त्यांच्या काकू, काका आणि चुलत भावांचाही मृत्यू झाला. एकूण 100 हून अधिक लोक मरण पावले. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटून गेलाय, पण त्यातील काहींचे मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखालीच अडकलेले आहेत.
गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या धाकट्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. नजला आता दोन वर्षांची झाली असती. अहमद अजूनही कुटुंबीयांच्या झालेल्या हानीच्या धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत.
ते आपल्या मुलींचे मृतदेह हातात धरू शकत नाहीत किंवा घाईघाईने का होईना त्यांचा दफनविधी करू शकत नाहीत, आपल्या मुली अजूनही हयात असल्याप्रमाणे ते त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांच्या निर्विकार चेहऱ्यावरून अश्रूं ओघळत राहतात.
"माझ्या मुली माझ्यासाठी चिमण्यांसारख्या आहेत," असं ते म्हणतात. "मला असं वाटतं की मी स्वप्न पाहतोय. आमच्यासोबत जे झालंय त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीए."

त्यांनी आपल्या फोन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरून मुलींची छायाचित्रे हटवली आहेत, जेणेकरुन त्यांच्याकडे पाहून पुन्हा त्यांची आठवण येऊन त्रास होऊ नये.
नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी ते हयात असलेल्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना जाऊन भेटले.
त्या लोकांनी त्यांना सांगितलं की क्षेपणास्त्र प्रथम त्यांच्या कुटुंबाच्या घराच्या प्रवेशद्वारावर येऊन आदळलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
"ते सर्वजण घाईघाईने बाहेर पडले आणि जवळच असलेल्या माझ्या मामाच्या घरी गेले," असं ते म्हणाले. "पंधरा मिनिटांनंतर एक लढाऊ विमान त्या घरावर येऊन आदळलं.”
सर्व कुटुंबीय ज्या चार मजली इमारतीमध्ये मारले गेले ती गाझा शहराच्या झीटोन परिसरात सहाबा मेडिकल सेंटरच्या कोपऱ्यात होती.
इमारतीचं आता काँक्रीटच्या ढिगाऱ्यात रूपांतर झालंय. हिरव्या रंगाचा प्लास्टिकचा कप, धुळीने माखलेल्या कपड्यांच्या चिंध्या अशा सर्व रंगीबेरंगी गोष्टी त्या ढिगाऱ्यातून डोकावत होत्या.

हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली सिल्वर रंगाची कार, त्या कारच्या तुटलेल्या काचा यामुळे ते चित्र आणखी विदारक दिसत होतं.
अहमद यांच्या जिवंत असलेल्या नातेवाईकांपैकी एक, हमीद अल-गुफेरी यांनी बीबीसीला सांगितलं की, 'जेव्हा हल्ले सुरू झाले तेव्हा जे लोक टेकडीवर पळून गेले ती वाचले आणि जे घरात लपून बसले ते मारले गेले.'
“आगीचे लोळ पडत होते,” असं तो म्हणाला. "आमच्या शेजारी असलेल्या चार घरांवर हल्ले झाले. दर 10 मिनिटांनी ते घरांवर हल्ला करत होते."
"आमची मुलं आणि नातेवाईक मिळून गुफेरी कुटुंबातील 110 लोक तिथे होती," असं त्याने सांगतलं. "त्यापैकी मूठभर लोक वगळता सर्व मारले गेले.”
हल्ल्यात बळी पडलेली सर्वांत मोठी व्यक्ती ही 98 वर्षांची आजी होती आणि सर्वांत लहान मूल हे नऊ दिवसांपूर्वी जन्माला आलेलं बाळ होतं, असं वाचलेल्या लोकांचं म्हणणं आहे.
नातेवाईकांमधील अहमद नावाच्या आणखीन एका चुलत भावाने हवाई हल्ल्याद्वारे केलेल्या दोन मोठ्या स्फोटांचं वर्णन केलं.
"कोणतीही आगाऊ सूचना दिली गेली नाही,” असं तो म्हणाला. "मला वाटतं की, जर [काही] लोकांनी आधीच हा परिसर सोडला नसता तर शेकडो लोक मारले गेले असते. आता या परिसराचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय. तिथे एक कार पार्क करण्याची जागा, पाणी साठवण्यासाठी जागा आणि तीन घरे आणि एक मोठं घर होतं. स्फोटामुळे संपूर्ण निवासी परिसर उद्ध्वस्त झाला.
हमीद म्हणाले की, जे लोक वाचले होते त्यांनी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम केलं.
आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा आमच्यावर हेलीकॉप्टरमधून गोळीबार होत होता असं अहमद यांच्या चुलत भावाने सांगितलं.

"आम्ही घरात बसलो होतो आणि आम्ही ढिगाऱ्याखाली अडकलो,” असं अहमद अल-गुफेरी याने बीबीसीला सांगितलं. "मी एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला फेकला गेलो. मला माहीत नाही की त्यांनी मला बाहेर कसं काढलं. आम्ही आमच्या डोळ्यांनी मृत्यू पाहिला."
अडीच महिने उलटून गेले तरी ते अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेल्या काही मृतदेहांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कुटुंबाने पैसै गोळा करून ढिगारा साफ करण्यासाठी खोदकाम करणारं एक लहान यंत्र भाड्याने घेतलं आहे.
"आम्ही [आज] चार मृतदेह बाहेर काढले," असं अहमद याने बीबीसीला सांगितलं, “त्यात माझ्या भावाची पत्नी आणि माझा पुतण्या मोहम्मद यांचा मृतदेह देखील आहे आणि त्यांना तुकड्यांमध्ये बाहेर काढण्यात आलं. ते 75 दिवसांपासून ढिगाऱ्याखाली होते."
नजिकच्या रिकाम्या जमिनीच्या तुकड्यावर काठ्या आणि प्लॅस्टिकच्या चादरीने चिन्हांकित केलेल्या ठिकाणी त्यांची तात्पुरती कबर आहे.
अहमद जेरीकोमध्ये अडकलेले असल्याने त्यांना तिथे भेट देता आली नाही.
"माझी आई, माझी पत्नी, माझी मुलं आणि माझ्या भावांपासून इतका लांब जाण्यासाठी मी काय केलंय?” असं त्यांनी विचारलं. "ते सर्वजण सामान्य नागरिक होते."
हवाई हल्ल्याद्वारे लक्ष्य केल्याच्या कुटुंबीयांच्या आरोपांबद्दल आम्ही इस्रायली सैन्याकडे विचारणा केली. प्रत्युत्तरात लष्कराने सांगितलं की ज्या हवाई हल्ल्याचा उल्लेख प्रश्नावलीत करण्यात आलाय त्याबद्दल त्यांना माहिती नव्हती आणि हमासबरोबरच्या युद्धात इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) तर्फे "नागरिकांना कमीत कमी हानी पोहचावी यासाठी आवश्यक खबरदारी" घेण्यात आली आहे.
अहमद यांचं कुटुंब मारलं जाण्यापूर्वी आणि नंतरच्या काही दिवसांत, अल-गुफेरी यांच्या घराच्या दक्षिणेला असलेल्या शेजय्या भागात इस्रायली सैन्य आणि हमासच्या बंदुकधा-यांमध्ये तीव्र संघर्ष झाला.
9 डिसेंबरच्या एका दैनिक अपडेटमध्ये सैन्यानं सांगितलं की त्यांनी शेजय्याच्या दिशेने येणाऱ्या "टँकविरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या अनेक दहशतवाद्यांची ओळख पटवली" आणि त्यांच्यावर हेलिकॉप्टरने हल्ला केला.

त्यांनी असंही म्हटलं की, जमिनीवरील लष्करी कारवाई सुरू असताना लढाऊ विमाने गाझा पट्टीमध्ये दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला करत आहेत.
झैतूनच्या ज्या परिसरात एकेकाळी कुटुंबाचं घर होतं, तो परिसर आता आयडीएफद्वारे केल्या जाणाऱ्या ताज्या कारवायांचं केंद्रबिंदू आहे.
जेरिकोमध्ये असलेले अहमद अजूनही कधीकधी गाझामधील आपल्या हयात असलेल्या नातेवाईकांना फोन करतात. परंतु इतके महिने घरापासून दूर कुठेतरी अडकून पडल्यानंतर आणि परत जाण्यासाठी काहीही कारण राहिलं नसताना, ते आता परत तिथे जातील की नाही याबद्दल साशंक आहेत.
"गाझामध्ये माझ्या स्वप्नांचा चुराडा झालाय,” असं ते म्हणाले. "मी कोणासाठी परत जाऊ? मला बाबा म्हणून कोण हाक मारेल? डार्लिंग म्हणून मला कोण हाक मारेल? मी आयुष्यभर तुझ्यासोबत असेन, असं माझी बायको मला म्हणायची. आता कोण असं म्हणेल?"











