कफिया : कपड्याचा एक तुकडा पॅलेस्टिनींसाठी बनलं निषेधाचं प्रतीक, असा आहे इतिहास

फोटो स्रोत, GETTY IMAGES
- Author, फर्नांडा पॉल
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीत बॉम्बहल्ले सुरू केले. संपूर्ण जगाने हे मृत्यूचं तांडव आणि विध्वंस पाहिला. त्यानंतर आता या भागात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी जगभरातून निदर्शने आणि मोर्चे निघत आहेत.
पॅलेस्टिनी लोकांच्या बाजूने निघणाऱ्या मोर्चांमध्ये पारंपारिक कफिया परिधान केलेले आंदोलक दिसतात.
कोणी ते गळ्यात घालतं, तर कोणी डोक्यावर बांधतं. हे इतकं उठून दिसतं की त्याकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. एका कापसाच्या टॉवेलपेक्षा त्याला जास्त महत्त्व आहे.
बहुतेक पॅलेस्टिनी लोकांसाठी ते संघर्ष आणि प्रतिकाराचं प्रतीक आहे. एक राजकीय आणि सांस्कृतिक शस्त्र जे गेल्या 100 वर्षांत अधिकाधिक प्रासंगिक बनलं.
एवढंच नाही तर याला पॅलेस्टाईनचा "अनौपचारिक ध्वज" असंही म्हणतात.
पण कफिया वापरण्याची सुरुवात कशी झाली? याचं प्रतिकात रूपांतर कधी झालं? आज याचं किती महत्व आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
कफिया वापरण्यास सुरुवात
कफिया नेमका कधी उदयाला आला हे नेमकं सांगता येत नसलं तरी अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे की त्याची प्रथा 7 व्या शतकात पडली. विशेषत: इराकच्या कुफा शहरात याचा वापर सुरू झाल्याने याला कफिया म्हटलं जाऊ लागलं.
काहींच्या मते, त्याची उत्पत्ती याहूनही जुनी आहे, कदाचित इस्लामच्याही आधी.
पण वस्तुस्थिती अशी आहे की त्याचा वापर वाढला. पण यामागचं कारण सांस्कृतिक किंवा राजकीय नसून यामागे व्यावहारिक कारणं आहेत.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
20 व्या शतकाच्या सुरुवातीस शेतकरी आणि भटक्या अरबांनी सूर्य, वारा, वाळू किंवा थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी याचा वापर सुरू केला.
मात्र शहरांमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींनी ते परिधान करणं तेवढं सामान्य नव्हतं.
हे लोक फेजसारखे पातळ कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्यायचे. त्याला तारबुश असंही म्हटलं जातं. ही एक लाल टोपी होती, जी ऑट्टोमन शासक महमूद दुसरा याच्यामुळे लोकप्रिय झाली होती.
परंतु अनेक संशोधनातून असं दिसतं की 1930 च्या दशकात पॅलेस्टिनी समाजात कफियाचा एक विशिष्ट अर्थ आकार घेऊ लागला. सोबतच त्याचा वापर झपाट्याने वाढला.
1936 चा उठाव
1930 च्या दशकात पॅलेस्टिनी क्षेत्र ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते. पहिल्या महायुद्धानंतर लीग ऑफ नेशन्सने ते युनायटेड किंग्डमला दिले.
त्यांनी इथे 1920 ते 1948 पर्यंत राज्य केलं. ज्यामुळे पॅलेस्टिनी लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. कारण त्यांचा असा विश्वास होता की ब्रिटीश झिओनिस्ट प्रकल्पाला (ज्यू राज्य निर्माण करण्याची राजकीय मोहीम) समर्थन देत आहेत.
या काळात जेव्हा युरोपमध्ये ज्यू लोकांवर अत्याचार वाढले तेव्हा पश्चिम आशियामध्ये ज्यू लोक येण्याचा ओघही वाढला.
अशा प्रकारे, या भागात राष्ट्रवादी अरबांचे बंड सुरू झाले, ज्याला "महान अरब विद्रोह" म्हणून ओळखलं जातं. हे बंड 1936 ते 1939 अशी तीन वर्ष चाललं आणि या काळात या भागात अनेक संघर्ष झाले.
या संघर्षात कफियाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली.
कफियाच्या राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्वावर संशोधन करणाऱ्या इतिहासकार जेन टायनन यांच्या मते, "पॅलेस्टिनी लोक ब्रिटीशांच्या उपस्थितीमुळे अधिकाधिक निराश झाले होते आणि प्रतिकार करण्याचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे आपली ओळख लपवणं आणि अशा प्रकारे कफिया ब्रिटिश प्रशासनासाठी त्रास ठरला."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
1938 मध्ये, बंडखोर नेत्यांनी शहरांमध्ये राहणाऱ्या सर्व अरबांना कफिया घालण्यास सांगितलं.
नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅम विद्यापीठाशी संबंधित एका संशोधकाच्या मते, यामुळे लोकांना ओळखणे कठीण झाले आणि बंडखोरांना त्यांच्या कारवाया करणं सोपं झालं. यामुळे ब्रिटिश सैनिक पूर्णपणे गोंधळून जायचे.
असं म्हटलं जातं की इंग्रज इतके अस्वस्थ झाले की त्यांनी त्यावर बंदी घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
ए सोशियो पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ कफियाच्या लेखक अनु लिंगाला यांच्या मते, ही एक प्रभावी लष्करी रणनीती होती, पण ती एकजुटीने प्रतिकार करण्याचे प्रतीकही बनली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, "1938 मध्ये घडलेली ही घटना पॅलेस्टिनी संस्कृतीत एक महत्वाचं वळण मानलं जातं. सर्व मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादासाठी एकत्र येत लोक वसाहतवादाच्या विरोधात उभे राहिले."
जेन टायननच्या मते, त्या काळापासून कफिया पॅलेस्टिनी आत्मनिर्णय, न्याय आणि एकता यांचं दृश्य प्रतीक बनलं.
"आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत हे बंडखोरांना सांगण्याचा हा एक मार्ग होता."
कफिया म्हणजे काय?
वास्तविक, कफिया वेगवेगळ्या रंगांचा असतो. पण पॅलेस्टिनी लोकांची ओळख बनलेला कफिया काळा आणि सफेद असून त्याचे तीन नमुने आहेत.
- ऑलिव्हची पाने : हे त्या भागातील ऑलिव्हची झाडे आणि लोकांचा त्यांच्या जमिनीशी असलेला संबंध दर्शवते.
- लाल : हे पॅलेस्टिनी मच्छिमार आणि भूमध्य समुद्राशी त्यांचे संबंध दर्शवते.
- काळ्या रेषा : या पॅलेस्टाईनच्या शेजारील भागीदारांसोबत व्यापाराच्या रस्त्यांचे प्रतिनिधित्व करतात.
कफिया आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला कारण...
विद्रोहानंतरच्या वर्षांमध्ये ओळखीचं प्रतीक म्हणून कफिया घालण्याची प्रथा पॅलेस्टिनींमध्ये रूढ होत गेली.
इतिहासकार मानतात की, 'नकबा' किंवा 'संपूर्ण शुद्धीकरण' नंतर तर याला आणखीन गती मिळाली. या संघर्षामुळे लाखो पॅलेस्टिनींना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि त्यानंतर 14 मे 1948 रोजी इस्रायलची स्थापना झाली.
'नकबा' ही पॅलेस्टिनी इतिहासातील सर्वात दुःखद तारीख मानली जाते.
पण 1960 च्या दशकापर्यंत कफिया आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला नाही.
पॅलेस्टिनी हितसंबंधांचा चेहरा बनलेल्या यासर अराफात यांच्यामुळे कफिया मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अराफात यांचं कफियाशिवाय छायाचित्र क्वचितच सापडेल. सीरिया, जॉर्डन आणि लेबनॉनमधील लढाईदरम्यान त्यांनी ते परिधान केलं होतं. 1974 मध्ये जेव्हा त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टिनींच्या बाजूने भाषण केलं तेव्हा 20 वर्षांनंतर त्यांना ओस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं.
जेन टायनन यांच्या मते, "राजकीय विधाने करताना ते सहसा कफिया घालत. त्यांनी आपल्या उजव्या खांद्यावर त्रिकोणी आकार अशा प्रकारे ठेवला की तो 1948 पूर्वीच्या पॅलेस्टाईनच्या आकारासारखा दिसेल."
अनु लिंगाला यांच्या मते, 1967 मध्ये सहा-दिवसीय युद्धानंतर जेव्हा इस्रायलने पॅलेस्टिनी ध्वजावर बंदी घातली तेव्हा कफिया एक मोठं प्रतीक म्हणून उदयास आला.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
संशोधकांच्या मते, सहा दिवसांच्या विनाशकारी युद्धानंतरच राष्ट्रीय चिन्ह म्हणून त्याचं महत्त्व वाढलं.
त्यानंतरच्या काळात पॅलेस्टिनी प्रदेशांच्या सामूहिक अस्मितेला आणि त्यांच्या जमिनीवरील अधिकारांना धोका वाढल्याने, एकता आणि अस्मितेचं सांस्कृतिक प्रतीक म्हणून कफियाचे महत्त्व आणखीन वाढलं.
स्त्रियाही त्याचा वापर करू लागल्या
पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनच्या सदस्या लीला खालिद यांनी एके-47 रायफल हातात घेऊन कफिया परिधान केला होता. त्यांच्या या छायाचित्राने 1969 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
इंग्रजी वृत्तपत्र द गार्डियनशी बोलताना खालिद यांनी सांगितलं होतं की, सशस्त्र संघर्षात एक महिला म्हणून त्यांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान आहे असं त्यांना दाखवायचं होतं. "हेच कारण होतं की, आम्हाला पुरुषांसारखं दिसायचं होतं."
"फॅशनेबल" पोशाख
जेन टायनन यांच्या मते, वरील कारणांमुळे कफिया हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषत: पाश्चिमात्य देशांमध्ये फॅशन म्हणून पुढे आला.
त्यांच्या मते, "उत्तर अमेरिका आणि युरोपमधील प्रसारमाध्यमांमध्ये कफिया प्रसिद्ध झाल्यामुळे आणखीन लोकप्रिय बनले."
त्यांच्या संशोधनात असं आढळून आलं की 1970 च्या दशकापर्यंत, पश्चिमेतील तरुण लष्करी शैलीचे कपडे घालत असत. त्यांना प्रबळ भांडवलशाही संस्कृती आणि वसाहतवादा विरुद्ध प्रतिकार करायचा होता.

फोटो स्रोत, getty images
टायननच्या मते, यातूनच समजतं की पश्चिम आशियाबाहेर कफिया इतका कसा लोकप्रिय झाला.
1990 च्या दशकात जगातील काही मोठ्या व्यक्तींनीही याचा वापर सुरू केला. यात इंग्लिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि संगीतकार रॉजर वॉटर्स यांचा समावेश होता.
नंतर अमेरिकन ब्रँड अर्बन आउटफिटर्सने प्रसिद्ध फॅशन स्टोअर्समध्ये त्याची विक्री करण्यास सुरुवात केली आणि गिव्हेंची किंवा लुई व्हिटॉन सारख्या डिझाइन कलेक्शनमध्येही कफियाचा वापर सुरू झाला.
त्याची लोकप्रियता इतकी वाढली की त्याचे बहुतांश उत्पादन चीनमध्ये सुरू झाले.
आज फक्त एक पॅलेस्टिनी कारखाना शिल्लक आहे, जो 1961 मध्ये यासर हिरबावीने स्थापन केला होता. हा कारखाना वेस्ट बँकमधील हेब्रॉन शहरात आहे.
प्रतिकाराची शक्ती
कफिया ही काही प्रमाणात फॅशनेबल गोष्ट बनली असली तरी, इतिहासकारांचं असं मत आहे की, याचं राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व कधीही कमी झालेलं नाही.
आज जेव्हा गाझा पट्टीत युद्ध सुरू आहे, तेव्हा कफियाने नवी प्रासंगिकता स्वीकारली आहे.
यावरून वादही निर्माण झाला होता आणि जगातील काही देशांनी त्यावर बंदी घातली आहे. यात जर्मनी देखील आहे

फोटो स्रोत, GETTY IMAGES
अनु लिंगाला यांच्या मते, "आजही कफियाची शक्ती पॅलेस्टिनी प्रतिकाराचं प्रतीक म्हणून अबाधित आहे. पॅलेस्टिनी समर्थक शांतपणे एकता दर्शवण्यासाठी ते परिधान करतात."
जेन टायनन यांच्या म्हणण्यानुसार, "जगभरातील लोकांना या कपड्यांबद्दल आश्चर्यकारक समज आहे हे किती विशेष आहे. हे अतिशय विलक्षण आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








