कतार : इस्रायल आणि हमासचं तात्पुरत्या युद्धबंदीसाठी मन वळवणारा छोटा अरब देश

कतारचे शासक शेख तमीम बिन हमद अल-थानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कतारचे शासक शेख तमीम बिन हमद अल-थानी
    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

27 लाख लोकसंख्या असलेला कतार एक छोटासा देश पश्चिम आशियासह जगभर आपला प्रभाव वाढवत आहे.

तिन्ही बाजूंनी पर्शियन आखातानं वेढलेल्या या देशाचे क्षेत्रफळ 11,581 चौरस किलोमीटर आहे. हा देश पश्चिम आशियाच्या नकाशावर एका बिंदू सारखा दिसतो.

मात्र, गेल्या काही वर्षांत या देशानं आपल्या मुत्सद्देगिरीनं जगभर प्रभाव पाडला आहे.

आज जगात क्वचितच असा कोणताही देश असेल जो मध्यस्थ म्हणून कतारशी स्पर्धा करू शकेल.

इस्रायल आणि हमास यांच्यातील चार दिवसांच्या युद्धविरामाच्या वृत्तामुळे कदाचित येत्या काही दिवसांत या युद्धामुळे निर्माण होणारं मानवतावादी संकट दूर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

दोन्ही बाजूंमधील करारानुसार, हमास चार दिवसांत गाझामधील 50 ओलिसांची सुटका करेल आणि इस्रायल 150 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल.

अमेरिका, इस्रायल आणि हमास यांच्याशी सतत चर्चा करून हा करार होण्यात कतारने मोठी भूमिका बजावली आहे.

त्याचवेळी, पश्चिम आशियातील या छोट्याशा अरब देशानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो या प्रदेशाचा निर्विवाद मध्यस्थ आहे.

इस्रायल-हमास युद्ध आणि कतार

हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करून अनेकांना ओलीस ठेवलं. या ओलिसांची सुटका करण्यासाठी कतार हा देश अमेरिका आणि इस्रायलसोबत जवळून काम करत आहे.

या प्रयत्नांचा परिणाम असा झाला की 20 ऑक्टोबर रोजी दोन अमेरिकन महिला ओलिसांची हमासकडून यशस्वीपणे सुटका करण्यात आली.

यानंतर, इस्रायल आणि हमास यांच्यात चर्चा करण्याचे प्रयत्न सुरु झाले आणि अखेरीस दोन्ही बाजूंनी चार दिवसांचा युद्धविराम आणि ओलिसांची सुटका करण्यास सहमती दर्शविली आहे.

कतारची भूमिका केवळ ओलिसांना सोडवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. इस्रायली नाकेबंदीखाली गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी इजिप्तची सीमा खुली करण्यासाठी

या आखाती देशानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

लक्षात घ्यायला हवं की, कतार हा एक असा देश आहे ज्याचे इस्रायल आणि हमास या दोन्हींशी संबंध आहेत. 2012 मध्ये हमासने दोहा येथे आपले राजकीय कार्यालय उघडलं.

हमासचे अनेक प्रमुख नेते दोहामध्ये राहतात, असं मानलं जातं.

अलीकडेच अमेरिकेने हमासचे कार्यालय बंद करण्यासाठी कतारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र हमासच्या राजकीय कार्यालयाचा उद्देश या भागात संवादाचे माध्यम तयार करणं आहे आणि कोणतंही युद्ध भडकवणं हा नाही, असं कतारनं स्पष्ट केलं आहे.

कतारचं म्हणणं आहे की हमासशी संवादाचे मार्ग खुले ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आता कदाचित अमेरिकेलाही हे समजू लागलं आहे.

कतार हा देश मध्यस्थी आणि वाटाघाटींमध्ये पारंगत

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्या काही वर्षांची उदाहरणं पाहिली तर असं दिसतं की कतार वाटाघाटी, मध्यस्थी करण्यात किंवा चर्चेमध्ये मदत करण्यात पारंगत झाला आहे.

याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे 2020 मध्ये कतारची राजधानी दोहा इथं अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेला शांतता करार, ज्या अंतर्गत अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कतार हा एकमेव देश होता ज्यानं 2013 मध्ये तालिबानला आपल्या देशात राजकीय कार्यालयं उघडण्याची परवानगी दिली होती.

कतारच्या मध्यस्थीचं उदाहरण या वर्षी सप्टेंबरमध्ये दिसलं जेव्हा त्याने हाय-प्रोफाइल कैद्यांची देवाणघेवाण सुलभ केली ज्यामध्ये पाच अमेरिकन कैदी आणि पाच इराणी कैद्यांची सुटका करण्यात आली. पाच अमेरिकन कैद्यांना तेहरानहून दोहा इथं आणण्यात आलं तेथून ते अमेरिकेला रवाना झाले.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये, कतारने मध्यस्थी केलेल्या करारानुसार, रशियाने चार युक्रेनियन मुलं त्यांच्या कुटुंबीयांकडे परत करण्याचं मान्य केलं.

कतारच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना कित्येकदा यश मिळालं आहे. दारफुरमधील दोहा शांतता करार, इरिट्रियामधील जिबूतीच्या युद्धकैद्यांची सुटका, सीरियातील ओलिसांची सुटका आणि लेबनॉनमधील राष्ट्रपती पदाचं संकट संपवण्यात कतारच्या मध्यस्थीनं महत्त्वाची भूमिका बजावली.

'कतार तटस्थ आणि स्वीकार्य मध्यस्थ'

डॉ. प्रेमानंद मिश्रा हे जामिया मिलिया इस्लामियाच्या नेल्सन मंडेला सेंटर फॉर पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन, इथं सहाय्यक प्राध्यापक आहेत.

ते म्हणतात की कोणत्याही मध्यस्थीसाठी मध्यस्थ हा न्यूट्रल किंवा तटस्थ हवा आणि तो दोन्ही पक्षांना मान्य असणं आवश्यक आहे.

तसंच ते पुढे म्हणतात की, "मध्यस्थाच्या तटस्थतेला अयोग्य ठरवेल असं कोणताही ऐतिहासिक कारण नसावं. वाटाघाटी कायम ठेवण्यासाठी अफाट आर्थिक संसाधनं आवश्यक असतात, जी मध्यस्थाकडे असणं आवश्यक आहे."

"याशिवाय, देशांतर्गत मुद्द्यांवर त्याचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड हवा आणि अमेरिकेसारख्या शक्तींशी चांगले संबंध देखील मध्यस्थासाठी उपयुक्त ठरतात. कतार हे सर्व निकष पूर्ण करतो."

डॉ मिश्रा म्हणतात, "कतारवर निश्चित अजेंडा असण्याचा किंवा कोणत्याही एका बाजूने झुकल्याचा त्यांचा असा इतिहास नाही. कतार हा चांगला हेतू असणारा तटस्थ मध्यस्थ आहे आणि चर्चेसाठी शत्रुपक्षांना एकत्र आणण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या तो योग्य आहे."

डॉ मिश्रा म्हणतात की कतार हा संसाधनांनी खूप समृद्ध आहे आणि त्यामुळेच छोटा देश असूनही पश्चिम आशियात त्याची गंभीर दखल घेतली जाते.

कतारच्या स्थापनेपासून आधुनिक पश्चिम आशियामध्ये मध्ये इस्रायल, सौदी अरेबिया, इराण आणि तुर्कस्तान यांचं वर्चस्व असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आणि आखाती देशांतर्गत सौदी अरेबियाचा काही विरोध वगळता कतारचे सर्व प्रादेशिक शक्तींशी चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे कतार हा संघर्ष निराकरणात सक्षम देश आणि तटस्थ मध्यस्थ म्हणून उदयास आला आहे.

मिश्रा पुढे सांगतात की, "कतारचे अमेरिका या एकमेव जागतिक महासत्तेशी मजबूत आणि विश्वासार्ह संबंध आहेत. संघटनात्मक हेतूंसाठी कतार हे सर्व इस्लामिक पक्षांचं केंद्र आहे, ज्यामुळे कतार पश्चिम आशियातील एक अपरिहार्य मध्यस्थ बनतो. मध्यस्थाची भूमिका हे धार्मिक कर्तव्य असल्याचंही कतारचं मत आहे."

"हे सर्व घटक कतारला एक यशस्वी मध्यस्थ बनवतात, परंतु कतारच्या दृष्टीकोनातून तितकेच महत्त्वाचं म्हणजे मध्यस्थीची भूमिका राज्याचे ब्रँडिंग आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढवण्यास मदत करते."

"त्याच्या प्रादेशिक शेजाऱ्यांपेक्षा लहान असूनही, एक प्रादेशिक शक्ती आणि शांतता निर्माता म्हणून स्थापित करण्यात मध्यस्ताची भूमिका या देशासाठी उपयुक्त ठरते."

कतारचं महत्त्व कसं वाढलं?

अनिल त्रिगुणायत यांनी जॉर्डन आणि लिबियामध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलं आहे. त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम आशिया विभागातही काम केलं आहे.

ते म्हणतात, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कतारमध्ये अमेरिकेचा खूप मोठा तळ आहे. जर दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर, कतार हा या क्षेत्रातील सर्वात श्रीमंत देश आहे. कतारचे दरडोई उत्पन्न 138,000 डॉलर एवढं आहे आणि इथं गॅसचा प्रचंड साठा आहे. "

"त्यांचे नेते अतिशय गतिमान आणि आंतरराष्ट्रीय विचारसरणीचे आहेत आणि त्यांना हे समजलं आहे की, एक छोटासा देश असल्यानं त्यांचा पश्चिम आशियात फारसा प्रभाव पडणार नाही."

अनिल त्रिगुणायत म्हणतात की, कतारकडे पैशांची कमतरता नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रभाव निर्माण करण्यासाठी उपाय शोधला, तो म्हणजे संकटकाळात मोठ्या शक्तींना, विशेषत: अमेरिकेला मदत करणं सुरू केलं.

त्रिगुणायत पुढे सांगतात की, "काही वर्षांपूर्वी कतारने तालिबानच्या ताब्यात असलेल्या एका अमेरिकन कैद्याच्या बदल्यात पाच तालिबानी कैद्यांची सुटका करण्यात मदत केली होती. त्यानंतर त्यांनी तालिबानला कतारमध्ये कार्यालय उघडण्याची परवानगी दिली."

"कतारच्या मदतीने अमेरिका आणि तालिबानमध्ये दोहा करार झाला. या चर्चेत जेव्हा-जेव्हा कोणतीही अडचण आली तेव्हा कतारनं मदत केली आणि यामुळेच अमेरिकेने कतारला नॉन-नाटो मित्र राष्ट्राचा दर्जा दिला."

अनिल त्रिगुणायत यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत पश्चिम आशियाचा प्रश्न आहे, कतार सुरुवातीपासून मुस्लिम ब्रदरहूडला पाठिंबा देत आहे.

ते सांगतात की, "याच कारणामुळे 2017 मध्ये सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनने कतारवर ब्लॉकेड (नाकेबंदी) लादली होती.

या चार देशांनी 2017 मध्ये कतारशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडले आणि त्यावर सागरी, जमीन आणि हवाई नाकेबंदी लादली होती.

कतार दहशतवादाला पाठिंबा देत असून इराणच्या अगदी जवळ असल्याचं या देशांनी म्हटलं होतं.

त्रिगुणायत सांगतात की , "कतारने या नाकेबंदीदरम्यानचा काळ आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढवण्यासाठी वापरला. आणि आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कतारवर लादलेली नाकेबंदी त्यांच्यासाठी वरदान ठरली."

"त्यामुळे त्याला जगाची सहानुभूती मिळाली आणि त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धांमुळे त्यांचं स्थान उंचावलं. कतारकडे आता मुत्सद्देगिरीची ताकद आहे."

'अमेरिकेसोबतची भागीदारी कतारसाठी फायदेशीर'

डॉ मिश्रा म्हणतात की कतार हे इस्लामिक वैशिष्ट्यांसह पश्चिम आशियातील नॉर्वेसारखं आहे.

ते सांगतात की, "पश्चिम आशियातील संघर्षाची परिस्थिती मुख्यत्वे इस्लामिक चळवळीमुळे आहे, ज्यांना कतारने सामग्री आणि संघटनात्मकदृष्ट्या पाठिंबा दिला आहे."

"याशिवाय, कतार हा अमेरिकेचा विश्वासू भागीदार आहे आणि इतर आखाती राजेशाही आणि इस्रायलचा विरोध करणार्‍या विविध विरोधी गटांना हाताळण्यासाठी अमेरिकेला कतारची गरज आहे."

ते म्हणतात की, कतारला प्रादेशिक मॅचमेकर बनवण्यात इराणचा फॅक्टर महत्त्वाचा आहे.

कतार इराणलाही मान्य आहे कारण इराण कतारला तुर्कीसारखा संभाव्य धोका मानत नाही. याशिवाय कतार हा या प्रदेशात खूप लोकप्रियता असलेल्या मुस्लिम ब्रदरहूडसारख्या इस्लामिक पक्षांच्या जवळ आहे.

मिश्रा सांगतात की, "अमेरिकेची रणनीती ही प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याची आहे, जी एक रचनात्मक खेळाडूच्या रुपात असलेल्या कतारच्या अजेंड्याशी जुळतेय आणि कतारला आंतरराष्ट्रीय ओळख असलेला एक मजबूत देश म्हणून स्वतःला स्थापित करण्यात मदत करते. मध्यस्थीमुळे जागतिक राजकारणात कतारचं महत्त्व वाढलं आहे."

कतारचा दबदबा वाढणार?

माजी राजदूत अनिल त्रिगुणायत यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत कतारचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत, तोपर्यंत त्याचा प्रभाव कमी होणार नाही.

तसंच त्यांचं म्हणणं आहे की, ज्या सौदी अरेबियानं एकेकाळी कतारवर नाकेबंदी(ब्लॉकेड) लादली होती, त्याच सौदी अरेबियाशी त्यांचे आता घनिष्ट संबंध आहेत.

डॉ. प्रेमानंद मिश्रा म्हणतात की पश्चिम आशिया अनेक मूक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि भविष्यात आणखी अनेक संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.

ते म्हणतात," पश्चिम आशियामध्ये आणखी अरब उठाव दिसू शकतात आणि या प्रादेशिक परिस्थितीत इराणची भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि त्यामुळे सर्व घटकांचा विचार करता कतारची स्थिती मजबूत होईल."

"पॅलेस्टाईनचा प्रश्न सुटला नाही तर पश्चिम आशियातील परिस्थिती गंभीर होईल. इराणशी अमेरिका, आखाती देश आणि इस्रायलमधील संबंध शत्रुत्वाचे राहिले आहेत आणि येमेन, लिबिया, लेबनॉनपासून पॅलेस्टाईनपर्यंत अनेक आव्हानं आहेत."

डॉक्टर मिश्रा यांच्या मते, "पश्चिम आशियातील शांततेचा रोडमॅप प्रादेशिक चौकटीतून जातो आणि कतार हा सर्वात महत्त्वाचा अभिनेता आहे ज्याने एक लहान राज्य असूनही मध्यस्थीची भूमिका उत्तम प्रकारे बजावली आहे."

"जागतिक हेतू असेलेली एक प्रादेशिक शक्त्ती म्हणून त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा, त्यासोबत वैधतेच्या अजेंड्यामुळे कतारची स्थिती अधिक शक्तिशाली असेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)