पॅलेस्टाईनचा 'रेड प्रिन्स' ज्याच्या हत्येसाठी मोसादने प्रयत्न केले, ज्याच्या प्रेमात 'मिस युनिव्हर्स' होती

अली हसन सलामेह

फोटो स्रोत, YOUTUBE GRAB

    • Author, जयदीप वसंत
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

पॅलेस्टाईनसाठी काहीतरी करायला हवं हे त्याच्या डोक्यात सतत सुरू होतं. ही भावना त्याला त्याच्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळाली होती.

म्युनिकमधील ‘ब्लॅक सप्टेंबर’मुळे तो इस्रायलच्या निशाण्यावर आला.

इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांच्या हातून निसटला.

पॅलेस्टाईनमध्ये यासर अराफात यांच्यानंतर दुसरं स्थान त्यालाच होतं. तो अराफात यांच्या 'दत्तक पुत्रा'सारखाच होता.

तो त्याचं आयुष्य ऐशोआरामात जगत होता. उशिरापर्यंत पार्ट्या करणं, नाईट लाईफचा आनंद लुटणं हा त्यांचा दिनक्रमच बनला होता.

त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे, पेहरावामुळे, वागण्या-बोलण्याने मुली त्याच्याकडे लगेच आकर्षित व्हायच्या.

माजी ‘मिस युनिव्हर्स’ जॉर्जिना रिझक देखील या माणसाच्या मोहातून सुटू शकली नाही. तिने त्याच्याशी लग्न केलं. या व्यक्तीला 'रेड प्रिन्स' असं देखील म्हटलं जायचं.

त्याचं नाव होतं अली हसन सलामेह उर्फ अबू हसन.

पॅलेस्टाईनचा 'रेड प्रिन्स'

अली हसन सलामेहचे वडील शेख हसन सलामेह यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू बंडखोरांविरुद्ध युद्ध पुकारलं. ते 'जैश अल-जिहाद अल-मुकदास' या पॅलेस्टिनी सशस्त्र संघटनेचे कमांडर होते.

इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान शेख हसन सलामेह यांचा 1948 मध्ये मृत्यू झाला. अली हसन त्यावेळी खूपच लहान होता आणि त्याला आपल्या वडिलांबद्दल फारशी माहिती नव्हती.

मात्र, वडिलांच्या संपत्तीमुळे अली हसनला काही कमी पडलं नाही. त्याने पॅलेस्टाईन आणि हिंसक घडामोडींपासून स्वतःला दूर केलं.

अली हसनची बहीण निदालने अल-जझीराला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "माझ्या भावाला भाषा आणि अभियांत्रिकीची आवड होती. त्याने स्वित्झर्लंडमध्ये भाषांचा अभ्यास केला आणि नंतर जर्मनीला गेला."

"मग तो कैरोला परतला. माझी आई यावर खूश नव्हती. पॅलेस्टाईनची चळवळ तेव्हा सुरू झाली होती. मला आठवतंय की, सलाह खलाफ आणि अबू सलाह आमच्या घरी आले होते. हसन सलामेहचा मुलगा अजून क्रांतीत का सामील झाला नाही हे विचारण्यासाठी ते आमच्या घरी आले होते."

त्यानंतर 1963 मध्ये यासर अराफात यांच्या नेतृत्वाखालील पीएलओमध्ये अली हसन सामील झाला आणि 1964 मध्ये कुवेतला पोहोचला.

नंतर त्याने कैरो आणि मॉस्कोमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं गेलं अली हसन हा देखणा आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती होता. तो लवकरच अराफात यांचा विश्वासू आणि 'दत्तक मुलगा' बनला.

यासर अराफत

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1967 मध्ये सहा दिवसांच्या युद्धात अरब राष्ट्रांना इस्रायलच्या हातून दारुण पराभव पत्करावा लागला. अरब राष्ट्रांच्या दबावाखाली पीएलओला निर्बंध स्वीकारावे लागले आणि काही भाग रिकामे करावे लागले.

पीएलओतील काही सदस्यांचं असं मत होतं की, अरब राष्ट्रांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे बदला घेण्यासाठी त्यांनी 'ब्लॅक सप्टेंबर'ची मोहीम आखली. ज्या नेत्यांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी तहाला मान्यता दिली होती त्यांना मारण्याची योजना होती.

या ब्लॅक सप्टेंबरचा पीएलओशी तसा औपचारिक संबंध नव्हता. त्यामुळे काही हत्याकांडांसाठी इस्रायली हेरांना जबाबदार धरण्यात आलं.

इस्रायलसाठी, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय होता त्यामुळे त्यांनी यात हस्तक्षेप केला नाही आणि सोबतच 'ब्लॅक सप्टेंबर'ला गांभीर्याने घेतलं नाही.

पण गोष्टी लवकरच बदलल्या. पुढे जाऊन ही संघटना इस्रायलची सर्वात मोठी शत्रू बनली.

हसन सलामेह पाश्चिमात्य कपडे घालायचा, फाडफाड इंग्रजी बोलायचा, स्पोर्ट्स कार चालवायचा.

मुलींचा त्याच्याभोवती नुसता गराडा पडलेला असायचा. धूम्रपान, संगीत यातून त्याला हिंसेची पर्वा नव्हती. पॅलेस्टिनी तरुणांमध्ये तो 'रेड प्रिन्स' पोस्टरबॉय बनला.

ब्लॅक सप्टेंबरपासून सुरुवात

5 सप्टेंबर 1972 रोजी जर्मनीतील म्युनिक शहरात ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होती. यावेळी 'ब्लॅक सप्टेंबर' या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेशी संबंधित काही लोकांनी ऑलिम्पिक व्हिलेजवर हल्ला केला आणि 11 इस्रायलींना ओलीस ठेवलं.

इस्रायलच्या तुरुंगात कैद असलेल्या शेकडो पॅलेस्टिनींची तात्काळ सुटका करावी अशी त्यांची मागणी होती. सुरुवातीला त्यांनी एका खेळाडूची हत्या केली. वाटाघाटी सुरू असताना दुसरा खेळाडू मारला गेला.

चर्चेअंती असं ठरलं की अपहरणकर्ते ओलीस ठेवलेल्या खेळाडूंसह जवळच्या लष्करी तळावर जातील आणि तेथून ते हेलिकॉप्टरने जर्मनीला निघून जातील.

पण दुसरीकडे जर्मन पोलिसांनी खेळाडूंना वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं होतं. पण हे पोलिस अननुभवी होते. या चकमकीत सर्व नऊ इस्रायली खेळाडू ठार झाले. तर दुसरीकडे तीन अपहरणकर्ते वगळता अन्य पाच जण ठार झाले.

ब्लॅक फ्रायडे

फोटो स्रोत, Getty Images

चकमकीनंतर विमानतळावर लपून बसलेल्या तीन अपहरणकर्त्यांना अटक करून अल्पशा चाचणीनंतर सोडून देण्यात आलं.

हजारो किलोमीटर दूर असलेल्या इस्त्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मीर, त्यांचे सुरक्षा सल्लागार आणि मोसाद या घटनेकडे असहाय्यपणे पाहत होते. हे सगळं प्रकरण मित्र देशात घडत असल्यानं ते काहीही करू शकले नाहीत.

यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 'एक्स कमिटी'ची बैठक झाली. यात म्युनिक हत्याकांडातील गुन्हेगार आणि योजना तयार करणाऱ्यांना शोधून ठार करण्याचे आदेश देण्यात आले.

या कामासाठी 20 पेक्षा कमी मोसाद एजंट्सची निवड करण्यात आली आणि. या मोहिमेला 'ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड' असं नाव देण्यात आलं. ही मोहीम राबविण्यासाठी मोसादचे एजंट्स युरोप आणि मध्य-पूर्व देशांमध्ये प्रवास करणार होते.

म्युनिक हत्याकांड झाल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत, रोममध्ये पहिली मोहीम पार पडली. या हल्ल्यात सहभागी असलेला एक संशयित मारला गेला तर शेवटचा बळी होता, अली हसन सलामेह उर्फ अबू हसन उर्फ रेड प्रिन्स.

‘मिस युनिव्हर्स’ जॉर्जिना

'द टेलिग्राफ' (22 एप्रिल 1972) च्या वृत्तानुसार, जॉर्जिनाचे वडील लेबनीज होते, तर तिची आई हंगेरियन होती. जॉर्जिनाने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला होता.

मिस युनिव्हर्स झाल्यानंतर, इंग्रजी, अरबी, फ्रेंच आणि इटालियन बोलू शकणार्‍या जॉर्जिनाला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर आल्या. पण तिने त्या नाकारल्या. अमेरिकेतील फ्लोरिडात मिस युनिव्हर्स बनल्यानंतर तिने 38 देशांचा दौरा आखला.

जॉर्जिना

फोटो स्रोत, Getty Images

पाच फूट आठ इंच उंची असलेल्या जॉर्जिनाने 60 हून अधिक सौंदर्यवतींना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब जिंकणारी ती पहिली लेबनीज होती. त्यावेळी तिला 10,000 डॉलर्सचं रोख बक्षीस आणि 5,000 डॉलर्सचा गाऊन मिळाला.

त्यावेळी एक फ्रेंच तरुण तिचा प्रियकर असल्याची चर्चा होती. पण 1975 मध्ये एका लेबनीज माणसाशी तिचं लग्न झालं. हे लग्न फार काळ टिकलं नाही.

ती कोणत्याही पुरुषाला आकर्षित करू शकली असती, पण ती 'रेड प्रिन्स'च्या प्रेमात पडली.

मृत्यूला चकवा देणारा अली हसन

म्युनिकच्या हत्याकांडानंतर सर्वांना यमसदनी धाडण्याचा काम एकट्या मोसादने केलं.

इतर इस्रायली सैन्याने काही ठिकाणी त्यांना मदत केली. अशीच एक मोहीम होती 'स्प्रिंग ऑफ यूथ' जी मूळ मोहिमेचा एक भाग होती.

एप्रिल 1973 मध्ये लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये या मोहिमेसाठी इस्रायली स्पेशल फोर्सची मदत घेण्यात आली होती.

इस्त्रायली नौदलाच्या बोटींद्वारे हे एजंट बेरूतजवळील निर्जन समुद्रकिनाऱ्यावर उतरले. या एजंटच्या संघाचं नेतृत्व एहुद बराक यांच्याकडे होतं, जे नंतर इस्रायलचे पंतप्रधान झाले.

बराक एकदा म्हणाले होते की, "इतक्या तरुणांना एकत्र पाहणं संशयास्पद वाटेल, म्हणून आमच्यापैकी काहींनी तरुण स्त्रियांची तोतयागिरी करण्याचा आणि त्यांच्या कपड्यांखाली शस्त्रे आणि स्फोटके लपवण्याचा निर्णय घेतला."

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे (पीएलओ) तीन प्रमुख नेते महंमद युसूफ, कमाल नासेर आणि कमाल अडवान एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर राहत होते. इस्त्रायली कमांडोंनी मिळून त्यांची हत्या केली.

त्यानंतर तेथूनच ब्लॅक सप्टेंबर आणि पीएलओचं मुख्यालय म्हणून ओळखली जाणारी इमारत उडवून दिली.

याशिवाय काही ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आलं. या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर एक अपार्टमेंट होती, जिथे अली हसनचं घर होतं. मृत्यूला चकवा देऊन पळून जाण्यात तो यशस्वी झाला.

अली हसन किंवा त्यांच्या संघटनेने म्युनिक हत्याकांडातील भूमिका जाहीरपणे मान्य केली नसली तरी इस्रायलने 'ब्लॅक सप्टेंबर'साठी अराफात आणि अली युसूफला जबाबदार धरलं, पण याची जाहीर वाच्यता करणं टाळलं.

महंमद युसूफच्या मृत्यूनंतर अली हसनने त्याची जबाबदारी स्वीकारली.

मोसादकडून निष्पाप व्यक्तीची हत्या

1972 मध्ये अली हसन नॉर्वेच्या लिलेहॅमर स्की रिसॉर्टमध्ये उतरल्याची माहिती मोसादच्या हेरांना मिळाली.

इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि अरबी भाषेचा जाणकार, वेश बदलण्यात मास्टर म्हणून अली प्रसिद्ध होता.

जेव्हा इस्त्रायली पथक लिलेहॅमर मध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी कुरिअर बॉय म्हणून काम करणाऱ्या एका माणसाचा माग काढला.

तो माणूस आपल्या पत्नीसह राहत होता. मात्र, त्याला फ्रेंच बोलता येत होतं. इतर गोष्टींची पडताळणी केल्यावर पथकाला 'टार्गेट' सापडल्याचं जाणवलं.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

जुलै 1973 च्या एका संध्याकाळी, टार्गेट आपल्या गर्भवती पत्नीसह चित्रपट बघून परतत असताना मोसादच्या पथकाने त्याच्यावर हल्ला केला आणि एकामागून एक 14 गोळ्या झाडल्या. शेजाऱ्यांच्या लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारचा माग काढला आणि दोन मोसाद एजंटना अटक केली.

पुढे आणखीन चार मोसाद एजंटना अटक करण्यात आली. पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती की मोसादने मारलेला माणूस अहमद बौशिकी एक निष्पाप मोरोक्कन वेटर होता. त्याने नॉर्वेजियन मुलीशी लग्न केलं होतं आणि ती गर्भवती होती.

आता मोसादचे प्रसिद्ध हेर एकामागून एक पकडले जात होते. केवळ नॉर्वेतीलच नाही तर संपूर्ण युरोपमधील मोसाद एजंट्सची खरी नावं, टोपणनावं, फोन नंबर, सेफहाऊसचे पत्ते एजंटांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उघड झाले. यात दूतावासातील अधिकाऱ्यांचा असणारा सहभागही उघड झाला.

कॅनडा आणि ब्रिटननेही इस्रायलला त्यांच्या पासपोर्टचा गैरवापर केल्याबद्दल तंबी दिली.

त्यानंतर गोल्डा मायर यांनी म्युनिकशी संबंधित कामकाज थांबवण्याचे आदेश दिले. या काळात मोसादने अली हसनचा पाठलाग सुरूच ठेवला. दुसरीकडे, इस्त्रायल आणि इस्रायलींवर हल्ले चालूच राहिले जे अली हसनकडून सुरू होते.

अखेर नवे पंतप्रधान माँचेम बिजिन यांनी अली हसनला संपवण्याच्या योजनेला मान्यता दिली.

इस्रायल, अली हसन आणि अमेरिका

सायमन रिव्हीच्या 'वन डे इन सप्टेंबर' (पृष्ठ 188-210) या पुस्तकात अली हसनच्या सीआयएशी असलेल्या जवळीकवर तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, बेरूतमध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं. यात पश्चिमेकडील भाग मुस्लिमांच्या ताब्यात होता, तर पूर्वेकडील भाग ख्रिश्चनांच्या ताब्यात होता. अमेरिकन दूतावास पश्चिम बेरूत मध्ये होता.

यावेळी सलामेहने अमेरिकेच्या जवळ येण्यासाठी एक ऑफर दिली. बेरूतमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला होणार नाही आणि फोर्स 17 दूतावासाच्या आसपासच्या भागाचं संरक्षण करेल अशी ही ऑफर होती.

सलामेहने बेरूतमध्ये अडकलेल्या अनेक अमेरिकन लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात मदत केली. ज्या संघटना ताफ्यावर हल्ला करतील त्यांना अल-फतेहच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी धमकीही देण्यात आली.

याशिवाय मध्यपूर्वेतील अमेरिकन हितसंबंधांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सलामेहने सीआयएला माहिती दिली होती. त्यामुळे तो सीआयएचा विश्वापात्र बनला होता. या माहितीसाठी सलामेहने कधीही पैसे घेतले नाहीत.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

बेरूतमधील सीआयएचे स्टेशन हेड रॉबर्ट एम्स हे सलामेहच्या थेट संपर्कात होते. या प्रकरणात अमेरिकेने इस्रायलसोबतच्या विश्वासाचे उल्लंघन केले होते. इस्रायल आणि अमेरिका यांच्यात अशी सहमती झाली होती की अमेरिका पीएलओ किंवा इतर कोणत्याही पॅलेस्टिनी संघटनेशी वाटाघाटी करणार नाही किंवा संपर्क करणार नाही.

मात्र रेगन प्रशासनातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी या मुद्द्याबद्दल अराफात यांचे आभार मानले.

रॉबर्ट एम्स आणि सलामेह यांच्या प्रयत्नांमुळे पॅलेस्टाईनच्या मुद्द्याला रोनाल्ड रेगनच्या प्रशासनात स्थान मिळालं यासर अराफात यांना यूएनमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली. त्यावेळी सलामेह सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत होता.

त्यानंतर, जेव्हा अराफात रशियाला गेले आणि जागतिक नेत्यांना भेटले, तेव्हाही सलामेह त्यांच्यासोबत होता.

पीएलओच्या सर्वोच्च नेत्यांच्या सुरक्षेसाठी फोर्स 17 काम करत होती. याचा तो प्रमुख होता. अली हसनने काही ज्यूंशीही संधान साधलं होतं. हा इस्रायलसाठी मोठा धक्का होता.

अली हसन सलामेह हा पाश्चात्य पत्रकार आणि अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए (सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी) स्टेशन प्रभारी रॉबर्ट यांच्याशी थेट संपर्कात होता. त्याने पाश्चात्य देशांमध्ये पॅलेस्टाईनच्या समस्येवर सहानुभूती आणि सकारात्मक कव्हरेज मिळविण्याचा प्रयत्न केला.

असा अंत झाला...

इस्रायली इतिहासकार मायकेल बार-जोहर यांनी त्यांच्या 'मोसाद' या पुस्तकात (पृष्ठ 188-213) लिहिलंय की, 1975 मध्ये, बेरूतमधील एका श्रीमंत कुटुंबाने जॉर्जिनासाठी पार्टी आयोजित केली होती. नवीन मिस युनिव्हर्स म्हणून निवड झाल्यानंतर, ती लेबनॉनला गेली आणि सुपरमॉडेल म्हणून करिअर सुरू केलं. तिचे अनेक बुटीकही होते.

त्या पार्टीत तिला एक देखणा आणि अप्रतिम व्यक्तिमत्व असलेला तरुण भेटला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर जुलै 1977 मध्ये दोघांनी लग्न केलं.

अली हसनचे यापूर्वी उमर हसनशी लग्न झाले होते. त्याला हसन आणि उसामा ही दोन मुलं होती. अली आणि जॉर्जिना आता एकत्र राहत होते.

अली हसन आणि जॉर्जिना फ्लोरिडामध्ये हनिमूनला गेले होते. त्यावेळी त्यांचा संपूर्ण खर्च सीआयएने केला होता.

यासर अराफात यांच्यानंतर अली हसन पीएलओमध्ये त्यांचा उत्तराधिकारी असेल, अशी चर्चा पीएलओमध्ये सुरू होती.

1973-79 दरम्यान अली हसन लेबनॉनमध्ये बिनधास्त आयुष्य जगत होता. बेरूतच्या नाईट लाईफचा आनंद लुटत होता.

आता मात्र त्याचं आयुष्य कारकूनाचे झालं होतं. तो रोज एकच दिनक्रम पाळायचा. सकाळी दहा वाजता घर सोडायचा, बेरूतमधील पीएलओ कार्यालयात जायचा, दुपारी जॉर्जिनाला भेटायला यायचा आणि नंतर पुन्हा पीएलओ कार्यालयात जायचा. इथेच बसून त्याने वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या.

जॉर्जिनाही आता साधं आयुष्य जगू लागली होती. अली हसनने तिला त्याच्या देशद्रोही कारवायांपासून दूर ठेवलं होतं. अली सलामेह सारखे काम करणारे लोक सहसा एकाच ठिकाणी जास्त काळ थांबत नाहीत, पत्ते बदलत राहतात. दररोज एकाच ठिकाणाहून जात नाहीत.

मात्र त्याच्या रोजच्या सवयीने इस्रायली हेरांचं लक्ष वेधून घेतलं आणि सहज शिकार बनला.

पीएलओचे अधिकारी, लेबनीज हितचिंतक, कुटुंबीय आणि अमेरिकन लोकांनी अली हसनला याबाबत इशारा दिला होता, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

मोसादने सलामेहच्या ताफ्यावर हल्ला करण्याची रणनीती आखली होती. परंतु सलामेह सोबत त्याचे फोर्स 17 बॉडीगार्ड असायचे.

मोसादने यावेळी रणनीती बदलली. एरिका मेरी चेंबर्स नावाची ब्रिटिश महिला बेरूतमध्ये आली. ती लेबनॉनमधील पॅलेस्टिनींच्या हितासाठी काम करणाऱ्या संघटनेशी संबंधित होती. तिला बेरूतला बोलावण्यात आलं.

इथे तिची अली हसनशी जवळीक निर्माण झाली. ती अली हसनच्या रोजच्या दिनचर्येची नोंद ठेऊ लागली. अली हसनच्या अपार्टमेंटजवळ आठव्या मजल्यावर तिने फ्लॅट भाड्याने घेतला होता.

अली हसन बेरुतमध्येच आहे याची खात्री पटल्यावर मोसाद टीमचे इतर सदस्य देखील कॅनेडियन आणि ब्रिटिश पासपोर्टवर बेरूतमध्ये दाखल झाले. त्यांनी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये चेक-इन केले आणि कार भाड्याने घेतल्या.

एका अंधाऱ्या रात्री इस्रायली नौदलाची बोट बेरूतजवळील निर्जन समुद्रकिनाऱ्यावर आली आणि एक मोठं सामान खाली उतरवलं.

हे सामान घेण्यासाठी आधीच बेरूतला आलेले एजंट भाड्याच्या गाड्या घेऊन आले. सामानात स्फोटके होती, जी भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये भरली.

टीम लीडरने गाडीत स्फोटके बसवली. अली हसनचा ताफा रोज ज्या गल्लीतून जायचा तिथे या गाड्या उभ्या करण्यात आल्या.

एरिकाला तिच्या फ्लॅटमधून ती गाडी दिसत होती. अली हसनची शेवरलेट गाडी पुढे जात असताना एरिकाने रेडिओचा ट्रिगर दाबला. मोठा स्फोट झाला आणि अली हसनच्या कारचे फेंडर उडून बाजूला पडले. आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या.

स्फोटाचा आवाज ऐकून पीएलओ सैनिक हातात शस्त्रं घेऊन धावले आणि त्यांनी परिसराला वेढा घातला. अली हसनचा अंगरक्षक मेला होता, परंतु तो अजूनही श्वास घेत होता. त्याला तातडीने बेरूत येथील रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांनंतर, जेव्हा अली हसनला बेरूतच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आलं तेव्हा यासर अराफात देखील उपस्थित होते. त्याच्या अंत्ययात्रेत हजारो बैरूती जमले होते.

स्फोटाच्या रात्री, एरिका आणि तिचा एक मित्र निर्जन समुद्रकिनाऱ्यावर इस्रायली नौदलाच्या बोटीवर चढले.

त्यानंतर एरिकाला कोणीही पाहिलं नाही की तिचं नाव कोणी ऐकलं नाही.

बार-जोहरच्या पुस्तकानुसार, तिचं खरं नाव एरिका चेंबर्स होतं आणि इस्रायलमधील हिब्रू विद्यापीठात शिकत असताना ती मोसादमध्ये भरती झाली होती.

अली हसन सलामेह 2.0

'रॅथ ऑफ गॉड' या मोहीमेअंतर्गत 1972 ते 1979 दरम्यान युरोप आणि अरब देशांमध्ये डझनहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. हे लोक म्युनिक हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप होता.

समीक्षकांच्या मते, काही सामान्य कार्यकर्ते' होते, पण त्यांना मोठं करण्यात आलं. आणि यातून असं दाखविण्यात आलं की, इस्त्रायल कुठेही पोहोचू शकतो आणि कधीही कोणालाही संपवू शकतो.

इस्रायलने अहमद बौशिकी या निष्पाप मोरोक्कन वेटरच्या कुटुंबाला जवळपास चार लाख डॉलर्स देऊन त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून तह केला. मात्र माफी मागितली नाही.

जॉर्जिना रिझक अली हसनची दुसरी पत्नी होती. अली हसनचा जानेवारी 1979 मध्ये मृत्यू झाला तेव्हा ती सहा महिन्यांची गर्भवती होती.

अली हसनच्या मृत्यूनंतर, तिने तिसऱ्यांदा गायक आणि अभिनेता वलीद तौफिकशी लग्न केलं. पण तिने मृत पतीच्या मुलाला जन्म दिला आणि मध्य पूर्व तसेच युरोपियन देशांमध्ये त्याचं पालनपोषण केलं.

1996 मध्ये इस्रायली पत्रकार डॅनियल बेन-सायमन यांनी त्यांच्या मित्रांना जेरुसलेममध्ये आयोजित पार्टीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होते. तिथे डॅनियलला एक उंच पॅलेस्टिनी तरुण भेटला. तो अस्खलित इंग्रजी बोलत होता.

त्याने डॅनियलला आपलं नाव सांगितलं, "अली हसन सलामेह"

हे नाव ऐकून डॅनियलला धक्काच बसला. ते म्हणाले, "हे नाव तर म्युनिकमध्ये इस्रायली खेळाडूंच्या हत्येमध्ये सामील असलेल्या मास्टरमाइंडचे आहे."

त्यावर तो तरुण उत्तरला, "ते माझे वडील होते, ज्यांना मोसादने मारलं."

यासर अराफातचे पाहुणे म्हणून जेरुसलेममध्ये आलेले अली सलामेहने इस्रायली लोकांच्या आदरातिथ्याचे कौतुक केले आणि तो म्हणाला, "मी एक शांतताप्रिय माणूस आहे. माझ्या वडिलांच्या काळात युद्ध झालं आणि त्यांनी त्यांच्या जीवाने ती किंमत चुकवली. आता एक नवं युग आहे. मला आशा आहे की पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्यात जर शांतता प्रस्थापित झाली तर ती त्यांच्या दोघांच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट असेल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)