भारतीयांना नग्न फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या जीवघेण्या स्कॅमचा बीबीसीकडून पर्दाफाश

    • Author, पूनम अगरवाल, नुपूर सोनार आणि स्टेफनी हेगार्टी
    • Role, बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन
भूमी सिन्हा
फोटो कॅप्शन, भूमी सिन्हा

झटपट कर्जाच्या आमिशाला भुलून इन्स्टंट लोन अॅपवरून कर्ज घेतलेल्या लोकांना त्यांचे नग्न फोटो पाठवून धमकावलं जातं.

अश्लील धमक्यांना घाबरून आतापर्यंत आपल्या देशात किमान 60 लोकांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.

भारतातच नाही तर आशियात इतरत्र तसंच आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या देशांमध्येही या प्रकारे फसवणूक होत आहे.

हा आंतरराष्ट्रीय घोटाळा उघडकीला आणण्यासाठी बीबीसीने केलेलं Undercover Investigation आणि त्यातून समोर आलेलं हे शोधवृत्त.

आस्था सिन्हा, वय 17 - सकाळी सकाळी तिच्या मावशीच्या फोनमुळेच लवकर उठली. "तुझ्या आईला अजिबात घराबाहेर पडू देऊ नकोस. लक्ष ठेव तिच्यावर... " मावशीच्या आवाजातली भीती आणि शंका यामुळे आस्था हबकलीच.

आस्थाची आई भूमी सिन्हा शेजारच्या खोलीत गुडघ्यात डोकं खुपसून निराश बसली होती. डोळ्यातून अखंड ओघळ सुरू होते.

आपल्या बिनधास्त, मनमोकळ्या, आनंदी आणि निर्भीड आईचं हे असं काय झालं? आस्थाला समजेना.

भूमी सिन्हा – आस्थाची आई या मुंबईतील एक प्रथितयश प्रॉपर्टी लॉयर होत्या. तरुणपणीच पतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला एकटीने सांभाळलं होतं. अशी खंबीर बाई हताश होऊन कोपऱ्यात बसलेली आस्थाने पाहिली.

आस्था सांगते, "आई अक्षरशः मोडून पडल्यासारखी वाटली. कुठे काय काय ठेवलंय, कागदपत्रं, काँटॅक्ट्स वगैरेंबद्दल मला सांगू लागली." जणूकाही निरवानिरवीची भाषा करून ती बाहेर पडायची तयारी करत होती.

आस्थाला माहीत होतं आईला एकटं बाहेर सोडायचं नाही. मावशीने तिला सकाळीच बजावलं होतं. "तिला बाहेर जाऊ देऊ नको, नाहीतर ती जिवाचं बरंवाईट करून घेईल."

आईला वाचवण्यासाठी मुलीची धडपड

आपल्या आईला गेल्या काही दिवसांपासून विचित्र फोन येतात. कुणीतरी तिला पैसे परत देण्यासाठी धमकावतं याची आस्थाला कल्पना होती.

पण भूमीला गेल्या काही महिन्यांपासून कुठल्या थराला जाऊन धमकावलं जात आहे आणि तिचा मानसिक छळ केला जात आहे याची आस्थाला कल्पना नव्हती.

आस्थाची आई -भूमी सिन्हा एका आंतरराष्ट्रीय घोटाळ्यात, फसणुकीची बळी पडली होती. जगभरातील 14 देशांत या प्रकारे कर्जासाठी पैसे देऊन त्यानंतर अश्लील धमक्या देत नफा कमावण्याचं कारस्थान सुरू आहे.

या गैरव्यवहारात कर्ज घेणाऱ्या ग्राहकाची वैयक्तिक बदनामी करत व्यक्तीला अडकवलं जातं आणि त्यात अडकलेल्या व्यक्तींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं.

आस्था

फोटो स्रोत, PRARTHNA SINGH/BBC

फोटो कॅप्शन, आपल्या आईला तणावात पाहून आस्था अतिशय हादरली होती.

यांचं बिझनेस मॉ़डेल अगदी साधं आहे. पण अगदी क्रूर पद्धतीने ते चालवलं जातं.

काही मिनिटांत कुठल्याही कटकटींविना आणि कागदपत्रांशिवाय कर्ज देण्याचं आमीश दाखवणारी अनेक मोबाईल अॅप्स आहेत.

पण एकदा ते अॅप डाउनलोड केलं की तुमच्या मोबाईलमधले काँटॅक्ट्स, फोटो आणि ओळखपत्रांसारख्या गोष्टींवर ते ताबा मिळवतं. याच वैयक्तिक माहितीचा उपयोग नंतर तुम्हाला धमकी देत वसुलीसाठी केला जातो.

ग्राहक जेव्हा पैसे वेळेवर परत करत नाहीत, त्या वेळी किंवा काही वेळा तर वेळेवर व्याजासहित पैसे परत केलेले असूनही तुमची माहिती कॉल सेंटरला पुरवली जाते. तिथले तरुण एजंट लॅपटॉप, फोन अशी अत्याधुनिक आयुधं वापरून ग्राहकाला धमकावण्याचं काम करतात. त्यांचा मानसिक छळ करतात. कसंही करून ग्राहकाकडून पैसे वसूल करण्याचं प्रशिक्षण त्यांना मिळालेलं असतं.

भूमी सिन्हांनी किती कर्ज घेतलं होतं?

2021 च्या शेवटी भूमीनेही अशाच काही लोन अॅप्सवरून 47,000 रुपये घेतले होते. आपल्या कामाचे पैसे हाती येईपर्यंतची सोय म्हणून तिने ही कर्जाऊ रक्कम घेतल्याचं सांगते. तिने कर्जासाठी विचारणा केल्या केल्या लगेचच रक्कम उपलब्ध झाली.

पण इतर शुल्क या नावाखाली त्यातली मोठी रक्कम आधीच वजा झाली. सात दिवसानंतर तिला त्या कर्जाची परतफेड करणं अपेक्षित होतं. पण या कालावधीत तिला येणं असलेले पैसे आलेच नाहीत.

मग कर्जाची परतफेड करण्यासाठी तिने दुसऱ्या लोन अॅपवरून अल्प कालावधीसाठी कर्ज घेतलं. आणि ते फेडण्यासाठी आणखी तिसऱ्या अॅपचा वापर केला. असं करत करत कर्ज आणि व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढत 20 लाखांवर गेलं.

व्हीडिओ कॅप्शन, कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या छळाला कंटाळून किमान 60 लोकांनी संपवलं आयुष्य - BBC Eye 'The Trap'

आता 20 लाख रुपये तिला फेडायचे बाकी होते.

लवकरच तिला वसुली एजंटांचे फोन यायला सुरुवात झाली. सुरुवातीला साध्या शब्दांत पैशांची मागणी करणारे कॉल थेट अपशब्द वापरून धमक्या देणारे कॉल झाले.

फोनवरून अवमानकारक भाषेत भूमीची अवहेलना होऊ लागली. तिने फेडलेले पैसेही मिळाले नाहीत, असं म्हणत ती खोटं बोलत असल्याचे दावे केले जाऊ लागले. एक-दोनदा नव्हे, दिवसभरात 200 कॉल तिला येऊ लागले. ‘तू कुठे राहतेस आम्हाला माहिती आहे’, असं म्हणत तिला मृतदेहाचे फोटो पाठवून त्यांनी घाबरवायला सुरुवात केली.

रोहन
फोटो कॅप्शन, कर्जवसुली एजंट म्हणून काम केल्यानंतर रोहनने छळवणूक समोर आणण्याचं ठरवलं.

हे धमकीसत्र सुरू झालं आणि उत्तरोत्तर वाढू लागलं. ‘तुझ्या फोनमधल्या सर्व 486 काँटॅक्टसना तू चोर आहेत, व्यभिचारी आहेस, असं सांगणारे मेसेज पाठवू’, अशी धमकी एकदा त्यांनी दिली. भूमीच्या मुलीचं नाव घेत तिचं आयुष्यही बरबाद करण्याचं धमकी देणारे बोलू लागले त्या वेळी मात्र भूमीचा धीर सुटला.

कसंही करून पैसे फेडून टाकायला तिची धडपड सुरू होतीच. तिने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून उधार घेतली. आणखी काही अॅप्सवरूनही तिने पुन्हा पैसे उसने घेतले. असं करत एकूण 69 अॅप्सवरून तिने कर्ज घेतलं.

उद्याची सकाळ उजाडूच नये, अशी दररोज रात्री ती प्रार्थना करू लागली. पण सकाळी 7 वाजल्यापासून अविरत तिचा फोन वाजायला सुरुवात होत असे.

कसंतरी जमवाजमवी करून भूमीने सगळं कर्ज फेडलं. पण तरीही एका अॅपकडून तिला धमकीचे फोन येत राहिले. - आसान लोन अॅपकडून (Asan Loan) फोन येणं सुरूच राहिल्याने ती कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. तिला पॅनिक अटॅक यायला लागले.

सहकाऱ्याला पाठवले नग्न फोटो

एके दिवशी ती ऑफिसमध्ये असताना तिच्या एक सहकाऱ्याने जवळ येऊन तिला त्याच्या फोनवर काहीतरी दाखवलं. ते पाहून तिला भोवळच आली.

तिचा नग्न फोटो होता तो. पोर्नोग्राफिक इमेज फोटोशॉपने क्रॉप करून मॉर्फ करून भूमीचा चेहरा कुठल्यातरी नग्न देहावर दाखवण्यात आला होता.

आसान लोन अॅपवाल्यांच्या एजंटने तिच्या काँटॅक्ट लिस्टमधल्या सर्वांना हा मॉर्फ केलेला फोटो पाठवला होता. तो पाहून तिची अवस्था एवढी लाजिरवाणी झाली की, आपण आयुष्य संपवावं हाच विचार तत्क्षणी तिच्या मनात आला.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

या अशाच गैरव्यवहारांची प्रकरणं भारतातच नव्हे तर जगभरात सुरू असलेली आम्हाला दिसली. पण एकट्या भारतात 60 हून अधिक लोकांनी लोन अॅपच्या वसुलीच्या नावाने होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बीबीसीच्या निदर्शनास आलं.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातच यातल्या 50 टक्क्यांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत.

या झटपट कर्जाला बळी पडणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने वीस ते तीस वर्षांदरम्यानचे तरुण होते. एक जण अग्निशमन दलात कामाला होता, एक तरुण आई-वडील होते, ज्यांनी आपल्या तीन आणि पाच वर्षांच्या दोन मुलींना मागे ठेवून शेवटचं पाऊल उचललं.

एक पुरस्कारविजेता संगीतकार या प्रकरणात बळी गेला. एका प्रकरणात तर आजोबा आणि नातू एकत्र या विळख्यात अडकले. या छळाला कंटाळून आयुष्य संपवणाऱ्यांमध्ये चार जण तर किशोरवयीन होते.

या ऑनलाइन कर्जाच्या विळख्यात सापडलेले आणि नंतर छळाला बळी पडलेले बहुतेक जण इतके वैषम्यग्रस्त झाले की, ते या गैरव्यवहाराबद्दल बोलण्याचीही त्यांना लाज वाटते, भीती वाटते. त्यामुळे अनेक प्रकरणात गुन्हेगारांची नावं समोर येतच नाहीत. खरे दोषी दिसतच नाहीत.

काय करतात वसुली एजंट?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या गैरव्यवहारांच्या मुळाशी पोहोचण्यासाठी बीबीसीला एक आतला माणूस हवा होता. अनेक महिन्यांच्या शोध आणि पाठपुराव्यानंतर एक जण बीबीसीच्या हाती लागला. या तरुणाने कर्जवसुली एजंट म्हणून कॉल सेंटर्समध्ये काम केलेलं होतं आणि अनेक लोन अॅपसाठी तो एजंट म्हणून कार्यरत होता. रोहन- अर्थातच हे त्याचं खरं नाव नाही. - स्वतः या प्रकरणातला छळ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून, अनुभवून व्यथित झालेला होता.

"अनेक ग्राहक अक्षरशः रडले. बऱ्याच जणांनी आपण आयुष्य संपवत असल्याचे इशारे दिले... या सगळ्याचा परिणाम म्हणजे माझीही रात्रीची झोप उडाली. त्यांच्या विचारांनी काळजात काहूर उठायचं..." असं सांगणारा रोहन अखेर हा मोठा स्कॅम उघडकीस आणायला बीबीसीला मदत करण्यास तयार झाला.

बीबीसीच्या सांगण्यावरून त्याने दोन वेगवेगळ्या कॉल सेंटर्सकडे नोकरीसाठी अर्ज केला. एक- मॅजेस्टी लीगल सर्व्हिसेस आणि दुसरी कॉलफ्लेक्स कॉर्पोरेशन. या दोन कंपन्यांमध्ये राहून अनेक आठवडे गुप्तपणे वावरून त्याने आवश्यक माहिती गोळा केली.

कॉल सेंटरचे तरुण एजंट कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा कसा छळ करतात याचे व्हिडीओ त्याने काढले.

"बऱ्या बोलाने लाइनीवर ये, नाहीतर तुला संपवून टाकीन", एक महिला शिव्या देत ग्राहकाशी बोलत आहे. तिने त्या ग्राहकावर व्यभिचारी असल्याचा आरोप केला आणि त्याने फोन ठेवताच ती जोरजोरात हसायला लागते. दुसरा एक जण फोनवर ग्राहकाला सांगतोय, "तुझ्या आईलाच का नाही उभी करत वेश्या म्हणून... म्हणजे त्या पैशातून तरी तू हे कर्ज फेडशील."

विशाल चौरासिया
फोटो कॅप्शन, विशाल चौरसिया ग्राहकांना पैसे देण्यासाठी कसं छळत होते हे सांगताना. याचं शूटिंग होत असल्याची त्यांना कल्पना नव्हती.

अशा प्रकारची किमान 100 संभाषणं रोहनने रेकॉर्ड केली. वसुली एजंट कशा प्रकारची भाषा वापरून आणि कुठल्या थराला जाऊन ग्राहकांची अवहेलना करतात हे यामुळे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलं.

या छळवणुकीचा कहर म्हणता येईल अशी व्यवस्था त्याने दिल्लीच्या जवळ कॉलफ्लेक्स कॉर्पोरेशनमध्ये पाहिली. इथले एजंट ग्राहकांना घाबरवण्यासाठी आणि धमकवण्यासाठी अत्यंत अश्लील भाषा वापरत होते आणि हे त्या एजंट्सच्या अंगवळणी पडलं होतं. हे तरुण एजंट त्यांना शिकवल्याप्रमाणेच असं वागत होते हे विशेष. त्यांच्या संभाषणांवर वरिष्ठांचं लक्ष होतं आणि कॉल सेंटरच्या मॅनेजर्सच्या देखरेखीखालीच हा रोजचा तमाशा सुरू होता. त्यातीलच एक वरिष्ठ होता विशाल चौरसिया नावाचा इसम.

गुंतवणूकदार बनून बीबीसीच्या पत्रकाराने साधला संवाद

रोहनने या चौरसियाचा विश्वास संपादन केला आणि त्याच्या मदतीनेच बीबीसीचा एक पत्रकार (Undercover reporter) हा घोटाळा नेमका कसा चालतो हे समजून घेण्यासाठी चौरसियापर्यंत पोहोचला. अर्थाच आमचा पत्रकार एक गुंतवणूकदार असल्याचं भासवून रोहनबरोबर चौरसियाला भेटला.

नेमकं इथे कसं काम चालतं असं विचारल्यावर चौरसियाने सिस्टीम समजावून सांगितली. एखादा ग्राहक लोन घेतो त्या वेळी त्याच्या फोनवरचे सगळे काँटॅक्ट्स अॅपला मिळतात.

कॉलफ्लेक्स कॉर्पोरेशन या कंपनीला कर्जवसुलीचं काम सोपवण्यात आलं होतं. ग्राहकाने कर्ज चुकवताना एखादा हप्ता चुकवला की त्याचा छळ सुरू करण्याचं काम ही कंपनी करते आणि त्यानंतर त्याच्या काँटॅक्ट लिस्टचा या कामी वापर करण्यात येतो. आमच्या कर्मचाऱ्यांना वाटेल ते बोलण्याची मुभा आहे. त्यांनी फक्त वसुली करणं महत्त्वाचं. त्यासाठी वाटेल तसं ते बोलू शकतात.

"बदनामी आणि मानहानीला घाबरून शेवटी ग्राहक कसेही करून पैसे देतात. त्यांच्या काँटॅक्ट लिस्टमध्ये असा एक तरी माणूस सापडतोच की, ज्याच्यापर्यंत पोहोचल्याने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं," चौरसिया सांगतो.

ही बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी आम्ही चौरसियाशी पुन्हा एकदा बीबीसी म्हणून थेट संपर्क साधला. पण आपण याविषयी काहीही भाष्य करू इच्छित नसल्याचं चौरसियाने स्पष्ट केलं. कॉलफ्लेक्स कॉर्पोरेशनशी देखील बीबीसीने संपर्क साधला. पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

एका धडपड्या मुलीची आत्महत्या

या अशा कॉल्समुळे जे आयुष्यातून उठतात, त्यापैकीच एक होती किरनी मौनिका.

24 वर्षांची मौनिका तेलंगणाच्या सिद्दीपेट शहरात सरकारी नोकरीत होती. तिच्या शाळेतली ती एकमेव विद्यार्थिनी होती जिला सरकारी अधिकारी होता आलं. तिच्या कुटुंबासाठी मौनिका शान होती. तीन भावांची लाडकी बहीण होती. तिचे सुस्थित शेतकरी वडील तिला पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यास तयार होते आणि ती तिथे पदव्युत्तर शिक्षण घेणार होती.

तीन वर्षांपूर्वी एका सोमवारी, कुणाच्या ध्यानीमनी नसताना मौनिकाने स्वतःला संपवलं.

"ती त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी तिच्या स्कूटरवरून निघाली होती. चांगली हसत होती"... किरनी भूपानी - मौनिकाचे वडील तो दिवस आठवून सांगतात.

पोलिसांनी मौनिकाचा फोन आणि तिची बँक स्टेटमेंट तपासली तेव्हा तिने 55 वेगवेगळ्या लोन अॅप्सवरून कर्ज घेतल्याचं समोर आलं. फक्त 10 हजार रुपयांचं कर्ज तिने सुरुवातीला घेतलं होतं. ते चक्रवाढ दराने तीसपट वाढलं. आत्महत्येचं पाऊल उचललं त्या वेळपर्यंत तिने त्यातील 3 लाख रुपयांची परतफेड केलेली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, मौनिकाला फोनवरून वसुलीसाठी अर्वाच्य शब्दांत धमकावलं जात होतं. तिला अश्लील मेसेज यायचे आणि नंतर तिच्या काँटॅक्ट लिस्टमधल्या लोकांना तिच्याविषयीचे मेसेज जायला सुरुवात झाली होती.

ज्या दिवशी मोनिकाने आत्महत्य केली, त्यादिवशी तिला मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं.
फोटो कॅप्शन, ज्या दिवशी मोनिकाने आत्महत्य केली, त्यादिवशी तिला मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं.

मौनिकाची खोली आता तिच्या आठवणीत घरच्यांनी एखाद्या स्मृतिस्थळासारखी जपून ठेवली आहे. तिचं सरकारी आयकार्ड दाराला नेहमीप्रमाणे लटकलेलं आहे आणि तिच्या आईने एका लग्नासाठी भरून ठेवलेली तिची बॅगही आहे तशीच तिथे पडलेली आहे.

मौनिकाच्या वडिलांना राहून राहून एक गोष्ट अजूनही सलते. "तिने याबद्दल मला सांगायला हवं होतं. आम्ही कुठूनही पैशांची व्यवस्था करू शकलो असतो..." डोळ्यातलं पाणी पुसत ते सांगतात.

ज्या लोकांमुळे हे सगळं झालं, त्यांच्याविषयी सात्विक संतापाने ते बोलतात.

आपल्या मुलीचा मृतदेह रुग्णालयतून घरी आणत असताना तिचा फोन खणखणला. तो तिच्या वडिलांनीच उचलला तेव्हा अत्यंत अश्लील भाषेत बोलत कुणीतरी शिव्या देताना त्यांनी ऐकलं. "तो माणूस तिला पैसे देण्याविषयी सांगत होता. नाहीतर... असं म्हणून धमकी देत होता. मी सांगितलं त्याला ती आता या जगात नाहीये."

हे राक्षस कोण होते ते काही तेव्हा समजलं नाही, असं ते सांगतात.

कर्जदारांनाच चोर आणि फ्रॉड म्हटलं

हरी (हे त्याचं खरं नाव नाही) हा अशाच एका कॉल सेंटरसाठी काम करत होता. मौनिकाने कर्ज घेतलं होतं त्यापैकी एका अॅपच्या वसुलीचं काम त्याच्या कॉल सेंटरकडे होतं. तिथे त्याला पगार चांगला होता. पण मौनिकाच्या मृत्यूबद्दल कळल्यानंतर आपण इथे काम करतो या विचाराने तो अस्वस्थ होऊ लागला होता.

त्याचं म्हणणं आहे की, तो अर्वाच्च भाषेत धमकावणी करत वसुली करणाऱ्यांपैकी तो नव्हता. तुलनेने नम्र भाषेतले कॉल करून सुरुवातीच्या दिवसात वसुलीसाठी ग्राहकांच्या मागे लागणाऱ्या एजंटांच्या टीममध्ये तो होता. पण त्याच्या मॅनेजरनेसुद्धा त्यांच्या टीम मेंबर्सना ग्राहकांना धमकावण्यास सांगितलं होतं.

त्याने दिलेल्या माहितीनुसार, हे एजंट ठराविक ग्राहकांच्या काँटॅक्टलिस्टमधील नंबर्सवर खोटे मेसेज पाठवत असत. ती व्यक्ती कशी चोर आहे, फसवी आहे हे सांगणारे हे मेसेज असायचे.

"प्रत्येकालाच आपल्या प्रतिमेची काळजी असते. कुटुंबीयांसमोरची, मित्रमंडळींसमोरची आपली प्रतिमा निव्वळ पाच हजारांसाठी मलीन व्हावी अशी कुणाचीच इच्छा नसते", हरी सांगतो.

एकदा ग्राहकाकडून पैसे आले की, या एजंट्सच्या सिस्टीमवर Success असा मेसेज उमटतो. हा संदेश मिळाला की एजंट दुसऱ्या व्यक्तीला धमकावायला सरसावतो.

एजंट्सच्या या धमक्यांना वैतागून काही ग्राहकांनी आता आपणच आपलं आयुष्य संपवू असा इशारा द्यायला सुरुवात केली. त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं. पण अशा प्रकारे आत्महत्या खरोखरच होऊ लागल्या.

या बातम्या कानावर आल्यानंतर मात्र त्याकॉल सेंटरचे काही कर्मचारी त्यांच्या बॉसला विचारायला गेले की, आता असे कॉल थांबवायला हवेत का? त्यावर त्यांचा बॉस - परशुराम ताकवे उलट त्यांच्यावरच दरडावला.

हरी सांगतो, "दुसऱ्या दिवशी ताकवे ऑफिसमध्येच आले आणि चिडून आम्हाला म्हणाले की, तुम्हाला सांगितलंय तेवढंच करा आणि पटापट वसुली करा," यानंतर वसुली एजंटांचे हॅरासमेंट कॉल सुरूच राहिले.

पुढच्या काही महिन्यात मौनिकाने आत्महत्या केली.

अशा अॅप्सचं चिनी कनेक्शन

ताकवे हा निर्दयी माणूस होता. पण ही सगळी यंत्रणा चालवणारी ती काही एकमेव व्यक्ती नव्हती. हरीने दिलेल्या माहितीनुसार ते काम करत असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अचानक भाषा बदलली जायची. सॉफ्टवेअर इंटरफेस कुठल्याही पूर्वसूचनेनुसार चायनीज व्हायचा.

ताकवे याचं एका चिनी महिलेशी लग्न झालेलं होतं. तिचं नाव लियांग टियान टियान. या दोघांनी मिळूनच कर्जवसुलीचा व्यवसाय उभा केला होता. ‘जियालियांग’ या नावाने त्यांनी पुण्यात व्यवसाय सुरू केला होता. तिथेच हरी काम करीत असे.

डिसेंबर 2020 मध्ये ताकवे आणि लियांगला पोलिसांनी एका छळवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. पण त्यांची काही महिन्यातच जामिनावर सुटका झाली. एप्रिल 2022 मध्ये त्यांच्याविरोधात खंडणीसाठी धमकावणे, खंडणी वसूल करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. वर्षअखेरीला ते दोघेही फरार झाले. अजूनही ते फरार आहेत.

बीबीसीने प्रयत्न केला, पण आम्ही ताकवेपर्यंत पोहोचू शकलो नाही. पण त्याची कंपनी जियालियांग ज्या लोन अॅप्ससाठी काम करत होती त्यांचा शोध घेतला असता त्याचे धागेदोरे एका चिनी व्यावसायिकाशी जाऊन पोहोचले. त्याचं नाव ली शियांग (Li Xiang).

या ली शियांग यांचं नाव कुठल्याही ऑनलाइन डॉक्युमेंटमध्ये दिसत नाही. पण त्यांच्या एका कर्मचाऱ्यापर्यंत घेऊन जाणारा एक फोन नंबर आम्हाला सापडला. पुन्हा एकदा गुंतवणूकदार आहोत असं दाखवून आम्ही ली शियांगबरोबर एक मीटिंग आयोजित केली.

कॅमेऱ्यासमोर जवळ येत चेहरा जोरजोराने हलवून ली त्यांच्या भारतातल्या बिझनेसबद्दल बढाया मारत होते.

"आम्ही अजूनही अशाच पद्धतीने काम करतो. भारतीयांना पत्ताही नसतो की आमची कंपनी चायनीज आहे", ली म्हणाले.

लियांग तियान तियान आणि परशुराम ताकवे
फोटो कॅप्शन, लियांग तियान तियान आणि परशुराम ताकवे

2021 मध्ये ली शियांगच्या दोन कंपन्यांवर भारतीय पोलिसांनी छापे घातले होते. लोन अॅपने केलेल्या छळवणुकीसंदर्भातल्या तपासासाठी पोलीस त्याच्या कंपनीपर्यंत पोहोचले आणि त्या कंपन्यांची बँक खाती गोठवण्यात आली होती.

"आमच्या गुंतवणुकीचा लवकरात लवकर परतावा मिळावा या उद्देशाने आम्ही व्याजदर ठेवतो. आमचे व्याजदर स्थानिक कायद्यात बसणारे नसतात आणि सहाजिकच आम्ही स्थानिक करही भरत नाही. तुम्ही ही रचना समजून घेतली पाहिजे", ली सांगत होते.

ली यांच्या कंपनीची लोन अॅप्स भारताबरोबर मेक्सिको आणि कोलंबियातही आहेत, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. रिस्क कंट्रोल आणि डेटा कलेक्शन सर्व्हिसेसच्या क्षेत्रात म्हणजेच कर्ज वसुली सेवा क्षेत्रात आपण आग्नेय आशियातील सर्वांत मोठे व्यावसायिक असल्याचा त्यांचा दावा होता. आता या व्यवसायाचा विस्तार ते लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतही करत आहे. त्यासाठी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात 3000 हून अधिक कर्मचारी नेमले आहेत. "पोस्ट लोन सर्व्हिसेस देण्यासाठीचा हा विस्तार आहे", असं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर आपली कंपनी कर्ज वसुलीसाठी काय काय करते हे त्यांनी समजावून सांगितलं.

"तुम्ही वेळेवर पैसे परत दिले नाहीत तर तुम्हाला आम्ही Whatsapp वर अॅड करू आणि मग तिसऱ्या दिवशी तिथे कॉल आणि मेसेज सुरू होतील. व्हॉट्सअॅप आणि मोबाईल दोन्हीवर एकाच वेळी कॉल सुरू होतात. तसंच तुमच्या काँटॅक्ट्सनादेखील कॉल जाऊ लागतात. मग चौथ्या दिवशी तुमच्या संपर्कातल्या लोकांनीही पैसे देण्यास नकार दिला तर पुढे काय करायचं याची आमच्याकडे रीतसर पद्धत आहे."

"आम्ही ग्राहकाची कॉल रेकॉर्ड तपासतो आणि त्यातून बरीच वैयक्तिक माहिती घेतो. जणू काही तो ग्राहक आता आमच्यापुढे संपूर्ण उघडा पडतो", ली सांगत होते.

अश्लील फोटो पाठवल्याचा परिणाम

भूमी सिन्हाने तिला येणाऱ्या धमकीच्या फोन कॉल्सला धीराने तोंड दिलं. शिवीगाळ, अवहेलनादेखील सहन केली. पण पॉर्नोग्राफिक इमेज आल्यानंतर मात्र तिचा धीर सुटला. ती कोलमडली.

"त्या एका मेसेजने मला सगळ्या जगापुढे उघडं पाडलं. नग्न केलं. माझा आत्मविश्वास, आत्मसन्मान, प्रतिष्ठा, माणूस म्हणून असलेली किंमत... सगळं एका क्षणात संपलं."

भूमीचा तो तसा फोटो तिच्या संपर्कातले वकील, आर्किटेक्ट, सरकारी अधिकारी, लहान-थोर नातेवाईक, मित्रमंडळी, तिच्या आई-वडिलांचं मित्रमंडळ या सगळ्यांपर्यंत पोहोचला. आता त्यापैकी कुणीच आपल्याकडे पूर्वीच्या नजरेने पाहणार नव्हतं.

"माझ्या आतल्या माझ्याच प्रतिमेला तडा गेला होता. एखाद्या फुटलेल्या काचेला जोडायचा प्रयत्न केलात तर ती कशी दिसेलच ना... तसंच होणार होतं", ती सांगते.

ती ज्या वसाहतीत गेली 40 वर्षं राहात होती, तिथल्या रहिवाशांनीसुद्धा तिला वाळीत टाकलं.

"या क्षणी मला एकही मित्र नाही. जगात फक्त मीच आहे माझ्यासाठी असं वाटतं", खिन्नपणे हसून ती सांगते.

भूमी सिन्हा आपली मुलगी आस्था सोबत
फोटो कॅप्शन, भूमी सिन्हा आपली मुलगी आस्था सोबत

तिचे काही नातेवाईक आजही तिच्याशी बोलत नाहीत. आपण ज्यांच्याबरोबर काम करतो ते पुरुष आपल्याकडे त्याच नजरेने पाहतील का? आपली नग्नावस्थेतील कल्पनाच करत असतील का, अशी शंका तिच्या मनात सतत असते.

भूमीची मुलगी आस्थाने तिला त्या दिवशी सकाळी ज्या उद्विग्न अवस्थेत पाहिलं होतं, तो दिवस तिच्यासाठी सर्वांत वाईट होता. ती टोकाच्या मानसिक अवस्थेत होती. पण त्याच क्षणी तिच्या मनात या सगळ्याला विरोध करण्याची, लढण्याची भावना वर येत होती. "अशा पद्धतीने नक्कीच नाही मरायचं. आता लढायचं", तिने मनोमन ठरवलं.

तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पण त्यानंतर पुढे काहीच घडलं नाही. पुढचा छळ कमी करायला आपला फोन नंबर बदलून, जुनं सिमकार्ड फेकून देणं याखेरीज तिच्या हातात काहीच नव्हतं. मग आस्थाच्या - तिच्या मुलीच्या मोबाईलवर फोन येणं सुरू झालं. अखेर तिनेही तिचं सिमकार्ड फेकून दिलं. आपल्या मित्र-मंडळींना, परिवाराला तिच्या जुन्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यास तिने सांगितलं. मग हळूहळू हे कॉल येणं बंद झालं.

या सगळ्यांत भूमीला तिच्या बहिणींचा, ऑफिसमधील बॉसचा भक्कम पाठिंबा मिळाला. लोन अॅपच्या जाळ्यात फसलेल्या व्यक्तींची ऑनलाइन कम्युनिटी मानसिक आधार द्यायला कामी आली. पण तिची सर्वांत मोठी ताकद ठरली तिची लेक- आस्था.

"मी नक्कीच काहीतरी चांगलं काम केलंय, म्हणून मला अशी मुलगी लाभली. तिने मला वेळीच आधार दिला नसता, पाठिशी उभी राहिली नसती तर इतर अनेक लोकांसारखी मीदेखील लोन अॅप्सच्या छळाला कंटाळून आयुष्याचा शेवट करून बसले असते.

ग्राहकांना त्रास झाल्यास होतो फायदा

आम्ही या रिपोर्टमध्ये आसान लोन अॅप ही कंपनी आणि लियांग टियान टियान - परशुराम ताकवे या दांपत्यावर आरोप केले आहेत. हे दोघेही फरार असून त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद आलेला नाही. कंपनीनेदेखील काहीच प्रतिसाद दिलेला नाही.

ली शियांग यांच्याशी बीबीसीने संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया मागितली असता ते म्हणाले की, माझ्या कंपन्या सर्व स्थानिक कायद्यांचे आणि नियमांचे पालन करतात. माझी कुठलीही लोन अॅप्स नाहीत आणि जियालियांग कंपनीशी असलेले संबंध आपण पूर्वीच संपवलेले आहेत.

ग्राहकांच्या संपर्कयादीतून आम्ही कुठलीही माहिती गोळा करत नाही किंवा वापरत नाही, असंही ली शियांग म्हणाले. माझी कर्जवसुली सेवा देणारी कॉल सेंटर्स कठोर मानकांचे पालन करतात आणि सामान्य भारतीयांचा छळ करून आपण नफेखोरी करत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लि शियांग

मॅजेस्टी लीगल सर्व्हिसेस या कंपनीनेही ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा आणि संपर्कांचा उपयोग कर्जवसुलीसाठी करत असल्याचा आरोप फेटाळला.

कुणीही अपशब्द वापरू नयेत आणि धमकीचे कॉल करू नयेत अशी सक्त ताकीद आमच्या एजंटांना दिलेली असल्याचं त्यांनी 'बीबीसी'ला सांगितलं. कंपनीच्या कुठल्याही धोरण किंवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कंपनी कामावरून काढून टाकते, असंही त्यांचं म्हणणं आहे.

(या रिपोर्टसाठी रॉनी सेन, श्वेतिका पराशर, सईद हसन, अंकुर जैन आणि बीबीसी आय टीमने अतिरिक्त वार्तांकन केले आहे. यासाठी अंडरकव्हर रिपोर्टिंग करणाऱ्या बातमीदारांचे आभार. त्यांची नावे आम्ही त्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी नमूद केलेली नाहीत.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)