आर्थिक फसवणूक: डेबिट कार्ड क्लोनिंग म्हणजे काय? ते कसं टाळायचं?

डेबिट कार्ड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्लोन किंवा स्किमिंग करून तुमच्या खात्यातून परस्पर पैसे काढण्याचे प्रकार तुम्ही ऐकलेच असतील. हे क्लोनिंग होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्याल?

मुंबई जवळच्या डोंबिवली उपनगरात IDBI बँकेच्या काही ग्राहकांना एका विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. तब्बल पन्नास एक जणांना सोमवार रात्रीपासून मोबाईलवर एसएमएस यायला सुरुवात झाली. त्यांच्या खात्यातून काही हजार ते अगदी लाखो रुपये वजा झाले होते. त्यांनी किंवा घरातल्या इतरांनी पैसे काढले नव्हते, तरी.

प्रकाश जैन (नाव बदलले आहे) यांचा MIDCमध्ये रासायनिक कारखाना आहे. IDBIच्या फडके रोड शाखेत त्यांचं करन्ट अकाऊंट आहे. सोमवारी रात्री त्यांना पहिला संदेश आला तोच मुळी 1 लाख रुपये खात्यातून गायब झाल्याचा. मंगळवार (13 एप्रिल 2021) आणि बुधवारी (14 एप्रिल 2021) बँकेला गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी होती. त्यामुळे गुरुवारीच बँकेशी संपर्क होऊ शकला.

जैन जेव्हा बुधवारी सकाळी बँकेत पोहोचले. तेव्हा त्यांच्यासारखे आणि चार जण तक्रारी घेऊन आले होते. त्यातल्या एक गृहिणी होत्या. तर एक ज्येष्ठ नागरिक. त्यांच्याही खात्यातून काही हजार रुपये गायब झाले होते.

पुढच्या दोन दिवसांत बँकेकडे अशा पन्नास एक तक्रारी आल्या. आणि खुद्द त्या शाखेत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचेच पैसे अशा प्रकारे खात्यातून वजा झाले. अखेर बँकेनं पुढाकार घेऊन डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांची एक तीन जणांची टीमच बँकेत आणली. जेणेकरुन ज्यांचे पैसे गायब झाले आहेत, त्यांना तिथल्या तिथे एफआयआर दाखल करता यावा. दोन दिवसांत असे तीस-एक एफआयआर दाखल झाले.

सुरुवातीला हे प्रकरण म्हणजे सायबर हल्लाच असावा आणि ऑनलाईन घोटाळा करून पैसे खात्यातून गायब केले असावेत असा पोलिसांना संशय आला. कारण, एकाही ग्राहकाचं डेबिट कार्ड चोरीला गेलं नव्हतं.

पण, हळुहळू पोलिसांना एक एक तपशील कळत गेला. ज्या ग्राहकांना अशा प्रकारे लुबाडण्यात आलं होतं, त्यांनी आठवड्याभरात कधी ना कधी शाखेच्या परिसरात असलेलं बँकेचं एटीएम वापरलं होतं. शिवाय पैसे परस्पर खात्यातून वळते झाले नव्हते तर ते खात्यातून काढण्यात आले होते.

bank, service

आणि ही सगळी माहिती मिळाल्यावर रामनगर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं,

"शाखेसमोरच्या एटीएम केंद्रातून पैसे काढण्यात आले आहेत. हा सायबर हल्ला नाही. तीस तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. आरोपींनी एटीएम मशिनमध्ये स्क्रिनिंग/स्कॅनिंग यंत्र बसवलं असावं. आणि त्याच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने पैसे काढले असावेत. आमचा पुढचा तपास सुरू आहे."

रविवार (18 एप्रिल) पर्यंत अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध फ्रॉड म्हणजे फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला आहे. आणि फसवणुकीचा गुन्हा जर सिद्ध झाला तर ज्या ग्राहकांचे पैसे गेले त्यांना बँक विमा संरक्षणाच्या माध्यमातून आपले पैसे परतही मिळू शकतील.

पण, या प्रकरणाच्या निमित्ताने आपण आपल्या डेबिड कार्ड आणि एकूणच एटीएम व्यवहारांविषयी थोडी माहिती घेऊया. आणि हे व्यवहार कसे सुरक्षित करता येतील ते पाहूया….

डेबिट कार्ड स्किमिंग/क्लोनिंग पासून सावधान

IDBI बँकेत मागच्या आठवड्यात जो प्रकार घडला तो प्रथमदर्शनी डेबिट कार्ड क्लोनिंगचा प्रकार असावा असंच दिसतंय. पोलिसांनीही तीच शक्यता वर्तवली आहे.

म्हणजे असं की, सराईत गुन्हेगार बँकेच्या एटीएम मशिनमध्ये तुम्ही जिथे पिन क्रमांक टाकता किंवा कार्ड स्वाईप करता तिथे एक स्क्रिनिंग यंत्र बसवतात. हे यंत्र अगदी सराईत नजरेलाही कळत नाही. आपल्याला ते एटीएम मशिनचाच एक भाग वाटतं. पण, या यंत्राला आपल्या डेबिट कार्डची माहिती नीट वाचता येते. किंवा आपण जो पिन क्रमांक टाकू तो ही त्यातला कॅमेरा टिपतो.

आणि मग या माहितीच्या आधारे गुन्हेगारांना दुसरं तसंच दिसणारं एटीएम कार्ड बनवता येतं. यालाच म्हणतात डेबिट कार्ड क्लोनिंग किंवा स्किमिंग. हल्ली सगळे व्यवहार ऑनलाईन असल्याने अनेकदा प्रत्यक्ष कार्डही नवं बनवावं लागत नाही. पैसे वळते करण्याची प्रक्रिया ऑनलाईनही होते. त्यामुळे गुन्हेगार कुणाच्या नजरेसही पडत नाही. पण, परस्पर चोरी केली जाते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

बरं, हे असं क्लोनिंग फक्त एटीएम केंद्रातच होतं, असंही नाही. तुम्ही एखाद्या दुकानात खरेदी केल्यानंतर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पैसे चुकते केलेत. त्यासाठी तुमचं कार्ड तिथल्या मशिनमध्ये स्वाईप केलंत, तरी या छोट्या मशिनलाही स्क्रिनिंग यंत्र बसवलेलं असू शकतं. तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची माहिती चोरांना मिळते.

क्रेडिट कार्डाच्या बाबतीत ओटीपी क्रमांकाच्या पडताळणीमुळे निदान कार्डाचा गैरवापर काही प्रमाणात रोखता येतो पण, डेबिट कार्डाची माहिती चोरांना मिळाली आणि क्लोनिंग झालं तर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.

त्यामुळे जसं तुमचा ओटीपी क्रमांक कुणाला फोनवर देऊ नका असं तज्ज्ञ वारंवार सांगत असतात, तसंच तुमचं डेबिट कार्ड जपून वापरा असंही ते सांगतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही आणखी काय नवीन भानगड असं तुम्हाला वाटेल कदाचित. पण, ग्राहकांनी जागरुक असणं गरजेचं आहे.

क्लोनिंग पासून कसा कराल बचाव?

गुगल सर्चवर जाऊन एटीएम स्किमिंग असं सर्च केलंतर तर अशी किती प्रकरणं तुमच्या अवती भवती रोज घडतायत याची कल्पना तुम्हाला येईल. पण, मग अशावेळी आपलं कार्ड सुरक्षित कसं ठेवायचं. त्यासाठी काय करायचं?

  • स्किमिंग यंत्राचा शोध - एटीएम केंद्रावर जाल तेव्हा एकदा मशिन नीट न्याहाळून बघा. मशिनच्या रंगसंगतीशी न जुळणारं एखादं उपकरण तिथे दिसलं तर त्या मशिनचा वापर करू नका. पिन टाईप करता ते की पॅड किंवा कार्ड स्क्रिनिंग करता तो स्वाईप स्लॉट इथं काही गडबड आढळली, ओरखडे आढळले, स्वाईप जर सहज झालं नसेल, कार्ड कुठे अडकत असेल तर लगेच त्या केंद्रातून बाहेर पडा. की पॅड आणि स्वाईप या दोन्ही ठिकाणी कुठला प्रकाश दिसत असेल अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा किंवा इतर कुठलाही तर तिथून बाहेर पडा.
  • पैसे काढण्यासाठी बँकांच्याच एटीएमचा वापर करा. अनेकदा घाईच्या वेळी आपण बँकांची केंद्र न वापरता फक्त पैसे देणारी जी यंत्र मॉल, बार, सिनेमागृह इथं बसवलेली असतात त्यांचाच वापर करतो. बऱ्याचदा ही मशिन सुरक्षित नसतात. 60% घटनांमध्ये अशाच मशिनमध्ये स्किमिंग यंत्र बसवलेलं असतं.
  • कीपॅड नीट तपासा - ही सगळ्यांत महत्त्वाची कसोटी आहे. काही ठिकाणी कीपॅडच वरून नवं बसवलेलं असतं. तेव्हा जर एटीएम मशिनचं
  • पिन क्रमांक हाताने झाका - हा सगळ्यात सुरक्षित उपाय आहे. कीपॅड हॅक केल्याशिवाय चोरांना पिन क्रमांक कळत नाही. त्यामुळे
  • सुरक्षारक्षक असलेली गर्दीच्या ठिकाणची एटीएम वापरा - अशा एटीएम केंद्रांमध्ये स्किमिंग मशिन बसवण्यासाठी कुणी घुसण्याची शक्यता कमी असते. कारण, असं यंत्र एखाद्या व्यक्तीने तिथे बसवल्याशिवाय ते आपोआप येत नाही. पण, स्किमिंग यंत्र बसवल्यानंतर पुढचं काम ऑनलाईन होऊ शकतं.
  • अकाऊंट बॅलन्स नियमितपणे तपासा - खबरदारीचा उपाय म्हणून निदान आठवड्याला तुमच्या बँक खात्यांचा अंदाज घ्या. निदान अशा
  • एसएमएस संदेश नोंदणी करा - तुमच्या बँक खात्यात कुठलाही व्यवहार झाला तर तो तुम्हाला लगेच कळावा यासाठी बँका एसएमएस सेवा देत असतात. त्यांचा लाभ घ्या. एखादा व्यवहार तुम्ही केलेला नसेल तर तो रिपोर्ट करण्यासाठीची लिंक असा संदेशांमध्येच दिलेली असते. तुम्ही ताबडतोब आपली कारवाई त्या माध्यमातून सुरू करू शकाल.
क्रेडिट कार्ड

फोटो स्रोत, Getty Images

क्लोनिंगचा फटका बसलाच तर?

तुमच्या मेहनतीचे पैसे असे फुकट गेलेले कुणालाच आवडणार नाही. त्यात अशा क्लोनिंगमध्ये साधारणपणे ग्राहकांची काही चूकही नसते. पण, पैसे जर गेलेच तर ग्राहक म्हणून तुम्ही काय कराल?

बँकेचा आठ आकडी मदत केंद्राचा टोल फ्री क्रमांक असतो. त्यावर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांना द्या. भीती वाटत असेल तर डेबिट कार्ड बंद किंवा ब्लॉक करा.

त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांना सविस्तर पत्र लिहून झालेला प्रकार कळवा. आणि त्यांच्याकडून परतावा कसा मिळेल याची विचारणा करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असले प्रकार हे आर्थिक फ्रॉड म्हणजे फसवणूक या प्रकारात मोडतात. म्हणून लगेच पोलिस स्थानकात तक्रार द्या. या तक्रारीची एक प्रत बँक व्यवस्थापकांना सादर करा.

बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी याविषयी सांगतात, "जेव्हा बँक व्यवस्थापकांकडे तक्रार जाते तेव्हा बँकेची आयटी सेल कामाला लागते. पोलीसांची आर्थिक गुन्हे शाखा आपल्याकडून चौकशी सुरू करते. आणि मग हा प्रकार कसा घडवून आणला गेला याचा तपास यंत्रणेला करता येतो. पोलीस आणि आयटी तपासात काय निष्कर्ष निघतो यावरून ग्राहकांचे पैसे परत मिळणं अवलंबून असतं."

आता तुम्ही म्हणाल ही ग्राहकांची चूकच नव्हती. तर पैसे परत मिळायला उशीर का लागतो?

यावर उटगी सांगतात, "ग्राहकांना त्यांची चूक नसताना पडलेल्या भुर्दंडात त्यांचे पैसे परत करणं ही बँकेची जबाबदारी आहे. कारण, बँकेतली रोख रक्कम आणि एटीएम मशिनमधली रक्कम सुरक्षित ठेवणं ही बँकेची कायदेशीर जबाबदारी आहे. पण, त्यापूर्वी गुन्ह्याचं स्वरूप सिद्ध व्हावं लागतं. आर्थिक घोटाळा होता की, फसवणूक किंवा यात मानवी हात होता की, नैसर्गिकपणे घडवून आणण्यात आलं, हे पाहून परतावा देण्याची पद्धत ठरते."

"कुठल्याही बँकेनं आपल्याकडे असलेली रोख रक्कम आणि इतर ठेवी यांचा ब्लँकेट विमा काढलेला असतो आणि अशा फसवणुकीच्या प्रकरणात ग्राहकांचं हित राखण्याच्या दृष्टीनेच हा विमा काढलेला असतो. आणि ग्राहकांना त्यांची चूक नसताना त्यांनी गमावलेले पैसे परत मिळवून देणं ही बँकेची जबाबदारी आहे," असं विश्वास उटगी सांगतात.

IDBI प्रकरणातही ग्राहकांनी उमेद न हरता बँकेकडे आपल्या पैशांचा पाठपुरावा केला पाहिजे.

अलीकडे स्किमिंगचे प्रकार कमी करण्यासाठीच रिझर्व्ह बँकेनं अद्ययावत एटीएम मशिन बसवण्याची शिफारस केली आहे. शिवाय सामान्य डेबिट कार्डाचा वापर थांबवून चिप असलेलं कार्ड ग्राहकांना द्यावं अशाही सूचना बँकांना केल्या आहेत. चिपमधली ग्राहकांची माहिती सुरक्षित आणि कोडेड असते.

त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या बाबतीत आपण जुनं कार्ड वापरत नाही ना याची खात्री ग्राहकांनीही करून घ्यायला हवी. शिवाय कार्ड स्वाईप न करता कॉन्टॅक्टलेस कार्डांचा वापरही हल्ली सुरू झाला आहे. अशी अद्ययावर मशिन असतील तर ग्राहकांनी जुन्या एटीएम मशिन ऐवजी अद्ययावत केंद्रांमध्येच पैसे काढावे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)