'या' चार अत्याधुनिक शस्त्रांनी हमास इस्रायलवर अजूनही प्राणघातक हल्ले करतंय

इस्रायल हमास युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

इस्रायलविरुद्धच्या युद्धात हमास हा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करत असल्याचं बीबीसी अरेबिकच्या फॉरेन्सिक तपासात आढळून आलं आहे.

पूर्वीच्या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचं रूपांतर आता अधिक प्राणघातक शस्त्रास्त्रांमध्ये करण्यात आलं असल्याचं लष्करी तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हमासने 7 ऑक्टोबर रोजी गाझामधून केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यामध्ये शेकडो रॉकेट आणि क्षेपणास्त्र, स्फोटकांनी भरलेले ड्रोन्स तैनात केले गेलेले आणि असंख्य अज्ञात शस्त्रे व दारूगोळ्याचा वापर करण्यात आला आहे.

यामध्ये जवळपास 1,200 इस्रायली मारले गेले आणि 240 हून अधिक लोकांना गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आलं. तेव्हापासून इस्रायली हवाई हल्ले आणि गाझामधील जमिनीवरील आक्रमणात 23,000 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

हमास आणि त्यांची लष्करी शाखा असलेल्या अल-कसाम ब्रिगेड्सद्वारे वापरण्यात आलेल्या चार शस्त्रास्त्रांची ओळख पटवण्यात बीबीसी अरेबिकला यश आलंय, ज्यात त्यांच्या क्षमतेबद्दल आणि भागांची खरेदी कशाप्रकारे केली जातेय याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हमासच्या 8,000 हल्लेखोरांना ठार केलं असलं तरी त्यांनी त्याचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

इंग्लंड आणि अनेक पाश्चिमात्य देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या हमासने या आरोपाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गाझामध्ये आतापर्यंत त्यांचे 187 सैनिक मारले गेले असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

1. 'यासिन 105' रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र

इस्रायलने जमिनीवरील हल्ल्याला सुरूवात केल्यानंतर अल-कसाम ब्रिगेड्सने शेअर केलेल्या विविध व्हिडिओंमध्ये यासिन 105 मिमी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र दाखवण्यात आलंय, ज्यामध्ये ते गाझामधील इस्रायली मर्कावा रणगाड्यांना लक्ष्य करताना दिसत आहेत.

हमास चळवळीचे दिवंगत संस्थापक शेख अहमद यासिन यांच्या नावावरून या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आलं असून, ते रशियन बनावटीच्या रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (आपीजी) लाँचरमधून डागण्यात येत आहे.

यासिन 105 चं दुहेरी वॉरहेड डिझाइन हा एक महत्त्वाची नवकल्पना असल्याचं इजिप्शियन सैन्याचे माजी ब्रिगेडियर जनरल समीर राघेब यांचं म्हणणं आहे.

इस्रायल हमास युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

पहिला स्फोटक हल्ला रणगाड्याच्या कवचाला लक्ष्य करतो आणि आंशिक किंवा पूर्ण प्रवेश करण्याचा रस्ता मोकळा करतो, तर दुसरा हल्ला रणगाड्याच्या आत संपूर्ण प्रवेश सुनिश्चित करतो वा त्याला उडवून देतो, असं ते म्हणाले.

माजी ब्रिटिश लष्करी गुप्तचर अधिकारी फिलिप इंग्राम म्हणाले की, 300 मीटर प्रतिसेकंद कमाल वेग असलेलं हे क्षेपणास्त्र 150-500 मीटर पल्ल्यापर्यंत प्रभावी मारा करू शकतं.

या दुहेरी वॉरहेड डिझाइनसाठी आवश्यक असलेली अचूकता हमासच्या प्रगत शस्त्रास्त्र निर्मितीची क्षमता अधोरेखित करतं, असंही ते म्हणाले.

येणारी क्षेपणास्त्रे रोखण्याच्या प्रणालीने इस्त्रायली रणगाडे सुसज्ज आहेत, असं ते पुढे म्हणाले.

पण इस्रायलच्या यंत्रणेला यासिन क्षेपणास्त्राशी झगडावं लागत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. बीबीसी अरेबिकला याची शहानिशा करता आलेली नाही.

हमासकडे किमान 2,000 ‘यासिन 105’ क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे, असा लष्करी तज्ज्ञांचा अंदाज आहे.

2. 'अल असेफ' टॉर्पेडो

ऑक्टोबरच्या उत्तरार्धात हमासने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अतिरेकी गटातर्फे 'अल असेफ' टॉर्पेडो नावाचे नवीन शस्त्र दाखवण्यात आहे, ज्याचा त्यांनी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात वापर केला असल्याचं सांगितलं.

हा व्हिडिओ यापूर्वी ऑनलाइन पोस्ट केला गेला नसल्याची खात्री बीबीसी न्यूज अरेबिकने केली आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे शस्त्र मानवरहित किंवा रिमोटपणे हाताळता येणारं पाण्याखाली चालणारं वाहन असून पाण्याखालच्या कारवायांसाठी डिझाइन करण्यात आलंय.

“एक साधं सेमी-सबमर्सिबल पाण्याखालचं व्यक्तिविरहित वाहन”, असं या शस्त्राचं वर्णन इजिप्शियन सैन्यातील माजी कर्मचारी प्रमुख यासेर हाशेम करतात.

मॅपिंग, पाळत ठेवणे, बुडालेल्या गोष्टींचं निरीक्षण करणे, पर्यावरणाचा आढावा घेणे आणि लढाऊ कारवाया यासह पाण्याखालची विविध कामं पार पाडण्याचं अष्टपैलुत्व त्यांनी अधोरेखित केलं.

इस्रायल हमास युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

ब्रिगेडियर जनरल रागेब म्हणतात की हे शस्त्र गाझामध्ये बनवलं गेलंय, त्याच्या घटकांची माहिती देताना ते म्हणतात की, कॉम्प्रेस्ड गॅस सिलिंडर, अंतर्गत ज्वलन इंजिन, कॅमेरा आणि मार्गदर्शन अँटेना या गोष्टी प्रतिबंधित नसलेली उत्पादनं आणि रिसायकल करता येणाऱ्या सामग्रीमधून मिळवता येऊ शकतात.

थ्रीडी प्रिंटिंगने सुसज्ज असलेले वर्कशॉप्ससुद्धा ही शस्त्रे बनवू शकतात, असंही ते पुढे म्हणाले.

हमासच्या व्हिडिओमध्ये 'अल असेफ' टॉर्पेडोचं प्रदर्शन केलं जात असलं तरी त्याच्या प्रभावीपणाबद्दल मर्यादित पुरावे उलब्ध आहेत.

7 ऑक्टोबर रोजी त्याचा वापर केल्याचा दावा केला जात असला ते वापरलं असल्याची कोणतीही खात्री बीबीसी अरेबिक करू शकलेलं नाही आणि त्यामुळे इस्रायली जहाजांचं नुकसान केल्याचे कोणतेही पुरावे पाहण्यात आलेले किंवा सादर केले गेलेले नाहीत.

मे 2021 मध्ये ‘आयडीएफ’ने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमधील दाव्यानुसार त्यांनी किनाऱ्याजवळील एक स्वायत्त म्हणता येईल अशा पाणबुडीवर हल्ला केला होता. परंतु, त्यावेळी उपकरणाची कोणतीही छायाचित्रे दाखवण्यात आलेली नव्हती.

3. उत्तर कोरियन एफ7 आरपीजी

हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात आणि गाझा पट्टीवरील इस्रायली सैन्याविरुद्धच्या जमिनीवरील संघर्षाच्या व्हिओंमध्ये ‘एफ7 आरपीजी’ लाँचर ठळकपणे पाहायला मिळतं.

हे ग्रेनेड लाँचर उत्तर कोरियामधून आणण्यात आलंय आणि प्रक्षेपणास्त्राच्या शिरोभागाभोवती लाल पट्ट्यासारखी विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत.

सशस्त्र हमास अतिरेकी एफ7 आरपीजी वाहून नेत असलेल्या अनेक व्हिडिओंच्या सत्यतेची पडताळणी आणि खात्री बीबीसी अरेबिकने केली आहे.

इस्रायल हमास युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

इझ-अल-दिन अल-कासम ब्रिगेड्सने हे लढाऊ शस्त्र दाखवणारे फुटेज देखील प्रसिद्ध केले आहे.

पकडलेल्या शस्त्रास्त्रांच्या विस्तृत प्रदर्शनाचा एक भाग म्हणून आयडीएफतर्फे पत्रकारांना एफ7 आरपीजी दाखवण्यात आले, जो हमासने त्याचा वापर केल्याचा पुरावा आहे.

एफ7 आरपीजी लाँचर हे त्याच्या जलद रीलोड गतीमानतेसाठी ओळखलं जातं आणि विशेषतः जड वाहनांवरील हल्याकरिता ते प्रभावी ठरतं.

माजी ब्रिटीश सैन्य गुप्तचर अधिकारी फिलिप इंग्राम म्हणतात की, त्यांनी ऑनलाइन पाहिलेल्या व्हिडिओंमध्ये हमासच्या अतिरेक्यांनी लाँचरमध्ये बदल केल्याचं दिसतंय.

तो म्हणाले की, त्यांनी रणगाडा विरोधी प्रोजेक्टाइलच्या जागी शार्पनलच्या अँटी-पर्सनल प्रकाराचा वापर केला आहे, ज्याचं एका तात्पुरत्या बॉम्बमध्ये रूपांतर करण्यात आलं असून त्याचा वापर जमिनीवरील सैन्याविरूद्ध केला जाऊ शकतो.

इस्रायल हमास युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

“उत्तर कोरिया अनेक वर्षांपासून शस्त्र पुरवत असलेल्या इराणमधून अथवा उत्तर कोरियातून ही शस्त्र हमासपर्यंत पोहोचल्याचा कोणताही थेट पुरावा नाही,." असं त्यांनी बीबीसी अरेबिकला सांगितलं.

“असं असलं तरी, ती मिळवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. याच पद्धतीने उत्तर कोरिया आपलं अधिकाधिक परकीय चलन मिळवतो."

तथापि, हमास आपली शस्त्रे वापरल्याचा आरोप प्योंगयांगने आपली अधिकृत वृत्तसंस्था ‘केसीएनए’द्वारे स्पष्टपणे धुडकावून लावला आहे. उत्तर कोरियाच्या राजवटीने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर अशा बातम्या "निराधार अफवा आणि खोटारडेपणा” असल्याचं म्हटलं आहे.

पण दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेने जानेवारीच्या सुरुवातीला दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलंय की, गाझामध्ये हमासद्वारे उत्तर कोरिया निर्मित शस्त्रे वापरली जात असल्याचं त्यांच्या गुप्तचर संस्थेचा अंदाज आहे.

4. स्फोटक यंत्र 'द शवाज'

सोशल मीडियावर हमासच्या व्हिडिओंमध्ये दिसणांरे आणखी एक शस्त्र म्हणजे 'द शवाझ', अरबी भाषेत ज्वाळांसाठी हा शब्द वापरला जातो. नजिकच्या अंतरावरील वाहनांवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारे हे एक स्थानिक पातळीवर बनवण्यात आलेले स्फोटक उपकरण आहे.

गाझामध्ये इस्रायलच्या जमिनीवरील हल्ल्यादरम्यान त्यांनी त्यांचा वापर केल्याची खात्री हमासच्या लष्करी शाखेने केली आहे.

इस्रायलने गाझामधून मोठ्या प्रमाणात गाझामधून ही शस्त्रे जप्त केल्याचं दाखवलं आहे, ज्यावरून स्थानिक पातळीवर याचं लक्षणीय उत्पादन केलं जात असल्याचा अंदाज बांधता येतो.

जुलै 2023 मध्ये अल-कसाम ब्रिगेड्सने ही स्फोटक उपकरणं दर्शविणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्याला एक वायर जोडलेली आहे.

इस्रायल हमास युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

मिस्टर इंग्राम म्हणतात की, हमास या संघर्षामध्ये सुधारित मॉडेलचा वापर करत आहे, जे इस्रायली चिलखती वाहनं नष्ट करण्यास सक्षम आहेत.

उपकरणांमध्ये धातूची डिस्क असते, जी मुख्यत: तांब्यापासून बनलेली असते आणि स्फोटकांमध्ये लपलेली असते, असंही ते म्हणाले.

स्फोट झाल्यावर तांब्याच्या डिस्कचं प्रक्षेपणास्त्रात रूपांतर होतं आणि ती लक्ष्य केलेल्या वाहनांच्या चिलखताला भेदते.

या उपकरणांचा साधेपणा त्यांचं जटिल डिझाइन आणि उपाययोजनेच्या विपरीत आहे.

तांब्याची डिस्क मिळवणं आणि त्याला अचूक आकार देणं हा सर्वात आव्हानात्मक भाग असताना त्याची निर्मिती करण्याची क्षमता असल्याचं हमासने दाखवून दिलं आहे, असंही ते पुढे म्हणाले.

युद्ध सुरू असताना हमास शस्त्रे कशी बनवत आहे?

स्फोट न झालेले इस्रायली बॉम्ब तसेच नुकसान किंवा उद्धस्त झालेल्या इमारतींमधील धातू आणि वायरींचा हमास पुनर्रवापर करत आहे.

ब्रिगेडियर जनरल राघेब म्हणतात की, इराणने गाझा पट्टीमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी मदत केली आहे, गाझाच्या सीमेवरील गुप्त बोगदे आणि भूमध्य समुद्रातून इस्रायलच्या नाकेबंदीतून नौका नजर चुकवून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

इस्रायल हमास युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

इराणचे विद्यमान पर्यटन मंत्री आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) मधील माजी जनरल एझातोल्लाह जरघामी यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये सरकारी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पॅलेस्टिनी सशस्त्र गटांना इराणी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात त्यांचा सहभाग असल्याचं आणि गाझामध्ये त्यांच्या बोगद्यात प्रवेश करण्याविषयी जाहीर वक्तव्य केलं होतं.

लेबनॉनमधून इस्रायलमध्ये प्रवेश करणार्‍या "आंतरराष्ट्रीय तस्करी सीमा” च्या अस्तित्वाकडे निर्देश करून माजी इजिप्शियन आर्मी चीफ ऑफ स्टाफ यासर हाशेम असं सुचवतात की आपल्या सीमांवर इस्रायलचं निरपेक्ष नियंत्रण असू शकत नाही.

इस्रायली अधिकाऱ्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर केलं की, 'गाझामध्ये केरेम शालोम क्रॉसिंगवर स्फोटकांची तस्करी करण्याचा केलेला प्रयत्न त्यांनी हाणून पाडला होता. जहाजावरील कपड्यांच्या मालामध्ये ही स्फोटकं लपवून ठेवण्यात आली होती.'

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)