अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात असताना नेमकं काय काय घडलं होतं?

कॅप्टन अभिनंदन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नियाज फारूकी
    • Role, बीबीसी उर्दू, दिल्ली

27 फेब्रुवारी 2019 च्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने त्यांच्या हद्दीत एक भारतीय लढाऊ विमान पाडलं. या विमानाचे वैमानिक होते विंग कमांडर अभिनंदन वर्धमान. पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतल्यावर दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि सामारिक तणाव वाढला.

27 फेब्रुवारीची ती घटना आता पुन्हा चर्चेत आली आहे. त्या वेळी पाकिस्तानमध्ये नियुक्त असलेले भारताचे तत्कालीन उच्चायुक्त अजय बसारिया यांच्या पुस्तकात त्या रात्रीबद्दल काही नवे दावे करण्यात आलेत.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान या दाव्यांवर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या, मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, हे पुस्तक फेब्रुवारी 2019 मधील भारताच्या काल्पनिक कथनकाला चालना देणारं आहे.

पण हे स्पष्ट आहे की फेब्रुवारी 2019 मध्ये दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी त्यांच्या 'नेव्हर गिव्ह एन इंच' या पुस्तकात म्हटलंय की, तणाव इतका वाढला होता की दोन्ही देशांमध्ये आण्विक युद्ध होण्याची भीती होती.

इथे हे देखील नमूद करणं आवश्यक आहे की एप्रिल 2019 मध्ये गुजरातमधील एका सभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, अमेरिकेने भारताच्या वैमानिकाला सोडून द्या असं पाकिस्तानला सांगितलं होतं, नाहीतर मोदी 12 क्षेपणास्त्रांसह तयार आहेतच.

"नरेंद्र मोदींचं हे विधान बेजबाबदार आणि युद्ध भडकावणारं आहे," असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.

सोबतच 'बालाकोट घटना, विमान खाली पाडणं आणि वैमानिकाला पकडणं' या घटनांना पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद दिला होता. हे आमच्या तयारी, दृढनिश्चय आणि क्षमतेचे स्पष्ट पुरावे असल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.

भारताचे माजी उच्चायुक्त अजय बसारिया यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की, भारतीय वैमानिक अभिनंदनला ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करायची होती. पण भारताने या चर्चेत रस दाखवला नाही.

त्यावेळी संघर्ष वाढल्याने पाकिस्तान 'घाबरला' असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

या संदर्भात बीबीसीने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला मात्र त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अद्याप उत्तर दिलेली नाहीत.

मात्र परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितलं की,

"अभिनंदनला भारताच्या स्वाधीन करून पाकिस्तानने तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तेच पुस्तकात मात्र फेब्रुवारी 2019 च्या भारताच्या काल्पनिक कथनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलाय."

पण 27 फेब्रुवारीला नेमकं घडलं काय होतं?

2019 मध्ये भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करत बालाकोट भागात बॉम्ब टाकले. त्यांनी पाकिस्तानी भूमीवरील अतिरेकी अड्डे उध्वस्त करण्यासाठी 'सर्जिकल स्ट्राइक' केल्याचा दावा केला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला.

यावर पाकिस्तानने प्रत्युत्तर देत भारतीय मिग -21 विमान पाडलं आणि भारतीय वैमानिक अभिनंदन यांना ताब्यात घेतलं. पण पुढे दोन्ही देशांमध्ये जो तणाव निर्माण झाला तो कमी करण्यासाठी त्यांनी अभिनंदनला भारताच्या स्वाधीन केलं.

नवी दिल्ली स्थित 'अलिफ पब्लिकेशन्स'ने अलीकडेच प्रकाशित केलेल्या पुस्तकात 27 फेब्रुवारीचा उल्लेख केलाय. यात अजय बिसारिया यांनी त्यांच्या पाकिस्तानातील वास्तव्याचं वर्णन केलंय.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने लष्करी कारवाई केली तेव्हा ते दिल्लीत होते. ते त्यांच्या पुस्तकात लिहितात की, '26 फेब्रुवारीला सकाळी मी झोपेतून उठलो तेव्हा सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू होती ती म्हणजे, भारताने पाकिस्तानवर बॉम्ब टाकले आहेत.'

अभिनंदन

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्लामाबादमधील त्यांच्या एका सहकाऱ्याने त्या दिवशी सकाळी आयएसपीआरचे प्रवक्ते आसिफ गफूर यांचं एक ट्विट शेअर केलं होतं. यात असं म्हटलं होतं की, 'भारतीय लढाऊ विमानाने पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर बॉम्ब टाकला.'

ते लिहितात की, पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या दिवशी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) चार किलोमीटर आसपास लष्करी चौक्यांना लक्ष्य करत दारूगोळा बरसवला. त्यानंतर पाकिस्तानच्या 24 विमानांनी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला होता.

27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या विमानांची झुंज लागली. यात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या विमानाला पाकिस्तानी क्षेपणास्त्राचा फटका बसला आणि ते नियंत्रण रेषेच्या सात किलोमीटर आत पडले. मग पाकिस्तानच्या हवाई दलाने त्यांना ताब्यात घेतलं.

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी त्यांच्या 'नेव्हर गिव्ह एन इंच' या पुस्तकात लिहिलंय की, "ज्या पद्धतीने फेब्रुवारी 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाला होता ते पाहता या तणावाचं अणु युद्धात रूपांतर झालं असतं. आणि जगाला याची कल्पना देखील नव्हती."

ते व्हिएतनाममध्ये असताना त्यांना त्यांच्या भारतीय समकक्षाने झोपेतून उठवलं. पाकिस्तानने हल्ल्यासाठी अण्वस्त्रं सज्ज करण्यास सुरुवात केली असेल याची त्यांना भीती होती. त्यांनी सांगितलं की, भारत स्वतः युद्धाच्या तयारीचा विचार करत आहे.

माईक पोम्पिओ लिहितात की, त्यांनी पाकिस्तानचे जनरल बाजवा यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आपण युद्धाच्या तयारीला लागलोय हे त्यांनी नाकारलं. मात्र भारतीय अण्वस्त्र तैनात करण्याच्या तयारीत आहेत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात माजी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया लिहितात की, तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने 'पी-फाइव्ह' देशांतील (म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन) राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं.

'आमचे पंतप्रधान सध्या उपलब्ध नाहीत'

भारतीय मुत्सद्दी बिसारिया यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की, पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय विमानांनी हल्ला चढवल्यानंतर पाकिस्तानने भारतीय वैमानिकाला पकडलं. मात्र पाकिस्तानच्या या कृतीने त्यांनाच जास्त भीती वाटू लागल्याचं राजकीय मुत्सद्दी म्हणतात.

बिसारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की, "बैठक सुरू असताना संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तहमीना जंजुआ यांना लष्कराकडून संदेश मिळाला. त्यांनी सांगितलं की, भारताने पाकिस्तानच्या दिशेने नऊ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत आणि ती कधीही डागली जाऊ शकतात."

कॅप्टन अभिनंदन

फोटो स्रोत, Getty Images

बिसारिया पुढे लिहितात की, 'तहमीना जंजुआ यांची इच्छा होती की राजनैतिक अधिकाऱ्यांनी हा संदेश त्यांच्या देशांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवावा आणि भारताने परिस्थिती चिघळवू नये असं सांगावं. त्यामुळे 'पी-फाइव्ह' देशांच्या राजधानी, इस्लामाबाद आणि नवी दिल्लीत हालचालींना वेग आला.'

एका 'पी-फाइव्ह' देशाच्या मुत्सद्द्याचा संदर्भ देत ते लिहितात की, "यापैकी एका मुत्सद्द्याने सांगितलं की पाकिस्तानने स्वतःची चिंता थेट भारताला कळवावी.'

बिसारिया लिहितात की, त्यावेळी त्यांना मध्यरात्री भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांचा फोन आला. ते म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं आहे.

ते लिहितात की, 'मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मेहमूद यांना कळवलं की, आमचे पंतप्रधान सध्या उपलब्ध नाहीत. पण इम्रान खान यांना कोणताही महत्त्वाचा संदेश द्यायचा असेल तर ते मला कळवू शकतात.'

पण त्यानंतर रात्री त्यांचा फोन आला नाही.

ते पुढे लिहितात की, "अमेरिका आणि ब्रिटनच्या राजदूतांनी यादरम्यान भारताला कळवलं की पाकिस्तान आता तणाव कमी करण्यास, भारताने दिलेल्या दस्तऐवजावर कारवाई करण्यास आणि दहशतवादाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान स्वतः ही घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करतील."

त्यांनी पुढे लिहिलंय की, 1 मार्च रोजी भारताने अभिनंदन यांच्या परतीसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानला बजावलं की याचा कोणताही तमाशा करू नका.

ते लिहितात की, "अभिनंदन यांना परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेचे विमान पाठवण्यात आले, पण पाकिस्तानने परवानगी नाकारली. संध्याकाळी पाच वाजता त्यांना सोडलं जाणार होतं, पण रात्री नऊ वाजले."

‘भारताने रचलेली काल्पनिक कथा’

गुरुवारी साप्ताहिक पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, "हे पुस्तक फेब्रुवारी 2019 मधील भारताच्या काल्पनिक कथनाला चालना देणारं आहे."

एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं की, भारताने त्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधानांचा फोन घेण्यास नकार दिल्याच्या दाव्यावर तुम्ही काय सांगू इच्छिता.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

यावर मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, "भारतातील राज्यकर्त्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी पुलवामा घटनेचा वापर केला. बालाकोट हे भारताचं लष्करी अपयश होतं. त्यांना चांगलंच माहिती आहे की, भारताचं विमान पाडून एका भारतीय वैमानिकाला पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. भारतासाठी भयंकर आणि लाजिरवाणं होतं."

त्या पुढे म्हणाल्या की, "पाकिस्तानने या परिस्थितीत आपण जबाबदार असल्याचं दाखवलं आहे. पण एक राजनैतिक अधिकारी बळाचा वापर करण्याबद्दल बोलतोय हे दुःखद आहे."

"त्यांनी हे पण लक्षात ठेवावं की 28 फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांना 1 मार्च रोजी सोडण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान इम्रान खान यांनी सभागृहात सांगितलं होतं की, 'आज भारताने पुलवामाबाबत संदेश पाठवला होता पण त्याआधीच त्यांनी हल्ला केला."

इम्रान खान म्हणाले होते की, "आम्ही संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. मी कालही मोदींशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि याला आमची दुर्बलता मानू नये. मला भारताला सांगायचं आहे की तुम्ही यापुढे कोणतीही कारवाई करू नका नाहीतर आम्हालाही प्रत्युत्तर द्यावं लागेल."

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.