भारताच्या गुप्त सैन्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का?

- Author, आमीर पीरजादा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
घरातल्या एका कोपऱ्यात नीमा तेनजीन यांचा फोटो ठेवलेला आहे. फोटोसमोर ठेवलेल्या दिव्याच्या मंद प्रकाशात तो फोटो उजळून निघाला आहे. शेजारच्या खोलीत प्रार्थना सुरू आहे. तिथे घरातले सदस्य, नातेवाईक आणि बौद्ध भिख्खू मंत्र म्हणत आहेत.
काही दिवसांपूर्वीच 51 वर्षांचे नीमा तेनजीन यांचा लद्दाखमधल्या पॅंगाँग त्से लेकजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात मृत्यू ओढावला.
लद्दाखमधल्या या भागात भारत आणि चीन यांचं सैन्य गेल्या अनेक महिन्यांपासून समोरासमोर आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान जे भूसुरुंग पेरून ठेवले होते त्यापैकीच एकाचा स्फोट झाला आणि त्या स्फोटात नीमा तेनजीन यांचा मृत्यू झाल्याचं भारतीय सैन्याच्या सूत्रांनी बीबीसीला सांगितलं.
त्या दिवसाविषयी सांगताना तेनजीन यांचे भाऊ नामदाख म्हणतात, "30 ऑगस्टच्या रात्री साडेदहाच्या सुमाराला मला फोन आला आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की नीमा जखमी झाले आहेत. त्यांचा मृत्यू झाल्याचं मला सांगितलं नाही. माझ्या एका मित्राने मला ही बातमी दिली."

21 बंदुकांची सलामी
तेनजीन यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार नीमा तेनजीन स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये (SFF) होते.
स्पेशल फ्रंटियर फोर्स एक 'गुप्त दल' आहे. रिपोर्ट्सनुसार या 'गुप्त दलात' साडेतीन हजार जवान आहेत आणि यापैकी बहुतांश तिबेटी आहेत.
तेनजीन यांचं कुटुंबही शरणार्थी होते आणि तीन दशकं त्यांनी भारतीय सैन्यात सेवाा बजावली.
एसएफएफविषयी फारशी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. भारतीय सैन्यानेही कधीही हे दल अस्तित्वात असल्याचं सार्वजनिकरित्या मान्य केलेलं नाही.
मात्र, सैन्य, परराष्ट्र धोरणाविषयक जाणकार आणि लद्दाखहून वृत्तांकन करणारे पत्रकार यांच्यासाठी हे गुपित नाही.
असं असलं तरी भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर जो तणाव वाढतोय त्या पार्श्वभूमीवर तेनजीन यांचा मृत्यू सार्वजनिकरित्या मान्य करण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच भारतीय सैन्याने तिबेटी लोकांच्या भूमिकेविषयी उघडपणे भाष्य केलं.
तेनजीन यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना 21 बंदुकांची सलामी देत निरोप देण्यात आला.
इतकंच नाही तर अंत्यसंस्कारावेळी लेहमध्ये तिबेटी समाज आणि स्थानिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images
एसएफएफच्या स्थापनेचा इतिहास
नीमा तेनजीन यांच्या अंत्यसंस्काराला भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधवही उपस्थित होते. तेनजीन यांच्या पार्थिवावर भारतीय तिरंग्यासोबतच तिबेटी झेंडाही ठेवण्यात आला. सैन्याच्या एका ट्रकमधूनच पार्थिव त्यांच्या घरापर्यंत नेण्यात आलं.
राम माधव यांनी तेनजीन यांना एसएफएफचा सदस्य असल्याचं सांगत एक ट्वीटही केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, "लद्दाखमध्ये भारतीय सीमेचं रक्षण करताना ते 'शहीद' झाले." मात्र, काही वेळातच राम माधव यांनी ट्वीट डिलीट केलं.
या ट्वीटमध्ये त्यांनी भारत-चीन सीमेऐवजी भारत-तिबेट सीमा असंही लिहिलं होतं.
असं असलं तरी केंद्र सरकार किंवा सैन्याकडून तेनजीन यांच्या मृत्यूविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, भारतीय प्रसार माध्यमांनी ही बातमी दिली आणि चीनसाठी हा इशारा असल्याचंही म्हटलं.
नामदाख तेनजीन म्हणतात, "आतापर्यंत हे एक गुपित होतं. मात्र, आता ते स्वीकारण्यात आलं आहे. याचा मला खूप आनंद आहे. जो कुणी सेवा बजावतो त्याचं नाव व्हायला हवं आणि त्याला पाठिंबाही द्यायला हवा."

फोटो स्रोत, Getty Images
"1971 सालीही आम्ही युद्धात सहभागी होतो. मात्र, ते गुप्त ठेवण्यात आलं. 1999 साली कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधातही आम्ही लढाईत उतरलो होतो. ते ही गुपित ठेवण्यात आलं. मात्र, यावेळी पहिल्यांदाच आमचं असणं, स्वीकारण्यात आलं आहे. याचा मला खूप आनंद आहे."
जाणकार सांगतात की 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर SFF ची स्थापन करण्यात आली.
तिबेटी पत्रकार, चित्रपट निर्माते आणि फँटम्स ऑफ चंटगाव या डॉक्युमेंट्रीचे निर्माते कलसांग रिनचेन म्हणतात, "तिबेटहून पळून भारतात शरण घेतलेले आणि 1960 पर्यंत चीनशी लढणाऱ्या चूशी गँडरूक या तिबेटी गोरिल्ला दलातले जवान ज्यांना उंचावर गोरिल्ला युद्ध करण्याची कला अवगत होती अशा तिबेटी नागरिकांना या दलात सामील करणं, हा यामागचा उद्देश होता."
रिनचेन यांनी एसएफएफच्या माजी जवानांच्या अनेक दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत.
1959 सालच्या चीनविरोधातल्या बंडखोरीत अपयश आल्यानंतर 14 वे दलाई लामा तिबेट सोडून भारतात पळून आले आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर भारतातच तिबेटच्या निर्वासित सरकारची स्थापना करण्यात आली होती.
14 व्या दलाई लामांसोबतच हजारो तिबेटी नागरिक भारतात आश्रयाला आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
'विशेष अमेरिकी दलाकडून प्रशिक्षण'
दलाई लामा आणि त्यांच्यासोबत आलेल्या शरणार्थींना भारताने पाठिंबा दिला. चीन आणि भारत यांच्या संबंधात कटुता येण्यामागे हेदेखील एक कारण आहे. 1962 च्या युद्धात भारताचा पराभव झाला होता आणि त्यानंतर ही कटुता अधिकच वाढली.
भारताचे तत्कालीन सुरक्षा प्रमुख बी. एन. मलिक यांनी अमेरिकेच्या सीआयए (सेंट्रल इंटेलिजेन्स एजेंसी) या अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने एसएफएफची स्थापना केली होती, असं सांगतात.
याकामी अमेरिकेने किती मदत केली, यावरून वाद आहे. मात्र, काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण मोहीम भारताने स्वतः पार पाडली आणि अमेरिकेचा याला पाठिंबा होता.
तर तब्बल 12 हजार तिबेटी नागरिकांना अमेरिकेच्या विशेष दलांकडून प्रशिक्षण देण्यात आलं आणि या कार्यक्रमासाठी अमेरिकेने निधीही पुरवला, असंही काहींचं म्हणणं आहे.
1962 साली एसएफएफमध्ये सहभागी होणारे तिबेटी शरणार्थी जांपा म्हणतात, "प्रशिक्षण देणारे बहुतांश लोक अमेरिकेचे होते. एक सीआयएचा माणूस होता. तो मोडकी-तोडकी हिंदी बोलायचा. आम्हाला हिंदी येत नव्हतं. त्यामुळे आमच्यातल्या ज्या चौघांना हिंदी भाषा यायची त्यांना त्याने प्रशिक्षण दिलं आणि मग त्या चौघांनी इतरांना प्रशिक्षित केलं."
चीनची भूमिका
या दलात सुरुवातीला केवळ तिबेटी नागरिक होते. मात्र, पुढे इतरांचाही समावेश सुरू झाला.
जाणकारांच्या मते हा दल थेट केंद्रीय मंत्रिमंडळाला रिपोर्ट करतो आणि भारतीय सैन्याच्या वरिष्ठ पातळीवरून त्याची सूत्र हलतात.
रिनचेन म्हणतात, "गुप्तपणे चीनविरोधात लढणे आणि गुप्त माहिती गोळा करणे, हा या दलाचा उद्देश होता."
मात्र, एसएफएफविषयी कुठलीही माहिती नसल्याचं चीनचं म्हणणं आहे.
नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत चीनी प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या होत्या, "निर्वासित तिबेटी लोक भारतीय सैन्यात आहेत का, याबाबत मला माहिती नाही. याविषयी तुम्ही भारताला विचारलं पाहिजे."
चीन-भारत सीमेवर तणाव
ते म्हणाले, "चीनची भूमिका स्पष्ट आहे. तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या कुठल्याही देशाचा आम्ही विरोध करतो."
तिबेट आपलाच भाग असल्याचं चीनचं म्हणणं आहे.
जूनमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर या दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे.
या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता. मात्र, चीनच्या किती जवानांचा मृत्यू झाला किंवा जखमी झाले, याविषयी कुठलीच अधिकृत माहिती चीनने दिलेली नाही.
दोन्ही देशांमधली निश्चित न करण्यात आलेली सीमारेषा, हे या दोन्ही देशांमधल्या वादाचं कारण आहे. ही सीमा अनेक अशा दुर्गम भागातून जाते जिथे पोहोचणंही अवघड आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ वेंस्टमिंस्टरच्या स्कूल ऑफ सोशल सायंसमधले प्राध्यापक दिब्येश आनंद म्हणतात, "भारताच्या दृष्टीने ही विचित्र परिस्थिती आहे. आम्ही तुमच्याविरोधात तिबेटी नागरिकांचा वापर करू, हे भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र, भारत अधिकृतपणे हे बोलू शकत नाही."
एसएफएफमधून निवृत्त झालेले जवान जांपा म्हणतात, "भारतीय सैन्य जे करतं ते प्रत्येक काम आम्ही केलं आहे. मात्र, भारतीय सैन्याला जो मान-सन्मान आणि ओळख मिळते ते आम्हाला कधीही मिळालं नाही. हे मला बोचतं."
भारताने एसएफएफचं अस्तित्व स्वीकारल्याने भारत आणि चीन यांच्या संबंधावर काय परिणाम होईल, हे सांगणं कठीण आहे. मात्र, या दोन देशांमधल्या वाढत्या तणावामुळे भारतात राहणारे 90 हजार तिबेटी नागरिक चिंतेत आहेत, एवढं मात्र खरं.
यातल्या बहुतांश लोकांना अजूनही आपण तिबेटला परत जाऊ, अशी आशा आहे. मात्र, भारतालाही ते आता आपलं घरच मानतात.
तेनजीन यांचे मेहुणे तुडूप ताशी म्हणतात, "तेनजीन यांनी आमचे दोन देश - भारत आणि तिबेट - यांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, याचा आम्हाला अभिमान आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








