पाकिस्तानचे प्रस्तावित लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांच्याविषयी जाणून घ्या

लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांना नवे लष्करप्रमुख म्हणून तर लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांचे नवे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केले आहे.

याबाबतचा अहवाल पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना पाठवण्यात आला आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बावजा 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ट्विट करत म्हटलंय की, “हा अहवाल राष्ट्रपती अल्वी यांच्या कार्यालयात पोहोचला आहे. आता ते देशाची सुरक्षा वादग्रस्त बनवतील की बळकट करतील, हे पाहावं लागणार आहे. आता त्यांची आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची कसोटी आहे.”

पाकिस्तानच्या कायद्यानुसार, या नियुक्त्या करणे हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार आहे. त्यांचा सल्ला अंतिम मानला जातो.

पण, काही कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, राष्ट्रपती हा अहवाल होल्डवर शकतात किंवा काही प्रश्नांसह पंतप्रधानांना परत करू शकतात.

सय्यद असीम मुनीर यांच्या नियुक्तीवर इम्रान खान यांचे आक्षेप असल्याचे राजकीय जाणकारांचं मत आहे. काल (24 नोव्हेंबर) संध्याकाळी माध्यमांशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, राष्ट्रपती अल्वी हे पीटीआयचे माजी समर्थक आणि खासदार आहेत. ते अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या नियुक्तीबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत करतील.”

या नियुक्त्यांवरून देशात राजकीय वातावरण तापलं आहे. आता सर्वांचं लक्ष राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडे आहे.

लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर कोण आहेत?

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. ते पाकिस्तानी सैन्यात क्वार्टरमास्टर जनरल म्हणून कार्यरत आहेत.

लष्कराने नियुक्तीसाठी पाठवलेल्या यादीतील 6 जनरल्समध्ये ते सर्वांत वरिष्ठ अधिकारी होते. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ 27 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार होता. पण आता राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्यास त्यांना लष्करप्रमुख म्हणून आणखी 3 वर्षांचा कार्यकाळ मिळेल.

लेफ्टनंट जनरल असीम यांनी विद्यमान लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांच्यासोबत जवळून काम केलं आहे. ऑक्टोबर 2018 मध्येइम्रान खान यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस एजन्सी (ISI) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

कमर जावेद बाजवा

फोटो स्रोत, SEBASTIAN WIDMANN/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, कमर जावेद बाजवा

पण, या सर्वोच्च गुप्तचर अधिकारी पदावरील त्यांचा कार्यकाळ आतापर्यंतचा सर्वांत कमी कालावधीचा ठरला होता. कारण त्यांना नियुक्तीनंतर 8 महिन्यांतच इम्रान खान यांच्या आग्रहावरून पदावरून काढून टाकण्यात आलं होतं.

पाकिस्तानी सैन्याच्या क्वार्टरमास्टर जनरलची नियुक्ती होण्यापूर्वी त्यांची कॉर्प्स कमांडर गुजरानवाला म्हणून नियुक्ती झाली होती.

लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा कोण आहेत?

लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

मिर्झा हे सध्या रावळपिंडीचे कॉर्प्स कमांडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधी चीफ ऑफ जनरल स्टाफ आणि डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स या पदांवर काम केलं आहे. पाकिस्तानी लष्करातील ही दोन्ही शक्तिशाली पदं आहेत.

त्यांनी पाकिस्तानी तालिबान्यांविरुद्ध अनेक गुप्तचर मोहिमांचं नेतृत्व केलं आहे. तसंच त्यांनी अफगाणिस्तानात चर्चेसाठी नियुक्त झालेल्या समन्वय गटाचं नेतृत्व केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)