कोट्यवधींचा दरोडा टाकणाऱ्या 12 जणांचे गूढ मृत्यू, 40 वर्षं झाले 1 रुपयाही सापडला नाही

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वकार मुस्तफा
- Role, पत्रकार आणि संशोधक, लाहोर
10 डिसेंबर 1978 च्या त्या रणरणत्या उन्हात न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळाबाहेर चोरीची काळी फोर्ड व्हॅन उभी होती.
या व्हॅनमध्ये काही मुखवटाधारी लोक बसले होते. दुपारचे सव्वा तीन वाजले असतील, या लोकांना एक सिग्नल मिळाला.
सिग्नल मिळताच हे मुखवटाधारी लोक हातात शस्त्र घेऊन डिलिव्हरी गेटमधून लुफ्थांसा एअरलाइन्स टर्मिनलमध्ये घुसले. जवळपास 64 मिनिटांनंतर ते बाहेर आले तेव्हा त्यांच्याकडे 5 मिलियन डॉलरची रोकड आणि 1 मिलियनचं सोनं होतं. हे सगळं व्हॅन मध्ये भरून त्यांनी तिथून धूम ठोकली.
11 डिसेंबर 1978 चा सूर्योदय व्हायचाच होता, पण अमेरिकन अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. जी चोरी झाली होती ती अमेरिकन इतिहासातील सर्वांत मोठी चोरी होती. आजच्या किंमतीनुसार, या दरोड्यात 2.8 बिलियन डॉलर लुटले होते.
केटी सेरेना यांनी या घटनेवर संशोधन केलं आहे. त्या म्हणतात, 1970 च्या दशकात न्यूयॉर्कमध्ये ज्या दरोड्यांच्या घटना घडल्या त्या आजच्या काळात घडणं शक्यच नाही.
तेव्हा न्यूयॉर्कमध्ये पाच मोठी माफिया कुटुंब होती. यात बोनानो, कोलंबो, गॅम्बिनो, जेनोव्हेसे आणि लुचेस होते. म्हणजे अमेरिकेतल्या प्रत्येक मोठ्या गुन्ह्यामागे यापैकी कोणीतरी एक असायचंच. लुफ्थांसाच्या दरोड्यामागे लुचेस कुटुंब होतं.
लुचेसचा आणि दरोड्याचा संबंध कसा काय लागला?
खरंतर लुचेस कुटुंबासाठी काम करणाऱ्या जेम्स बर्कने दरोड्याची योजना आखली होती.
निकोलस प्लेज त्यांच्या 'वाईज गाय' या पुस्तकात लिहितात की, 'लुफ्थांसाचा मालवाहू पर्यवेक्षक असलेल्या लुई वर्नरवर 20,000 डॉलरचं कर्ज होतं. हे पैसे त्याने जुगारात घालवले होते. जेव्हा सट्टेबाज मार्टिन क्रुगमनने त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा त्याने पैसे देण्याऐवजी स्वतःचं मालवाहू टर्मिनल लुटण्याचा सल्ला त्याला दिला.'
"त्याने क्रुगमनला सांगितलं की, जर्मनीतून आलेले डॉलर्स तात्पुरते एअरलाईनच्या एअरपोर्ट व्हॉल्टमध्ये साठवले जात आहेत. त्यामुळे तू अशी माणसं गोळा कर जी हे पैसे लुटू शकतील."
क्रुगमनच्या सांगण्यावरून, गँगस्टर हेन्री हिलने त्याचा गुरू जेम्स बर्कला याची माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
पण जेम्स बर्क हा लुचेस या माफिया कुटुंबासाठी काम करत होता. आणि पॉल व्हेरिओ त्याचा बॉस होता.
असंही लुचेसच्या टोळीला रोख रकमेची नितांत गरज असल्याने त्यांनी दरोडा टाकला. पण यावेळी बर्कला मोठी रक्कम मिळणार होती आणि त्याने तसं मान्य करवून घेतलं होतं.
निकोलस प्लेज यांच्या माहितीनुसार, क्वीन्समधील हॉटेल रॉबर्ट लाउंजमध्ये दरोड्याची योजना आखण्यात आली. हे हॉटेल बर्कच्या मालकीचं असून तो गुन्हेगारांचा मोठा अड्डा होता.
अनेक महिन्यांपासून सुरू होतं दरोड्याचं नियोजन
अॅलन मे लिहितात की, वर्नर आणि त्याचा साथीदार ग्रुएनवाल्ड यांनी यापूर्वी 1976 मध्ये लुफ्थांसा मधून 22,000 डॉलर इतकं विदेशी चलन चोरलं होतं.
इव्हान रोमनच्या माहितीनुसार, वर्नरने बर्कला गाडी कुठे पार्क करायची, नेमकं कोणत्या वेळी आतमध्ये यायचं, किती वेळ थांबायचं याची इत्यंभूत माहिती दिली होती.
त्यामुळे बर्कचं काम सोपं झालं. तरीही त्याने अनेक महिने वर्नर, क्रुगमन, विमानतळ आणि सुरक्षा कार्याशी परिचित असलेल्या इतर सहकाऱ्यांसोबत नियोजन सुरू ठेवलं.
बर्कने गॅम्बिनो कुटुंबातील पाओलो ले कॅस्ट्री यांच्यासह लुचेस कुटुंबातील टॉमी डिसिमोन, अँजेलो सेप, लुईस कॅफोरा, जो सिविटेलो सीनियर, टोनी रॉड्रिग्ज, जोसेफ एम. कोस्टा, जो मॅनरी आणि रॉबर्ट मॅकमोहन यांची निवड केली.
कार चालवण्यासाठी बर्कने आपला मुलगा फ्रँक आणि त्याचा पार्टनर पार्नेलची निवड केली.
टॉमी डिसिमोन, अँजेलो सेप, लुईस कॅफोरा, जो सिविटेलो, टोनी रॉड्रिग्ज, जोसेफ एम. कोस्टा, जो मॅनरी, रॉबर्ट मॅकमोहन आणि ली कॅस्ट्री हे चोरीला गेलेल्या फोर्ड इकोनोलिन व्हॅन मधून येऊन स्वतः दरोडा घालणार होते. एडवर्ड्स व्हॅन चालवणार होता.
दरोड्याच्या वेळी टर्मिनलजवळ येताना फ्रँक बर्क आणि पोलीस आमने सामने आले. त्यामुळे त्याला विमानतळाबाहेर एका कारमध्ये थांबावं लागलं.
वॅरिओचा मुलगा पॉल याला लुचेसचा वाटा मिळणार होता. बोनान्नो कुटुंबातील व्हिन्सेंट असारो याचाही या दरोड्यात सहभाग होता. कारण लुचेस ज्या भागात दरोडा घालणार होते तो भाग माफिया असलेल्या बोनान्नो यांचा होता. त्यामुळे जेम्स बर्कला या योजनेत समन्वय ठेवणं आवश्यक होतं.
अॅलन मे सांगतात की, प्रत्येक सहभागी दरोडेखोरला त्याच्या भूमिकेनुसार 10,000 ते 50,000 डॉलर मिळणार होते.
खरंतर दरोड्याची रक्कम दोन लाख डॉलर ठरवून त्यात वाटणी केली जाणार होती, पण मूळ दरोड्याची रक्कम याच्या तिप्पट होती. कारण वर्नरला दरोड्याच्या रकमेपैकी 10 टक्के रक्कम मिळणार होती.
सूचना आणि कृती
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, 9 डिसेंबर रोजी रोख रकमेची मोठी शिपमेंट टर्मिनलवर आल्याची माहिती वर्नरने सर्वांना दिली होती. हे पैसे आठवड्याच्या शेवटी कार्गो स्टोरेजमध्ये ठेवण्यात येणार होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे ठरल्याप्रमाणे 10 ते 11 डिसेंबरच्या रात्री व्हॅन लुफ्थांसा टर्मिनलच्या बाहेर उभी होती.
दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी कार्गो एजंट असलेल्या केरी व्हेलनने एक संशयास्पद व्हॅन पाहिली. तो व्हॅन मध्ये काय आहे हे पाहण्यासाठी गेला असता व्हॅनमधील लोकांनी त्याच्यावर पिस्तुल रोखलं आणि त्याला व्हॅनच्या आत ओढलं. त्याचं पाकीट काढून त्याला धमकावण्यात आलं. कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने व्हेलनने सहकार्य करण्याचं ठरवलं.
...आणि लुफ्थांसा मध्ये दरोड्याची सुरुवात झाली
वर्नरने दिलेली चावी घेऊन ते लोक इमारतीत घुसले. त्यांनी इतर लोकांना घाबरवण्यसाठी रक्ताने माखलेल्या आणि पट्टीने बांधलेल्या व्हेलनला समोर केलं. अशा पद्धतीने त्यांनी उर्वरित कर्मचार्यांना एका खोलीत नेऊन बंद केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
लुचेसच्या एका सदस्याने वरिष्ठ मालवाहू एजंट रुडी एलरिचला कोणत्या तरी बहाण्याने बोलावण्याचे आदेश दिले. वर्नरच्या म्हणण्यानुसार, एलरिचकडे तिजोरी उघडण्याचा एक कोड होता.
वर्नरने आधीच स्पष्ट केलं होतं की, दुसरा दरवाजा उघडण्याआधी पहिला दरवाजा उघडणं आवश्यक आहे. पण पहिला दरवाजा दुसरा दरवाजा उघडण्याआधी बंद करणं आवश्यक होतं.
एखादी बारीकशी चूक सुरक्षा यंत्रणांना सक्रिय करू शकते. बंदर प्राधिकरण पोलीस 90 सेकंदांपेक्षा कमी वेळात विमानतळ बंद करू शकत होते.
अॅलन मे यांनी लिहिलंय की, 'एलरिचला दरवाजा उघडण्यास भाग पाडण्यात आलं तेव्हा त्याला याचं आश्चर्य वाटलं की, या मुखवटाधाऱ्यांना या प्रणालीचं इतकं विस्तृत ज्ञान कसं असू शकतं?'
'खबरदारी म्हणून बर्कच्या माणसांनी एलरिच कडून पहिला दरवाजा उघडून घेतला. पुढे बंदुकीच्या जोरावरच त्याच्याकडून दुसरा दरवाजाही उघडून घेतला. त्यानंतर चेंबरमध्ये सामान भरून दुसरा दरवाजा बंद करण्यात आला.
बाहेरचा दरवाजा उघडल्यानंतर, बर्कच्या माणसाने एलरिचला इतर लोकांना बंद केलेल्या खोलीत नेलं. पहाटे साडेचार वाजेपर्यंत सर्व माल बाहेर व्हॅनमध्ये भरण्यात आला. साडेचार वाजेपर्यंत कोणताही फोन सुरू करू नये, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान सर्व काम निपटून दरोडेखोरांनी तिथून पोबारा केला. मात्र जीवे मारण्याची धमकी मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देण्यासाठी 14 मिनिटे वाट पाहिली.
अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत बर्कच्या माणसांचा कोणताच थांगपत्ता नव्हता. अवघ्या 64 मिनिटांत देशातील सर्वांत मोठा दरोडा पडला होता. ना गोळीबार झाला ना कोणी गंभीर जखमी झालं ना कोणाचा मृत्यू झाला.'

फोटो स्रोत, Getty Images
दरोड्याच्या घटनेनंतर हत्येच्या प्रकरणांना वेग
दरोड्याच्या दोन दिवसांनंतर, 13 डिसेंबर रोजी ब्रुकलिनमधील नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या एका मोठ्या व्हॅनची तक्रार करण्यासाठी एका अधिकाऱ्याने पोलिसांना बोलावलं. कारण ही व्हॅन लुफ्थांसा दरोड्यात वापरलेल्या व्हॅनसारखी होती.
पोलिस तपास अधिकारी आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी तात्काळ घटनास्थळ गाठून व्हॅन जप्त केली. अधिक तपास केल्यावर त्यांना पार्नेल एडवर्ड्सच्या बोटांचे ठसे सापडले.
पोलिसांना एडवर्ड्सची कधी चौकशीच करता आली नाही, कारण त्याची स्वतःची कोणतीही चूक नसतानाही त्याच्या अपार्टमेंटमध्ये त्याची हत्या करण्यात आली होती.
रात्रीचं जेवण करत असताना एडवर्ड्सच्या डोक्यात पाच वेळा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यामुळे तो खात असलेलं कोंबडीचं मांस त्याच्या तोंडात तसंच होतं.
पैसे हस्तांतरित केल्यानंतर, एडवर्ड्सला फोर्ड इकोनोलाइनची विल्हेवाट लावण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र गाडी भंगारात घालण्याऐवजी एडवर्ड्स ब्रुकलिनमधील कॅनर्सी येथील आपल्या मैत्रिणीच्या घरी गेला. आणि नशेतच त्याने ती व्हॅन नो-पार्किंग झोनमध्ये उभी केली.
दरोड्याच्या तीन दिवसांत, फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने बर्कच्या लोकांना संभाव्य गुन्हेगार ठरवलं होतं.
निकोलस प्लेज लिहितात, 'एडवर्ड्सचे रॉबर्ट लाऊंजमध्ये असलेल्या लोकांशी संबंध होते हे पोलिसांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी बर्कवर शंका घेतली.'
'एफबीआयने हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या गाड्यांवर, रॉबर्ट लाउंजमधील फोन आणि बारजवळील पे फोन्सवरही पाळत ठेवली.
आजूबाजूला आवाज असूनही एफबीआयला काही संभाषणे रेकॉर्ड करता आली. जसं की, सेप एका अज्ञात व्यक्तीला लुफ्थांसा येथील एका बॅग बद्दल सांगत होता. तो लॉनमध्ये खड्डा काढण्यासंबंधी काहीतरी सांगत होता.'

फोटो स्रोत, Getty Images
मात्र बर्कच्या माणसांनीच हा दरोडा टाकलाय हे निश्चितपणे सांगण्यासाठी हे पुरेसं नव्हतं, त्यामुळे कोणतेही वॉरंट काढता आलं नाहीत.
हिलच्या म्हणण्यानुसार, एडवर्ड्सला चुकीच्या कृत्याबद्दल शिक्षा दिल्यानंतर बर्कने शपथ घेतली की, जो कोणी लुफ्थांसा दरोड्यात अडकण्याची शक्यता आहे त्याला ठार मारलं जाईल आणि बर्कने तेच केलं.
सहा महिन्यांच्या आत जेम्सचा स्वतःचा मुलगा फ्रँक बर्क आणि सगळे साथीदार मारले गेले किंवा बेपत्ता झाले.
क्रुगमनने चोरलेल्या रोख रकमेचा मोठा भाग मागितला. दरोड्याच्या एका महिन्यानंतर बर्क आणि सेप यांनी क्रुगमनला ठार केलं. त्याचं शरीर पोलिसांना कधीच सापडलं नाही.
लुईस वर्नरला दरोड्याच्या चार महिन्यांनंतर अटक करण्यात आली कारण त्याने दरोडेखोरांना टर्मिनल लेआउटची माहिती पुरवली होती. वर्नरची मैत्रीण आणि भावी पत्नी जेनेट बारबेरीने त्याच्या विरोधात साक्ष दिली होती. वर्नरचा मित्र पीटर ग्रुनेवाल्डनेही त्याच्या विरोधात साक्ष दिली.
मे 1979 मध्ये दोषी ठरल्यानंतर वर्नरने 15 वर्षं तुरुंगवास भोगला.
वर्नरच्या अटकेमुळे बर्कला आणखीन भीती वाटू लागली. काही आठवड्यांनंतर बर्कने कॅफोराला लक्ष्य केलं. तो त्याच्या पार्किंगच्या व्यवसायात दरोड्याचे पैसे टाकून मनी लॉन्ड्रिंग करत होता.
रोमनच्या म्हणण्यानुसार, कॅफोराला काही दिवस भूमिगत राहण्यास सांगितलं होतं. पण त्याने याकडे दुर्लक्ष करून त्याची पत्नी जोआनासाठी गुलाबी रंगाची कॅडिलॅक गाडी विकत घेतली. आणि एफबीआय ज्या ठिकाणी तपास करत होती, त्याच ठिकाणी ती गाडी नेण्यात आली. त्यानंतर कॅफोरा आणि त्याची पत्नी कधीच दिसले नाहीत, ना त्यांचे मृतदेह सापडले.
मॅकमोहन आणि मॅनरी एअर फ्रान्ससाठी काम करत होते. त्यांनी संरक्षणाच्या बदल्यात एफबीआयला सहकार्य करण्यास नकार दिला. मे महिन्यात दोन्ही मृतदेह एका पार्क केलेल्या कारमध्ये आढळले होते. त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूने गोळी झाडण्यात आली होती.
एका महिन्यानंतर, सिसिलियन अंमली पदार्थ तस्कर पाओलो ले कॅस्ट्रीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत ब्रुकलिनमधील कचराकुंडीत सापडला. त्याला गॅम्बिनो कुटुंबाने दोन लाख डॉलर्स परत करण्याचं काम दिलं होतं.
फ्लोरिडा रेस्टॉरंट आणि क्लब मालक रिचर्ड ईटन आणि टॉम मॉन्टेलोन यांच्यावर त्यांच्याच व्यवसायातून पैसे लुटल्याचा आरोप होता. ईटनचा गोठलेला मृतदेह मांसाच्या ट्रकमध्ये सापडला. तर न्यू जर्सीच्या समुद्रकिनाऱ्यावर टेरेसा फेराराचं धड सापडलं.
दरोड्यात सहभागी असलेल्या आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. गॅम्बिनोच्या दोन माणसांना परवानगीशिवाय मारल्याबद्दल डीसिमोनच्या डोक्यात गोळी झाडली होती.
जुलै 1984 मध्ये म्हणजेच दरोड्याच्या पाच वर्षांनंतर लुचेस कुटुंबाने सेपचा काटा काढला कारण त्याने लुचेसशी संबंधित ड्रग डीलरकडून हजारो डॉलर्स आणि कोकेन चोरलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा केरी व्हेलनला पोलिसांनी जुने फोटो दाखवले तेव्हा त्याने सेपला ओळखलं, पण आता तो जिवंत नव्हता.
1980 मध्ये हेन्री हिलला अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांना सहकार्य केल्यास बर्क त्याला मारेल या भीतीने हिल संरक्षणाच्या बदल्यात एफबीआयचा साक्षीदार बनला. बर्क, व्हेरिओ आणि इतरांबद्दल माहिती देऊन हिल गायब झाला.
व्हेरिओ आणि बर्क दोघेही गजाआड गेले पण लुफ्थांसा दरोड्यासाठी नाही. तर व्हेरिओने मालवाहतूक कंपन्यांकडून खंडणी गोळा केली म्हणून त्याला अटक झाली. तर बर्क ईटनची हत्या आणि बोस्टन कॉलेज घोटाळा या दोन कारणांसाठी तुरुंगात गेला.
1988 मध्ये व्हेरिओचा तुरुंगात मृत्यू झाला. आणि 1996 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने बर्कचा मृत्यू झाला.
अखेरीस, 2014 मध्ये लुफ्थांसा चोरीच्या 36 वर्षानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
बोनान्नो माफिया कुटुंबातील व्हिन्सेंट असारो यांना वयाच्या 78 व्या वर्षी अटक करण्यात आली. त्याचा चुलत भाऊ गॅसपर व्हॅलेंटीने त्याच्याविरुद्ध साक्ष दिली. असारो विरुद्धचा खटला केवळ एका साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून होता.
खटल्याच्या वेळी असारोने दरोड्याशी आपला कोणताही संबंध असल्याचं नाकारलं.
असारोची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. पण 2017 मध्ये रोड रेजच्या घटनेत त्याला अटक करण्यात आली आणि आठ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्याचाही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तुरुंगात मृत्यू झाला.
हेन्री हिल म्हणतात की, दरोड्यातील रोख रक्कम आणि सोनं कधीच सापडलं नाही. केवळ एक दोषी आणि डझनभर मृतदेह सापडले.
"कारण चार किंवा पाच लाख डॉलर देण्याऐवजी प्रत्येकाच्या डोक्यात गोळी झाडणं तुलनेनं सोपं होतं."
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








