दरोडेखोरांनी जेव्हा अख्खी ट्रेन गायब केली होती...पण पुढे काय झालं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
8 ऑगस्ट 1963 ची तारीख. ग्लासगो ते लंडन सेंट्रल दरम्यान नाईट मेल ट्रेन धावत होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास एका टोळक्याने ही ट्रेन थांबवली आणि 26 लाख पाऊंडच्या नोटा घेऊन पसार झाले.
या लुटीची किंमत आजच्या काळात जवळपास पाच कोटी पाऊंड इतकी आहे.
या घटनेला साठ वर्षं उलटून गेली पण तरीही या चोरीची आठवण ब्रिटनच्या लोकांच्या मनात ताजी आहे. ही चोरी ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’ म्हणून ओळखली जाते.
या घटनेवर अनेक चित्रपट, मालिका येऊन गेल्यात. ही कुप्रसिद्ध चोरी आज लोकांच्या मनात दंतकथा बनून राहिलेय.
चोरट्यांनी कशी आखली योजना? काय घडलं त्यादिवशी आणि त्या चोरांचं पुढे काय झालं? चला जाणून घेऊया.
ती पंधरा जणांची गँग होती आणि तिचा म्होरक्या होता ब्रुस रेनॉल्डस. त्याला रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याकडून खबरा मिळत होत्या. तो कर्मचारी कोण हे शेवटपर्यंत कळलं नाही.
त्या खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून यांनी दरोड्याचा प्लॅन बनवला. त्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच छेडछाड केली आणि त्यामुळे चालती ट्रेन बकिंगहॅमशायरपाशी थांबली.
त्यांनी या दरोड्यात बंदुका किंवा तत्सम शस्त्र वापरली नाहीत पण एका रेल्वे चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. हा ड्रायव्हर बचावला खरा, पण पूर्णपणे बरा होऊ शकला नाही.
कसा आखला प्लॅन?
ब्रुस रेनॉल्डस या दरोड्याचा मास्टरमाईंड होता असं म्हणतात. ग्लासगोहून लंडनला जाणारी ट्रेन थांबवायची आणि लुटायची असा प्लॅन होता.
या ट्रेनमध्ये किती पैसा जातो, तसंच त्याच्या सुरक्षेसाठी काय केलेलं असतं याची खडानखडा माहिती असणारा एका सुरक्षा अधिकारी ती माहिती या गँगला पुरवत होता.
या सुरक्षा अधिकाऱ्याची ओळख लंडनच्या एका वकिलाच्या ऑफिसात काम करणाऱ्या ब्रायन फिल्डने गॉर्डन गुडी आणि रोनाल्ड ‘बस्टर’ एडवर्ड्सशी करून दिली. दोघं गुंड होते.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/UNIVERSAL HISTORY ARCHIVE
दरोड्याचा प्लॅन आखण्यात अनेक महिने गेले. या गँगची कोअर टीम होती ब्रुस रेनॉल्डस, गॉर्डन गुडी. बस्टर एडवर्ड्स आणि चार्ली विल्सन यांची.
हे गुन्हेगारी जगतात नवे नसले तरी त्यांना चालती ट्रेन थांबवून ती लुटण्याचा काहीही अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांनी लंडनच्या आणखी एका गँगची मदत घेण्याचं ठरवलं. या गँगमध्ये होते टॉमी विस्बे, बॉब वेल्च, जिम हसी. त्यांना साऊथ कोस्ट रेडर्स गँग म्हणायचे. यांना म्हणे ट्रेन लुटण्याचा ‘अनुभव’ होता.
नंतर आणखी काही माणसं या ट्रेन लुटण्याच्या प्लॅनमध्ये सहभागी झाली. शेवटी 16 जणांची टीम तयार झाली.
काय होतं या ट्रेनमध्ये ?
ग्लासगोहून लंडनला जाणाऱ्या या ट्रेनला ‘फिरतं पोस्ट ऑफिस’ म्हणायचे. यातून पत्रं, पार्सल, मनी ऑर्डर्स आणि कॅश पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे.
या ट्रेनमध्ये साधारण 72 लोकांचा स्टाफ असायचा आणि चालत्या ट्रेनमध्ये हे लोक वाटेत लागणाऱ्या स्टेशन्सवरून पार्सल आणि पत्रांची पोती उचलायचे.
ट्रेन थांबावी लागू नये म्हणू ट्रेनच्या डब्यांच्या बाहेर मोठे मोठे हुक असायचे त्याला पोती लटकवली जात.

फोटो स्रोत, PA Wire
मग स्टाफ ट्रेनमध्ये बसूनच पत्रांचं सॉर्टिंग करत असे. ट्रेनला 12 डबे होते.
या ट्रेनच्या इंजिनला लागून जो डबा असायचा त्यात पैसे असायचे. सहसा या ट्रेनमध्ये 3 लाख पाऊंड असायचे, पण 7 ऑगस्ट 1963 च्या आधी बँक हॉलिडे आल्याने यात तब्बल 26 लाख पाऊंड होते.
ट्रेन कशी थांबवली?
या दरोडेखोरांनी ट्रेन थांबवण्यासाठी मेन सिग्नल लाईनवरचा ग्रीन सिग्नल हातमोज्याने झाकून टाकला आणि दुसरा बॅटरीवर चालणारा लाल लाईट आणला.
8 ऑगस्टला पहाटे तीन वाजता ट्रेनचा चालक जॅक मिलरने लाल लाईट पाहून गाडी थांबवली. खरंतर अवेळी अशी आडबाजूला गाडी थांबणं अपेक्षित नव्हतं. म्हणून जॅक मिलरचा मदतनीस डेव्हिड व्हीटबी खाली उतरला आणि ट्रेनच्या रुळांच्या बाजूला जे फोन असतात तिथून स्टेशनला फोन करायला गेला. पण तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की फोन लाईन्स कोणीतरी कापून टाकल्यात.
जोवर डेव्हिड परत आला तोवर इंजिन केबिनमध्ये दरोडेखोर घुसले होते. जॅक मिलरने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर एका दरोडेखोराने त्याचा डोक्यात रॉड घातला.
दरोडेखोरांचा प्लॅन असा होता की ते इंजिन आणि पैसे असलेला पहिला डबा इतर ट्रेनपासून वेगळा करतील आणि तिथून साधारण 800 मीटर अंतरावर असलेल्या ब्रीजगो या पुलावर नेतील.

फोटो स्रोत, PA Wire
त्यासाठी त्यांनी एक निवृत्त ट्रेन ड्रायव्हरही आणला होता. पण नेमकं दरोड्याच्या वेळी लक्षात आलं की त्या ड्रायव्हरला ही नवीन पद्धतीची ट्रेन चालवता येत नाही. त्यामुळे त्यांनी परत जॅक मिलरला धमकावून ट्रेन आपल्या इच्छित स्थळी न्यायला सांगितली.
तोपर्यंत बाकीचे दरोडेखोर मागच्या डब्यांमध्ये घुसले होते आणि त्यांनी कर्मचाऱ्यांचा प्रतिकार मोडून काढत त्यांना एका कोपऱ्यात पालथं पडायला सांगितलं होतं. ट्रेनमध्य असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढवत त्यांनाही बांधून टाकलं होतं. आता पैशाच्या गोण्या काढायच्या होत्या.
पहिल्या डब्यात 128 गोण्या होत्या. त्यातल्या 120 गोण्या त्यांनी एकेक करत काढल्या, आणि मानवी साखळी तयार करून पुलाच्या खाली उभ्या असलेल्या त्यांच्या ट्रकमध्ये भरल्या. दरोड्याला सुरुवात झाल्यानंतर तीस मिनिटात पैशांच्या गोण्या भरून ते पसार झाले. इतकंच नाही, प्रत्यक्षदर्शींना फसवण्यासाठी त्यांनी खोट्या नंबर प्लेट लावलेले आणखी दोन ट्रक दोन विरुद्ध दिशांना रवाना केले.
पैशाने भरलेल्या गोण्या आपल्या गाडीत भरल्या नंतर दरोजेखोर एका लहानशा रस्त्यावरून पसार झाले. याकाळात ते पोलिसांच्या रेडियोवर काही माहिती मिळतेय का तेही ऐकत होते.
पहाटे साडेचारच्या सुमारास ते लेदरस्लेड फार्म या ठिकाणी आले. इथे ते लपून राहाणार होते. पहाटे साडेचारला पहिल्यांदा पोलीस यंत्रणेला या दरोड्याबद्दल कळलं.
ट्रेन लुटली गेली हे कसं कळलं?

फोटो स्रोत, BBC One
दरोडेखोरांनी रुळांच्या बाजूलाल असणाऱ्या टेलिफोन्सच्या वायर कापून टाकल्या होत्या. ट्रेनचे मागचे डबे एका ठिकाणी होते आणि इंजिन आणि पैसे असणारा दुसरा डबा त्यांनी साधारण 800 मीटर लांब नेला होता.
मागचे डबे जिथे होते तिथूनच काही काळाने एक मालगाडी जात होती. ट्रेनच्या स्टाफपैकी एक जण त्यात चढला आणि पुढच्या स्टेशनवर उतरला.
तिथून त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांच्या रेडियोवर ऐकू आलं, “एक दरोड पडलाय, आणि शप्पथ सांगतो तुमचा विश्वास बसणार नाही, त्यांनी ट्रेनच चोरलीये.”
गुप्त अड्डा
घटनास्थळापासून लेदरस्लेड फार्म साधारण 43 किलोमीटर दूर होतं. इथे आल्यावर त्यांनी पैशांची वाटावाटी केली.
16 मोठे हिस्से मुख्य दरोडेखोरांसाठी आणि बाकी लहान सहान हिस्से त्यांच्यासाठी ज्यांनी लहानमोठी कामं केली.
पोलिसांचा रेडियो ऐकून त्यांना कळलं की पोलिसांनी 50 किलोमीटरच्या परिघात तपास सुरू केलाय. पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्स गस्त घालत आहेत.
या गँगच्या लक्षात आलं की आपल्याला वाटलं होतं तेवढं लपून राहाणं शक्य नाही. पोलीस लवकरच आपल्यापर्यंत पोचतील. त्यांचा खरं तिथे काही दिवस राहाण्याचा विचार होता पण आता त्यांना तातडीने हालचाल करणं गरजेचं झालं.
ब्रायन फिल्ड त्यांना दरोड्याच्या संध्याकाळी भेटायला आला. त्याला गँगच्या म्होरक्यांनी सांगितलं की, “बाबा, लपायला दुसरी जागा बघ.”
आता तिथून पळायला त्यांनी दरोड्यासाठी वापरलेली वाहनं वापरणं शक्य नव्हतं. प्रत्यक्षदर्शींनी आधीच त्याचं वर्णन पोलिसांना दिलं होतं.
ब्रायन रॉय जेम्स नावाच्या साथीदाराला घेऊन लंडनला गेला आणि तिथे आणखी एक कार शोधली. दरम्यान, ब्रुस रेनॉल्ड्स आणि जॉन डेली दोन कार घेऊन आले. त्यात काही माणसं गेली तर ब्रायन फिल्ड आणि त्याची बायको एक व्हॅन घेऊन आले त्यात काही माणसं फिल्डच्या घरी लपायला गेली.
त्यांना दुसऱ्याच दिवशी आपला अड्डा सोडावा लागला होता.

ट्रेनमधल्या पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना धमकवताना एक जण बोलून गेला, ‘आता अर्धा तास इथून कोणी हलायचं नाही’.
हे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं आणि त्यावरून पोलिसांनी अंदाज बांधला की अर्ध्या तासात वाहन जिथपर्यंत जाऊ शकतं हे दरोडेखोर तेवढंच अंतर गेलेले असणार.
त्यांनी 50 किलोमीटरचा परिसर चाळून काढायला सुरुवात केली. म्हणजेच आता पोलीस कधीही या दरोडेखोरांच्या अड्ड्यावर पोचू शकत होते.
त्यामुळे त्यांना तातडीने शुक्रवारीच अड्डा सोडावा लागला.
दोन दिवसांनी चार्ली विल्सनने ब्रायन फिल्डला फोन करून विचारलं की ज्या फार्महाऊसवर हे लोक लपले होते, तिथले पुरावे नष्ट करून तिथे आग लावली ना नक्की?
ब्रायन उत्तर देताना गडबडला. म्हणून विल्सनने एडवर्ड्स, रेनॉल्ड्स, डेली, जेम्स यांची मिटिंग बोलावली आणि म्हटलं की याचा सोक्षमोक्ष लावायला हवा. ते सगळे ब्रायन फिल्डला भेटले तेव्हा त्याने मान्य केलं की त्याच्या असिस्टंट मार्कने ती जागा पेटवून दिली नाही जसं आधी ठरलं होतं.
विल्सन फिल्डचा गळाच आवळणार होता पण इतरांनी त्याला आवरलं. सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी स्वतः त्या अड्ड्यावर जाऊन तो जाळून टाकायचा असं ठरलं. पण तोवर पोलीस तिथे पोचले होते.
त्यांना तिथे बोटांचे ठसे सापडले, इतर काही पुरावे मिळाले, मुख्य म्हणजे पोस्टाच्या गोण्यांचे अवशेष मिळाले ज्यात पैसे होते.
दरोडेखोर ट्रेन लुटून इथेच आले होते अशी पोलिसांची खात्री पटली.
त्यांनी त्या फार्महाऊसची कागदपत्रं आणि नोंदी तपासल्या, त्यात त्यांना ब्रायन फिल्डचं नाव दिसलं. पोलिसांनी आधी त्याला ताब्यात घेतलं. तिथून मग पुढच्या सोळा जणांपर्यंत पोचणं त्यांना अशक्य नव्हतं.
या दरोडेखोरांचं पुढे काय झालं?
ब्रुस रेनॉल्ड्स या गँगचा म्होरक्या होता आणि या दरोड्याचा मास्टरमाईंड. ‘नेपोलिनय’ हे त्याचं टोपणनाव होतं. तो या दरोड्यानंतर पाच वर्षं पोलिसांपासून लपून छपून राहात होता.
तो खोट्या पासपोर्टवर आधी मेक्सिकोला गेला आणि नंतर कॅनडाला. त्याच्यासोबत त्याची बायको आणि मुलगा पण होते.
पाच वर्षं लपून राहिल्यावर तो इंग्लंडला परत आला, पण आल्या आल्या त्याला अटक झाली. 1968 मध्ये त्या या दरोड्याप्रकरणी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण दहा वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली.
त्यानंतर तो लंडनमधल्या एका छोट्या फ्लॅटमध्ये एकटाच राहायचा. 1980 मध्ये ड्रग विक्रीबद्दल पुन्हा तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
यानंतर तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी एका दरोड्यावर आधारित चित्रपटासाठी कन्सलटंट म्हणून काम केलं आणि स्वतःचं आत्मचरित्रही लिहिलं.
या दरोड्याच्या बरोबर 50 वर्षांनी 2013 साली त्याचा झोपेतच मृत्यू झाला.
रोनाल्ड ब्रिग्सची कथा एखाद्या चित्रपटात शोभावी अशी रंजक आहे.
त्याला 1964 साली या दरोड्याप्रकरणी अटक झाली. पण पुढच्याच वर्षी जेलमधून पळाला. त्याने प्लॅस्टिक सर्जरी करून आपला चेहरा बदलला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये लपत छपत राहिला. त्याने वेगवेगळ्या देशांच्या पोलिसांना चकमा दिला आणि एकदा तर तो किडनॅपर्सच्या तावडीतूनही सुटला. पण या सगळ्या काळात तो मीडियाला मात्र आवर्जून सांगायचा की तो काय करतोय.
36 वर्षं त्याने आपली अटक टाळली. शेवटी 2001 मध्ये त्याची तब्येत खूपच ढासाळली तेव्हा त्याने आत्मसमर्पण केलं. 2009 साली दया दाखवून त्याची सुटका करण्यात आली कारण तो तोवर बेडरिडन झाला होता. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.

रोनाल्ड एडवर्डनेच ट्रेन ड्रायव्हरच्या डोक्यात रॉड घातला होता. त्याच्यावर 1988 साली ‘बस्टर’ नावाचा चित्रपटही आला होता. तोही दरोड्यानंतर मेक्सिकोला पळून गेला, पण 1966 साली त्याने आत्मसमर्पण केलं.
नऊ वर्षं जेलमध्ये काढल्यानंतर त्याची सुटका झाली. त्याने फुलांचं दुकान काढलं. 1994 साली तो एका गॅरेजमध्ये छताला लटकलेला आढळून आला. तेव्हा त्याचं वय होतं 62 वर्षं.
चार्ल्स विल्सन या गँगचा खजिनदार होता. त्यानेच पैशांचे वाटे केले. त्याला सर्वात आधी अटक झाली. त्याला नंतर ‘सायलेंट मॅन’ हे टोपणनाव पडलं कारण त्याने कधीच पोलिसांना काहीच सांगितलं नाही.
त्याला 30 वर्षांची शिक्षा झाली. पण तो चारच महिन्यात कॅनडाला पळून गेला. चार वर्षांनी त्याला परत अटक झाली आणि त्याने दहा वर्षं पुन्हा तुरुंगात काढली.
1978 साली जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा स्पेनला निघून गेला. 1990 साली त्याचा गोळी झाडून खून करण्यात आला.
रॉय जेम्स पैसे भरून नेले त्या ट्रकचा ड्रायव्हर होता. त्याच्याच बोटांचे ठसे पोलिसांना गुप्त अड्ड्यावर सापडले होते. तो चांदीचा कारागिर होता. त्याला कार रेसिंगचाही शौक होता.
त्याला 30 वर्षांची शिक्षा झाली पण 12 वर्षांनी सोडून देण्यात आलं. तोही स्पेनला निघून गेला.
1993 साली त्याला पुन्हा तुरुंगात पाठवलं कारण त्याने त्याच्या बायकोच्या वडिलांवर गोळी झाडली होती आणि बायकोच्या डोक्यात पिस्तुल घातलं होतं.
आणि सगळ्यात शेवटी ब्रायन फिल्ड. यानेच ते फार्महाऊस विकत घेतलं होतं जिथे दरोडेखोर लपले होते.
यालाही 25 वर्षांची शिक्षा झाली, पण पाच वर्षांनी त्याची सुटका करण्यात आली. 1979 मध्ये एका अपघातात त्याचा मृत्यू झाला.
अरे हा, आणि एक सांगायचं राहिलं... चोरीला गेलेले पैसे कधीही सापडले नाहीत !
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








