सिस्टर अभया हत्याकांड: केरळच्या इतिहासातील सर्वांत दीर्घकाळ चाललेला तपास

अभया

केरळमध्ये 28 वर्षांपूर्वी झालेल्या एका ननच्या हत्या प्रकरणात चर्चचे पादरी आणि सिस्टर दोषी असल्याचं सिद्ध झालं आहे. तिरुअनंतपूरमधील विशेष सीबीआय न्यायालय आज (23 डिसेंबर) या प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावणार आहे.

अभया,असं या ननचं नाव होतं. तब्बल 28 वर्षांपूर्वी 1992 साली केरळच्या कोट्टायममधल्या कॉन्व्हेंटच्या हॉस्टेलमधल्या विहिरीत नन अभया यांचा मृतदेह आढळून आला होता. हे प्रकरण अभया हत्याकांड म्हणून ओखळलं गेलं.

याप्रकरणी मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने फायदर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी दोषी असल्याचा निकाल सुनावला. आज म्हणजेच 23 डिसेंबर रोजी या दोघांनाही शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

कोर्टाने दोघांनाही हत्येसोबतच पुरावे नष्ट केल्याप्रकरणीही दोषी ठरवलं आहे. फादर कोट्टूर यांना कट रचण्याच्या आरोपाखालीही दोषी ठरवण्यात आलं आहे.

तब्बल 28 वर्षांचा दीर्घ तपास

केरळमध्ये हे प्रकरण बरचं गाजलं. या प्रकरणामुळे केरळमधील चर्चेवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले. तब्बल 28 वर्षं या प्रकरणाचा तपास सुरू होता. हे केरळच्या गुन्हेगारी इतिहासातील सर्वात दीर्घ काळ तपास सुरू असणारं प्रकरण ठरलं आहे.

गेल्या तीन दशकात या प्रकरणात बरेच चढ-उतार आले. पोलीस, क्राईम ब्रांच आणि त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला. कोर्टानेही एकदा पोलिसांचा आणि दोनदा सीबीआय तपास फेटाळला होता.

हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न झाला. अखेर केरळ उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर योग्य दिशेने तपास करून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आलं.

काय आहे नेमकं प्रकरण?

सिस्टर अभयाचं मूळ नाव बीना थॉमस होतं. मृत्यूच्या वेळी अभया (19) कनया कॅथलिक चर्चेकडून चालवण्यात येणाऱ्या पायस टेन क्वॉन्व्हेंटमध्ये पदवीचं शिक्षण घेत होत्या. कॉन्व्हेंटच्या हॉस्टेलमध्ये त्या रहायच्या.

प्रतिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

27 मार्च 1992 रोजी त्यांच्या रुममेट सिस्टर शर्ली यांनी त्यांना पहाटे 4 वाजता अभ्यासाला उठवलं. परीक्षेची तयारी करायची असल्याने त्या पहाटे उठून अभ्यास करायच्या. झोप येऊ नये, म्हणून चेहऱ्यावर फ्रिजमधलं गार पाणी घेण्यासाठी त्या किचनमध्ये गेल्या. त्याचवेळी शर्ली यांनी सिस्टर अभया यांना शेवटचं बघितलं होतं. त्यानंतर अभया कधीच खोलीत परतल्या नाही. दुसऱ्या दिवशी हॉस्टेल परिसरातल्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला.

नन अभयाने सिस्टर सेफी यांना फादर थॉमस कुट्टूर आणि फादर जोस पुथुरुक्कयिल या दोघांसोबत 'आक्षेपार्ह स्थितीत' बघितलं होतं आणि तिने हे इतर कुणाला सांगू नये, यासाठी तिची हत्या करण्यात आली, असं सीबीआयचं म्हणणं होतं.

फादर कोट्टूर यांनी अभयाचा गळा आवळला आणि सिस्टर सेफी यांनी तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर तिघांनी मिळून सिस्टर अभया यांना विहिरीत फेकल्याचं सीबीआयने कोर्टाला सांगितलं.

दुबईत राहणारे सिस्टर अभया यांचे भाऊ बीजू थॉमस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "कोर्टाने दिलेला निकाल कळला तेव्हा हसावं की रडावं मला कळत नव्हतं. संमिश्र भावना होत्या. कोर्ट आज निकाल देईल, अशी मला अपेक्षा नव्हती."

"आज स्वर्गात असलेल्या माझ्या आई-वडिलांना आनंद झाला असेल. चार वर्षांपूर्वी दोघंही हे जग सोडून गेले."

दुबईत हॉटेलमध्ये काम करणारे बीजू सांगतात, "अभया माझ्याहून दोन वर्ष लहान होती. ती 14-15 वर्षांची असताना मला नन बनायचं आहे, असा हट्ट करायची, रडायची. माझे वडील तिला रागवायचे. पण, आमच्या घरी फादर आणि ननला मिळणारा आदर बघून ती खूप प्रभावित झाली होती."

बीजू पुढे सांगतात, "अभयाचा खून झाल्याचं माझ्या आई-वडिलांना आधीपासूनच माहिती होतं. पण, आम्ही खूप गरीब होतो. त्यामुळे कोर्टात जाण्याची आमची आर्थिक कुवत नव्हती. अॅक्शन काउंसिलसारखे लोक पुढे आले आणि त्यांनीच आमचा हा लढा पुढे नेला."

आत्महत्या की हत्या?

तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक वर्गीस पी. थॉमस यांनी बीबीसी हिंदीशी बोलतााना सांगितलं, "हे स्पष्टपणे हत्येचं प्रकरण होतं. तिच्या डोक्यावर वार करण्यात आला होता आणि त्यानंतर ती मेली हे समजून तिला विहिरीत फेकण्यात आलं होतं. हे प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आलं त्यावेळी मी या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो."

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला. पुढच्या वर्षी म्हणजे 1993 मध्ये पोलिसांनी आत्महत्या म्हणत प्रकरण बंद केलं. मात्र, कॉन्व्हेंटच्या प्रमुख मदर सुपिरियर यांनी अभया यांच्यासोबत शिकणाऱ्या इतर 67 नन्ससोबत मिळून केरळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटून प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली. पोलीस आणि क्राईम ब्रांच या प्रकरणाचा नीट तपास करत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

यानंतर केरळ उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयला सुपूर्द केलं.

तपासातील चढ-उतार

1993 साली सीबीआयने प्रकरण हाती घेतलं. तीन वर्ष तपास केल्यानंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे समजू शकलं नसल्याचं सीबीआयने कोर्टात सांगितलं. मात्र, कोर्टाने सीबीआयचा अहवाल फेटाळत नव्याने तपासाचे आदेश दिले. सीबीआयने दुसऱ्यांदा तपास सुरू केला.

माजी पोलीस अधिकारी वर्गीस पी. थॉमस सांगतात, "ही आत्महत्या असल्याचं सांगून प्रकरण बंद करण्याची अधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यांना कुठलंही पेंडिंग प्रकरण नको होतं. मी याला विरोध केला आणि नोकरीचा राजीनामा दिला."

नन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

या प्रकरणावर लक्ष ठेवून असणाऱ्या वकील संध्या राजू (यांचा अभया हत्याकांडाशी संबंध नाही) म्हणतात, "एक प्रकारे हे ऐतिहासिक प्रकरण आहे. कारण कुठल्याही निष्कर्षावर न पोहोचताच प्रकरण बंद करण्याचे बरेच प्रयत्न झाले."

"हायकोर्टाने कठोर भूमिका घेऊन या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करा, असे आदेश दिले तेव्हा या प्रकरणात गांभीर्याने तपास सुरू झाला. अनेकदा पुराव्यांसोबत इतकंच नाही तर नार्को-अॅनालिसीस रेकॉर्डिंगशीही छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला."

या प्रकरणात कमीत कमी तीन वेळा सीबीआयने सांगितलं की "सिस्टर अभयाने आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. मात्र, गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात सीबीआयला यश आलं नाही. उच्च न्यायालयाने तब्बल दोन वेळा सीबीआयचा अहवाल फेटाळला. अखेर तिसऱ्यांदा 2008 साली उच्च न्यायालयाने सीबीआयला रिपोर्ट सादर करायला तीन महिन्यांची मुदत दिली."

परिस्थितीजन्य पुरावे

सीबीआयने कॉन्व्हेंटच्या शेजारी राहणाऱ्या संजू मॅथ्यू नावाच्या व्यक्तीला शोधून काढलं. त्यांनी कलम 164 अंतर्गत साक्ष दिली आणि 26 मार्च 1992 रोजी आपण फायर थॉमस कट्टूर यांना कॉन्व्हेंट परिसरात बघितल्याचं सांगितलं.

या साक्षीनंतर सीबीआयने फायदर थॉमस कोट्टूर, फादर जोस पुट्टुकायल आणि सिस्टर सेफी यांना अटक केली. सीबीआयने अडक्कू राजू नावाच्या एका चोरालाही पकडलं. या चोरानेही त्या पहाटे आपण दोन पादऱ्यांना कॉन्व्हेंट परिसरात बघितल्याचं सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अभयाच्या गुन्हेगारांच्या अटकेसाठी मोहीम चालवणाऱ्या अॅक्शन काउंसिल या संस्थेचे जोमोन पुथेनपरक्कल म्हणतात, "हे आत्महत्येचं प्रकरण नाही, ही बाब आधीपासूनच स्पष्ट होती. किचनकडे बघून त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली, हे स्पष्ट दिसत होतं. किचनमध्ये सिस्टर अभयाच्या दोन चप्पल दोन वेगवेगळ्या ठिकाणी पडल्या होत्या. पहाटे चार वाजता अभ्यासासाठी कुणीच्यातरी उठवण्यामुळे जागी झालेली व्यक्ती अशी अचानक आत्महत्या कशी करणार?"

संध्या राजू सांगतात, "हे राज्याचं सर्वांत दिर्घकाळ चाललेलं गुन्हेगारी प्रकरण आहे, यात शंका नाही."

सेव्ह अव्हर सिस्टर्सचे माजी संयोजक फादर ऑगस्टिन वट्टोली म्हणतात, "ज्यांच्यावर आरोप झाले ते पादरी म्हणून काम करत राहिले. चर्चने त्यांच्याशी असलेले संबंध तोडले नाही. चर्चने किमान त्यांना निलंबित करायला हवं होतं. ते निर्दोष सिद्ध झाले असते तर त्यांना पुन्हा त्यांचा कार्यभार सोपवता आला असता."

जालंधर ड्योसिसचे पादरी फादर बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर एका सिस्टरवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्या घटनेनंतर सेव्ह अव्हर सिस्टर्स नावाची संस्था स्थापन करण्यात आली होती.

हे प्रकरण सध्या कनिष्ठ न्यायालयात आहे आणि प्रकरणाच्या संपूर्ण सुनावणीची रेकॉर्डिंग सुरू आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)