रंगा-बिल्ला : 40 वर्षांपूर्वी देशाला हादरवून सोडणारे हे दोन गुन्हेगार कोण होते?

रंगा-बिल्ला

फोटो स्रोत, TWITTER

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

31 जानेवारी 1982 रोजी तिहार तुरुंगात रंगा आणि बिल्ला या दोन क्रूरकर्म्यांना फासावर चढवण्याची तयारी पूर्ण झाली होती.

पहाटे पाच वाजता उठल्यानंतर दोघांनाही एक-एक कप चहा देण्यात आला. त्यांना शेवटचं विचारण्यात आलं, "तुम्हाला मॅजिस्ट्रेटकडे मृत्यूपत्र लिहायचं आहे का?"

दोघांनीही नकार दिला. दोघांच्या हातात आणि पायात बेड्या घालण्यात आल्या आणि ब्लॅक वॉरंटमध्ये नमूद फाशीच्या वेळेच्या दहा मिनिटांआधी फाशीचा दोरखंड बांधलेल्या प्लॅटफॉर्मकडे जाण्यास सांगण्यात आलं.

'ब्लॅक वॉरंट - अ कन्फेशन ऑफ अ तिहार जेलर' या पुस्तकाचे लेखक सुनील गुप्ता सांगतात, "रंगा जॉली स्वभावाचा होता. तो 5 फूट 10 इंच उंच होता. तो कायम आनंदी असायचा. आपल्याला फाशी होणार आहे, याची त्याला कधीच चिंता वाटली नाही. तेव्हा 'रंगाखुष' नावाचा एक सिनेमा आला होता. तो नेहमी सांगायचा, की या सिनेमातला डायलॉग त्याने म्हटला आहे."

"बिल्ला टॅक्सी चालवायचा. तो जवळपास साडे पाच फूट उंच होता. तो कायम गंभीर असायचा आणि रडत सांगायचा, की रंगा ने मला फसवलं. रंगाच्या मते मात्र बिल्लानं त्याला फसवलं होतं. दोघं कायम भांडायचे."

सुनील गुप्ता पुढे सांगतात, "तुरुंगाच्या नियमानुसार जोपर्यंत राष्ट्रपती फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराची दया याचिका फेटाळत नाहीत, तोपर्यंत त्याला सामान्य गुन्हेगार म्हणूनच वागवलं जातं. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतरच फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला कोठडीत नेऊन बेड्या घालून ठेवतात."

"मी तिहार तुरुंगात गेलो तेव्हा त्यांच्या शिक्षेची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या दोघांना कधी बॅडमिंटन खेळताना किंवा फुटबॉल खेळताना पहायचो."

त्या दोघांनी असा कोणता गुन्हा केला होता, की संपूर्ण देशाला त्यांना फासावर चढलेलं बघायचं होतं.

त्या काळातील सर्वात नृशंस गुन्हा

'ब्लॅक वॉरंट' पुस्तकाच्या सहलेखिका आणि हिंदुस्तान टाईम्सच्या राजकीय संपादक सुनेत्रा चौधरी सांगतात, "आमच्या पिढीतील पत्रकारांसाठी सर्वात मोठं प्रकरण दिल्लीतील 'निर्भया'वर झालेला अत्याचार हे होतं. तसंच आमच्या आधीच्या पिढीच्या पत्रकारांसाठी सर्वात मोठं प्रकरण रंगा-बिल्ला यांचं होतं."

संडे स्टँडर्डचं मुखपृष्ठ

फोटो स्रोत, SUNDAY STANDARD

फोटो कॅप्शन, संडे स्टँडर्डचं मुखपृष्ठ

"1978 साली 16 वर्षांची गीता चोप्रा आणि तिचा 14 वर्षांचा भाऊ संजय चोप्रानं एका कारमधून लिफ्ट घेऊन ऑल इंडिया रेडिओमध्ये पोहोचले. ऑल इंडिया रेडिओवरच्या युवावाणी कार्यक्रमात त्यांचा एक शो होता. दुर्दैवाने या दोन भावंडांना लिफ्ट दिली ती मुंबईहून दिल्लीला आलेल्या गुंडांनी.

ते छोटे-मोठे गुन्हे करायचे. कुणाचं तरी अपहरण करून खंडणी उकळायची,अशी त्यांची योजना होती. या भावंडांच्या आई-वडिलांकडे खूप पैसे असतील, असा विचार करून त्यांनी दोघा मुलांना 'किडनॅप' केलं. मात्र, हे संपूर्ण प्रकरण आधी बलात्कार आणि नंतर खून असं बदललं."

अपहरण आणि बलात्कारानं हादरला देश

दोन किशोरवयीन मुलांचे खून आणि गीता चोप्रावर बलात्कार या घटनेने संपूर्ण देश हादरला.

इंडिया टुडेच्या 30 सप्टेंबर 1978 च्या अंकात दिलीप बॉब यांनी लिहिलं, "गीता आणि संजय चोप्रा यांचे वडील कॅप्टन एम. एम. चोप्रांनी सांगितलं, की त्यांची दोन्ही मुलं धौला कुँआ भागातल्या ऑफिसर्स क्वाटर्समधून शनिवारी संध्याकाळी सहा वाजता निघाली होती. गीता जीझस अँड मेरी कॉलेजमध्ये कॉमर्सच्या द्वितीय वर्षात शिकत होती. त्यांना त्या संध्याकाळी संसद मार्गावरच्या आकाशवाणी स्टुडिओत युवा वाणीच्या 'इन द ग्रुव्ह' कार्यक्रमात भाग घ्यायचा होता."

"5 फूट 10 इंच उंचीचा तिचा भाऊ संजय दहावीत शिकत होता. वातावरण ढगाळ होतं आणि सकाळपासूनच अधून मधून पाऊस पडत होता. शो झाल्यानंतर कॅप्टन आपल्या दोन्ही मुलांना आकाशवाणीच्या गेटवरून पिक करतील, असं ठरलं होतं."

"ते रात्री 9 वाजता गेटवर पोचले तर तिथे दोन्ही मुलं नव्हती. त्यांनी आत जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं, की गीता आणि संजय दोघेही रेकॉर्डिंगला पोहोचलेच नव्हते."

चालत्या गाडीत चाकूने हल्ला

दिल्ली आणि आसपासच्या राज्यातील पोलिसांनी संपूर्ण ताकदीनिशी या मुलांचा शोध सुरू केला.

भगवान दास नावाच्या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितलं, "जवळपास साडे सहा वाजता लोहिया हॉस्पिटलजवळ वेगाने जाणारी एक फियाट माझ्या स्कूटर जवळून गेली. मला एका मुलीची किंचाळी ऐकू आली. मी स्कूटरचा वेग वाढवून कारजवळ गेलो. पुढच्या सीटवर दोन जण बसले होते. मागच्या सीटवर एक मुलगा आणि एक मुलगी होते."

"लाल सिग्नलवर कारचा वेग कमी झाला तेव्हा मी ओरडून काय चाललं आहे, असं विचारलं. मुलाने खिडकीपाशी येत रक्ताने माखलेला आपला टी-शर्ट दाखवला. मुलगी मागून ड्रायव्हरचे केस ओढत होती."

"ड्रायव्हर एका हाताने गाडी चालवत होता आणि दुसऱ्या हाताने मुलीवर वार करत होता. मंदिर मार्ग आणि पार्क स्ट्रीटच्या क्रॉसिंगवर गाडीने वेग धरला. लाल सिग्नल तोडून ती पुढे निघाली. मुलाचा चेहरा परदेशी असल्यासारखा वाटला आणि मस्टर्ड रंगाच्या कारचा क्रमांक होता HRK 8930"

आधी संजयचा खून आणि मग गीतावर बलात्कार

रंगा आणि बिल्ला त्या दोघांना रिज भागात बुद्धा गार्डनकडे घेऊन गेले. त्यांनी तिथे एका सामसूम असलेल्या रस्त्यावर गाडी थांबवली.

त्यांनी आधी संजय चोप्राचा खून केला आणि त्यानंतर गीता चोप्रावर बलात्कार केला.

गीता चोप्रा

फोटो स्रोत, GEETA SANJAY CHOPRA

रंगाने आपल्या कबुलीजबाबात म्हटलं, "मी मुलीला तिकडे घेऊन जात होतो जिथे तिच्या भावाचा मृतदेह पडला होता. मी तिच्या उजव्या बाजूने चालत होतो. बिल्लाने मला इशारा केला आणि मी थोडा पुढे चालू लागलो.

बिल्लाने संपूर्ण ताकदीनिशी मुलीच्या गळ्यावर तलवारीने वार केला. वार केल्यानंतर तिचा लगेच मृत्यू झाला. आम्ही तिचा मृतदेह उचलून झुडुपांमध्ये फेकला.

मोरारजी देसाईंनी घेतली पीडित कुटुंबाला भेट

घटनेची बातमी पसरताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. बोट क्लबवर जीझस अँड मेरी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आंदोलन केलं. तत्कालीन परराष्ट्र मंत्री त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

एक दगड अटलबिहारी वाजपेयींच्या डोक्यालाही लागला आणि रक्त येऊ लागलं. सुनील गुप्ता सांगतात, "मला अजूनही आठवत की तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. एखाद्या पंतप्रधानाने अशा प्रकारच्या गुन्ह्यातील पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन संवेदना प्रकट करणं फार कमी वेळा घडतं."

शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं, की गीता चोप्राच्या शरीरावर पाच वार करण्यात आले होते. संजयच्या शरीरावर वार केल्याच्या एकूण 21 खुणा होत्या. गीताच्या पॅन्टच्या खिशात तिचं आयकार्ड होतं. त्यांच्याजवळ एक पाकिटही सापडलं. त्यात 17 रुपये होते.

कालका मेलमधून दिल्लीला येताना जवानांनी पकडलं

घटनेनंतर रंगा आणि बिल्ला दिल्लीतून आधी मुंबईला पळाले आणि मग तिथून आग्र्याला गेले.

दुर्दैवानं ते आग्र्याहून दिल्लीला येताना ते कालका मेलमधल्या जवानांच्या डब्यात चढले आणि जवानांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

सुनेत्रा चौधरी सांगतात, "या घटनेनंतर ते घाबरले आणि दुसऱ्या शहरांमध्ये पळू लागले. ते एका ट्रेनच्या अशा बोगीत चढले जी लष्कराच्या जवानांसाठी होती. त्यांच्याशी या दोघांचं भांडण झालं आणि जवानांनी त्यांना आयकार्ड मागितलं.

रंगाने बिल्लाला म्हटलं, की यांना 'भरलेलं आयकार्ड' देऊन टाक. तेव्हाच जवानांना संशय आला, की काहीतरी काळंबेरं आहे. जवानांनी दोघांनाही बांधलं आणि दिल्ली स्टेशन आल्यावर पोलिसांच्या ताब्यात दिलं."

फाशीसाठी बोलावले दोन जल्लाद

रंगा आणि बिल्ला यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवली.

राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी दोघांची दयायाचिका फेटाळली. फाशीच्या एक आठवड्याआधी दोघांना जेल नंबर 3 च्या फाशीच्या कोठडीत नेण्यात आलं. तिथे त्यांना पूर्णपणे एकांतवासात ठेवण्यात आलं. तिथे ते 24 तास तामिळनाडू स्पेशल पोलीस जवानांच्या देखरेखीत होते.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

दोघांना फाशी देण्यासाठी फरीदकोटहून फकिरा आणि मेरठहून कालू या दोन जल्लादांना बोलवण्यात आलं होतं.

सुनेत्रा चौधरी सांगतात, "कालू आणि फकिरा दोघंही 'लिजेंडरी' होते. फाशी देण्याआधी दोघांनाही 'ओल्ड मंक' दारू देण्याची प्रथाच पडली होती. कारण कुठलीही व्यक्ती मग तो जल्लादच का असेना पूर्ण शुद्धीत दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेऊ शकत नाही. जेल मॅन्युअलमध्ये फाशी देण्यासाठी जल्लादला केवळ 150 रुपये देण्याचा नियम लिहिला आहे. ही रक्कम खूपच कमी आहे."

फाशीसाठी खास दोर

रंगा आणि बिल्ला यांना फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सर तुरुंगातून दोर मागवण्यात आले होते.

सुनील गुप्ता सांगतात, "हा दोर बाजारातून विकत घेतला जात नाही. बिहारच्या बक्सर तुरुंगात तो बनवतात. हा दोर लवचिक बनवण्यासाठी त्यावर मेण किंवा दह्याचा लेप देतात. काही जल्लाद पिकलेलं केळ कुस्करून दोरावर लावतात. हा दोर 1.8 ते 2.4 मीटरच्या आसपास असतो."

"यातला एक जल्लाद फकिरा खूप काळा होता. तो स्वतःला यमराज भासवण्याचा प्रयत्न करायचा. कालूचं पोट सुटलं होतं. दोघंही मुद्दाम भयानक दिसण्याचा प्रयत्न करायचे."

पत्रकारांशी बिल्लाची भेट

फाशीच्या एक दिवसाआधी दिल्लीतील पाच पत्रकारांनी रंगा आणि बिल्ला यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यातले एक होते तत्कालीन नॅशनल हेरॉल्डमध्ये काम करणारे प्रकाश पात्रा.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

प्रकाश सांगतात, "रंगाने भेटण्यास नकार दिला. मात्र, बिल्ला आमच्याशी जवळपास 20 मिनिटं बोलला. तो आमच्याशी बोलत होता तेव्हा त्याचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. तो शेवटपर्यंत हेच म्हणत होता, की देवाला माहिती आहे मी हा गुन्हा केलेला नाही. मला फसवण्यात आलं आहे. मात्र, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून तो खोटं बोलत असल्याचं स्पष्ट दिसत होतं."

फाशीआधी चेहरा काळं कापड टाकून झाकला

फाशीच्या आदल्या रात्री रंगा आपलं रोजचं जेवण जेवला आणि झोपला. बिल्ला जेवलाही नाही आणि त्याला एक मिनिटही झोप लागली नाही.

संपूर्ण रात्र तो आपल्या कोठडीत बडबडत चकरा मारत होता.

31 जानेवारी 1982च्या सकाळी रंगा आणि बिल्ला यांचे चेहरे काळं कापड टाकून झाकण्यात आले. त्यांच्या गळ्यात फाशीचा दोर अडकण्यात आला.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

सुनील गुप्ता सांगतात, "आम्ही त्यांना पहाटे 5 वाजता उठवलं आणि आंघोळ करायला सांगितलं. रंगाने आंघोळ केली. मात्र, बिल्लाने आंघोळ करायला नकार दिला. समोर काय घडतंय हे दिसू नये म्हणून फाशीच्या आधी दोघांचेही चेहरे काळ्या रंगाच्या कापडाने झाकण्यात आले. फाशीच्या वेळी बिल्ला रडत होता. मात्र, रंगा शेवटपर्यंत जोशात होता. फाशीच्या आधी त्याने जोरात घोषणा दिली, 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल'."

"फाशीच्या काही सेकंदांआधी मी नोट केलं, की दोघांच्या चेहऱ्याचे रंग बदलले होते. भीतीमुळे दोघांचेही चेहरे काळवंडल्यासारखे वाटत होते."

पाय ओढून श्वास कोंडला

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सांगितलेल्या वेळी जेल सुप्रिटेंडंट आर्य भूषण शुक्ल यांनी लाल रुमाल हलवला आणि कालूने फकिराच्या मदतीने लीव्हर ओढला.

पुढे अनेक वर्ष शुक्ल आपल्या मित्रांना तो लाल रुमाल दाखवायचे जो रुमाल हलवून त्यांनी रंगा आणि बिल्ला यांना फाशी देण्याचा आदेश दिला होता.

दोन तासांनंतर डॉक्टरांनी दोघांना तपासलं तेव्हा बिल्लाचा मृत्यू झाला होता. मात्र, रंगाची नाडी अजूनही सुरू होती.

फाशीचे प्रत्यक्षदर्शी सुनील गुप्ता सांगतात, "गुन्हेगाराच्या वजनावर हे अवलंबून असतं. आम्हाला सांगण्यात आलं, की तो उंच होता आणि फाशीच्यावेळी त्याने आपला श्वास रोखला होता. त्यामुळे त्याचा प्राण लगेच गेला नाही. तेव्हा तुरुंगातील एका कर्मचाऱ्याला विहिरीत उतरवण्यात आलं. त्याने रंगाचे पाय ओढले. तेव्हा त्याने प्राण सोडला. हे एक बरं झालं की त्याकाळी फाशीनंतर शवविच्छेदन करण्याचा नियम नव्हता. नाहीतर बाहेर बातमी आली असती की रंगाला 'बाह्य मदतीने' मारण्यात आलं. 32 वर्षांनंतर शत्रुघ्न चौहान यांच्या निर्णयानंतर फाशी दिलेल्या व्यक्तीचं शवविच्छेदन करणं बंधनकारक करण्यात आलं."

"फाशीच्या इतिहासात असंही घडलं आहे, की लीव्हर जोरात ओढल्यामुळे शरीराचेच दोन तुकडे झाले. शीर वर राहिलं आणि खालचं शरीर तुटून विहिरीत पडलं. फाशी दिल्यानंतर बरेचदा व्यक्तीचा चेहरा विद्रूप होतो. कधीकधी त्याची जीभ आणि डोळेही बाहेर येतात. तुरुंगाच्या भाषेत याला 'मान लांब होणं' असंही म्हणतात."

रंगा आणि बिल्ला दोघांपैकी एकाचेही कुटुंबीय त्यांचे मृतदेह घेण्यासाठी पुढे आले नाही. अखेर जेलनेच दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)