अमेरिका-ब्रिटनचे हुती बंडखोरांच्या केंद्रांवर हल्ले

फोटो स्रोत, MINISTRY OF DEFENCE/PA WIRE
अमेरिका आणि युनायटेड किंग्डमच्या सैन्याने येमेनमध्ये हूती बंडखोरांच्या केंद्रांवर हल्ले सुरू केले आहेत.
अमेरिकेने आपला एक महत्त्वाचा सहकारी देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असतानाच हे हल्ले सुरू केले आहेत.
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यांविरोधात मध्य-पूर्वेतले इस्लामिक देश एकी दाखवत होते मात्र हुतींच्या केंद्रावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे या स्थितीत गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
हुतींना इराणचा पाठिंबा आहे असं मानलं जातं आणि सौदी अरेबिया येमेनमध्ये हुतींविरोधात लढतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणतात की इराणच्या पाठिंब्यावर असलेले हुती बंडखोर गेल्या वर्षी 20 नोव्हेंबरपासून तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करत आहेत. त्याला प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली जात आहे. त्यांना नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि बहारिनसह अनेक देशांची मदत मिळत आहे असंही त्यांनी सांगितलं.
तसेच ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रॉयल एअरफोर्सच्या लढाऊ विमानांच्या मदतीने हुतींच्या सैन्यकेंद्रावर नेम धरून हल्ले केले गेले असं जाहीर केलं.
हे एक मर्यादित, आवश्यक आणि आत्मसंरक्षणासाठी उचललं गेलेलं पाऊल आहे असं त्यांनी या हल्ल्यांचं वर्णन केलं आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार येमेनची राजधानी साना, तांबड्या समुद्रावर असेलेले हुदैदा बंदर, धामार आणि वायव्येस असलेल्या हूतींच्या सदा या बालेकिल्ल्यावर हल्ले केले गेले आहेत.
हुती बंडखोरांच्या एका अधिकाऱ्याने युके आणि अमेरिकेला या आक्रमक पावलाची मोठी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.
हुती कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय?
हुती हा येमेनच्या अल्पसंख्याक शिया 'झैदी' समुदायाचा एक शस्त्रधारी समूह आहे.
त्यांचं नाव त्यांच्या मोहिमेचे संस्थापक हुसैन अल हुती यांच्या नावावरून पडलं. ते स्वतःला 'अन्सार अल्लाह' म्हणजे ईश्वराचे सोबती असंही म्हणतात.
या समुदायानं 1990 च्या दशकात येमेनचे तत्कालीन राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या तथाकथित भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी या गटाची स्थापना केली होती.
2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात इराकवर झालेल्या हल्ल्यात हुती बंडखोरांनी घोषणा दिली होती. "ईश्वर महान आहे. अमेरिका नष्ट व्हावी, इस्रायल नष्ट व्हावे. ज्यूंचा विनाश व्हावा, इस्लामचा विजय असो," अशी ती घोषणा होती.

फोटो स्रोत, Getty Images
हुती स्वतःला हमास आणि हिजबुल्लाहच्या साथीनं इस्रायल, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या विरोधात इराणच्या नेतृत्वातील विरोधी अक्ष गटाचा भाग मानतात.
युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे तज्ज्ञ हिशाम अल-ओमेसी म्हणाले की, हुती आखातातून इस्रायलकडे जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य का करत आहे, याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो.
"आपण आता वसाहतवाद्यांशी आणि इस्लामिक राज्याच्या शत्रूंशी लढत आहोत, हा विचार त्यांच्या विचारधारेशी मेळ खाणाराही आहे," असं ते म्हणाले.
हुतींनी येमेनच्या मोठ्या भागावर ताबा कसा मिळवला?
येमेनमध्ये 2014 च्या सुरुवातीला हूती हे राष्ट्रपती पदावरील अली अब्दुल्लाह सालेह यांचे उत्तराधिकारी बनलेले अब्दरब्बुह मन्सूर हादी यांच्या विरोधात उभे राहिले. पुढे ते राजकीयदृष्ट्या बलशाली बनले.
त्यांनी त्यांचे आधीचे शत्रू असलेले सालेह यांच्याबरोबर एक करार केला आणि त्यांना पुन्हा सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला.
येमेनच्या उत्तरेत हुतींना सादा प्रांतावर ताबा मिळवण्यात यश आलं. नंतर 2015 च्या सुरुवातीला त्यांनी राजधानी सनावर ताबा मिळवला. त्यातच राष्ट्रपती हादी येमेन सोडून विदेशात पळून गेले.
येमेनचा शेजारी देश सौदी अरबनं लष्करी हस्तक्षेप केला आणि हूती बंडखोरांना हटवून पुन्हा हादी यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना युएई आणि बहरीनचीही साथ मिळाली.
हुती बंडखोरांनी या हल्ल्यांचा सामना केला आणि येमेनच्या मोठ्या भागावर ताबा कायम ठेवला.
त्यांनी 2017 मध्ये अली अब्दुल्लाह सालेहची हत्या केली. त्यावेळी सालेहनं सौदीला साथ देण्याचा प्रयत्न केला होता.
या बंडखोरांना मदत कोण करतं?
हुती बंडखोर लेबनानच्या सशस्त्र शिया समूह हिजबुल्लाहच्या मॉडेलकडून प्रेरणा घेतात.
अमेरिकेतील रिसर्च इन्स्टिट्यूट 'कॉम्बॅटिंग टेररिझम सेंटर' नुसार हिजबुल्लाहद्वारेच त्यांना 2014 पासून मोठ्या प्रमाणावर लष्करी मदत आणि प्रशिक्षण दिलं जात आहे.
हुती हे इराण त्यांचे सहकारी असल्याचा दावाही करतात, कारण दोघांचा शत्रू एकच म्हणजे सौदी अरेबिया आहे.
इराण हुती बंडखोरांना शस्त्र देत असल्याची शंकाही व्यक्त केली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या मते, इराणनं हुती बंडखोरांना बॅलेस्टिक मिसाइल पुरवली होती. त्याचा वापर 2017 मध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियादवर हल्ल्यासाठी करण्यात आला होता. ती क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आली होती.
सौदी अरेबियानं इराणवर हूती बंडखोरांना क्रूझ मिसाईल आणि ड्रोन दिल्याचा आरोपही केला आहे. 2019 मध्ये सौदी अरेबियाच्या तेल कारखान्यांवर हल्ल्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला होता.
हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर कमी पल्ल्याची हजारो क्षेपणास्त्रही डागली आहेत. तसंच त्यांनी यूएईलाही लक्ष्य केलं आहे.
अशा प्रकारच्या शस्त्रांचा पुरवठा करण्याचा अर्थ म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी लावलेल्या शस्त्रांवरील निर्बंधांचं उल्लंघन करणं. पण इराणनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
येमेनच्या किती भागावर हूतींचा ताबा?
एप्रिल 2022 मध्ये अब्दरब्बुह मन्सूर हादी यांनी प्रेसिडेन्शियल लीडरशिप काऊन्सिलला त्यांचे सर्व अधिकार बहाल केले होते. हे काऊन्सिल सौदी अरेबियाची राजधानी रियादमधून काम करते. त्यालाच येमेनचं अधिकृत सरकार समजलं जातं.
पण येमेनची बहुतांश लोकसंख्या हूती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांची संघटना देशाच्या उत्तर भागातून कर वसुली करते आणि त्यांचं चलनही छापते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं हूती आंदोलनाचे अभ्यासक अहमद अल-बाहरी यांच्या हवाल्यानं म्हटलं होतं की, 2010 पर्यंत हूती बंडखोरांसोबत 1,00,000 ते 1,20,000 एवढे समर्थक होते. त्यात शस्त्रधारी सदस्य आणि बिगर शस्त्रधारी समर्थकांचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार हूती बंडखोरांनी लहान मुलांचीही भरती केली होती. त्यांच्यापैकी 1500 जणांचा 2020 मध्ये झालेल्या युद्धात मृत्यू झाला आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणखी शेकडो मुलं मारली गेली होती, असंही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.
हुतींचा तांबड्या समुद्र किनारच्या मोठ्या भागावर ताबा आहे. तिथूनच ते जहाजांवर हल्ले करत आहेत.
युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे एक तज्ज्ञ हिशाम अल-ओमेसी म्हणाले की, या हल्ल्यांमुळं त्यांना सौदी अरेबियासोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेत त्यांची बाजू मजबूत करण्यासाठी मदत मिळाली आहे.
"ते बाब अल-मंदब म्हणजे लाल समुद्रातील अरुंद सागरी मार्ग बंद करू शकतात हे दाखवून त्यांनी सौदी अरेबियावर सवलती देण्यासाठी दबाव वाढवला आहे," असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








