'नवऱ्याच्या मृत्यूनंतर 4 मुलांची काळजी कोण घेणार?', गाझाच्या छावणीत विधवा आणि लहान मुलांचे हाल

- Author, फर्जल किआन
- Role, बीबीसी न्यूज जेरुसलेम
तंबूत राहाणारी झुहारा कधीकधी समुद्राकडे पाहात बसते. त्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने तो एकदम निळाशार दिसत होता. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा तो सोनेरी दिसतो आणि संपूर्ण आसमंत तांबूस दिसायला लागतो.
हा समुद्र तेल अविवच्या उत्तरेला आहे. याच समुद्रातून इस्रायलच्या गनबोटमधून एक गोळी आली आणि त्या गोळीने तिच्या नवऱ्याचा बळी घेतला.
“तो समुद्राकडे जात होता. तिथे कार आणि मदत पुरवणाऱ्या गाड्या होत्या. तिथे गर्दी होती. तेव्हा मिलिट्री बोट्सने लोकांवर गोळीबार सुरू केला. माझ्या नवऱ्याच्या डोक्याला गोळी लागली.” त्या सांगत होत्या.
हे सगळं 9 फेब्रुवारीला झालं. झुहारा आता एका छावणीत राहते. तिला नवऱ्याच्या मृत्यूची बातमी लगेच कळली नाही. 26 वर्षीय झुहारा यांनी नुकताच चौथ्या बाळाला जन्म दिला आहे.
सुरुवातीला एका तरुण मुलगा घटनास्थळी होता. त्याला सत्य परिस्थिती माहिती होती. मात्र त्याला झुहारापासून ही बातमी लपवून ठेवायची होती. तिचा नवरा महमूदचा तेव्हाच मृत्यू झाला होता.
पण तिला कळलं की काहीतरी गडबड आहे. तिचा दीर रडत आला आणि त्याने जोरजोरात ओरडून सांगितलं की महमूद मेला होता. काय घडलं आहे ते पहायला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. तिचं सगळं विश्वच उद्धवस्त झालं होतं.
झुहारा मान खाली घालून रडू लागली. आपल्या आईची तशी अवस्था पाहून तीन वर्षांच्या लानाने तिच्या आईला हलकंच थोपटलं. त्यानंतर आईच्या मांडीत झोपलेल्या लहान भावाला थोपटलं.
झुहारा पुन्हा बोलायला लागली. “त्याचं पूर्ण शरीराला वेगवेगळी यंत्रं लावली होती. त्याला भयंकर थंडी वाजत होती. मी त्याच्याशी बोलू शकले नाही. मी प्रयत्न केला पण त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही.”
या युद्धामुळे हे कुटुंबच उद्धवस्त झालं आहे. ते युद्धाच्या आधी गाझाला रहायचे. त्यानंतर ते अल-नसेरियत या स्थलांतरितांच्या छावणीत गेले. गाझा पट्टीच्या अगदी मध्यभागी ती छावणी आहे.
तिथूनही त्यांना हाकलण्यात आलं. त्यानंतर ते दक्षिणेला राफा येथे गेले. कारण इस्रायलच्या सैन्याने त्यांना सांगितलं होतं की ती सुरक्षित जागा आहे.

झुहारा इतर विधवा स्त्रियांबरोबर अल-मवासी रेफ्युजी कँप मध्ये राहाते. ज्या स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना कोणताच आधार नाही अशांसाठी ही छावणी आहे. तिची शेजारीण असलेल्या अमिनाचा नवरा आणि तीन मुलं इस्रायलच्या हल्ल्यात मरण पावली. खान युनिसजवळ त्यांचं घर होतं.
अमिना आणि तिचा मुलगा इब्राहिम यांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आलं. त्यांच्याघरचे इतर सदस्य या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावले. तिचा मुलगा इब्राहिम अपंग आहे.
अमानी जसेर अल खावर या 32 वर्षीय महिलेचा नवराही या हल्ल्यात मारला गेला. तो पोलीस होता आणि तिची पाच मुलं ऑक्टोबरमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात मारले गेले. ती आता एका पत्र्याच्या छावणीत राहते.
वाऱ्यामुळे तो पत्रा सतत हलतो. तसंच झुहारा आणि तिच्या मुलांना आसरा देणारी प्लॅस्टिकची शीट आणि कापडही असंच हलत राहातं
तिचा संघर्ष सगळे लोक पाहतात. तिचा निवारा जरी गलिच्छ असला तरी फरशी स्वच्छ असते आणि कुटुंबाचे कपडे समोर वाळत घातलेले दिसतात.
झुहारा तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवते. तो अतिशय रुबाबदार होता आणि कुटुंबाचं रक्षण करायचा.
“त्याच्याशिवाय काय करू? हे मला माहिती नाही. तो माझा आणि माझ्या मुलांचा सांभाळ करायचा. त्याने मला कधीच कशाचीही उणिव भासू दिली नाही. आता आमची कोणालाच काळजी नाही.” झुहारा म्हणाली.
विधवांना आयुष्यात अनेकदा अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो. झुहाराला तिच्या बाळासाठी आणि अपंग मुलगा मुस्तफासाठी डायपर्स हवे आहेत. त्याच्या अस्वस्थतेबद्दल ती सतत बोलत असते.
“त्याला काहीतरी हवं असतं आणि मी त्याला ते देऊ शकत नाही. तो सतत रडतो आणि स्वत:चं डोकं आपटून घेतो. पण मी ते घेऊन देऊ शकत नाही.”
“मुस्तफाच्या अनेक गरजा आहेत. त्या मी पुरवू शकत नाही. तो चड्डीत लघवी करतो आणि ज्या गोष्टी मी देऊ शकत नाही त्या मागत असतो. तो सतत ज्युस, सफरचंद, फळं मागत असतो. ते मी त्याला देऊ शकत नाही.”
काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाला जवळपास एका ठिकाणी चिकन मिळालं. झुहाराच्या मुलांनी ते पाहिलं. त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं.
तीन वर्षांची लाना रडायला लागली. पण काहीही करता येऊ शकत नव्हतं. काही लोक नशीबवान होते. त्यांच्याकडे काही पैसे होते आणि त्यांची मुलं खाऊ शकत होती.
अल मवासीमधील विधवा आता एका नव्या आसऱ्याची वाट पाहत आहेत. त्यांना खायला हवं आहे, वाऱ्याने उडणारं छत नकोय, त्याचप्रमाणे हा सगळा संघर्ष थांबायला हवाय जेणेकडून कुणाचेच आप्तस्वकीय हिरावले जाणार नाही.
(हनीन अब्दीन आणि अलिस डोयार्ड यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)











