इब्राहिम भोलू: पाकिस्तानमधला ‘अंगठाछाप’ डॉन, जो एका देशाचा राष्ट्राध्यक्ष ठरवू शकत होता...

फोटो स्रोत, ZAFAR RIZVI
- Author, जफर रिझवी
- Role, पत्रकार, लंडन
"बंदुकीची नळी माझ्या चेहऱ्यापासून वीतभर अंतरावर होती. माझ्यासमोर संतापलेले, निर्दयी आणि खुनी डोळे होते. भीतीनं माझा थरकाप उडाला होता. इतका की माझं हृदय छातीतून बाहेर पडतंय की काय असं वाटत होतं. माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता की हा मला गोळी तर मारणार नाही ना."
हाजी इब्राहिम भोलूशी झालेली ही माझी पहिली आणि शेवटची भेट होती.
तुम्हाला इब्राहिम भोलूला भेटायचं आहे का?
मात्र नक्की कोणाला, कराचीतील गरीब वस्तीत जन्मलेल्या भोलूला की दुबई पासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत कोट्यवधी डॉलरचा बेकायदेशीर धंदा चालवणाऱ्या हाजी इब्राहिम भोलूला?
सूचना: ही कथा तुमचं मन विचलित करू शकते.
कराचीतील पटनी भागात कच्चा-पक्क्या गल्ल्यांमध्ये वाढलेला भोलू, बॅंकॉकमधील आलिशान फ्लॅट, दुबईतील सर्वात महागडे हॉटेल आणि मोझांबिकची राजधानी असलेल्या मापूतोमधील आलिशान जुगारखान्यांपर्यतची मजल मारणारा हाजी इब्राहिम भोलू कसा बनला? अंडरवर्ल्डच्या कमाईतून राष्ट्रपती निवडणुकीत पैसा कसा पुरवू लागला?
ही धक्कादायक कथा आश्चर्याने थक्क करायला लावणारी आहे.
या कथेत तुमची भेट अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमशीदेखील होणार आहे. त्याचबरोबर दुबईपर्यंत पसरलेल्या सट्टा, हफ्ता, अंमली पदार्थ, हुंडी, हवाला, खून आणि दरोड्यांचे गुन्हेगारी विश्व चालवणाऱ्या कराचीतील अंडरवर्ल्ड मधील इतर अनेक पात्रांशीदेखील तुमची भेट होईल.
मात्र भोलू बद्दल जाणून घेण्याआधी कराचीतील बल्दिया टाऊनमध्ये जाऊया.
कराचीतील सर्वांत मागास, गरीब भागात याची गणना होते. या भागात उर्दू बोलणाऱ्यांबरोबरच बलोच, पश्तून (पख्तून), सिंधी, कच्छी, मेमन, पंजाबी, काश्मिरी सरायकी, हिंदको आणि हजारा अशा कराचीत असणाऱ्या सर्व समुदायांमधील लोक राहतात.
प्रशासकीयदृष्ट्या कराचीच्या पश्चिम जिल्ह्यातील असणारी ही घनदाट लोकवस्ती. 1990 च्या दशकापर्यत याची ओळख अल्पउत्पन्न असणाऱ्या मजूर वर्गाचे वसतीस्थान अशी होती. हा भाग आता केमाडी जिल्ह्याचा भाग आहे. याच परिसरतात पटनी मोहल्ला म्हणून एक छोटासा भाग होता. तिथल्याच एका अरुंद गल्लीत भोलूचं बालपण गेलं.

फोटो स्रोत, ZAFAR RIZVI
कित्येक वर्षांच्या माझ्या अभ्यासानुसार व्यवसायानं खाटीक (कसाई) असणाऱ्या कुटुंबात भोलूचा जन्म झाला होता. तो अजिबात शिकलेला नव्हता.
मात्र आश्चर्याची बाब अशी की या अंगठाछाप भोलूचा उदय कराचीतील विद्यार्थी राजकारणात झाला आणि तो विद्यार्थी नेता म्हणून नावलौकिकाला आला.
भारताप्रमाणंच पाकिस्तानातदेखील राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना असतात आणि त्या स्थानिक पातळीवरचं राजकारण करतात.
पाकिस्तानातील पीपल्स पार्टीची विद्यार्थी संघटना असलेल्या पीपल्स स्टुटंड्स फेडरेशन (पीएसएफ)चे कराचीतील माजी उपाध्यक्ष आणि माझे व भोलूचे खूप जुने मित्र शाहनवाज शानी यांनी मला भोलूबद्दलची ही माहिती दिली.
शाहनवाज शानी यांनी सांगितंल की, ''हा भोलू अगदी अंगठेबहाद्दर होता. मात्र खूपच धूर्त होता. कॉलेज सोडाच त्याने कधी शालेय शिक्षणदेखील घेतलं नाही. मात्र खूप चलाख होता. खूपच हुशार आणि प्रतिभावान होता.''
शाहनवाज शानी यानी दिलेल्या माहितीनुसार भोलू अल्ताफ हुसैन हा फारुख पटनी या एमक्यूएमच्या सशस्त्र शाखेशी संबंधित असणाऱ्या नेत्याचा जवळचा नातेवाईक होता.
शाहनवाज यांनी हेदेखील सांगितलं की, ''तुम्हाला आठवत असेल की बकरी ईदच्या काळात खाटीक समुदायाचे तरुण देखील पशूंना मारून पैसा कमवत असत. भोलूदेखील असं काम करायचा. मात्र नंतर तो लोकांच्या हत्या करून पैसे कमवू लागला..''
भोलू विद्यार्थी नेता कसा बनला?
भोलूचे अनेक मित्र, सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारी, लष्करी आणि बिगर लष्करी गुप्तहेर खात्याच्या सध्या कार्यरत आणि माजी अधिकारी यांनी केलेल्या मदतीमुळेच मला ही माहिती तुमच्यापर्यत पोचवता आली आहे.
जुनैद मसूद हे त्यातीलच एक आहेत. 1987 मध्ये नाजिमाबाद येथील गव्हर्नमेंट कॉलेज फॉर बॉईजमध्ये ते पीएसएफचे अध्यक्ष होते आणि सध्या परदेशात वास्तव्यास आहेत.
त्यांनी मला सांगितलं की, भोलूकडे सुरूवातीच्या काळात पीएसएफच्या कोणत्याही नेत्यानं लक्ष दिलं नाही. त्या काळात एका नेत्यानं शाहनवाज शानी यांची भोलूशी गाठ घालून देताना सांगितलं होतं की या तरुणाला राजकीय समज आहे आणि तो मजबूत शरीरयष्टीचा आहे.

शाहनवाज शानी यांनी सांगितलं की भोलूला सुरूवातीपासूनच भारतीय चित्रपटातील डॉनसारखं व्हायचं होतं.
17 ऑगस्ट 1988 ला पाकिस्तानचे लष्करी राष्ट्राध्यक्ष जनरल झिया उल हक एका विमान अपघातात मारले गेले आणि जनरल झिया यांच्या मार्शल लॉ नंतर पाकिस्तानात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यावेळेस भोलूच्या कहाणीची सुरूवात झाली. त्या निवडणुकीनंतर 2 डिसेंबर 1988ला बेनझीर भुट्टो यांच्या नेतृत्वात पीपल्स पार्टीचे पहिलं सरकार सत्तेत आलं.
अर्थात, तोपर्यंतदेखील जनरल झिया उल हक यांच्या मार्शल लॉ चा परिणाम समाजात पूर्णपणे दिसून येत होता.
हत्यारबंद गट आणि संघटनांना सरकारकडून मिळणाऱ्या संरक्षणामुळे विद्यार्थी राजकारणात सुद्धा हिंसा वरचढ झाली होती.
छोट्याशा गोष्टीमुळे आणि किरकोळ वादांसाठी हत्यारांचा वापर केला जायचा. गोळीबार व्हायचा आणि खून, हिंसेपर्यत गोष्ट पोचायची. शस्त्रांच्या जोरावर चालणाऱ्या विद्यार्थी राजकारणात सतत दोन गटात हिंसाचार व्हायचा.
या मारामाऱ्यांमध्ये किंवा हिंसाचारात विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते किंवा नेते यांचा जीवदेखील जायचा.
याच काळात अल्ताफ हुसैन यांच्या एमक्यूएमची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. शहरात राष्ट्रीय व राज्य असेंब्लीच्या जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये यश मिळाल्याने कराची शहराचा एकमेव प्रतिनिधी असल्याचा दावादेखील हा पक्ष करत होता.
त्याचवेळी दहशत आणि ताकदीच्या जोरावर कराचीचे राजकारणात बदल होत होता.
उर्दू आर्ट्स कॉलेज गेल्यानंतंर शाहनवाज शानी यांच्या बरोबर भोलू देखील पीएसएफच्या सशस्त्र शाखेशी जोडला गेला.
त्या काळातील विद्यार्थी नेते आणि शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवणारा सर्व वर्ग, यांना या गोष्टीची जाणीव होती की अनेकवेळा तुरुंगात गेलेल्या शाहनवाज शानी यांना पीएसएफच्या सशस्त्र शाखेत महत्त्वाचे स्थान होतं.

भोलूच्या युवावस्थेतील या काळात प्रतिभेची नव्हे तर ताकदीची चलती होती. गोळ्या, बंदूक आणि ताकदीपुढे बॅनर, पोस्टर, पॅम्पलेट, घोषणा पत्र आणि मूल्यांचे राजकारण गुदमरत होतं.
विद्यार्थी नेत्यांच्या भाषणांनी नाही तर त्या काळात हत्यारांच्या आवाजांमुळे वातावरण तापत असे. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षात अशा प्रकारचं नेतृत्व होतं जे आक्रमक किंवा भडक माथ्याचे होते.
हळूहळू आणि नकळत जवळपास प्रत्येक राजकीय पक्षात हत्यारबंद गट किंवा सशस्त्र गट वर्चस्व मिळवत होते.

फोटो स्रोत, Getty Images
दादागिरीच्या या राजकारणाचा परिणाम सत्ताधारी पीपल्स पार्टी आणि एमक्यूएमवर देखील झाला. मात्र त्याहून अधिक प्रभाव या दोन्ही पक्षांच्या विद्यार्थी संघटनांवर पडला.
संपूर्ण शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये पाकिस्तान मुहाजिर स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (एपीएमएसओ) या एमक्यूएमच्या विद्यार्थी संघटनेच्या आणि पीएसएफच्या समर्थकांमध्ये नेहमीच छोट्याशा तणावातून सुरू होणारा वाद थोड्याच वेळा सशस्त्र संघर्षाचं स्वरुप घेत असे.
हा काळ गुणवत्तेचा नाही तर दादागिरीचा, ताकदीच्या प्रभावाचा होता. ताकद आणि प्रतिभा जितकी जास्त असेल तितकीच ती अधिक हवी असते. जुनैद मसूद यांच्या मते भोलू बाहुबली तर शाहनवाज शानी यांच्या मते प्रतिभावान आणि हुशार होता.
बाहुबली भोलूने डॉन बनण्यासाठी राजकारणाचा मार्ग निवडला.
जुनैद मसूद यांनी मला सांगितलं की, ''त्या काळात सतत तणाव आणि अघोषीत युद्धासारखी परिस्थिती असायची. दादागिरी आणि ताकदीचा वापर करून केल्या जाणाऱ्या राजकारणामुळं पीपल्स पार्टीसह शहरातील जवळपास सर्व राजकीय संघटनांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. अशावेळी भोलू सारख्या कार्यकर्त्यांवरच लक्ष दिलं जाऊ शकत होतं किंवा त्याचं महत्त्व वाढत होतं. त्याचा परिणाम असा झाली की कधी कधी चहा इत्यादी गोष्टी आणून देणारा भोलू नेहमीच शाहनवाज शानी यांच्यासोबत दिसू लागला.''
हळूहळू शाहनवाज शानी यांच्या मदतीने भोलू पीएसएफच्या शहरातील सर्वोच्च नेतृत्वाच्या म्हणजे पीएसएफचे कराचीतील अध्यक्ष असणाऱ्या नजीब अहमदसारख्या लोकांच्या इतक्या जवळचा झाला की त्याला विशेष महत्त्व देण्यात येऊ लागलं.
शाहनवाज शानी सांगतात की, ''खरंतर नजीब अहमद यांनी मला सांगितलं की मला सुरक्षेसाठी काही माणसं द्या. मग मी अय्यूब अतीक, रऊफ नागौरी आणि भोलू यांना सांगितलं की तुम्ही सर्वजण नजीब यांच्यासोबत राहत जा. अय्यूब, रऊफ नंतर उर्दू आर्ट्स कॉलेजात परत गेले कारण त्यांचे सर्व मित्र तिथंच होते. मात्र भोलू नजीब यांच्या खूपच जवळचा झाला.''
पीएसएफच्या नेत्यांना खासकरून नजीब अहमद यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे भोलूची ओळखदेखील विद्यार्थी नेता अशी झाली.

फोटो स्रोत, ZAFAR RIZVI
1990 पर्यत हाजी इब्राहिम भोलू कराचीतील पीपल्स पार्टीच्या पीएसएफ या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता.
स्वभावाने रागीट आणि आक्रमक असणाऱ्या भोलू बद्दल पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तो पीएसएफच्या सशस्त्र शाखेचा सदस्य होता. नंतर तो मुर्तजा भुट्टो यांच्या 'अल झुल्फिकार' या संघटनेशी जोडला गेला होता. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील अंमली पदार्थ, हुंडी, हवाला स्मगलिंग आणि इतर गुन्ह्यांद्वारे भोलूचं गुन्हेगारी विश्व विस्तारत गेलं.
भोलूशी माझी पहिली आणि शेवटची भेट
त्याच काळात भोलूशी माझी पहिली आणि शेवटची भेट झाली. तो दिवस आणि तारीख मला नक्की आठवत नाही मात्र तो बहुदा 1989चा डिसेंबर महिना असावा, कारण ते थंडीचे दिवस होते.
त्यावेळेस मी कराचीतील नॅशनल स्टुडंट्स फेडरेशनचा (एनएसएफ) सेक्रेटरी जनरल आणि शहराच्या मधोमध असणाऱ्या नॉर्थ नाजिममाबादच्या एच ब्लॉकमधील प्रीमियर कॉलेजचा विद्यार्थी होतो.
त्या दिवशी एनएसएफ आणि पीएसएफ या दोन्ही संघटनांमधील आक्रमक सदस्यांमध्ये वाद सुरू झाला होता. एनएसएफने जहागिरदारी, सरंजामशाही व्यवस्थेविरोधात पोस्टर लावले होते. हे पोस्टर फाडल्यामुळं तणाव निर्माण झाला होता. त्यावेळस परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती की वातावरण शांत करण्यासाठी मला हस्तक्षेप करावा लागला.
मी सांगितल्यामुळं चर्चेतून मार्ग काढण्याचं ठरलं आणि त्या चर्चेसाठी ठिकाण ठरलं कॉलेजचं मैदान. तणाव कमी करायचा आहे असा विचार करून कार्यकर्त्यांना सोबत नेण्याऐवजी एकटं जाणंच मला योग्य वाटलं.
दुसऱ्या बाजूने कलीम आफंदी आले. (इथं नाव बदललं आहे, कारण पीएसएफमधील माझा हा मित्र आता एक मोठ्या वित्तीय समूहात ग्रुप डायरेक्टरच्या पदावर आहे आणि त्याचं नाव घेतल्यामुळं त्याच्या व्यावसायिक प्रतिमेवर विपरित परिणाम होऊ शकतो.)
प्रीमियर कॉलेजचा विद्यार्थी असलेला कलीम आफंदी माझा मित्र होता, मात्र चर्चेसाठी कलीमसोबत आणखी एक तरुण देखील आला. कलीम सोबत आलेला तरुण माझ्यासाठी अगदी नवखा होता आणि तो तरुण होता भोलू...

कडक चेहरा, खोल मात्र अत्यंत आक्रमक डोळे, थोडीशी विस्कटलेली दाढी, साधारण उंची आणि सलवार-कमीज (पठाणी)वर घातलेले जॅकेट ज्याला त्या काळात 'क्लाशनिकोट' म्हणायचे आणि त्यावर सिंधमधील परंपरागत चादर ज्याला 'अजरक' म्हणतात, ती घेतलेला भोलू.
त्यावेळेपर्यंत मी भोलूचं नावदेखील कधी ऐकलं नव्हतं. मी दोन्ही दोघांशी हस्तांदोलन करू पाहिलं. कलीमने तर नाराजीने का होईना पण हस्तांदोलन केलं. मात्र, भोलूने मी पुढे केलेल्या हाताकडे दुर्लक्षच केलं.
मी अत्यंत मैत्रीपूर्णरित्या कलीमला म्हटलं, "मित्रा, विनाकारणच तणाव निर्माण झाला आहे? आपण हा तणाव दूर करू शकतो का?"
उत्तर देण्याआधी काही क्षणभर गप्प असलेल्या कलीममुळे मला अंदाज आला होता की हे प्रकरण सहजासहजी संपणारं नाही.
मी त्याला पुन्हा म्हटलं, "कलीम तुम्ही लोकं का आक्रमक झाला आहात?"
बस...मी असं म्हणताच भोलूने अचानक मध्ये भाग घेतला.
मी भोलूचा तो चेहरा कधीच विसरलो नाही. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला संताप मला आजदेखील नीट आठवतो.
भोलूचे ओठ फुलले, डोळे बारीक झाले आणि तो ओरडून मला म्हणाला, ''बॅज काढ...''
माझ्या कमीजवर असलेला एनएसएफचा बॅज मी काढावा या भोलूच्या मागणीनंतर माझं लक्ष भोलूच्या छातीकडे गेलं. तिथे पीएसएफचा बॅज लावला होता.
भोलूच्या आक्रमकतेकडे दुर्लक्ष करत मी भोलूला म्हटलं, ''बॅज तर तूसुद्धा लावला आहेत. बॅज लावूनसुद्धा आपण चर्चा करू शकतो.''
त्यानंतर मिळालेली प्रतिक्रिया अतिशय अनपेक्षित होती.

फोटो स्रोत, ZAFAR RIZVI
भोलूने अचानक आपल्या अंगावर अजरक (चादर) काढून फेकली. अजरक दूर करताच त्याच्या छातीवर बांधलेली कलाशनिकॉव्ह रायफल (एके 47) दिसू लागली.
अत्यंत चपळाई आणि कौशल्याने रायफल लोड करत भोलूने ती माझ्या दिशेने रोखली. मी अत्यंत अस्वस्थपणे आणि तणावात फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो.
स्वत:चा जीव वाचवू की पक्षाचं राजकारण, प्रतिष्ठा आणि प्रतिमा? जर मी भोलूच्या म्हणण्यानुसार पक्षाचा बॅज काढला असता तर त्यामुळे एनएसएफ कमकुवत दिसला असता. दूरून आमच्याकडं पाहत असलेल्या साथीदारांचा धीर आणि आत्मविश्वास त्यामुळं खचला असता. कॉलेजमधील एनएसएफची लोकप्रियता आणि राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह लागलं असतं.
हाच सर्व विचार करत माझी नजर इच्छा नसतानादेखील भोलूच्या बोटांकडं होती. भोलूची बोटं एके 47 च्या ट्रिगरवर होती. भोलू आपल्यावर गोळ्या तर झाडणार नाही ना? असा विचार माझ्या मनात येत होता.
विचार करण्यासाठी मी काही क्षणांचा वेळ घेतला आणि त्यामुळं भोलू अधिकच बिथरला.
''बॅज काढ,'' दुसऱ्यांदा आदेश देत भोलूनं मला शिवीगाळ केली.
त्यावेळेस शेवटची गोष्ट जी मी पाहिली ती म्हणजे रायफलवर सरसावलेले भोलूचे हात.
बॅज न काढल्यामुळं संतापलेल्या भोलूनं रायफलचा दस्ता मला मारला आणि मग आजूबाजूला असलेले त्याचे साथीदार माझ्यावर तुटून पडले. त्यांच्या हाती जे आलं त्याचा वापर करून त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला.
मी जेव्हा शुद्धीवर आलो ते माझ्या डोळ्यासमोर एक कात्री होती. ती माझ्या हाताजवळ होती. आत्मसंरक्षणासाठी मी ती कात्री उचलली आणि मग जो पहिला हात दिसला त्याच्यावर ती रोखली.
मात्र मला पूर्ण भान आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती कात्री प्रत्यक्षात एका डॉक्टरची होती. तो डॉक्टर नॉर्थ नाजिमाबाद मधील झियाउद्दीन हॉस्पिटलमध्ये माझ्या जखमांवर उपचार करत होता.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की भोलू आणि माझी पहिली आणि शेवटची भेट आटोपली आहे.
भोलूसारखे गुन्हेगार कोंडीत सापडू लागले
ज्या काळात भोलूशी माझी ही भेट झाली होती त्याच काळात सत्तारुढ पीपल्स पार्टीचं राजकारण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं उतरणीला लागलं होतं. त्यावेळेस पाकिस्तानच्या राजकीय क्षितिजावर एक वेगळीच मांडणी तयार होत होती.
तोपर्यत बेनझीर भुट्टो सरकारचा मित्रपक्ष असलेल्या एमक्यूएमने अचानक पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचार आणि आश्वासनं न पाळण्याचा आरोप करण्यास सुरूवात केली होती. सतत टीका करून शेवटी पीपल्स पार्टीच्या आघाडी सरकारमधून एमक्यूएम बाहेर पडली.
आता पीपल्स पार्टी आणि एमक्यूएम मध्ये राजकीय रस्साखेची सुरू झाली आणि शहरांमधील गल्ल्या, बाजार आणि शैक्षणिक संस्था या त्याच्या युद्धभूमी बनल्या.
दोन्ही राजकीय पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचार, खून, मारामारी आणि दहशतवादाचे आरोप करत असत आणि येताजाता त्यांच्यात शैक्षणिक संस्थांमध्ये सशस्त्र संघर्ष, हिंसाचार व्हायचा.
अशातच 8 जून 1989 ला कराची विद्यापीठात अजीजुल्लाह उजन सह पीएसएफचे तीन पदाधिकारी एका सशस्त्र संघर्षात मारले गेले. पीएसएफने त्यांच्या मृत्यूसाठी एमक्यूएमला जबाबदार धरलं.
तणाव इतका वाढला की पीएसएफचे कराचीतील अध्यक्ष नजीब अहमद यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली संघटना बंद करण्याची आणि राजकीय कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. काही महिन्यातच दोन्ही संघटनांमधील अनेक कार्यकर्ते या गुंडगिरीच्या राजकारणाचे बळी बनले.
परिस्थिती इतकी चिघळत गेली की 6 एप्रिल 1990ला स्वत: नजीब अहमद, नॉर्थ नाजिमाबादमधील त्यांच्या घराजवळ दबा धरून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले. जखमी झाल्यानंतर पाच दिवसात म्हणजे 11 एप्रिल 1990 ला त्यांचा मृत्यू झाला.
हा काही किरकोळ खून नव्हता. सत्तारुढ पीपल्स पार्टीच्या विद्यार्थी संघटनेच्या इतिहासातील सर्वात मातब्बर नेता आणि कराचीतील त्यांचा अध्यक्ष नजीब अहमद यांचा शहराच्या मध्यभागी खून झाला होता.
पीएसएफ, पीपल्स पार्टी आणि सरकार, सर्वांनीच नजीब अहमद यांच्या हत्येसाठी एमक्यूएमला जबाबदार ठरवलं. मात्र एमक्यूएम आणि अल्ताफ हुसैन यांनी नजीब अहमद सहीत इतर सर्व हत्यांचा आरोप नेहमीच फेटाळून लावला.
याचदरम्यान एमक्यूएमने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येसाठी पीएसएफ किंवा पीपल्स पार्टीला जबाबदार ठरवलं.
अल्ताफ हुसैन हे नेहमीच म्हणत असत की सरकारी गुप्तहेर खात्याचा या गुंडगिरी आणि दहशतीच्या कारवायांमध्ये सहभाग आहे. यामागचा हेतू एमक्यूएमला बदनाम करून त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा होता.
या काळात पाकिस्तानच्या राजकीय हिंसाचाराचे एक नवे स्वरुप समोर आले.
सरकारी अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात येऊ लागलं की देशातील बहुतांश राजकीय, धार्मिक आणि विघटनवादी संघटना आणि जिहादी संघटनांशी संबंधित लोक पाकिस्तानात आणि पाकिस्तानबाहेर परकी गुप्तचर संस्थांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेत आहेत.
पोलिस आणि कायदासुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या इतर निमलष्करी आणि लष्करी संस्थांकडून उघडपणे या प्रकारचे आरोप केले जात होते आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये त्याचे मथळे बनत होते.
अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की या प्रकारच्या घटकांना दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तान, भारत आणि काश्मीरमध्ये असलेल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सशस्त्र कारवाई करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.
भोलूच्या कथेत माझी मदत करणाऱ्या काही सरकारी अधिकारी आणि इतर जणांनीदेखील सांगितलं की भोलूसुद्धा अशा प्रशिक्षण केंद्रांमध्ये हत्यारं आणि सशस्त्र कारवायांच्या प्रशिक्षणासाठी जात होता.
अखेर 6 ऑगस्ट 1990ला त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष गुलाम इसहाक खान यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बेनझीर भुट्टो सरकार बरखास्त केलं. त्यानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांचे सहकारी आणि बेनझीर भुट्टो यांचे विरोधक गुलाम मुस्तफा जतोई यांना हंगामी पंतप्रधान बनवलं.
सिंधमध्येदेखील पीपल्स पार्टीचे मुख्यमंत्री आफताब शोबान मीरानी यांचं सरकार बरखास्त करण्यात आलं आणि पीपल्स पार्टीचे कट्टर विरोधक असलेले जाम सादिक अली यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं.
सत्तेचं कवच दूर होताच पीपल्स पार्टी, पीएसएफ आणि भोलूसारखे घटकांवरील दबाव वाढू लागला.

फोटो स्रोत, Getty Images
भोलूचे मित्र असलेल्या आणि परदेशात स्थायिक झालेल्या पीएसएफच्या एका माजी नेत्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मला सांगितलं की, मुख्यमंत्री जाम सादिक यांनी आम्हा सर्वांना (नजीब अहमद यांचे पीएसएफमधील विश्वासू कार्यकर्ते) बोलावलं. त्यांनी सांगितलं की जर जीव प्यारा असेल तर गुलाम मुस्तफा जतोई यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश करा. मात्र आमच्यातील कोणीही त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. (जाम सादिक आता हयात नसल्यामुळं याविषयी त्यांची प्रतिक्रिया घेणं शक्य नाही)
मात्र जुनैद मसूदने आपल्या साथीदारांच्या माहितीला दुजोरा दिला आणि सांगितलं की जाम सादिक यांनी म्हटलं होतं की ''दोनच पर्याय आहेत- आमच्यासोबत या नाहीतर...''
मग त्या नाहीतरची म्हणजे दुसऱ्या मार्गाची सुरूवात झाली. 22 ऑगस्टला कराचीत एमक्यूएमच्या अनेक ठिकाणांवर गोळीबाराच्या घटना घडल्या आणि त्याचा आरोप पीएसएफच्या कार्यकर्त्यांवर लागला.
त्यानंतर पीपल्स पार्टी आणि पीएसएफच्या कार्यकर्त्यांच्या अटकेचं सत्र सुरू झालं.
त्यावेळेस वृत्तपत्र आणि इतर प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार पीएसएफच्या अनेक कार्यकर्त्यांवर खटले भरण्यात आले. पीएसएफच्या माजी नेत्यांनी केलेल्या आरोपांनुसार पीएसएफच्या अनेक वॉंटेड नेत्यांच्या जीवाची किंमत देखील ठरवली जात होती.
पीपल्स पार्टीचे सरकार बरखास्त केल्यामुळं आणि सरकारी ताकद हातातून गेल्यामुळं तयार झालेलं नवीन वातावरण पीएसएफसाठी खूपच आव्हानात्मक आणि कठीण झालं होतं. अशावेळी पीएसएफच्या अनेक कार्यकर्त्यांनी परदेशात जाण्यातच हित मानलं. या परिस्थितीत असंख्य अडचणींना तोंड देत असलेल्या पीपल्स पार्टीमध्ये गटबाजी आणि रस्सीखेच सुरू झाली.
आतापर्यत प्रसारमाध्यमं आणि विरोधी पक्ष, पीपल्स पार्टीच्या कथित भ्रष्टाचारावर टीका करत होते. मात्र आता पक्षाच्या आतूनच टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
इतकंच काय तर खुद्द पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा भाऊ मीर मुर्तजा भुट्टो यानेदेखील आपल्या बहिणीच्या सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यासंदर्भात उघडपणे टीका केली. यामुळे पीपल्स पार्टी मध्ये बेनझीर भुट्टो आणि मुर्तजा भुट्टो यांच्या समर्थकांमधील दरी वाढू लागली होती.

फोटो स्रोत, ZAFAR RIZVI
शेवटी मुर्तजा भुट्टो याने आपण झुल्फिकार अली भुट्टो यांचा खरा वारस आणि उत्तराधिकारी असल्याचं सांगत पीपल्स पार्टी शहीद भुट्टो या पक्षाची स्थापना केली.
मुर्तजा भुट्टो 18 ऑक्टोबर 1993च्या निवडणुकीत आपले मूळ गाव असलेल्या लाडकाना जिल्ह्यातून सिंध असेंब्लीचे सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते पाकिस्तानात परतले. मात्र त्यांची बहीण आणि त्यावेळच्या पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या आदेशानुसार मुर्तजा भुट्टो यांना दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
आणि तेव्हाच पीपल्स पार्टीच्या सशस्त्र गटाचे अनेक कार्यकर्ते मुर्तजा भुट्टो यांचे समर्थक बनले. जुनैद मसूद यांचं म्हणणं आहे की, ''त्यानंतर भोलूशी आमचा संपर्क तुटला. कारण तोदेखील मुर्तजा भुट्टोच्या गटात सहभागी झाला.''
बहुतांश पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं कित्येक वर्षे असं मत होतं की मुर्तजा भुट्टो 'अल झुल्फिकार' या कट्टरपंथी संघटनेचे नेतृत्व करत होते. जनरल झिया उल हक यांच्या काळात आणि नंतर बेनझीर भुट्टो यांच्या सरकारच्या कार्यकाळातदेखील अनेक दहशतवादी कारवाया घडवण्यात या संघटनेचा हात होता.
सरकारी संस्थांनी सिंधमधील अनेक दहशतवादी घटनांशी 'अल झुल्फिकार' या संघटनेचा संबंध असल्याचे मानले. मात्र पीपल्स पार्टी आणि मुर्तजा भुट्टो मात्र नेहमीच 'अल झुल्फिकार' या संघटनेचे अस्तित्वच नसल्याचे सांगत आले. सरकारी अधिकाऱ्यांनी या खोट्या कथा तयार केल्या आहेत असे त्यांचं म्हणणं होतं.
मात्र शाहनवाज शानी यांनी माझ्याशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला की भोलू देखील 'अल झुल्फिकार' या संघटनेचा सदस्य झाला होता.
पोलिसांकडील रेकॉर्ड्स, तपास अधिकारी, न्यायालयीन कागदपत्रे, सरकारी अधिकारी आणि पीएसएफमधील मित्रांनुसार, 'अत्यंत तल्लख बुद्धी आणि दणकट शरीरयष्टीचा भोलू' आता 'अल झुल्फिकार'चा सदस्य झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी करत होता. मुर्तजा भुट्टो यांचा जवळचा साथीदार अली सुनारा इत्यादी बरोबर दहशतवादी कारवायांमध्ये भोलूचा सहभाग होता
कराचीतून मोझाम्बिकमध्ये पोचला भोलू
आखाती देशांमध्ये वास्तव्य केलेल्या पीएसएफ नेत्याने मला सांगितलं की, त्याच काळात कराचीतील मलेर कॅंटजवळ घोड्यांच्या शर्यतीवरील जुगारासाठी प्रसिद्ध असलेल्या रेस कोर्सच्या राणा साहब पर्यत भोलू पोचला.
कित्येक वर्षांपूर्वी एका संवेदनशील सरकारी अधिकाऱ्याने मला सांगितलं होतं की' ''भोलूला पैशांचं आकर्षण होतं की त्याला घोड्यांच्या शर्यतींचा नाद होता की तो हे एक काम म्हणून करत होता याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. मात्र आमचे काही अधिकारीदेखील रेस कोर्सशी संबंधित प्रकरणात सहभागी होते.''
आखाती देशांमध्ये राहणारे पीएसएफचे नेते आणि भोलूचे मित्र असलेल्या व्यक्तीचं म्हणणं आहे की मग नंतर कदाचित त्याच राणा साहेब आणि त्यांच्या पत्नीने भोलूला समजावलं की कराचीतील परिस्थिती तुझ्यासाठी योग्य नाही.
राणा साहेब आणि त्यांच्या पत्नीने भोलला सांगितलं की, ''जर त्याची इच्छा असेल तर राणा साहेब त्याला मोझाम्बिक या आफ्रिकन देशात जाण्यासाठी मदत करू शकतात.''

फोटो स्रोत, Getty Images
अशाप्रकारे राणा साहेब आणि त्यांच्या पत्नीच्या मदतीने भोलू मोझाम्बिकमध्ये पोचला.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका मित्रानं सांगितलं की भोलू गेल्यानंतर काही काळाने त्याचे जवळचे मित्र आणि पीएसएफचे माजी नेते मंजर अब्बास जाफरी देखील दक्षिण आफ्रिकेत गेले.
कराची पोलिस दलातील अनेक माजी अधिकारी आणि सध्याच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, ''मूळचे पंजाबमधील असलेल्या मंजर अब्बास जाफरीदेखील भोलूच्याच मार्गावर चालत होते.''
भोलू आणि मंजर हे दोघेही पीएसएफचे मारले गेलेले माजी अध्यक्ष नजीब यांचे जवळचे साथीदार होते. एका गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकाऱ्यानुसार, ''दोघांमध्येही उत्तम ताळमेळ होता.''
शाहनवाज शानी यांचं म्हणणं आहे की, ''मोझाम्बिक मध्ये गेल्यानंतर देखील भोलू अनेकदा पाकिस्तानात येत जात राहिला.''
''एकदा पाकिस्तानात आल्यानंतर भोलू मला त्याच्या यशाबद्दल सांगू लागला. मी त्याला विचारलं की मला सांग...पाकिस्तानातील मूर्ख लोक तिकडे मोझाम्बिक किंवा दक्षिण आफ्रिकेत जाऊन डॉन कसे बनतात?...यावर भोलू हसायला लागला.''
राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत फंडिंग
शाहनवाज शानी यांनी विचारलेला हाच प्रश्न माझ्यासाठी देखील एक कोडं होता आणि त्याचं उत्तर शोधण्यास मला कित्येक वर्षे लागली. या प्रश्नाचं उत्तर मला आफ्रिकेतील देशात पाकिस्तानी गॅंगस्टरबरोबर दीर्घकाळ राहिलेल्या एका 'सूत्रा'कडून मिळालं. कधीकाळी विद्यार्थी दशेत तो माझ्या संपर्कात होता.
माझ्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खरतर भोलू आणि मंजर यांच्या बऱ्याच आधी मोझाम्बिकमधील एक पाकिस्तानी मेमन सेठ (ज्याचं नाव काही कारणास्तव त्यानं मला सांगितलं नाही) मोझाम्बिकच्या अंडरवर्ल्डमधील महत्त्वाची व्यक्ती बनले होते.
''या मेमन सेठनेच भोलू आणि मंजर गॅंगला स्थानिक अंडरवर्ल्डवरील प्रभाव वाढवण्यास मदत केली होती. त्या मेमन सेठचे अंडरवर्ल्डच्या काळ्या व्यवसायात दाऊद इब्राहिमशीदेखील संबंध होते.''
माझ्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तो मेमन सेठ कराची रेस कोर्सवरील राणा साहेबच्या देखील संपर्कात होता आणि त्यानेच भोलू-मंजर यांच्या मदतीने आपला व्यवसाय वाढवला होता.
काही मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत पोचल्यानंतर भोलू आणि मंजर यांनी मेमन सेठने शिकवलेल्या रणनीतीनुसार जोहान्सबर्ग ते मोझाम्बिकची राजधानी मापूतो पर्यत एक संघटीत टोळी बनली होती.
कराचीच्या अंडरवर्ल्डमधील महत्त्वाचे गुन्हेगार असणाऱ्या भोलू आणि मंजर यांनी ताकद आणि पैशाच्या जोरावर मापूतोमधील गुन्हेगारी विश्वावर सहजपणे कब्जा केला होता.
आखाती देशात राहणाऱ्या मित्रानुसार सर्वात आधी भोलू-मंजर गॅंगने डिस्को क्लबच्या आडून काळे धंदे चालवणाऱ्या मापूतोमधील अंडरवर्ल्डशी टक्कर घेतली.
भोलू-मंजर गॅंगने लवकरच स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना तिथून हुसकावून लावलं आणि गुन्हेगारी विश्व, काळ्या धंद्याशी निगडीत प्रत्येक क्षेत्रावर ते वर्चस्व मिळवत गेले.
भोलू-मंजर गॅंगने दारू, जुगार, अंमली पदार्थ, बनावट चलनी नोटा, सट्टा, खंडणी, हुंडी, हवाला आणि तस्करीसहीत सर्व प्रकारचे बेकायदेशीर उद्योग केले ज्यातून प्रचंड पैसा कमावता येतो.
पैशांच्या जोरावर ताकद आणि ताकदीच्या जोरावर पैसा, या फॉर्म्युलाचा वापर करून या गॅंगने दक्षिण आफ्रिकेपासून आखाती देशांपर्यत एक अतिशय संघटित नेटवर्क तयार केलं.
काही अतिशय जवळच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की भोलू-मंजर आणि पीएसएफच्या सशस्त्र गटामधून वेगळे होणारे अनेकजण या गॅंगमध्ये सामील होत गेले.
मात्र लवकरच दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात आधीपासूनच कार्यरत असलेल्या एक गुन्हेगारी टोळीचं आव्हान भोलू-मंजर गॅंगसमोर उभं राहिलं. दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेल्या आणि नंतर त्याचा सर्वात मोठा शत्रू बनलेल्या छोटा राजनचीच ही टोळी होती.
भोलू आणि मंजर यांना या संघर्षात दाऊद इब्राहिमचीदेखील भरपूर मदत मिळत होती. कारण दाऊद इब्राहिमशी वाद झाल्यानंतर छोटा राजनने कथितरित्या भारतीय गुप्तचर खात्याशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे छोटा राजनची ताकद कमी करण्यासाठी दाऊद भोलू आणि मंजर गॅंगला मदत करत होता.
दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पाकिस्तानी मित्रांनी भोलू-मंजर गॅंगशी हातमिळवणी करून छोटा राजनची टोळी संपवण्यास सुरूवात केली.
कराची पोलिस दलातील माजी अधिकारी एसएसपी राव अनवार यांनी मला सांगितलं की लवकरच दक्षिण आफ्रिकेत भोलूकडे प्रचंड पैसा आला.
पीएसएफच्या किमान दोन माजी पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला की एक काळ असा होता की भोलू-मंजर गॅंग मोझाम्बिकच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना पैसे पुरवू लागली होती.
म्हणजेच कराचीतील पटनी मोहल्ल्यातील अंगूठा छाप भोलू हे ठरवत होता की मोझिम्बिक देशाचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार.
कराची तुरुंगातील माझ्या सूत्रानुसार भोलूने मोझाम्बिकमध्ये आपल्या गॉडफादरच्या म्हणजेच मेमन सेठच्या मुलीशी लग्नदेखील केलं होतं. भोलूला दोन मुलंदेखील होते.

फोटो स्रोत, Getty Images
याचदरम्यान इकडे पाकिस्तानात एक नवीन खेळ सुरू झाला होता.
सिंधमधील दरोडे आणि खंडणीसाठी अपहरणाच्या घटनांना लगाम घालण्यासाठी नवाझ शरीफ सरकारने लष्कर आणि सरकारी यंत्रणांच्या मदतीने 1992चं 'ऑपरेशन क्लीनअप' सुरू केलं होतं. मग 19 जून 1992ला अचानक या ऑपरेशनच्या रडारवर अल्ताफ हुसैन यांचं एमक्यूएम आलं.
1994 मध्ये ही मोहिम शिखरावर होती. त्यावेळेस पोलिस एनकाऊंटरमध्ये आणि पोलिस कोठडीत असताना एमक्यूएमच्या कार्यकर्त्यांचे मृत्यू होऊ लागले. ते पाहून एमक्यूएमच्या सशस्त्र गटाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानाबाहेर पळ काढला. याचा परिणाम असा झाला की एमक्यूएमचे बरेचसे लोक त्याच दक्षिण आफ्रिकेत जाऊन पोचले जिथे भोलू-मंजर गॅंगचं गुन्हेगारी साम्राज्य होतं.
आता पुन्हा नव्यानं एक गोष्ट सुरू झाली. प्रचंड पैसा आणि ताकद असलेल्या भोलू आणि मंजर यांना तारुण्यावस्थेतील आपली मैत्री आणि शत्रूत्व यांची आठवण झाली.
भोलू-मंजर गॅंगने दक्षिण आफ्रिकेत पोचलेल्या आपल्या कट्टर शत्रूंच्या म्हणजेच एमक्यूएमच्या सदस्यांच्या विरोधात मोहिम सुरू केली. ज्यांना ते स्वत:च संपवू शकत होते त्यांना संपवलं...आणि ज्यांना संपवू शकत नव्हते त्यांची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांपर्यत पोचवली.
कराची तुरुंगातील एका सूत्राने सांगितलं की याचा परिणाम असा झाला की खोट्या नावानं किंवा बनावट पासपोर्टच्या आधारे पाकिस्तानात परतणाऱ्या एमक्यूएमच्या सदस्यांना भोलू आणि मंजर कडून मिळणाऱ्या खात्रीलायक माहितीच्या आधारावर सरकारी यंत्रणेकडून विमानतळावरच ताब्यात घेत होती.
पाकिस्तानाबाहेर राहणाऱ्या पीएसएफच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांनी आणि भोलूच्या जवळचे मित्र असणाऱ्यांनी सांगितलं आहे की, ''त्या काळात अशी परिस्थिती होती की कोणताही पाकिस्तानी नागरिक जेव्हा मोझाम्बिकच्या विमानतळावर उतरत असे तेव्हा त्याच्या पासपोर्टची एक प्रत भोलू आणि मंजरला फॅक्स केली जात असे. जेणेकरून त्यांना हे कळावं की पाकिस्तानातून कोण आलं आहे.''

फोटो स्रोत, ZAFAR RIZVI
कराची पोलिस दलातील माजी अधिकारी राव अनवार यांनी मला सांगितलं की, ''भोलूनं अनेक प्रसंगी आम्हाला खूप मदत केली आहे. ही मदत व्यक्तिगत स्वरुपाची नव्हती तर तो देश प्रेमापोटी असं करत होता. त्याला पाकिस्तानबद्दल आत्मियता वाटत होती आणि त्या प्रेमापोटी त्यानं हे सर्व केलं.''
जुनैद मसूददेखील सांगतात की भोलूचे मित्र कधी कधी त्याच्याविषयी बोलताना असं म्हणायचे की पैसा आणि ताकद आल्यानंतर भोलूला वाटायचं की आपण देशासाठीदेखील काही केलं पाहिजे.
म्हणजेच त्यावेळेस भोलू-मंजर गॅंग एका बाजूला दक्षिण आफ्रिकेत बेकायदेशीर व्यवसाय वाढवत होती तर दुसऱ्या बाजूला एमक्यूएमबरोबरचा आपला हिशेब पूर्ण करत होती. मापूतो पासून जोहान्सबर्ग पर्यत जुगाराचे आलिशान अड्डे, महागडे हॉटेल आणि आलिशान वेश्यालयांमध्ये भोलू-मंजर गॅंगचंच वर्चस्व होतं.
लवकरच या गॅंगचं नाव मापूतो आणि जोहान्सबर्गमधून निघून कराची आणि दुबईपर्यत पोचू लागलं .
'न्यूजलाईन' या पाकिस्तानी मासिकाच्या सप्टेंबर 2001च्या अंकातील माहितीनुसार दाऊद इब्राहिम देखील दक्षिण आफ्रिकेतून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत होता. लवकरच भोलू-मंजर गॅंगने दाऊद इब्राहिमचं दक्षिण आफ्रिकेतील काम सांभाळण्यास सुरूवात केली.
कराची आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या या संगमामुळं आफ्रिकन देशांमध्ये हिंसाचार वाढला. दक्षिण आफ्रिकेत गॅंगवारच्या अनेक घटना घडल्या आणि त्यात अनेक जीव गेले.
कधी काळी भोलू जसा पीएसएफचे अध्यक्ष नजीब अहमद यांचा जवळचा साथीदार होता त्याचप्रमाणे तो आता दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार झाला. फक्त फरक एवढाच होता की आता भोलूच्या मागणीनुसार त्याला हाजी इब्राहिम भोलू आणि हाजी साहब म्हटलं जाऊ लागलं.
हे सर्व सुरू असतानाच भोलूच्या नशीबाचे फासे फिरले आणि दुबईत दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून भोलूची भेट कराचीच्या अंडरवर्ल्डमधील गॅंगस्टर शोएब खान याच्याशी झाली.
शोएब खानला देखील अंडरवर्ल्डचा किंग बनायचं होतं. हेच स्वप्न घेऊन तो दाऊद भाईच्या आकर्षणात दुबईत पोचला होता.
लवकरच शोएब खान आणि भोलू अत्यंत जीवलग मित्र झाले. आता कराची असो की दुबई, जोहान्सबर्ग असो की मापूतो, भोलूसाठी सर्वकाही एकसमान होतं. जेव्हा मनात आलं तेव्हा कराची आणि जेव्हा मनात आलं तेव्हा जोहान्सबर्ग.
भोलूचे ग्रह फिरण्यास तेव्हा सुरूवात झाली जेव्हा दाऊद इब्राहिमनं त्याच्या धंद्यातून त्याचा सर्वात मोठा शत्रू आणि कधीकाळचा विश्वासू साथीदार छोटा राजनला बाजूला सारण्याचा निर्णय घेतला. या कामाची जबाबदारी दाऊद इब्राहिमने शोएब खानला दिली. शोएब खान आता कराचीच्या अंडरवर्ल्डच्या दुनियेत दाऊद इब्राहिमचा पार्टनर बनला होता.
छोटा राजनने कथितरित्या भारतीय गुप्तचर संस्थांशी हातमिळवणी करून दाऊद इब्राहिम विरोधात आपली एक टोळी बनवली होती. तो आता बॅंकॉकमध्ये आपला विश्वासू साथीदार आणि टॉप शूटर रोहित वर्माबरोबर एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.
शोएब खाने छोटा राजनला मारण्याची जबाबदारी भोलूला दिली.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कराचीहून भोलूच्या साथीदारांची पहिली तुकडी 31 ऑगस्ट 2000 ला बँकॉकच्या दिशेने निघाला. त्यावेळेस त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की, ''राजनला कराचीला घेऊन या किंवा त्याला मारून टाका.''
न्यूजलाईनमधील माहितीनुसार भोलूने छोटा राजनची हत्या करण्यासाठी ज्या लोकांची निवड केली त्यामधील तीन जणांचा संबंध आधी 'अल झुल्फिकार' संघटनेशी होता. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठी रक्कम देण्यात आली.
14 सप्टेंबर 2000च्या रात्री 9:30 वाजता महागडे काळे जॅकेट आणि चामड्याचे महागडे बूट घालून भोलू आपल्या इतर सात साथीदारांसह रोहित वर्माचा फ्लॅट असलेल्या बिल्डिंगच्या मेन गेटवर पोचले.
भोलूच्या साथीदारांमध्ये थायलंडचे दोन नागरिकदेखील होते. ते एक मोठा केक घेऊन उभे होते. मेन गेटवरील सुरक्षा रक्षकांना चकवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती आणि त्यात ते यशस्वीदेखील झाले.
या अत्यंत रुबाबात आलेल्या लोकांना सुरक्षा रक्षकाने आत जाण्याची परवानगी दिली. त्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगितलं होतं की त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आपल्या एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी आले आहेत.
जिना चढून वर पोचल्यानंतर भोलू आणि त्याचे साथीदार फ्लॅटच्या दरवाजापर्यंत पोचले. तिथे लाऊंजमध्ये रोहित वर्मा, त्याची पत्नी संगीता आणि एक छोटा मुलगा टीव्ही पाहत होते.
दरवाज्यावरील बेल वाजल्यानंतर कोणीतरी 'पीप आय' मधून पाहिले. तेव्हा दोन थाई माणसं हातात मोठा केक घेऊन उभे असलेले दिसले. त्यावेळेस भोलू आणि त्याचे साथीदार बाजूला भिंतीला चिटकून उभे असल्यामुळे दिसले नाहीत. हीच चूक रोहित वर्माला महागात पडली.

फोटो स्रोत, ZAFAR RIZVI
दरवाजा उघडताच 9 एमएन पिस्तूलांनी सज्ज असलेला भोलू आणि त्याचे साथीदार आत आले आणि मग त्यांनी गोळ्यांचा पाऊस पाडला. गोळ्या लागल्याने सर्वात आधी रोहित वर्माचा मृत्यू झाला मग एक गोळी त्याला वाचवण्यासाठी पळत आलेल्या त्याची पत्नी संगीताला लागली.
हे सर्व पाहून घाबरलेली त्यांची मोलकरीण कमीला, स्वयंपाकघराच्या दिशेने पळाली. भोलू आणि त्याच्या साथीदारांना छोटा राजन हवा होता. त्यांनी राजनला शोधला मात्र तो कुठे दिसला नाही.
मात्र अचानक एका सावलीने बेडरुमच्या बाल्कनीतून खाली गार्डनमध्ये उडी मारली. तो छोटा राजनच होता.
भोलू आणि त्याचे साथीदारांनी पळता पळता छोटा राजनवर गोळ्यांचा पाऊस पाडला. मात्र पोटात एक आणि मांडीत एक गोळी लागूनसुद्धा छोटा राजन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
फ्लॅटमध्ये परत आल्यावर छोटा राजनने पाहिले की रोहित वर्माचा मृत्यू झाला आहे आणि संगीता गंभीररित्या जखमी झाली आहे. बेडरुममध्ये जात छोटा राजनने सर्वात पहिला फोन त्याचा सर्वात विश्वासू साथीदार ग्रोस्तम याला केला आणि मग थायलंडच्या पोलिसांना फोन केला.
या हल्ल्यात छोटा राजन तर वाचला मात्र कराचीत शोएब खान आणि भोलूची मैत्री मात्र तुटली. या हल्ल्यात अपयश आल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि शोएब खानमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर शोएब खान आणि भोलूमध्ये वाद झाला.
'न्यूजलाईन'मधील माहितीनुसार शोएबने भोलूच्या तीन साथीदारांना ठरलेली रक्कम देण्यास नकार दिला. यावर भोलूने त्या माणसांना स्वत:च्या खिशातून पैसे दिले. मात्र त्यानंतर भोलू आणि शोएब खान एकमेकांचे विरोधक झाले.
शोएब खानने केली भोलूची हत्या
भोलूकडून छोटा राजनच्या हत्येसाठी ठरलेल्या रकमेची मागणी आणि शोएबने ही रक्कम देण्यास दिलेला नकार यामुळे त्यांच्यातील संबंध अत्यंत बिघडले. तणाव इतका वाढला की शोएबने भोलूपासून कायमची सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानातील 'डॉन या इंग्रजी वृत्तपत्राने 13 जानेवारी 2005 ला बातमी दिली की कराचीतील गुजरी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या एका एफआयआरनुसार खयाबान-ए-गाजी येथील रहिवासी असलेला हाजी इब्राहिम भोलू त्याच परिसरातील खयाबान-ए-सहर मधून बेपत्ता झाला होता.
जिथून भोलू बेपत्ता झाला होता ते शोएब खानचे घर होतं. कराची पोलिस दलातील माजी अधिकारी एसपी फैयाज खान यांनी मला सांगितलं की त्या दिवशी भोलू, शोएब खानची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी गेला होता.
भोलू बेपत्ता झाल्यानंतर चौधरी असलम आणि राव अनावर यांच्यासारख्या कराची पोलिस दलातील अधिकाऱ्यांचा अंदाज होता की भोलूचा खून करण्यात आला आहे. भोलूच्या खूनात शोएब खानचा हात असू शकतो असा या पोलिस अधिकाऱ्यांना संशय होता.
त्यानंतर 'डॉन'मध्ये छापून आलेल्या अनेक बातम्यांनुसार भोलूची गाडी कराची विमानतळाच्या पार्किंगमध्ये उभी असलेली आढळली.
पोलिसांचा तपास, न्यायालयात सादर झालेली कागदपत्रे, प्रसारमाध्यमांमधून आलेल्या बातम्या, मित्रपरिवार, सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारी, गुप्तहेर संस्थांचे आजी माजी अधिकारी या सर्वांशी केलेल्या बोलल्यानंतर मिळालेल्या माहितीला एकत्र करून पाहिल्यास एक मोठं आणि भयानक चित्र समोर येतं.
या वेगवेगळ्या स्त्रोतांकडून जवळपास एकसारखीच माहिती दिली. त्यानुसार शोएब खानला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की भोलूच्या गाडीत ट्रॅकर लावण्यात आला आहे. भोलू बेपत्ता होण्यात आपला हात असण्याबाबत शोएब खानने वारंवार इन्कार केला होता.
भोलूची गाडी मिळताच तपास यंत्रणांना याची खबर लागली की विमानतळावर येण्यापूर्वी भोलूची कार कित्येक तास शोएब खानच्या घराबाहेर उभी होती.
अखेर भोलूचा भाऊ मोहम्मद युसुफ पटनी यांनी भोलू रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याबद्दल शोएब खानच्या विरोधात गुजरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
भोलू बेपत्ता झाल्याप्रकरणी शोएब खानची आरोपी म्हणून नोंद करण्यात आली. मात्र या प्रकरणात अटक टाळण्यासाठी शोएब खान जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होता. भोलू जसा काही हवेतच गायब झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
भोलू रहस्यमयरित्या कसा बेपत्ता झाला याची उकल होत नव्हती. म्हणून दक्षिण आफ्रिकेतील भोलूच्या गॅंगने त्यांच्या पद्धतीने या प्रकरणाचा फैसला करण्याचं ठरवलं.
या निर्णयानुसार कारवाई झाली आणि 21 फेब्रुवारी 2001 ला भोलूच्या हत्येच्या प्रकरणात जामिनाच्या सुनावणीसाठी जेव्हा शोएब खान न्यायालयात गेला तेव्हा भोलूचे समर्थक आणि शोएबचे साथीदार यांच्यात हाणामारी झाली.
हे सर्व झाल्यानंतर शोएब खानच्या देखील लक्षात आलं की बाहेरच्या जगात चारी बाजूंनी इतके शत्रू आणि विरोधक असणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तुरुगांत राहणं अधिक सुरक्षित मानून 14 जून 2001 ला शोएब खानने पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र काही महिन्यात भोलूच्या साथीदारांनी शोएब खानवर दुसरा हल्ला केला.
माझ्या अभ्यासानुसार 25 ऑगस्ट 2001 ला सिटी कोर्टात एक सुनावणी झाल्यानंतर शोएब खानला पुन्हा तुरुंगात पाठवलं जात होतं. तिथेच शोएब खानवर दुसरा हल्ला झाला.
पोलिस अधिकारी फैयाज खान यांनी सांगितलं की त्यांच्या तपासानुसार भोलू-मंजर गॅंगचा प्रमुख असलेल्या मंजर अब्बासने शोएबची हत्या करण्यासाठी लयारी गॅंगचा प्रमुख रहमान डकैत याला दोन कोटी रुपयांची सुपारी दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
या हल्ल्यात शोएब खान आणि त्या व्हॅनमध्ये असलेले अनेक पोलिस अधिकारी गंभीररित्या जखमी झाले होते. फैयाज खान यांनी सांगितलं की या हल्ल्यात जखमी झाल्याचा शोएब खानला असा फायदा मिळाला की त्याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयातून जामीन मंजूर झाला. मात्र भोलूचं नेमकं काय झालं याचा कित्येक वर्षे काहीही सुगावा लागला नाही.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल मुशर्रफ यांचा महत्त्वाची राजकीय सहकारी असलेली एमक्यूएम आणि त्यावेळचे सिंध प्रांताचे गव्हर्नर यांच्या हस्तक्षेपानंतर शेवटी मुशर्रफ यांच्या आदेशानुसार शोएब खानच्या अटकेचा निर्णय झाला. यानंतर 29 डिसेंबर 2004 ला पंजाबातील लाहोर कॅंट येथे शोएब खानला अटक करून कराचीत आणण्यात आलं.
त्यावेळेस उच्च स्तरीय तपास अधिकाऱ्यांसमोर शोएब खानने आपल्या अनेक गुन्ह्यांची कबूली दिली. यात त्याने हेदेखील मान्य केलं की त्यानेच भोलूचा खून केला होता.
पोलिस अधिकारी फैयाज खान यांनी मला सांगितलं कीअटक झाल्यानंतर झालेल्या चौकशीत शोएबने ही माहिती दिली होती की त्यानेच 8 जानेवारी 2001 ला भोलूचा खून केला होता.
सर्व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी शोएब खानने सर्वात आधी भोलूला दारू पाजली होती. त्यानंतर दाऊद इब्राहिम भोलूवर नाराज आहे आणि भोलूने त्याची भेट घेतली पाहिजे असा बहाणा करून दुसऱ्या एका कारमध्ये भोलूला टाकून कराची मध्य जिल्ह्यातील गुलबर्ग (समनाबाद) भागातील एका घरात त्याला नेण्यात आलं. शोएबचा साथीदार आणि अंडरवर्ल्डचा गॅंगस्टर खालिद शहंशाह याच्या ताब्यात ते घर होतं.
कुठे आणि कसा मिळाला भोलूचा मृतदेह
भोलूला घेऊन जाताना शोएबच्या दोन माणसांनी भोलूचा चेहरा काळ्या कपड्याने झाकून घेतला आणि त्याचे हात मागे बांधले. दाऊद इब्राहिमची भेट घेण्यास जात असल्यामुळे असं केलं जात असल्याचं कारण त्यांनी दिलं. कराचीतील दाऊद इब्राहिमच्या नव्या अड्ड्याचा रस्ता त्याला कळू नये आणि दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेसाठी हे सर्व केलं जात असल्याचं भोलूला सांगण्यात आलं.
हे सर्व पाहून भोलू खूप नाराज झाला. मात्र अखेर शोएब याच प्रकारे त्याला घेऊन बाहेर पडला.
गुलबर्ग येथे पोचल्यावर भोलूच्या हे लक्षात आलं की तो जाळ्यात अडकला आहे. तेव्हा त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र हात बांधलेले असल्यामुळे त्याला काहीही करता येत नव्हतं. यानंतर शोएब आणि त्याच्या साथीदारांनी भोलूच्या गळ्यात फास अडकवून त्याला मारून टाकलं आणि त्याचा मृतदेह खोलीतील पंख्याला टांगला.
मानवी जीवनाला खेळ समजणारा, भीती आणि दहशतीचं प्रतीक बनलेला आणि कराचीपासून ते मोझाम्बिक पर्यत गुन्हेगारी विश्वावर राज्य करणारा भोलू कराचीतील फेडरल बी एरियातील एका सर्वसामान्य घरात असहाय अवस्थेत मृत्यू पावला.
मग घराच्या मागच्या बाजूस एका मोठ्या ड्रममध्ये भोलूचा मृतदेह लपवण्यात आला. दहा-पंधरा किलो चूना आणण्यात आला. त्या ड्रममध्ये तो भरण्यात आला आणि त्यामध्ये भोलूचा मृतदेह टाकून त्यामध्ये पाणी भरण्यात आलं.
एका सूत्राने सांगितलं की चुन्यात पाणी मिसळलं की त्यातून उष्णता निर्माण होते. त्यामुळे भोलूचा मृतदेह त्यात जळून गेला. आठ-दहा दिवस तो ड्रम बंद होता. त्यादरम्यान भोलूच्या मृतदेहाची विल्हेवाट लागत होती.
मग अनेक वर्षांनंतर शोएब खानने भोलूचे उरलेले अवशेष त्या ड्रममधून बाहेर काढले आणि न्यू कराची किंवा ख्वाजा अजमेर नगरीच्या एका आडबाजूच्या कब्रस्तानात फेकून दिले. बाकी जे उरलं त्याला तिथेच गुलबर्गच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बागेत पुरण्यात आलं.
29 डिसेंबर 2004 ला शोएब खानने त्याच्या अटकेनंतर पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही सर्व माहिती दिली. यानंतर 13 जानेवारी 2005ला 'डॉन' या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार शोएब खानने सांगितलेल्या जागेवर भोलूच्या मृतदेहाचे अवशेष 12 जानेवारी 2005 ला हस्तगत करण्यात आले.
भोलूचा मृतदेहाच्या अवशेषांचा डीएनए आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा डीएनए यांची चाचणी करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे भोलूच्या मृतदेहाचे कुजलेले उरलेले अवशेष ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्याच्या मागील भागात असलेल्या उर्दू आर्टस कॉलेजमधूनच फक्त 16 वर्षांपूर्वी भोलूने त्याच्या गुन्हेगारी करियरची सुरूवात केली होती.
पस्तीस वर्षांपूर्वी भोलूने जेव्हा माझ्यावर रायफल ताणली होती त्याक्षणी मला अजिबात कल्पना नव्हती की भोलूची कहाणी तुमच्यापर्यत पोचवण्यासाठी मी जिवंत असेन, मात्र रायफलची नळी माझ्यावर धरणारा भोलू मात्र मारला गेलेला असेल.











