मॉस्कोत 133 जणांचा जीव घेणारी संघटना नेमकी कुठली? भारतासाठी किती धोकादायक?

ISKP/ISIS-K : मॉस्कोत 133 जणांचा जीव घेणारी संघटना नेमकी कुठली? भारतासाठी किती धोकादायक?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मॉस्कोमधला संशयित हल्लेखोर
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेट ही कट्टरतावादी संघटना पुन्हा चर्चेत आली आहे.

IS किंवा आधी ISIS नावानं ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेनं क्रोकस कॉन्सर्ट हॉलवरच्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि पुरावा म्हणून व्हीडिओ सादर केले आहेत.

रशियानं त्यावर काही भाष्य केलं नाही, आणि युक्रेनकडे बोट दाखवलं आहे तर युक्रेननं या हल्ल्याशी आपला काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पण अमेरिकन अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार इस्लामिक स्टेट खुरासन प्रोव्हिन्स या गटाचा त्यामागे हात असल्याचं नाकारता येत नाही, असं म्हटलं आहे.

नेमकी ही संघटना काय आहे आणि तिच्यावर लक्ष ठेवणं भारतासाठीही महत्त्वाचं का आहे, जाणून घेऊयात.

ISKP/ISIS-K कोण आहेत?

तर, ISIS-K किंवा ISKP नावानंही ही संघटना ओळखली जाते. खुरासन म्हणजे अफगाणिस्तान आणि आसपासचा पाकिस्तान, इराण, मध्य आशियातील देशांचा काही भाग. साहजिकच प्रामुख्यानं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात ही संघटना सक्रीय आहे.

अफगाणिस्तानातील सर्व जिहादी कट्टरवादी संघटनांमध्ये ISKP सर्वांत धोकादायक आणि हिंसक मानली जाते.

इराक आणि सीरियाच्या मोठ्या भागात इस्लामिक स्टेटनं कब्जा केला होता, त्यासुमारास म्हणजे 2014-15 च्या आसपास ISKP ची स्थापना झाल्याचं सांगितलं जातं.

अफगाणीस्तान

फोटो स्रोत, Getty Images

ISIS-K चे तालिबानसोबत बरेच मतभेद आहेत, ज्यांना तालिबान आता पूर्वीसारखी कट्टर राहिली नाही, असं वाटतं, अशा अफगाण लोकांमधून ISKP जिहादींची भरती करते, पाकिस्तानातही त्यांनी हातपाय पसरले आहेत.

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नंगरहार प्रांतात ISIS-K चा तळ असल्याचं आणि त्यांची संख्या तीन ते पाच हजारांपर्यंत असल्याचं सुरक्षातज्ज्ञ सांगतात.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान होणारा अंमली पदार्थांचा व्यापार आणि मानव तस्करी साधारण याच मार्गावरून होते.

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवला तेव्हा पुल-ए-चरकी तुरुंगातून मोठ्या संख्येने कैद्यांची मुक्तता केली. यामध्ये इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा संघटनेचे कट्टरवादी मोठ्या संख्येने होते.

ते कुठे सक्रिय आहेत?

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नंगरहार येथे ISIS-K चं तळ आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान होणारा अंमली पदार्थांचा व्यापार आणि मानव तस्करी याच मार्गावरून होते, असं म्हटलं जातं.

कधी काळी इस्लामिक स्टेटकडे सुमारे 3 हजार कट्टरवादी सदस्य होते.

पण तालिबान, अफगाण सुरक्षा दल आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सेनेविरुद्ध झालेल्या चकमकींमध्ये या संघटनेला मोठं नुकसान सहन करावं लागलं.

काबूल विमानतळ हल्ल्यानंतरचं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काबूल विमानतळ हल्ल्यानंतरचं दृश्य

तालिबानशी त्यांचा संबंध आहे का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ढोबळमानाने उत्तर द्यायचं तर 'हो.'

हक्कानी नेटवर्क या तिसऱ्या संघटनेमार्फत या दोन्ही संघटनांचे संबंध आहेत, असं म्हटलं जातं.

त्यातही ISIS-K आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात तर खूपच घनिष्ट संबंध आहेत, असं तज्ज्ञ सांगतात.

याच पार्श्वभूमीवर त्यांचा तालिबानसोबत जवळचा संबंध जोडला जातो.

तालिबानने काबूलच्या सुरक्षेची जबाबदारी खलील हक्कानीकडे दिली आहे. अमेरिकेने खलील हक्कानीवर 50 लाख डॉलरचं बक्षीस ठेवलं आहे.

एशिया पॅसिफिक फाऊंडेशनचे डॉक्टर सज्जन गोहेल अफगाणिस्तानातील कट्टरवादी संघटनांवर कित्येक वर्षांपासून लक्ष ठेवून आहेत.

ते सांगतात, "2019 पासून ते 2021 पर्यंत अनेक प्रमुख हल्ल्यांमध्ये ISIS-K, हक्कानी नेटवर्क आणि पाकिस्तानात सक्रिय असलेल्या कट्टरवादी संघटनांची संयुक्त भूमिका होती."

तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवला तेव्हा पुल-ए-चरकी तुरुंगातून मोठ्या संख्येने कैद्यांची मुक्तता केली.

यामध्ये इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा संघटनेचे कट्टरवादी मोठ्या संख्येने होते.

पण ISIS-K चे तालिबानसोबत बरेच मतभेद आहेत.

तालिबानने जिहाद आणि रणांगणावरील युद्धाचा मार्ग सोडून कतारची राजधानी दोहा येथे महागडे आणि आलीशान हॉटेलांमध्ये जाऊन सौदेबाजी केली, असा आरोप ISIS-K कडून केला जातो.

इस्लामिक स्टेटचे कट्टरवादी हेच तालिबानी राजवटीसाठी सर्वात मोठं आव्हान म्हणून पुढे येऊ शकतात, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.

ISIS-K : इस्लामिक स्टेट खुरासान संघटना नेमकी काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images

ISKP संघटना किती कट्टर?

अफगाणिस्तानात गेल्या काही वर्षांत झालेल्या बहुतांश आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटच्या या खुरासान शाखेने घेतली आहे. अफगाणिस्तानात मुलींच्या शाळा, रुग्णालयं इतकंच नव्हे तर प्रसूतीगृहावर त्यांनी हल्ले घडवून आणले होते.

अमेरिकेनं अफगाणिस्तानातून 2021 साली माघार घेतली, तेव्हा काबुल विमानतळाजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 170 जण मारले गेले होते, ISKP नं त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

अनेक विशेषज्ञांच्या मते ही संघटना हा इस्लामिक स्टेटनं तयार केलेल्या जागतिक नेटवर्कमधला सर्वांत घातक गट आहे. जगभरातील पाश्चिमात्य, आंतरराष्ट्रीय आणि मानवतावादी ठिकाणांना लक्ष्य करणं हा ISIS-K संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.

आता या संघटनेनं रशियावर हल्ला का केला असावा? तर, सीरियात या संघटनेविरुद्ध लढ्यामध्ये रशियानं सहभाग घेतला होता. तसंच चेचन्यामधील इस्लामिक बंडखोरांविरोधात रशियाची कारवाई आणि सोव्हिएत काळात रशियानं अफगाणिस्तानवर केलेला हल्ला यांमुळे इस्लामिक स्टेटचं रशियाशी शत्रुत्व आहे.

2015 साली इजिप्तमध्ये एक रशियन विमान स्फोटानं उडवलं होतं, आणि त्यात सर्व 224 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इस्लामिक स्टेटनं त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि कथित बाँबचे फोटोही आपल्या मासिकात प्रकाशित केले होते.

काबुलमध्ये 2022 साली रशियन दूतावासाबाहेर झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटाची जबाबदारी याच संघटनेनं स्वीकारली होती.

ISIS-K : इस्लामिक स्टेट खुरासान संघटना नेमकी काय आहे?

फोटो स्रोत, AFP

मग भारतानं या संघटनेविषयी चिंता करायला हवी का?

तर, भारतात आजवर इस्लामिक स्टेट संघटनेला थेट आपली पाळमुळं रोवता आलेली नाहीत. मात्र अफपाक म्हणजे अफगाणिस्तान-पाकिस्तान परिसरातील जिहादी संघटनांमार्फत ISKPचं जाळं पसरलं आहे.

एशिया पॅसिफिक फाऊंडेशनचे डॉक्टर सज्जन गोहेल अफगाणिस्तानातील कट्टरवादी संघटनांवर कित्येक वर्षांपासून लक्ष ठेवून आहेत.

ते सांगतात, "2019 पासून ते 2021 पर्यंत अनेक प्रमुख हल्ल्यांमध्ये ISIS-K, हक्कानी नेटवर्क आणि पाकिस्तानात सक्रिय असलेल्या कट्टरवादी संघटनांची संयुक्त भूमिका होती."

इस्लामिक स्टेट खुरासन प्रोव्हिन्स आणि पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क ही कट्टरवादी संघटना यांच्यात तर खूपच घनिष्ट संबंध आहेत, असं तज्ज्ञ सांगतात.

काबूलमध्ये 2020 साली गुरुद्वारात झालेला हल्ला या दोन संघटनांनी मिळून केल्याचा दावा केला जातो.

या हक्कानी नेटवर्कचं जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा सारख्या भारतविरोधी कट्टरवादी संघटनांशी नातं जोडलं जातं.

हेही नक्की वाचा