पाकिस्तानमधून आयसीसला कशी मदत केली जाते?

पाकिस्तान, आयसिस, सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयसिसला पाकिस्तानातून निधीपुरवठा कसा होतो
    • Author, रियाझ सुहैल
    • Role, बीबीसी ऊर्दू, कराची

पाकिस्तानमधून सीरियात आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटला आर्थिक रसद पुरवली जात होती. डिजिटल करन्सी 'बिटकॉईन' च्या माध्यमातून हा पैसा पुरवण्यात येत असल्याचा दावा, पाकिस्तानच्या आतंकवाद विरोधी पोलिसांनी केला आहे.

आतंकवाद्यांना आर्थिक मदत पोहोचवणाऱ्या टोळीला पोलिसांनी कराचीत केलेल्या छापेमारीत अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कराचीतील एनईडी विद्यापीठातील मोहम्मद उमर बिन खालिद नावाच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 'मोहम्मद उमर बिन खालिद इस्लामिक स्टेटच्या महिलांशी संपर्कात होता.'

पण, मोहम्मदच्या आईने याआधी त्याला डिसेंबरमध्ये अटक केल्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यात 'माझ्या मुलाचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही' असा दावा त्यांनी केला होता.

संशयित पुन्हा अटकेत

सोमवारी आतंकवाद विरोधी पथकाचे डीआयजी उमर शाहिद पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले, 'आरोपी मोहम्मद उमर बिन खालिदला कॅन्ट स्टेशनवरून अटक करण्यात आली. याआधी 17 डिसेंबरला त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.'

ते पुढे म्हणतात, 'सीटीडीला मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक पाकिस्तानमधून आर्थिक मदत गोळा करून विविध माध्यमांनी इस्लामिक स्टेटसाठी परदेशी पाठवत होते.'

अटक करताना मोहम्मद उमर बिन खालिदकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्यावेळी ठोस पुरावे नसल्याने त्याला जामीनावर सोडण्यात आलं होतं.

मोबाईल फोनमधून मिळाली माहिती

डीआयजी उमर शाहिद यांच्या म्हणण्यानुसार, 'आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीनंतर आरोपीचे इस्लामिक स्टेटसोबत संबंध असल्याचं समोर आलं. पाकिस्तानातून पैसे गोळा करून सीरियाला पाठवणाऱ्या टोळीचा मोहम्मद एक सूत्रधार आहे.'

पाकिस्तान, आयसिस, सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीरिया आणि पाकिस्तान कनेक्शन?

"आरोपी सीरिया आणि पाकिस्तानमधील इस्लामिक स्टेटच्या महिलांच्या माध्यमातून त्यांच्याशी थेट संपर्कात होता."

त्यांच्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती ईपीजेच्या (ऑनलाइन मनी ट्रान्सफर अॅप) माध्यमातून पैसे ट्रान्सफर करत होते.

हा पैसे उमरला पाठवला जायचा. आणि उमर पुढे हैदराबादच्या एका व्यक्तीला ईपीजेच्या माध्यमातून पाठवायचा. हा व्यक्ती ही रक्कम डॉलरमध्ये बदलून बिटकॉइनच्या मदतीने सीरियामध्ये पाठवायचा.

महिलांच्या माध्यमातून संपर्कात

पोलीस अधीक्षक राजा उमर खत्ताब बीबीसीशी बोलताना सांगतात, "पहिल्यांदा आतंकवाद्यांना डिजिटल स्वरूपात आर्थिक मदत करण्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे."

ते पुढे सांगतात, "उमर पैशासाठी नाही तर, वैचारिकरित्या इस्लामिक स्टेटसोबत जोडलेला होता. "

पाकिस्तान, आयसिस, सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिलांच्या माध्यमातून संपर्क केला जातो.

"सीरियातील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या कुटुंबातील उर्दू बोलणाऱ्या महिला ट्विटर आणि इतर सोशल साइट्सवर संपर्क करून भावनिक आवाहन करतात."

"त्यानंतर त्या आर्थिक मदत मागतात. पैसे देण्यासाठी कोणी तयार झालं तर त्यांना उमरसोबत संपर्क करण्यासाठी सांगितलं जायचं."

सीटीडीच्या माहितीनुसार, जामीनावर सुटल्यांनंतर उमर फरार झाला होता. तो कराचीतून पळण्याच्या प्रयत्नात होता.

मोहम्मद उमर बिन खालिद कोण आहे?

मोहम्मद उमर बिन खालिद एनईडी विद्यापीठात इंजिनिअरिंग शाखेचा अंतिम वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे. उमरची आई तैयबा खालिद यांनी त्याला अटक केल्यानंतर कोर्टात याचिका दाखल केली होती.

याचिकेत म्हणण्यात आलं, "उमरला 17 डिसेंबरला अटक करण्यात आली. पुरावा म्हणून पोलिसांच्या मोबाईलचे फुटेज आहेत."

"त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही."

कोर्टाने गृहविभाग, डीजी रेंजर्स आणि इतरांना नोटीस दिली होती. याआधी देखील कराची विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची इस्लामिक स्टेटसोबत जवळीक आणि हल्ल्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे.

पाकिस्तान, आयसिस, सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीरियातली परिस्थिती

सफूरां परिसरात इल्माइली समुदायाच्या बसवर हल्ला केल्याप्रकरणी अनेक युवकांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सफूरा घटनेत सहभागी सामाजिक कार्यकर्ता साद अजीज, सबीन महमूदच्या हत्येचा मास्टरमाईंड होता.

कराची विद्यापीठाच्या इन्स्टिट्युट ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन विभागात शिकले होते. त्यांचा साथीदार मोहम्मद अजहर इशरत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर होता.

पाकिस्तानच्या एमक्यूएमचे नेते आणि सिंध प्रांत विधानसभेचे विरोधीपक्षनेते ख्वाजा इजहार यांच्यावर हल्ला करणारे कराची विद्यापीठातच शिकलेले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अंसार-अल-शारिया नावाच्या संघटनेशी जोडलेले होते.

बिटकॉइन काय आहे?

डिजिटल करन्सी बिटकॉइन इलेक्ट्रोनिक पेमेंट करण्याचा एक पर्याय आहे. याचा वापर करून खरेदी करता येऊ शकते. पण, सद्यस्थितीत फार कमी ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो. व्हीडिओ गेम किंवा सोशल नेटवर्कवर पेमेंट करता येऊ शकतं.

पाकिस्तान, आयसिस, सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिटकॉईन

क्रिप्टोकरन्सीचा व्यापार अनेक देशात केला जातो. पण, पाकिस्तानात स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानने याची खरेदी, विक्री आणि वापरावर निर्बंध घातले आहेत.

एका क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत 30 हजार अमेरिकन डॉलर्स असल्याचं एका लेखात सांगण्यात आलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)