एक्स-बॉयफ्रेंडनं हत्या केलेल्या ऑलिंपिक धावपटूच्या अंत्ययात्रेत हजारोंची उपस्थिती

फोटो स्रोत, Alamy
- Author, सेलेस्टिन कॅरोनी
- Role, बीबीसी न्यूज, नैरोबी
ऑलिंपिकमधील धावपटू रेबेके चेपतेगे हिच्यावर शनिवारी (14 सप्टेंबर) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. रेबेके हिला तिच्या वडिलांच्या घराजवळ दफन करण्यात आले.
रविवारी (1 सप्टेंबर) ला रेबेकेच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळलं होतं. या हल्ल्यात रेबेके गंभीररीत्या भाजली होती, आणि यातच तिचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, EPA
33 वर्षीय रेबेके युगांडा येथील मॅराथॉन रनर होती. तिनं नुकताच पॅरिस ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता. ती वायव्य केनियात राहत होती आणि तिथेच तिनं प्रशिक्षणही घेतलं होतं. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार चर्चमधून परत येत असताना तिच्यावर हल्ला झाला होता.
स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ही ॲथलिट आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड यांचा एका जमिनीच्या तुकड्यावरून वाद सुरू होता. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
या प्रकरणावर बोलताना केनियाचे क्रीडा आणि युवा मंत्री म्हणाले, “सरकार म्हणून आम्ही दोषी आहोत, मात्र समाजही याला तितकाच जबाबदार आहे.”
‘युगांडासाठी आणि मित्रांसाठी हा एक दुःखाचा दिवस’ असल्याची भावना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रेबेकेची सहकारी असलेली स्टेला चेसांग हिने व्यक्त केली.
दरम्यान, केनियामध्ये महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अलीकडच्या काळात अनेक महिला खेळाडूंना लक्ष्य करण्यात आले असून, महिला ॲथलिट्सवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांत अनेकींचा मृत्यू झाला आहे.
ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते रुग्णालयाबाहेर बोलताना तिचे वडील जोसेफ चेपतेगा म्हणाले की त्यांची मुलगी खूप आधार देणारी होती. त्यांनी केन्या सरकारकडे न्याय मागितला आहे.
टीचिंग अँड रेफरल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. ओवन मेनाक यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की रेबेकाच्या शरीरातील सर्व अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

फोटो स्रोत, Uganda Atheltics Federation
तिच्यावर हल्ला करणारा तिचा पूर्वीचा प्रियकर डॅनिएल एडिएमा मरंगाला सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. भाजल्यामुळं त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. तो सध्या आयसीयूमध्ये आहे. त्याची तब्येत स्थिर असून सातत्याने सुधारत आहे असं डॉ. मेनाक यांनी सांगितलं आहे.
“ही दोघं त्यांच्या घरासमोर भांडत होते. हे भांडण सुरू असतानाच त्या प्रियकराने तिला जाळण्यापूर्वी पेट्रोल ओतले,” अशी माहिती स्थानिक पोलीस प्रमुख जेरमिया ओले कोसिओम यांनी स्थानिक माध्यमांना दिली होती.
चेपतेगा यांनी युगांडाच्या सीमेजवळ एका भागात ट्रान्स न्झॉइया गावात जमीन खरेदी केली आणि तिथे एक घर बांधलं. केन्याच्या अनेक प्रशिक्षण केंद्रांच्या जवळ हे घर असावं असा त्यांचा उद्देश होता.


युगांडाच्या ऑलिंपिंक समितीचे प्रमुख डोनाल्ड रुकेरे यांनी या घटनेनंतर ट्विट केले. ते म्हणतात, “हे एक अतिशय भ्याड कृत्य आहे. त्यामुळे आम्ही एक ॲथलिट गमावला आहे. तिचा वारसा मात्र कायम राहील.”
या आठवड्याच्या सुरुवातीला बोलताना तिचे वडील जोसेफ चेपतेगे म्हणाले होते की माझ्या मुलीला न्याय मिळावा यासाठी मी प्रार्थना करतोय. इतकं अमानवीय कृत्य त्यांनी उभ्या आयुष्यात बघितलं नसल्याचं ते म्हणाले.
चेपतेगा यांनी नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये 44 वे स्थान मिळवलं होतं.

फोटो स्रोत, AP
थायलंडमध्ये 2022 साली झालेल्या चिआंग मे येथे झालेल्या वर्ल्ड माऊंटन अँड ट्रेल रनिंग चॅम्पिअनशिप सुद्धा त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं.
पूर्व अफ्रिकेतील अग्नेस तिरोप आणि डॅमरिस मुतुआ यांचा मृत्यू झाल्यानंतर 2 वर्षांनी चेपतेगेचा मृत्यू झाला आहे. दोन्ही केसेसमध्ये त्यांचा जोडीदारच मुख्य आरोपी असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं.
तिरोप यांच्या पतीवर सध्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने या आरोप फेटाळला असला तरी मुतुआ यांचा बॉयफ्रेंड अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)











