पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताच्या खात्यात सातवं सुवर्णपदक

नवदीप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवदीप

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट केली आहे.

भालाफेकपटू नवदीपला सुवर्णपदक मिळाल्यानंभारताच्या नावावर 7 सुवर्णपदकं जमा झाली असून पदक तालिकेत 7 सप्टेंबरच्या अखेरीस भारत सोळाव्या स्थाावर आहे.

पॅरिसमध्ये आतापर्यंत 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य अशी एकूण 29 पदकं भारताच्या खात्यात असून पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

याआधी टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारतानं 19 पदकं मिळवली होती. पॅरिसमध्ये 25 पदकं जिंकण्याचं लक्ष्य भारतानं समोर ठेवलं होतं.

नवदीपची सुवर्णकमाई (7 सप्टेंबर)

भारताचा पॅरा-भालाफेकपटू नवदीपनं पॅरिस पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं. पुरुषांच्या भालाफेकीत F41 प्रकारात नवदीपनं 47.32 मीटरवर भालाफेक केली.

या कामगिरीसाठी त्याला आधी रौप्यपदक मिळालं होतं. पण पहिल्या स्थानावर आलेला इराणचा बेत साया सादेघचा थ्रो अपात्र ठरल्यामुळे नवदीपला सुवर्णपदक बहाल करण्यात आलं. पुरुषाच्या भालाफेकीमध्ये पॅरालिंपिकच्या या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा नवपदीप पहिलाच भारतीय ठरला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

24 वर्षीय नवदीप हरियाणाच्या पानीपतचा असून जन्मापासून त्याची उंची कमी आहे. पण ठेंगणा असूनही त्यानं खेळात करियर करून दाखवलं आहे.

नवदीपला खेळाकडे वळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचे पैलवान असलेल्या त्याच्या वडिलांनी प्रेरणा दिली. 2017 साली त्यानं भालाफेकीतलं प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलं आणि त्यावर्षी झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण मिळवलं.

टोकियो पॅरालिंपिक आणि पॅरा एशियन गेम्समध्ये नवदीपला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. पण पॅरिसमध्ये त्यानं सुवर्णपदकापर्यंत मजल मारली.

नवदीप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवदीप

महिलांच्या 200 मीटर T12 शर्यतीत भारताच्या सिमरननं कांस्यपदकाची कमाई केली. या शर्यतीतलं भारताचं हे पहिलं पॅरालिंपिक पदक आहे.

दृष्टीनं अधू असूनही सिरननं ही कमाई केली आहे.

प्रवीण कुमारला सुवर्ण, हकातो सेमाला कांस्य (6 सप्टेंबर)

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीमध्ये भारतानं आणखी एक सुवर्णपदकाची कमाई केली. प्रवीण कुमारनं उंच उडीच्या T64 प्रकारात सुवर्णपदक मिळवलं

त्यानं 2.08 मीटर उंच उडी मारत आशियाई विक्रमही रचला.

टोकियो पॅरालिंपिकमध्ये प्रवीणनं (T44) प्रकारात रौप्यपदक मिळवलं होतं.

प्रवीण कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रवीण कुमार

गोळाफेकीमध्ये नवोदीत होकातो सेमानं कांस्यपदकाची कमाई केली. त्यानं पुरुषांच्या गोळाफेकीत F57 प्रकारात 14.65 मीटरवर थ्रो करत कांस्यपदक मिळवलं.

कपिल परमारला ऐतिहासिक कांस्य (सप्टेंबर 5)

भारताचा ज्युदोका कपिल परमारनं पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या 60 किलो J1 गटात कांस्यपदकाची कमाई केली. ब्राझिलच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून कपिलनं हे पदक मिळवलं.

कपिलच्या रुपानं पहिल्यांदाच एखादा भारतीय पॅरालिंपिकच्या ज्युदो स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यामुळे पॅरालिंपिक ज्युदोमधलं भारताचं हे पहिलंच पदक ठरलं.

हरविंदर सिंगला रिकर्व्ह तिरंदाजीत सुवर्ण (4 सप्टेंबर)

तिरंदाज हरविंदरनं भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पॅरा तिरंदाजीमध्ये भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं आहे.

हरविंदरनं पॅरा तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात पुरुष एकेरीमध्ये पोलंडच्या लुकास सिझेकवर 6-0 अशी मात केली.

याआधी टोकियो पॅरालिंपिकमध्येही हरविंदरनं कांस्यपदक मिळवलं होतं. पॅरालिंपिकमध्ये भारताचं तिरंदाजीतलं ते पहिलंच पदक होतं.

हरविंदर सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरविंदर सिंग

हरियाणाच्या कैथलमधल्या अजित नगरचा रहिवासी असलेला हरविंदर 33 वर्षांचा आहे. अवघ्या दीड वर्षांचा असताना त्याला डेंग्यू झाला होता आणि उपचारासाठी इंजेक्शन्स घ्यावी लागली. साईड इफेक्ट्समुळे त्याच्या पायातली ताकद गेली.

2012 सालचं लंडमन पॅरालिंपिक पाहून हरविंदरला तिरंदाजीत रस वाटू लागला. 2017 साली तो पॅरा तिरंदाजीच्या जागतिक स्पर्धेत सहभागी झाला. 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये हरविंदरनं सुवर्णपदक मिळवलं.

लॉकडाऊनच्या काळात हरविंदरला सराव करता यावा, यासाठी त्याच्या वडिलांनी शेतात आर्चरी रेंज तयार केली.

खेळासोबतच हरविंदर पटियालाच्या पंजाबी विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी करत आहे.

धरमबीरला क्लब थ्रोचं सुवर्ण (4 सप्टेंबर)

भारताच्या धरमबीर नैननं क्लब थ्रो F51 प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. त्यानं 34.92 मीटरवर क्लब फेकत नवा आशियाई विक्रमही रचला.

याच प्रकारात प्रणव सूरमानं 34.59 मीटरवर क्लब फेकून रौप्यपदकाची कमाई केली.

धरमबीर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, धरमबीर

धरमबीर मूळचा हरियाणाच्या सोनीपतचा आहे. गावातल्या एका कालव्यामध्ये पोहण्यासाठी उडी मारताना पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्यानं धरमबीरला दुखापत झाली होती.

या अपघातात धरमबीरचं कमरेखालचं शरीर निकामी झालं. 2014 पासून तो पॅरास्पोर्ट्स कडे वळला. याआधी धरमबीरनं एशियन पॅरा गेम्समध्ये दोनदा रौप्यपदक आणि जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं आहे.

प्रणव सूरमाच्या आयुष्याला 2011 मध्ये दु:खद वळण लागलं. तो फरिदाबादमध्ये आपल्या एका चुलत भावंडाच्या घरी गेला होत.

त्यावेळेस एक सिमेंटचा पत्रा त्याच्या डोक्यावर पडला आणि त्याच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली.सुरूवातीला आपल्या शारीरिक अपंगत्वातून सावरताना अभ्यास ही त्याची ताकद होती.

मात्र 2016 च्या रिओ पॅरालिंपिकमध्ये भारताच्या पॅरा खेळाडूंच्या कामगिरीनं त्याला प्रेरणा मिळाली आणि तो पॅरा-स्पोर्टकडे वळला.

सांगलीच्या सचिन खिलारीला रौप्य (4 सप्टेंबर)

सांगलीच्या सचिन खिलारीनं भारताला पॅरिस पॅरालिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवून दिलं. सचिननं पुरुषांच्या शॉट पुट म्हणजे गोळाफेकीच्या स्पर्धेत F46 प्रकारात 16.32 मीटरवर गोळाफेक केली आणि दुसरं स्थान मिळवत पदक निश्चित केलं.

सचिन खिलारी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सचिन खिलारी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

34 वर्षीय सचिनने याआधी पॅरा ॲथलेटिक्सच्या जागतिक स्पर्धेत 2023 आणि 2024 अशी दोनदा सुवर्णपदकं मिळवली आहेत. तर 2023 मध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्येही त्यानं सुवर्णपदक मिळवलं होतं.

सचिन मूळचा सांगलीतल्या आटपाडीमधल्या करगणी गावचा रहिवासी आहे. तर पुण्यात आझम कँपस इथे तो सराव करतो.

त्याचा जन्म 23 ऑक्टोबर 1989 रोजी झाला. तो लहान असतानाच आईचं निधन झालं. शाळेत असताना सायकलच्या अपघातात त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. गँगरीनही झालं आणि हात पुढे निकामी झाला.

अपंगत्व आलं तरी सचिननं कधीच हार मानली नाही आणि वडिलांच्या पाठिंब्यानं त्यानं खेळ आणि अभ्यास या दोन्हीत यश मिळवलं.

त्यानं मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली असून MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन कतो.

2015 साली सचिनला पहिल्यांदा पॅरा खेळांची माहिीत मिळाली. 2019 पासून तो पूर्णवेळ खेळाडू बनला आहे.

सचिननं कमावलेलं पदक हे पॅरिसमध्ये भारताचं अ‍ॅथलेटिक्समधलं एकूण अकरावं पदक ठरलं आहे. त्याआधी मंगळवारी अ‍ॅथलीट्सनी भारताच्या पदकांमध्ये पाच पदकांची मोठी भर टाकली होती.

दीप्ती जीवनजीला कांस्य (3 सप्टेंबर)

भारताच्या दीप्ती जीवनजीनं पदार्पणातच पदक कमावलं. तिनं महिलांच्या 400 मीटर T20 शर्यतीत कांस्यपदक जिंकलं.

बौद्धिक विकलांगतेवर मात करत दीप्तीनं हे यश कमावलं आहे. याआधी एशियन पॅरा गेम्समध्ये तिनं स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. तर यंदा जागतिक स्पर्धेदरम्यान तिनं विश्वविक्रमाला गवसणी घालत सुवर्णपदक मिळवलं होतं.

दीप्ती जीवनजी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दीप्ती जीवनजी

पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात भारताच्या शरद कुमारनं रौप्यपदक मिळवलं. त्यानं 1.88 मीटर उडी मारली आणि पॅरालिंपिकमध्ये या प्रकारातला विक्रमही रचला. टोकियोमध्ये शरदनं कांस्यपदक जिंकलं होतं.

तर याच प्रकारात मरियप्पन थंगावेलूनं 1.85 मीटर उडी मारत कांस्यपदक जिंकलं. मरियप्पनचं हे पॅरालिंपिक स्पर्धांमधलं तिसरं पदक ठरलं आहे. याआधी टोकियोमध्ये त्यानं रौप्यपदक मिळवलं होतं तर रिओ पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.

पुरुषांच्या जॅवलीन थ्रो म्हणजे भालाफेक F46 प्रकारातही दोन भारतीयांनी पोडियमवर स्थान मिळवलं. या प्रकारात अजीत सिंगनं 65.62 मीटरवर भालाफेक करत रौप्यपदक कमावलं तर सुंदर सिंग गुर्जरनं 64.96 मीटरवर भालाफेक करत कांस्यपदकाची कमाई केली.

सुमित अंतिलची सुवर्ण कमाई (2 सप्टेंबर)

भारताच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या जॅवलिन थ्रो F64 प्रकारात 70.59 मीटरवर भालाफेक केली आणि सुवर्णपदक मिळवलं.

यादरम्यान त्यानं स्वतःचाच पॅरालिंपिकमधला 69.55 मीटरवर भालाफेकीचा विक्रम तीनदा मोडला.

टोकियो पॅरालिंपिकमध्येही सुमितनं सुवर्णपदक जिंकलं होतं. सलग दोन पॅरालिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्णकमाई करत इतिहास रचला.

सुमित अंतिल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुमित अंतिल

पॅरिसमध्ये सुमित भारताचा ध्वजवाहकही होता.

सुमित हरियाणातल्या सोनीपतचा असून कोचिंग क्लासवरून येत असताना वाटेत झालेल्या अपघातात त्यानं आपला पाय गमावला होता.

त्याआधी सुमित कुस्ती खेळायचा, पण उदयोन्मुख पैलवान म्हणून त्याची कारकीर्द पाय गेल्यावर थांबली.

आपल्या गावातला पॅरा-खेळाडू राजकुमारला भेटल्यावर सुमितला नवं ध्येय सापडलं. वेदना आणि अडचणींवर मात करून सुमितनं पॅरा-खेळाडू म्हणून स्वतःला घडवलं आहे.

त्यानं स्वतःचाच विश्वविक्रम आजवर चारवेळा मोडला आहे. हांगझू एशियन पॅरा गेम्समध्ये सुमितनं 73.29 मीटरवर भालाफेक केली होती. एखाद्या पॅरा खेळाडूनं भालाफेकीत नोंदवलेली ती आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.

आता त्याच्या यशाला पॅरालिंपिकमधल्या दोन सुवर्णपदकांनी नवी झळाळी चढवली आहे.

शीतल देवी आणि राकेश कुमारला कांस्य (2 सप्टेंबर)

भारताची युवा तिरंदाज शीतल देवी आणि अनुभवी राकेश कुमार या जोडीनं कंपाउंड तिरंदाजीच्या मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

या दोघांनी कांस्य पदकासाठीच्या लढतीत एलिओनोरा सार्ती आणि मॅटेओ बोनाचिना या इटलीच्या जोडीला 156-155 असं हरवलं.

शीतल देवी आणि राकेश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शीतल देवी आणि राकेश कुमार

अवघ्या 17 वर्षांच्या शीतलनं पॅरालिंपिकचं पदक जिंकून आपलं नाणं किती खणखणीत आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

नितेश कुमारला सुवर्ण (2 सप्टेंबर)

भारताचा बॅडमिंटनपटू नितेश कुमारनं पॅरिस पॅरालिंपिकमध्ये तिरंगा फडकावला.

नितेशनं पुरुष एकेरीत SL3 प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानं फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनच्या बेथेल डॅनियलवर मात केली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात नितेशनं अखेर 21-14, 18-21, 23-21 असं यश मिळवलं.

नितेश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नितेश कुमार

नितेश पॅरा बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारामध्ये जागतिक क्रमवारीतही सध्या अव्वल स्थानावर आहे.

30 डिसेंबर 1994 रोजी जन्मलेला नितेश हरियाणाचा रहिवासी आहे आणि IIT मंडी इथून त्यानं इलेक्ट्रिकल इंजिनियरींगची पदवीही घेतली आहे.

तो लहान असताना फुटबॉलही खेळत असे. पण 2009 साली एका अपघातानंतर त्याच्या पायात कायमचं अपंगत्व आलं. IIT मंडीमध्ये असताना त्याला बॅडमिंटनची गोळी लागली.

तो अभ्यासातून विश्रांती म्हणून इतर शरिरानं सक्षम असलेल्या खेळाडूंसोबत बॅडमिंटन खेळत असे.

शारिरीकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी एका कॉन्फरन्समधून त्याला पॅरास्पोर्ट्सची माहिती मिळाली. 2016 पासून तो पॅरा बॅडमिंटन स्पर्धांत सहभागी होतो आहे.

पॅरा एशियन गेम्समध्ये नितेशनं मिश्र दुहेरी आणि पुरुष एकेरीत पदकं कमावली होती.

सुहास यतिराज, तुलसीमतीला रौप्य तर मनिषाला कांस्य (2 सप्टेंबर)

भारताच्या सुहास यतिराजनं पॅरालिंपिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL4 प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आणि इतिहास घडवला.

सुहास यतिराज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुहास यतिराज

सुवर्णपदकासाठीच्या लढतीत फ्रान्सच्या लुका मझुरकडून 9-21, 13-21 असा पराभव झाल्यानं सुहासला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

सलग दुसऱ्या पॅरालिंपिकमध्ये सुहासनं रौप्यपदक मिळवलं आहे. अशी कामगिरी बजावणारा तो एकमव भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू ठरला आहे.

तुलसीमती आणि मनिशा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तुलसीमती आणि मनिशा

तर बॅडमिंटन महिला एकेरीत SU5 वर्गात तुलसीमती मुरुगेशननं रौप्यपदक मिळवलं. याच प्रकारात मनिशा रामदासनं कांस्यपदकाची कमाई केली.

बॅडमिंटनमध्येच नित्या श्री सिवाननं भारताला आणखी एक कांस्यपदक मिळवून दिलं. अवघ्या 19 वर्षांच्या नित्यानं महिला एकेरीत SH6 गटात कांस्यपदकाच्या लढतीत विजय साजरा केला.

योगेश कथुनियाला रौप्यपदक (2 सप्टेंबर)

डिस्कस थ्रो म्हणजे थाळीफेक स्पर्धेत F56 प्रकारात योगेश कथुनियानं रौप्यपदक पटकावलं. आपल्या पहिल्याच प्रयत्नात योगेशनं 42.22 मीटर अंतरावर थाळीफेक केली.

27 वर्षीय योगेशनं याआधी टोकियो पॅरालिंपिकमध्येही याच प्रकारात रौप्यपदक पटकावलं होतं.

योगेश कथुनिया, पॅरिस पॅरालिंपिकदरम्यान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, योगेश कथुनिया, पॅरिस पॅरालिंपिकदरम्यान

9 वर्षांचा असताना योगेशला गियान- बारे सिंड्रोम (Guillain-Barre syndrome) नामक दुर्धर ऑटोइम्युन आजारानं ग्रासलं. या आजारात स्नायू कमजोर होत जातात आणि त्यातून पुढे पॅरालिसिसही होऊ शकतो.

योगेश लहानपणापासून व्हिलचेअरवरच आहे. त्याला मदत व्हावी आणि त्याच्या स्नायूंची ताकद वाढवता यावी यासाठी त्याच्या आईनं, मीना देवीनं फिजियोथेरपी शिकून घेतली. तर योगेशचे वडील भारतीय लष्कराच्या सेवेत आहेत.

योगेशनं दिल्लीच्या प्रतिष्ठिक किरोईमल कॉलेजातून कॉमर्सची पदवीही घेतली आहे. पॅरालिंपिकच्या दोन रौप्यपदकांशिवाय त्यानं पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही तीन पदकं कमावली आहेत.

निषाद कुमारला रौप्य (1 सप्टेंबर)

भारताच्या निषाद कुमारनं अ‍ॅथलेटिक्समध्ये उंच उडीच्या T47 प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. त्यानं 2.04 मीटर उंच उडी मारत हे पदक निश्चित केलं.

निषादनं सलग दुसऱ्यांदा पॅरालिंपिकचं रौप्यपदक पटकावलं आहे. याआधी टोकियो पॅरालिंपिकमध्ये निषादनं 2.06 मीटरवर उडी मारत रौप्यपदक मिळवलं होतं.

निषाद कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निषाद कुमार

प्रीती पालला एकाच पॅरालिंपिकमध्ये दुसरं पदक (1 सप्टेंबर)

भारताच्या प्रीती पालनं पॅरिस पॅरालिंपिकमध्ये दुसरं पदक मिळवलं. अशी कामगिरी बजावणारी प्रीती भारताची पहिली ट्रॅक अँड फील्ड अ‍ॅथलीट ठरली.

महिलांच्या 200 मीटर - T35 धावण्याच्या शर्यतीत प्रीतीनं कांस्यपदकाची कमाई केली. याआधी तिनं 30 ऑगस्टला महिलांच्या 100 मीटर - T35 शर्यतीत कांस्यपदक मिळवलं होतं.

प्रीतीनं जिंकलेलं पदक हे पॅरिस पॅरालिंपिकमधलं भारताचं सहावं पदक ठरलं.

प्रीती पाल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रीती पाल

उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या 24 वर्षीय प्रीतीला जन्मानंतर अनेक शारिरीक अडचणींचा सामना करावा लागला.

जन्मानंतर सहा दिवस तिचे पाय प्लास्टरमध्ये होते. पायातली ताकद वाढवण्यासाठी तिला अनेक उपचार करावे लागले.

अनेकांना ती जगू शकेल की नाही अशी शंकाही वाटली होती. पण आपण हार मानणारी नसल्याचं प्रीतीनं दाखवून दिलं.

17 वर्षांची असताना सोशल मीडियावर पॅरालिंपिक विषयी माहिती मिळाल्यावर ती खेळांकडे वळली. आर्थिक अडचणींचा सामना करत प्रीतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली.

मागच्या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रीतीला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण यंदा पॅरा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिनं दोन 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतींमध्ये पदकं मिळवली. आता पॅरालिंपिकमध्येही तिनं पदकाची कमाई केली आहे.

रुबिना फ्रान्सिसला कांस्यपदक (31 ऑगस्ट)

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये शनिवारी (31 ऑगस्ट) रुबिना फ्रान्सिसनं शूटिंगमध्ये कांस्य पदक मिळवलं.

रुबिनानं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात SH1 इव्हेंटच्या फायनलमध्ये हे पदक पटकावलं.

याआधी टोकियो पॅरालिंपिकमध्ये रुबिनानं सातवं स्थान मिळवलं होतं. तर पॅरा एशियन गेम्समध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.

रुबिना फ्रान्सिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रुबिना फ्रान्सिस.

मध्य प्रदेशातील जबलपूरच्या रुबिनानं असंख्य आव्हानांवर मात करत शूटिंगमध्ये शिखर गाठलं आहे. मध्यमवर्गात जन्मलेल्या रुबिनाला पायातील समस्येमुळं अडथळ्यांचा सामना करावा लागला.

तिचे वडील सिमॉन फ्रान्सिस एक मेकॅनिक आहेत. आर्थिक अडचणींना तोंड देत ते रुबिनाच्या नेमबाजीच्या प्रवासात तिच्या पाठीशी उभे राहिले.

नेमबाजीतील रुबिनाचा प्रवास 2015 मध्ये सुरू झाला. गगन नारंग यांच्या ऑलिंपिकमध्ये केलेल्या कामगिरीमुळं तिला प्रेरणा मिळाली. 2017 मध्ये ती पुण्यातील ग्लोरी अकॅडमी (Glori Academy)मध्ये दाखल झाली.

रुबिना फ्रान्सिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रुबिना फ्रान्सिस

एम पी शूटिंग अकॅडमीमध्ये तिची निवड झाली. तिथे ख्यातनाम प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यातील कौशल्यं आणखी बहरलं.

2018 चा फ्रान्स वर्ल्ड कप तिच्या करियरसाठी महत्त्वाचा ठरला. तिथेच रुबिनाला पॅरालिंपिकमध्ये स्थान मिळवण्याचं महत्त्व समजलं. त्यानंतर तिनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य पदकं जिंकली. जागतिक विक्रमही केले.

अवनी लेखराला सुवर्ण, मोना अगरवालला कांस्य (30 ऑगस्ट)

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये 30 ऑगस्ट रोजी भारतानं एकाच दिवसात चार पदकांची कमाई करत दणक्यात सुरुवात केली.

सर्वात आधी रायफल नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अगरवाल यांनी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं.

अवनी
फोटो कॅप्शन, अवनी आणि मोना, पॅरिसमध्ये विजय साजरा करताना

महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्टँडिंग SH1 नेमबाजीमध्ये अवनीनं सुवर्पणदकाची कमाई केली. तर मोना अगरवालनं याच स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं.

टोकियो पॅरालिंपिकमध्येही अवनीनं नेमबाजीच्या याच प्रकारात दोन सुवर्णकमाई केली होती. पॅरिसमध्येही तिनं आपलं पॅरालिंपिक विजेतेपद कायम राखलं आहे.

अवनी मूळची जयपूर शहरात राहणारी आहे. तिने कायद्याचे शिक्षण घेतलं आहे.

2012 मध्ये झालेल्या एका कार अपघातानंतर ती स्पायनल कॉर्डसंदर्भातील एका आजाराने ग्रस्त आहे.

या अपघातानंतर अवनी केवळ व्हिलचेअरनेच चालू शकते. पण ती थांबली नाही. शूटिंगसाठी तिने आपल्या प्रयत्नांत सातत्य राखलं.

अवनी लेखरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अवनी लेखरा

साधारण 2015 पासून अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला. जयपूरमधील जगतपूरा क्रीडा संकुलात अवनी सराव करत होती.

अवनीने क्रीडा क्षेत्रात जावं ही तिच्या वडिलांची इच्छा होती. सुरुवातीला अवनीने शूटींग आणि तिरंदाजी दोन्हीसाठी प्रयत्न केला.

पण तिला शूटिंगमध्ये अधिक रस होता. अभिनव बिंद्रा यांच्या कामगिरीमुळे तिला प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते.

अनेक अडचणींवर मात करत अवनी लेखरानं टोकियो पॅरालिंपिकमध्ये दोन पदकं मिळवली, ज्यात एका सुवर्णपदकाचा समावेश होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिलाही ठरली.

मोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोना अगरवाल

तर मोना अगरवाल ही पॅरा शूटिंगमधली भारताची उगवती तारका आहे, पण भारतातल्या पॅरा-स्पोर्टसाठी मोनाचं नाव नवं नाही.

राजस्थानच्या सिकरमध्ये जन्मलेल्या मोनाला ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना पोलियोनं ग्रासलं होतं. त्यामुळे मोनाचे दोन्ही पाय निकामी झाले.

पण या अडचणींनंतरही तिनं शिक्षण पूर्ण केलं आणि मानसशास्त्रात पदवी घेतली. 23 वर्षांची असताना ती स्वतंत्रपणे राहू लागली. HR आणि मार्केटिंगमध्ये नोकरीही करत होती.

2016 पासून तिनं पॅरा अॅथलेटिक्सकडे लक्ष वळवलं. तिनं अॅथलेटिक्स आणि पावरलिफ्टिंगमध्ये पदकं मिळवली तसंच ती पॅरा व्हॉलीबॉलही खेळायची.

डिसेंबर 2021 मध्ये मोनानं नेमबाजीची सुरुवात केली. गेल्या अडीच वर्षांत अवनीनं पॅरा नेमबाजीत विश्वचषकात आणि आशियाई पॅरा गेम्समध्येही पदकं मिळवली. आता पॅरिस पॅरालिंपिकमध्येही तिनं कांस्यपदक मिळवलं आहे.

मनीष नरवालला रौप्यपदक

मनीष नरवालनं 10 मीटर एयर पिस्टल SH 1 प्रकारात रौप्य पदक जिंकलं. मनीषचं हे पॅरालिंपिक स्पर्धांमधलं दुसरं पदक आहे. याआधी टोकियो पॅरालिंपिकमध्ये त्यानं मिश्र पिस्टल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकलं होतं.

मनीष नरवाल, पॅरिसमधल्या रौप्यपदकासह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनीष नरवाल, पॅरिसमधल्या रौप्यपदकासह

मनीष मूळचा हरियाणाच्या बल्लबगढचा असून जन्मापासूनच त्याच्या उजव्या हातात अपंगत्व आहे. अगदी सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला.

पण 2016 मध्ये एका शूटिंग रेंजवर गेला असताना तो या खेळाच्या प्रेमात पडला. कोच जय प्रकाश नौटियाल यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषनं 2017 साली बँगकॉक वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केलं आणि 10 मीटर एयर पिस्टल SH 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.

ज्युनियर आणि सीनियर स्तरावर त्यानं अनेक विक्रम नोंदवले आहेत.

प्रीती पालला कांस्यपदक

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात प्रीती पालनं भारताचं पदकांचं खातं उघडलं. प्रीतीनं महिलांच्या 100 मीटर - T35 शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली.

प्रीती पाल, पॅरिसमध्ये पदक जिंकल्यावर तिरंग्यासह आनंद साजरा करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रीती पाल, पॅरिसमध्ये पदक जिंकल्यावर तिरंग्यासह आनंद साजरा करताना

शीतल देवीचा विक्रम (29 ऑगस्ट)

एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या शीतल देवीनं पॅरिस पॅरालिंपिकमध्ये सुरुवातीलाच लक्षवेधक कामगिरी बजावली.

गुरुवारी झालेल्या कंपाऊंड तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये शीतलनं 697 गुणांचा वर्ल्ड रेकॉर्ड मागं टाकला.

शीतल देवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शीतल देवी

शीतलनं 703 गुणांची कमाई केली, पण तुर्कियेच्या गिर्डीनं तिलाही मागे टाकत 704 गुणांचा नवा विक्रम रचला.

त्यामुळे शीतलला दुसरं स्थान मिळालं आणि पॅरालिंपिकमध्ये तिच्याकडून आता पदकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रँकिंग राऊंडमधून केवळ 16 खेळाडू प्रत्यक्ष पदकाच्या लढतींमध्ये खेळू शकतात.

पॅरिस पॅरालिंपिकचं दिमाखात उदघाटन (28 ऑगस्ट)

पॅरिस 2024 पॅरालिम्पिक खेळांची सुरुवात एका नेत्रदीपक उद्घाटन समारंभाने झाली.

गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव आणि भालाफेकपटू सुमित अंतिल हे पॅरालिंपिकच्या उदघाटन सोहळ्यात हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते.

या पॅरालिम्पिकमध्ये 180 हून अधिक देशांच्या टीम्स खेळणार असून भारत 12 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होईल.

त्यासाठी यंदा 84 खेळाडूंचं पथक भारताने पाठवलं असून, आजवरचं पॅरालिंपिकमधलं भारताचं हे सर्वात मोठं पथक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)