पॅरिस 2024 : विकलांगतेवर मात करत मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंचा सर्वात मोठा सोहळा

टोकियो पॅरालिंपिकमधल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतलं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टोकियो पॅरालिंपिकमधल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतलं दृश्य
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ऑलिंपिकनंतर पॅरिसमध्ये आता 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.

त्यामध्ये 184 देशांचे सुमारे 4,400 खेळाडू सहभागी होतील आणि एकूण 22 क्रीडाप्रकारांत 549 सुवर्णपदकांसाठी लढत रंगेल.

पॅरिसनं आजवर तीनदा ऑलिंपिकचं आयोजन केलं होतं, पण या शहरात पहिल्यांदाच पॅरालिंपिक क्रीडास्पर्धा भरवल्या जातायत.

पॅरालिंपिकची सुरुवात कशी झाली? यंदाचं पॅरालिंपिक कसं असेल, आणि भारतीय पथकामध्ये कुणावर नजर राहील, जाणून घ्या.

पॅरालिंपिक स्पर्धेचा इतिहास

पॅरालिंपिक म्हणजे पॅरा-ऑलिंपिक. या शब्दात पॅरलल अर्थात समांतर हा शब्द दडला आहे. ऑलिंपिकच्या धर्तीवर समांतर पातळीवर आयोजित होणारी स्पर्धा असं या स्पर्धेचं स्वरुप असतं.

सर लुडविग गटमन या डॉक्टरांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा पॅरालिंपिक साकारलं.

नाझी जर्मनीतून डॉक्टर गटमन इंग्लंडला आले होते आणि त्यांनी स्टोक मँडव्हिल रुग्णालयात मणक्याच्या दुखापतींकरता विभाग सुरू केला होता.

लुडविग गटमन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लुडविग गटमन

1948 साली स्टोक मँडव्हिल गेम्स नावानं त्यांनी खेळांचं आयोजन केलं. दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेले काही सैनिकही त्यात खेळले. यात 16 पुरुष खेळाडूंसह काही महिला खेळाडूंचाही समावेश होता.

या स्टोक मँडविल गेम्सनी 1960 साली व्यापक आंतरराष्ट्रीय रूप घेतलं आणि ती पहिली पॅरालिंपिक क्रीडास्पर्धा म्हणून गणली जाते.

रोम इथं झालेल्या या पहिल्या पॅरालिंपिकमध्ये 23 देशांचे 400 खेळाडू सहभागी झाले होते.

1989मध्ये द इंटरनॅशनल पॅरालिंपिक कमिटीची स्थापना करण्यात आली. तर 1988 पासून पॅरालिंपिक स्पर्धा ऑलिंपिकचं यजमानपद असलेल्या शहरातच ऑलिंपिक झाल्यावर लगेच काही आठवड्यांच्या अंतरानं भरवल्या जाऊ लागल्या.

पॅरिसच्या आर्क द ट्रायॉम्फवर लावलेला पॅरालिंपिकचा लोगो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरिसच्या आर्क द ट्रायॉम्फवर लावलेला पॅरालिंपिकचा लोगो

पॅरालिंपिक स्पर्धेच्या बोधचिन्हात लाल, निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे. हे चिन्ह लॅटिनमध्ये अगितो म्हणून ओळखलं जातं आणि त्याचा अर्थ आहे 'आय मूव्ह' म्हणजे मी चालतो/चालते असा अर्थ होतो.

पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय निकष असतात?

पॅरालिंपिकमध्ये खेळाडू त्यांच्या शरीरातील इंपेअरमेंट अर्थात अपंगत्वानुसार वेगवेगळ्या खेळांत सहभागी होतात.

पॅरालिंपिक स्पर्धेत अपंगत्वाच्या दहा विविध स्वरुपांचा विचार केला जातो. त्यात तीन मुख्य प्रकार आहेत. फिजिअल इंपेअरमेंट (शारीरिक अपंगत्व), व्हिजन इंपेअरमेंट (दृष्टी अपंगत्व) आणि इंटलेक्च्युअल इंपेअरमेंट (बौद्धिक अपंगत्व).

काही खेळ सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंना खेळता येतात मात्र काही खेळ विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतात. सर्व खेळाडूंना जिंकण्याची समान संधी असावी यादृष्टीने काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.

गाईड रनरसोबत धावणारे स्पर्धक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरालिंपिकमध्ये गाईड रनरसोबत धावणारे दृष्टीहीन स्पर्धक

प्रत्येक प्रकारात, खेळाडूंच्या शारीरिक अपंगत्वाची पाहणी केली जाते. तसंच त्यांना खेळताना मदत व्हावी यासाठी काही सुविधा देण्यात येतात.

उदाहरणार्थ दृष्टीनं अधू असलेले धावपटू गाईड रनरच्या साथीनं धावतात.

व्हिज्युअली इंपेअर्ड सायकलपटूंना गाईडच्या बरोबरीने मार्गक्रमण करतात. त्यांना पायलट म्हटलं जातं.

व्हिज्युअली इंपेअर्ड जलतरणपटूंच्या मदतीसाठी टॅपर्स असतात. पोहताना कधी वळायचं किंवा शर्यतीचा शेवट झाला आहे हे सांगण्यासाठी टॅपर त्यांच्या डोक्यावर किंवा शरीराच्या भागाला स्पर्श करून सांगतात.

पॅरालिंपिकचा उदघाटन सोहळा

28 ऑगस्टला पॅरिसमध्ये पॅरालिंपिकचा उदघाटन सोहळा रंगणार आहे. ऑलिंपिकप्रमाणे पॅरालिंपिकमध्येही अ‍ॅथलीट परेडचं आयोजन स्टेडियमबाहेर शहरातल्या रस्त्यांवर केलं जाणार आहे.

शाँप्स एलिझे या पॅरिसमधल्या प्रसिद्ध रस्त्यावरून प्लेस द ला काँकॉर्ड या चौकापर्यंत ही परेड रंगेल.

ऑलिंपिकचं आयोजन ज्या ठिकाणी केलं होतं, त्यातल्याच बहुतांश स्टेडियम्स आणि मैदानांमध्ये पॅरालिंपिकचं आयोजन होणार आहे.

पॅरालिंपिकमध्ये कोणत्या टीम्स सहभागी होतील?

पॅरा-खेळांचं महत्त्व गेल्या काही दशकांत वाढलं असून जगभरातून अधिकाधिक खेळाडू यात सहभागी होत आहेत.

पॅरालिंपिकमधली धावण्याची स्पर्धा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरालिंपिकमधली धावण्याची स्पर्धा

1996 साली अटलांटा पॅरालिंपिक गेम्समध्ये 104 देश सहभागी झाले होते. 2012 साली लंडन पॅरालिंपिकमध्ये विक्रमी 164 देश सहभागी झाले. त्यानंतर रिओ 2016 मध्ये 159 तर टोकियो 2020 पॅरालिंपिकमध्ये 162 देश सहभागी झाले. त्यावेळी काही टीम्सना कोव्हिडच्या साथीमुळे माघार घ्यावी लागली होती.

यावेळी 180 हून अधिक देशांच्या टीम्स पॅरालिंपिकमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

ऑलिंपिकप्रमाणे या स्पर्धेतही रेफ्युजी संघ सहभागी होणार आहे.

रशिया आणि बेलारूसचं काय?

रशियानं 2022 साली युक्रेनवर आक्रमण केल्यापासून रशिया आणि मित्रराष्ट्र बेलारूसचं ऑलिंपिकप्रमाणेच पॅरालिंपिकमधूनही निलंबन करण्यात आलं आहे.

त्यानंतर बीजिंग विंटर पॅरालिंपिकमध्ये या देशांच्या खेळाडूंना सहभागी होता आलं नव्हतं. पण यावेळेस रशिया आणि बेलारूसचे खेळाडू तटस्थ स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतील.

पॅरालिंपिकमध्ये भारत

ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक सुवर्णपदकासाठी 2008 सालापर्यंत वाट पाहावी लागली होती.

पण पॅरालिंपिकमध्ये मात्र स्पर्धा सुरू झाल्यावर बाराच वर्षांनी म्हणजे 1972 मध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळालं होतं.

त्या वर्षी जर्मनीच्या हायडेलबर्गमध्ये झालेल्या पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी जलतरणात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

पॅरिस पॅरालिंपिकला जाणाऱ्या भारतीय पथकातले खेळाडू

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पॅरिस पॅरालिंपिकला जाणाऱ्या भारतीय पथकातले खेळाडू
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पॅरालिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये भारतानं आजवर (2024 पर्यंत) 9 सुवर्ण, 12 रौप्य आणि 10 कांस्य अशी एकूण 31 पदकं मिळवली आहेत. त्यातली 19 पदकं मागच्या पॅरालिंपिकमध्ये म्हणजे टोकियोत कमावली होती.

टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारतानं 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य अशी विक्रमी कमाई केली होती.

यावेळी भारत 25 पदकांचा आकडा पार करेल असा विश्वास भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष आणि माजी भालाफेकपटू देवेंद्र झाझडिया यांनी मांडला आहे.

यंदा पॅरालिंपिकसाठी भारत आजवरचं सर्वात मोठं पथक पाठवणार आहे. भारतीय पथकात 84 खेळाडूंचा सहभाग असून एकूण 12 क्रीडाप्रकारांत हे खेळाडू सहभागी होतील.

त्यात नेमबाज अवनी लेखरा, तिरंदाज शीतल देवी बॅडमिंटनपटू मानसी जोशी या भारताच्या स्टार खेळाडूंचाही समावेश आहे.

उदघाटन सोहळ्यात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि महाराष्ट्रातल्या नांदेडची गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील असं भारतीय पॅरालिंपिक समितीनं जाहीर केलं आहे.

या स्पर्धेत भाग्यश्रीशिवाय सुयश जाधव (जलतरण), दिलीप गावित (धावपटू), सुकांत कदम (बॅडमिंटन) ज्योती गडेरिया (पॅरा सायकलिंग), स्वरुप उन्हाळकर (नेमबाजी) या महाराष्ट्राच्या खेळाडूंवरही नजर राहील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)