पॅरिस ऑलिंपिक : सहा पदकं आणि सहावेळा चौथं स्थान; थोडं शल्य, थोडं समाधान

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनायक दळवी
- Role, बीबीसी मराठीसाठी पॅरिसहून
“हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेणे” हे काय असतं हे मी पॅरिसला प्रत्यक्षात पाहिलं.
ही आहे भारताच्या काही शिलेदारांची पदकाच्या “जवळ आणि दूर” अशी कहाणी.
मनू भाकर शॅतरूच्या शूटिंग रेंजवर पाचव्या फेरीनंतर पहिल्या स्थानावर येते काय आणि नंतरच्या फेरीतील दोन चुकांमुळे सुवर्ण, रौप्य पदक जाऊद्या पण कांस्य पदकासाठीही ‘शूट ऑफ’साठी उभी रहाते... सारंच मतीगुंग करणारं होतं.
दोन दिवसांपूर्वी ज्या मेडल स्टॅन्डवर पदके घेतली, तो क्षणार्धात अंतर्धान पावला.
10 मीटर्स एअर रायफलमध्ये अर्जुन बबुटाचं पदक अगदी थोडक्यात निसटलं. तर स्कीट शूटिंगमध्ये महेश्वरी चौहान व अनंतजीत यांच्या चेहऱ्यावरचे हास्य अचानक अवघ्या एका गुणाने आपण कांस्य पदक गमावले तेव्हा मावळले.
व्हिक्टर अॅलेक्सनविरुद्ध उपांत्य फेरीत पूर्णपणे वर्चस्व गाजवूनही सामना गमाविणाऱ्या बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ताकद त्यानंतरच्या कांस्य पदकाच्या लढतीत संपुष्टात आली.
तिरंदाजीत अंकिता भाकत आणि धीरज यांची उपांत्य फेरीपर्यंतची झेप अचानक भरकटली आणि कांस्य पदकही हातून निसटले.
मीराबाई चानू वेटलिफ्टिंगमध्ये शेवटच्या लिफ्टला अपयशी ठरली आणि पदकाचे स्वप्नही केवळ एका गुणाने भंगले.
पदकापर्यंत पोहोचूनही चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागणे, यासारखे दु:ख नाही.


तब्बल चार वर्षांच्या मेहनतीला फळ लागता लागता अचानक यश हातून निसटून जाते, याचे हे दुःख आहेच, पण पुन्हा ऑलिंपिक पदकासाठी आणखी चार वर्ष प्रतीक्षा करावी लागणार हेही आहेच.
मनू भाकर, अर्जुन बबुटा, लक्ष्य सेन यांच्यासाठी वयाची मर्यादा अडचण ठरू शकणार नाही. मात्र अनेक भारतीय दिग्गज खेळाडूंना संधी हुकल्याचे शल्य अधिक जाणवेल.
30 वर्षीय वेटलिफ्टर मीराबाई चानूला, पुढच्या ऑलिंपिकमध्ये ती उतरू शकेल किंवा नाही याची खात्री देता येणार नाही.
तिरंदाज दीपिका कुमारी लंडन ऑलिंपिकपासूनचे भारताला तिरंदाजीत पदक मिळवून देण्याचे स्वप्न अजूनही साकारू शकली नाही.
बॉक्सिंगमध्ये गतऑलिंपिकची पदक विजेती लवलीना आणि निशांत देव उपांत्यपूर्व फेरीत बाद झाले, एकच सामना जिंकला असता, तर त्यांनाही कांस्य मिळाले असते.
त्याशिवाय विनेश फोगाटचे वजन वाढल्यामुळे हुकलेल्या किमान एका रौप्यपदकाचा विचार केला तर किमान 9 पदके मिळता मिळता अन्य कुणाच्या तरी गळ्यात पडली आहे.
ती मिळाली असती, तर हे ऑलिंपिक ऐतिहासिकच ठरले असते. पण ही झाली जर-तरची गोष्ट आणि पदक मिळाले म्हणजे सर्वोत्तम असा अर्थ काढता येत नाही.
प्रेरणादायी कामगिरी
खरंतर सहा पदकं आणि सहा ठिकाणी चौथं स्थान ही कामगिरी इतर अनेक देशांच्या पदकांच्या संख्येच्या तुलनेत, वरवर विशेष प्रभावी दिसत नाही.
पण तरीही ही आपण केलेली मोठी प्रगती म्हणावी लागेल.
या आधीच्या ऑलिंपिक मध्ये असं फारसं घडलं नव्हतं. पहिल्या फेरीतच आपले अनेक स्पर्धक गारद व्हायचे, पण यावेळी अनेकांनी उपांत्य किंवा उपांत्यपूर्व फेरी गाठली.
उपांत्य फेरीत भारतीय स्पर्धकांच्या लढती पाहण्यासाठी अन्य देशांचे क्रीडा तज्ञ देखील खास यायचे. यावरूनच भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्षेत्रात घेतली जाणारी दखल स्पष्ट होते.
दर वेळी पदके कोणत्या खेळात येतील हे काही वेळा सांगता येत नाही. गेल्या दोन ऑलिंपिक मध्ये भारतीय नेमबाजांच्या पदकांची पाटी कोरीच होती. पण यावेळी केवळ नेमबाजीतच तीन पदके मिळाली, आणि आणखी तीन पदकं हातून निसटली.

फोटो स्रोत, Getty Images
नेमबाजीतली ही प्रगती कशानं झाली? याचा विचार बाकीच्या खेळांनीही करायला हवा.
एका खेळाडूच्या यशानं किंवा फायनल गाठण्यानंही अनेक खेळाडूंना एरवी प्रेरणा मिळत असते.
उदाहरण द्यायचं झालं तर भारताचा नीरज चोप्रा याने टोकियोला सुवर्णपदक मिळवल्यानंतर भालाफेक स्पर्धेत गेल्या तीन वर्षात 80 मीटरच्या पुढे भाला फेकणारे तब्बल आठ स्पर्धक भारतात तयार झाले आहेत.
आता विनेश फोगाटने जपानच्या विश्व विजेत्याला पराभूत करणं ही गोष्ट अनेक भारतीय महिलांसाठी स्फूर्तीदायक आहे.
खरंतर जगातील सर्वोत्तम अॅथलिट सहभागी होतात, त्या ऑलिंपिकमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरणे हीच गोष्ट तुमच्या उच्च कोटीच्या क्रीडाकौशल्याची साक्ष देणारे आहे.
कारण फक्त पात्रतेसाठीही जगातील सर्वोत्तम अशा सहाव्या क्रमांकाच्या कामगिरीचा निकष लावण्यात आलेला असतो.
इथे पहिल्या क्रमांकाच्या, विश्वविक्रमधारक किंवा त्यापेक्षाही उत्तुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सहभागी होता. त्यांच्याशी स्पर्धा करता.
अशावेळी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंची ओळख जगातील सर्वोत्तम आठ किंवा दहा खेळाडूंपैकी एक अशी होत असते.

फोटो स्रोत, Getty Images
अंतिम लढतीदरम्यान तमाम प्रेक्षकांसमोर भारतीय खेळाडूंच्या नावाची घोषणा करताना, त्यांची उत्तम कामगिरी आणि वैशिष्ट्ये सांगितली जातात. संपूर्ण स्टेडियमवरचे प्रेक्षक त्यावेळी टाळ्यांनी प्रतिसाद देतात तो क्षण एखाद्या पदक प्राप्तीच्या क्षणाइतकाचा अभिमानाचा असतो.
आपला बीडचा एक वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूराचा मुलगा, अविनाश साबळे स्टिपलचेसच्या अंतिम फेरीत पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असतानाचा प्रेक्षकांचा जल्लोष मी ऐकलाय, अनुभवला.
डावपेचांच्या या शर्यतीत जोडीदार नसल्यामुळे कदाचित अविनाश एकटा पडला. पण लष्करातला हा जवान मनानं कणखर आहे आहे मी आज ना उद्या जिंकू शकतो हा विश्वास बाळग
पण आपल्या लक्ष्य सेनचे तसे नाही. जगातल्या कोणत्याही खेळाडूला पराभवाचे धक्के देण्याची क्षमता असलेला लक्ष्य एखादा गेम गमाविला की मग खचून जाताना दिसला.
तर दुसरीकडे भारतीय हॉकी संघाची जिगरबाज वृत्ती आणि बचावक्षेत्रातील हुकूमत प्रकर्षाने जाणवली.
सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकाविण्याचा पराक्रम करणाऱ्या भारतीय संघाला आता फक्त पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करू शकणाऱ्या खेळाडूंची फक्त गरज आहे.
अजून बरीच मजल बाकी
भारताने यावेळी ऑलिंपिक पोडियम पर्यंतच्या प्रवासासाठी दहा खेळ निवडून योजना आखली होती. त्या दहा खेळांतल्या खेळाडूंच्या पूर्वतयारीसाठी तब्बल 470 कोटी रुपये निधी सरकारनं उपलब्ध केला होता.
प्रत्येक खेळातील खेळाडूला मनाजोगते प्रशिक्षक, परदेशातील स्पर्धांना जाण्याची संधी आणि सोयी उपलब्ध करून दिली. याचा अर्थ यावेळी सरकार आघाडीच्या खेळाडूंना द्यायच्या निधीबाबत कुठेही कमी पडलेलं नाही.
पण आणखी बरंच काही करणं बाकी आहे. उदाहरणच घ्यायचं तर सपोर्ट स्टाफचा मुद्दा.
दरवेळी ऑलिंपिक आलं, की भारतीय पथकात एक प्रश्न उपस्थित केला जातो स्पर्धकांच्या संख्येपेक्षा सपोर्ट स्टाफ ची संख्या अधिक का?

फोटो स्रोत, Getty Images
पण अमेरिका चीन जपान इंग्लंड आणि अन्य प्रगत देशाच्या बाबतीत देखील असा प्रश्न कोणी उपस्थित करत नाही. कारण प्रत्येक खेळामध्ये आज केवळ खेळाडूच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ञांची गरज लागते.
चीन किंवा अमेरिकेचा एक खेळाडू पदक जिंकतो, तेव्हा त्याच्या मागे एक मोठी आणि सुसज्ज सपोर्ट टीम उभी असते. तशी सुसज्जता भारतालाही आणावी लागेल.
एकच उदाहरण देतो. यावेळी नेमबाजीच्या स्पर्धा पॅरिस शहरापासून तब्बल 270 किलोमीटर दूरवर होत्या. त्यामुळे तिथे भारतासह प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र स्टाफ होता. ही वेगळी व्यवस्था खेळाडूंसाठीही फायद्याची ठरली.
भविष्याचा विचार आतापासूनच हवा
कोणताही ऑलिंपिक पदकापर्यंतचा प्रवास हा अल्पकाळात योजना आखून होत नसतो. त्यासाठी दोन ते तीन ऑलिंपिक स्पर्धा दरम्यानची किंवा दहा-बारा वर्षांची प्रक्रिया असते.
या प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर मध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडता कामा नये, हेदेखील लक्षात ठेवलं गेलं पाहिजे.
त्यासाठी सरकार आणि प्रत्येक खेळाच्या क्रीडा संघटनांमध्ये वाद झाले, तर ते लवकरात लवकर संपुष्टात आणणे गरजेचे आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अगदी तळाच्या स्तरातही खेळात काम करणारे कार्यकर्ते आहेत, जे आज खेडेगावापासून शहरापर्यंत खेळाडू घडवत आहेत. पण त्या खेळाडूंची मशागत करणे तयारी करणे हे त्या त्या खेळांच्या संघटनांचे काम आहे.
यातली अनेक माणसं एकही पैशाचा मोबदला न घेता काम करीत असतात. त्यांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणे आणि त्या निधीच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवणे हे सरकारचं काम आहे.
सरते शेवटी, भारतात ऑलिंपिक आयोजनाचा विचार करण्याआधी आपण, आपले खेळाडू त्या पातळीपर्यंत पोहोचलो आहोत किंवा नाही याचा विचार आधी करणे गरजेचे आहे.
स्पर्धेच्या आयोजनावर करोडो रुपये उधळण्यापेक्षा तेच पैसे खेळाडूंवर, क्रीडा सुविधांवर आणि भारताला अधिकाधिक पदके मिळवून देतील अशा योजनांवर खर्च व्हायला हवेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)











