गरिबी, उपासमार, आजारपण आणि महागाईमुळे वृद्धांचे हाल...

- Author, रिकार्डो सेनरा
- Role, ग्लोबल पॉप्युलेशन करसपाँडंट
मेसिरेट आदिस -83 वर्षांच्या आजींचा आवाज अगदी खोलात गेला आहे. थरथरतो आहे.
त्यांच्या नाकावर लावलेल्या नळीतून ऑक्सिजन ओढून घेण्यासाठी त्या एक खोलवर श्वास घेतात आणि सांगतात, "मला आता हे सगळं सहन होत नाहीये. मला भुकेलं राहायचं नाहीये. मला थंडी वाजायला नकोय. बास आता हे सोसणं...."
आदिस आजी त्यांच्या तीन नातवंडांसह इथियोपियाची राजधानी आदिस अबाबा इथे एका छोट्या खोलीत राहतात. त्यांची मुलगी डायबेटिसमुळे गेली. ती सुद्धा विधवा होती.
नातवंडांचा नाश्ता आणि जेवण शाळेतच होतं, त्यामुळे थोडं-फार राहिलेलं अन्न आजींना त्यांच्या जेवणासाठी शिल्लक होतं. त्यांना एक वेळचंच जेवण मिळतं, तेही रोज नाही.
"आम्ही फक्त कोलो (भाजलेल्या मिश्र धान्याचा पारंपरिक इथिओपियन पदार्थ) खातो आणि पाणी पिऊन झोपतो. तेही नसतं, त्यावेळी आम्ही तसेच उपाशी झोपतो...." आदिस आजींची ही व्यथा फक्त त्यांच्या एकटीचीच नाही. उलट अशी कितीतरी उदाहरणं आहेत.
फक्त 'ती अदृश्य आहेत.'
जागतिक महागाईचा प्रश्न आणि त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी BBC ने जगभरातल्या वृद्ध स्त्री-पुरुषांशी संवाद साधला.
जगण्याच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठीची त्यांची धडपड, धर्मादाय संस्थांवर अवलंबून राहण्याचं वाढतं प्रमाण, कमालीची असुरक्षितता आणि अगतिकता या संवादातून समोर आली.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) वृद्धांच्या मानवी हक्क विभागात स्वायत्तपणे काम करणाऱ्या तज्ज्ञ क्लॉडिया मालर यांनी BBC शी बोलताना सांगितलं की, "वृद्धांसंदर्भातली वेगळी अशी माहितीच गोळा केलेली नाहीये. सपोर्टिंग सिस्टीमचा विचार करताना त्यांचे विषय मागेच राहतात, कारण ते ढळढळीत समोर दिसत नाहीत."

आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधीवर चालणाऱ्या हेल्पएज या चॅरिटी नेटवर्कने 10 देशांमध्ये केलेल्या एका अभ्यासात असं दिसतं की, जिवंत राहण्यासाठी म्हाताऱ्या माणसांना टोकाचे निर्णय घ्यावे लागतात. कोणी थेट भीक मागायला सुरुवात करतात तर कुणी रुग्णालयातले उपचार अर्धवट सोडतात.
अदिस अबाबामधल्या त्या 83 वर्षीय आजी मेसिरेट अदिस सांगतात, "तुम्हाला दिसतंय मी आजारी आहे. रुग्णशय्येवर आहे. मला मदत मिळाली नाही तर फक्त मरणाची वाट पाहणं माझ्या हातात आहे." हे सांगताना त्यांच्या थंडगार झालेल्या खोलीत एका तुटपुंजा पांघरुणाने तोंडापर्यंत अंग झाकून घेत त्या अगतिक होतात.
त्याच वेळी इथून 4000 किमी अंतरावर असलेल्या लेबननच्या राजधानीत - बैरूतमध्ये अॅलिस शोबॅनियन या 67 वर्षांच्या वृद्धा अंथरुणावर पडून अगदी तशीच अगतिकता व्यक्त करत असतात.
"मी किती वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असेल ते मी सांगू इच्छित नाही", त्या म्हणतात.
या महागाईच्या प्रश्नाचा वृद्धांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम भीषण आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
"त्यांचं नैराश्य हे मानसिक आजाराप्रमाणे नव्हे तर वयाबरोबर येणारी स्थिती म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे हे काही फार गंभीर नाही, असं समजलं जातं. पण हा पूर्णपणे दुर्लक्षिला गेलेला भयंकर प्रश्न आहे," UN च्या तज्ज्ञ क्लॉडिया मालर सांगतात.
बैरूतच्या अॅलिस शोबॅनियन या तर त्यांच्या खोलीत त्या इतर 10 जणांबरोबर राहतात. त्यांच्या दोन घटस्फोटित मुली आणि त्यांची 8 लेकरं असे एकूण 11 जण त्या खोलीत राहतात.
"आता आहे तितकी वाईट परिस्थिती कधीच नव्हती", त्या सांगतात. 2020 पासून शोबॅनियन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.

एकामागोमाग येणारी संकट मालिका
संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये 13.5 कोटी जनता भीषण उपासमारीचा सामना करत जगत होती. ती संख्या 2022 मध्ये 34.5 कोटींवर पोहोचली आहे.
आधी कोविड आणि हवामान बदल या संकटांमुळे परिस्थिती बिकट होतीच. त्यात फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अन्न, वीज आणि औषध पुरवठ्याच्या जागतिक साखळीत बाधा आली. त्यात महागाईची भर पडली.
लेबनन हा देश या युद्धाआधीच आर्थिक संकटात होता. त्यात महागाईने उच्चांक गाठला. गेल्या वर्षी महागाई निर्देशांक 372.8 टक्क्यांवर गेला.
शोबॅनियन सांगतात, "फक्त चिकनचा वास नाकात भरून घेता यावा म्हणून माझ्या नातींना चिकनच्या दुकानाजवळून चालायचं असतं."
"काल त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यांना द्यायला घरात काहीच नव्हतं. तेव्हा त्या बिचाऱ्या म्हणाल्या, चला झोपू या लवकर म्हणजे आपल्याला स्वप्नात तरी चिकन दिसू शकेल..."
शोबॅनियन यांची मुलगी देखभाल करण्याचं काम करते. त्यातून त्यांना महिना 20 डॉलर मिळतात.
"पूर्वी मी क्रोशाचे कपडे विकायचे. आता हे संकट आलंय तर विकत घेणारेच कोणी नाही. मी जे विकायचे ती आता गरजेची नाही तर मिरवायची गोष्ट आहे आणि लोकांकडे हौसेची खरेदी करायला पैसेच नाहीत." त्या सांगतात.
वृद्ध स्त्रियांना मोठा फटका
अदिस आणि शोबॅनियन यांच्यासारख्या वृद्धा या परिस्थितीत सर्वाधिक पोळल्या जात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.
"जेव्हा मोजकंच अन्न शिल्लक असतं तेव्हा घरातल्या स्त्रीनेच उपाशी राहावं, असे सामाजिक- सांस्कृतिक संस्कारच सांगतात. त्यामुळे आजही स्त्री तसंच वागते. सामाजिक असामनता आहेच. त्यामुळे आधीच स्त्रियांना कमवायची संधी कमी मिळते," हेल्पएजचे उत्पन्न सुरक्षा प्रमुख (इन्कम सिक्युरिटी) बॉब बाबा जानिअन म्हणतात.

"त्याचा परिणाम मग घरातल्या समीकरणांवर पडतोच आणि मग स्त्रियांचं घरातल्या गोष्टींवरचं नियंत्रण कमी होतं", बॉब स्पष्ट करतात.
मुलं, नातेवाईक यांची काळजी घेण्याची जबाबदारी मुख्यतः महिलांवर असते. त्या बाहेर काम करत असतील तरी बऱ्याचदा पुरुषांपेक्षा कमीच कमावतात. स्त्रिया या मोबदल्याच्या कामाव्यतिरिक्त बारिक-सारिक अखंड कामं करतच असतात.
"पे गॅप बद्दल आपण नेहमी बोलतो. पण स्त्री आणि पुरुषांच्या पेन्शनमध्येही तफावत असते," UN तज्ज्ञ क्लॉडिया मालेर सांगतात.
"स्त्रिया आणि मुलींना चांगल्या शिक्षणाची संधीच उपलब्ध करून दिली नाही तर पुरुषांएवढ्या चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता त्यांच्यासाठी कधीच निर्माण होणार नाही. या सगळ्याचा परिणाम शेवटी त्यांना मिळणारं तुटपुंजं निवृत्तीवेतन आणि इतर भत्ते अशा मदतीवर होतो," त्या म्हणतात.
पण स्त्रियाच नाही तर वृद्ध पुरुषही खूप आव्हानात्मक परिस्थितीत जगत आहेत.
'पेन्शन नसल्यामुळे या वयातही करावं लागं काम'
झैउद्दीन खिल्जी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये एका कार वर्कशॉपच्या पायरीवर बसले आहेत. दुपार सरते आहे. खिल्जींची पत्नी गेल्याच महिन्यात मरण पावली. ती गेली सात वर्षं डायलिसिसवर होती.
झैउद्दीन आता 68 वर्षांचे आहेत. पण या वयातही त्यांना काम करावं लागत आहे. कारण त्यांना पेन्शन नाही. पण गेल्या वर्षभरात त्यांचे बहुतेक ग्राहक गायब झालेत.

"एक काळ होता, जेव्हा आमच्याकडे थोडं बसायलाही दिवसभरात अजिबात उसंत मिळायची नाही. आता साऱ्या सकाळपासून मी हे एकच काम केलं आहे", खिल्जी सांगतात. त्यांच्या वर्कशॉपच्या धूळ खात पडलेल्या यंत्रांकडे त्यांचा इशारा असतो.
फेब्रुवारी 2023 मध्ये पाकिस्तानाने गेल्या 50 वर्षांतली सर्वांत प्रचंड वेगात वाढलेली महागाई अनुभवली. वर्षभरात झालेली महागाईची वाढ विक्रमी आहे.
त्याचा फटका खिल्जींसारख्यांवर थेट दिसतो आहे. आता ते वर्कशॉपच्या मागे फोल्डिंगची गादी अंथरून चक्क तिथेच झोपतात. पण हेही फार काळ टिकणारं नाही. कारण या वर्कशॉपचं भाडं गेल्या महिन्याच्या तुलनेत आता दुपटीपेक्षा अधिक वाढवलं आहे.
त्यात त्यांनी पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी काढलेलं कर्ज दिवसेंदिवस महाग होत चाललं आहे. कारण कर्जावरचे व्याजदर गगनाला भिडले आहेत.
"मी डायबेटिक आहे आणि माझ्या हृदयातही स्टेंट बसवलेला आहे. माझी किडनीसुद्धा दुखावली गेली आहे. त्यामुळे आता माझ्या औषधांचा खर्च हल्ली खूप जास्त येतो. कधीकधी मी ती औषधं घेणं टाळतो यामुळे. माझ्याकडे पैसे असतील त्या वेळी मी औषध घेतो आणि इतर वेळी घेत नाही", खिल्जी सांगतात.
इथियोपियाच्या अदिस आजींनीही त्यांच्या फुफ्फुसांच्या विकारासाठी आवश्यक म्हणून सांगितलेली औषधं विकत घेणं थांबवलं आहे.
हेल्पएजच्या संशोधनाला धरूनच या दोघांचीही परिस्थिती आहे. वाढत्या महागाईमुळे वृद्ध वैद्यकीय उपचार आणि औषधं घेऊ शकत नाहीत, असं हेल्पएजचं संशोधन सांगतं.
फूड बँकचा पहिला वापर
इथियोपिया, लेबनन आणि पाकिस्तान या विकसनशील देशांपुरता हा महागाईचा भडका मर्यादित नाही. यूकेसारख्या श्रीमंत देशातही याचा चटका बसू लागल्याचं दिसतं.
तबानी सिथोल या 74 वर्षांच्या निवृत्त नर्स साउथ लंडनमध्ये राहतात. त्यांना रोजच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी फूड बँक या स्वयंसेवी संस्थेने चालवलेल्या उपक्रमावर अवलंबून राहावं लागतं.

"माझ्यावर फूड बँकवर अवलंबून राहायची वेळ येईल असा विचारही मी केला नव्हता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. उलट जी काही थोडी-फार माझी बचत होती त्यावरून मलाच प्रश्न पडायचा की लोक कशाला ही फूड बँक वापरतात?"
"आणि आता माझ्यावर अन्नासाठी अशा रांगा लावायची वेळ आली आहे," त्यांच्या स्वयंपाकघरातल्या डब्यांकडे बोट करत त्या सुस्कारा टाकतात.
सिथोल 2019 मध्ये NHS (यूकेची राष्ट्रीय आरोग्य सेवा) मधून निवृत्त झाल्या. 'आत्ता तर कुठे आयुष्य सुरू झालंय,' असं त्यांना वाटत असतानाच महागाई गगनाला भिडली आणि सगळंच बदललं.
"कधीतरी काहीतरी चांगलं-चुंगलं खायची इच्छा व्हाययी. पण आता खायला काय आहे यापेक्षा किती आहे, पुरेसं आहे ना याचा विचार करावा लागतो."
सिथोल यांची मुलगी दोन महिन्यांची असतानाच त्यांच्या पतीचं निधन झालं. त्या एकुलत्या एका मुलीबरोबरच राहिल्या. तिच्या फोटोंनी त्यांच्या लिव्हिंग रूमच्या भिंती भरलेल्या आहेत.
"किमान मला माझी मुलगी तरी आहे. त्यामुळेच मला किमान काहीतरी परवडू शकतं."

पण अशा प्रकारे कुटुंबातील इतर व्यक्तींवर अवलंबून राहणं हे कॉमन असलं तरीही एकूण लोकसंख्येच्या वयाचा विचार करता हा चिरंतन दृष्टिकोन किंवा उपाय नक्कीच नाही.
लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये जेरंटॉलॉजी इन्स्टिट्यूचे संचालक असलेले आणि जरावैद्यकाचे संशोधक वेई यांग म्हणतात, "पुढच्या एक-दोन दशकांत यूकेमधल्या वय वर्षं 65 आणि त्यापुढील वयाच्या लोकांची संख्या दुप्पट किंवा तिप्पट होणार आहे."
"प्रत्येकाकडे कुटुंबातील तरुण सदस्य मदतीसाठी असतीलच हे शक्य नाही. सरकारने आता खरोखरच वृद्धांच्या दीर्घकालीन देखभालीसाठी निधीचे नवे मार्ग शोधायला हवेत," यांग सांगतात.
इंडिपेंडंट एजसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवर सिथोल अवलंबून आहेत. पण आणखी वाईट काळ येण्याची त्यांना सतत भीती वाटते आहे.
"दर दोन महिन्यांनी मॉर्टगेज वाढत जातंय. आता घरही सोडावं लागेल, कारण आम्हाला आता ते परवडत नाहीये."
"हे घर विकून थोडं स्वस्त घर इतरत्र पाहावं लागणार आहे. पण माझ्या मुलीच्या कामाच्या दृष्टीने तिथपर्यंतचा प्रवास अवघड असणार आहे," त्या सांगतात.
त्यांचं म्हणणं आहे की, वयोवृद्ध लोक उघडपणे बोलायला तयार नसतात.
"लाज बाळगू नका, घाबरू नका. लाजिरवाणं वाटून घेऊ नका", त्या सांगतात.
"अरेरे गरीब बिचारी! तुम्ही नर्स होतात ना, मग इथे यायची वेळ का आली....' वगैरे सुरुवातीला ऐकावं लागायचं. पण आता कोणी काही बोलत नाही. कारण आमच्याबरोबर रांगेत आता डॉक्टर, नर्स आणि शिक्षकही असतात, जे अजूनही नोकरीत आहेत आणि तरीही फूडबँकचा वापर करतात."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








