दुधाच्या किंमती वाढण्यामागे आहेत 'ही' पाच कारणं..

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चहा, कॉफी असो किंवा दही, ताक आणि पनीर.. दूध आणि दुधाचे पदार्थ हा अनेक भारतीयांच्या आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण याच दुधाच्या किंमती आता भरमसाठ वाढल्या आहेत.
फक्त पॅकेटबंद, ब्रँडेड दूधच नाही, तर सुटं दूधही महाग झालंय. तेही ऐन सणासुदीच्या दिवसांत.
दुधाच्या उत्पादनातली घट, चाऱ्याच्या वाढलेल्या किंमती, इंधन दरवाढ आणि जीएसटी अशा कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
महागाई वाढली, की त्याचा परिणाम दुधाच्या किंमतीवरही होणं स्वभाविक आहे. पण सध्या वरचेवर या दरांमध्ये वाढ होताना दिसते आहे आणि गेल्या काही आठवड्यांत बहुतांश दूध उत्पादकांनी दुधाच्या किंमती वाढवल्या आहेत.
दुधाच्या किंमती नेमक्या किती वाढल्या?
'अमूल' या देशातल्या आघाडीच्या दूधउत्पादक कंपनीनं 17 ऑगस्टपासून आपल्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करणार असल्याचं जाहीर केलं. अमूल गोल्ड 62 रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती 56 रुपये प्रति लीटर आणि अमूल ताजाचा दर 50 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.
अमूल या ब्रँडचे मालक असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (जीसीएमएमएफ) या सहकारी कंपनीनं दरवाढीविषयी मंगळवारी एक पत्रक जाहीर केलंय. त्यांचं म्हणणं आहे की, 'आम्ही साधारण 4 टक्के म्हणजे देशातल्या महागाई दरापेक्षा कमीच दरवाढ केली आहे.'
त्यानंतर मदर डेअरी या आणखी एका मोठ्या ब्रँडनंहीपासून त्यांच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली. यंदाच्या वर्षात मदर डेअरीच्या दुधाची किंमत दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.
मदर डेअरीचं फुल क्रिम मिल्क आत 61 रुपये प्रतीलिटर, टोन्ड मिल्क 51रुपये प्रतीलीटर, गाईचं दूध 53रुपये प्रतिलीटर झालं आहे.
महाराष्ट्रात गोवर्धन कंपनीचं दूधही दोन रुपयांनी महागलं आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ या ब्रँडनं तर दीड वर्षात तीनदा दूधाच्या किंमतीत वाढ केली आहे.
दुधाची दरवाढ केवळ मोठ्या ब्रँड्सपुरती नाही. राज्यात अनेक ठिकाणी सुटं दूध विकणाऱ्या विक्रेत्यांनीही किंमती वाढवल्या आहेत.
मुंबई दूध उत्पादक महासंघाने 1 सप्टेंबरपासून सुटे ताजे दूध सात रुपयांनी महाग होणार असल्याचं जाहीर केलंय.
वेगवेगळ्या शहरांमध्ये दुधाचा प्रकार आणि दर्जा यांनुसार दुधाच्या किंमती वेगवेगळ्या असल्या, तरी साधारणपणे सर्वच ठिकाणी 2 ते 7 रुपयांनी दरवाढ झाल्याचं दिसून येतंय.
दुधाच्या किमती एवढ्या का वाढल्या?
दुधाच्या उत्पादनात घट आणि उत्पादनखर्चात वाढ झाल्यानं दुधाच्या किमती वाढल्या असल्याचं मोठ्या डेअरी उत्पादकांचं म्हणणं आहे.
नेमकी यामागची कारणं काय आहेत?

फोटो स्रोत, ANI
1.दूध उत्पादनात घट
बारामती परिसरातल्या सह्याद्री डेअरीचे सचिन घाडगे यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी तीन हजार लीटर दूध जमा व्हायचं. आता बाराशे तेराशे लीटरच जमा होतंय. त्यांच्या मते लॉकडाऊनच्या काळापासूनच परिस्थिती बिकट होत गेली.
"लॉकडाऊनच्या काळात अनेकांचं नुकसान झालं. जनावरं पोसणं कठीण झालं, तशी त्यांची संख्या घटली. (दूध उत्पादक) शेतकऱ्यांना करावा लागणारा खर्चही वाढलाय. गेल्या सहा महिन्यांत तर जास्त फरक पडला आहे."
"एरवी पावसाळ्याच्या काळात दूधाचं उत्पादन खरंतर वाढतं, कारण तेव्हा हिरवा चारा उपलब्ध असतो. पण यंदा तसं दिसत नाही."
2.पशुखाद्याची कमतरता
मान्सूनच्या दिवसांत हिरवा चारा मुबलक उपलब्ध असतो. पण यंदा उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि नंतर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी गवताचं प्रमाण कमी झालंय.
मुंबईजवळ चारा पुरवणाऱ्या एका पुरवठादारानं दिलेल्या माहितीनुसार चाऱ्याचं जे 5-6 किलोचं बंडल पन्नास रुपयाला मिळायचं ते आता 70 ते 75 रुपयांना मिळतं.

फोटो स्रोत, ANI
हिरवा चारा कमी झाल्यावर पर्यायी आणि पूरक पशुखाद्याचा वापर शेतकरी करतात. पण गेल्या वर्षभरात तयार पशुखाद्याच्या किंमतींमध्येही 20 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती अमूलनं माध्यमांना दिली आहे.
3.इंधन दरवाढ
गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पशुखाद्य, दूध आणि दूधाचे पदार्थ यांच्या वाहतुकीवरील खर्चही वाढला आहे.
रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये गीर गाईंचं पालन करणारे सुनील हरपुडे सांगतात, "आमच्या गावात पशुखाद्य दूरवरून आणावं लागतं. आधीच पशुखाद्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यात वाहतुकीवरचा खर्चही मिळवला तर गाईंचं खाद्य जवळपास दीडपट महाग झालं आहे."
4.लंपी व्हायरस
गुजरात, राजस्थान पंजाब आणि ईशान्य भारतात आसाममध्येही काही ठिकाणी गुरांमध्ये लंपी व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे.
अशा प्राण्यांना अंगावर पुरळ उठतं, ताप येतो आणि त्यांचं दूधही कमी होतं. केंद्र सरकारनं त्यासाठी लसीकरणाची मोहीमही सुरू केली आहे.
5. जीएसटी
केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणांतील बदलांचाही दुधाच्या किंमतीवर परिणाम झाला असल्याचं अर्थतज्ज्ञ मदन सबनविस सांगतात.
"भारतात याआधी पाकीटबंद दुधावर जीएसटी नव्हता. पण आता पाकीटबंद दुधावरही पाच टक्के जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या दुधाच्या किमती आणि हा कर यांमुळे पाकीटबंद दुधाच्या किमती वाढल्या आहेत."
त्यांच्या मते "साधारणपणे आपल्याकडे किमतींचं समानीकरण (इक्वलायझेशन) करण्याचा प्रघात दिसून येतो. त्यामुळे पाकीटबंद दुधाच्या किंमती वाढल्या की सुट्या दुधाच्या किमतीही काही प्रमाणात वाढताना दिसतात."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









