भक्त त्याला ‘प्रेषित’ म्हणायचे, पण जवळपास 20 वर्षं तो महिलांचं शोषण, बलात्कार करत होता

- Author, आफ्रिका आय टीम
- Role, बीबीसी न्यूज
जगातल्या सर्वात मोठ्या एव्हाजेंलिकल चर्चपैकी एक असणाऱ्या चर्चचा नेता, लोकांवर आपली छाप सोडणारा धर्मगुरू अनेक वर्षं महिलांचं लैंगिक, शारीरिक शोषण करत होता.
बीबीसीने दोन वर्षं शोधपत्रकारिता करून त्याच्याबद्दलचं सत्य उघडकीस आणलं. ही त्याचीच गोष्ट.
(सूचना : यात शारीरिक शोषणाचं तसंच बलात्काराचं वर्णन आहे. ते वाचून मानसिक यातना होऊ शकतात.)
2002 साली 21 वर्षांची रे इंग्लंडमधून गायब झाली.
तिला तिच्या मित्र मैत्रिणींनी शेवटचं पाहिलं ते ब्राईटन विद्यापीठात. ती ग्राफिक डिझायनिंगचा अभ्यास करत होती. समुद्र किनाऱ्यापासून 25 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या एका घरात ती राहात होती. ती हुशार आणि लोकप्रिय होती.
“माझ्यासाठी तिचा मृत्यू झाला होता, पण मी त्याचा शोकही करू शकत नव्हते,” त्यावेळी तिची जवळची मैत्रिण असणाऱ्या कार्ला म्हणतात.
रे कुठे गेलीये हे कार्लाला माहीत होतं, पण तिच्या मित्र मैत्रिणींना सत्य सांगणं अवघड होतं. त्या आधी काही दिवस कार्ला आणि रे दोघी नायजेरियाला गेल्या होत्या.
तिथे एका गूढ धर्मगुरूला त्यांना भेटायचं होतं. हा धर्मगुरू म्हणे फक्त हातांच्या स्पर्शाने लोकांचे आजार बरे करत होता.
तो काळ्या दाढीचा, पांढऱ्या कपड्यांमधला ख्रिश्चन धर्मगुरू होता. त्याचं नाव टीबी जॉशुआ. त्याचे भक्त त्याला ‘प्रेषित’ म्हणायचे.
रे आणि कार्ला त्याच्या चर्चमध्ये गेल्या. त्या चर्चचं नाव होतं सिनोगॉग चर्च ऑफ ऑल नेशन्स (स्कोन). त्या एक आठवडा तिथे राहाणार होत्या. पण रे घरी आलीच नाही. ती जॉशुआच्या आश्रमात राहायला गेली.
“मी तिला तिथेच सोडलं,” कार्ला रडत रडत म्हणतात. “मी त्यासाठी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.”
हा आश्रम 12 मजल्यांचा होता. तिथे चर्च होतं, तसंच वरच्या मजल्यांवर राहायच्या खोल्या होत्या. तिथेच जॉशुआ आपल्या शिष्यांसह राहात असे. अनेक जिने जॉशुआच्या बेडरूममध्ये जायचे आणि तिथून ये-जा करायला तीन दरवाजे होते, तसंच तिथे आतमध्ये आरसे लावलेली गुप्त खोली होती. ती म्हणे प्रार्थना खोली होती.
खालच्या मजल्यांवर ‘क्लिनिक’ होतं. इथे काय चालायचं ते पुढे येईलच.

फोटो स्रोत, Carla Sturt
बीबीसीने 25 पेक्षा जास्त लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी जे चित्र उभं केलं ते धक्कादायक होतं.
कित्येक महिलांनी सांगितलं की जॉशुआने त्यांचं लैंगिक शोषण केलं. काही महिलांनी म्हटलं की त्यांच्यावर बंद दाराआड वारंवार बलात्कार केला गेला. काहींनी म्हटलं की या शोषणातून गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गर्भपात करायला लावला गेला.
आता रे इंग्लंडमध्ये परत आल्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या एका टुमदार गावात राहातात. त्याच्या चेहऱ्यावर हसू परतलं आहे पण त्या आपला भूतकाळ विसरू शकल्या नाहीत.
रे तब्बल 12 वर्षं नायजेरियाच्या लागोस शहरातल्या जॉशुआच्या आश्रमात होत्या.
“ही एक भयकथा आहे, तुम्ही हॉरर सिनेमात पाहाल अशी, पण ही सत्यकथा आहे,” त्या म्हणतात.
बीबीसी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था ओपन डेमोक्रसी यांनी एकत्र येत दोन वर्षं शोधपत्रकारिता केली. यात तीन खंडामधले बीबीसीचे 15 हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते.
त्यांनी व्हीडिओ रेकॉर्डिंग, कागदपत्रं शोधून काढले, रे याच्या म्हणण्याला दुजोरा देणारे प्रत्यक्ष साक्षीदार शोधले, त्यांचे हजारो तासांचे इंटरव्ह्यू रेकॉर्ड केले.
यूके, नायजेरिया, घाना, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि जर्मनीतल्या 25 हून अधिक प्रत्यक्ष साक्षीदारांनी जॉशुआच्या आश्रमात काय चालायचं याची साक्ष दिली. अगदी 2019 पर्यंत हे प्रकार घडत होते.
आम्ही सिनगॉग चर्च ऑफ ऑल नेशन्स (स्कोन)ला याबदद्ल विचारलं पण त्यांनी हे दावे खोडून काढले.
स्कोनच्या माजी सदस्यांनी आणि शिष्यांनी तिथे घडणाऱ्या गैरप्रकाराबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उठवण्यात आलं. दोन व्यक्तींना मारहाणही करण्यात आली.
जेव्हा बीबीसी आफ्रिका आयची टीम या चर्चच्या बाहेर शुटिंग करत होती तेव्हा तिथल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्याकडे व्हीडिओ मागितले. ते व्हीडिओ न दिल्यामुळे त्या सुरक्षारक्षकाने हवेत गोळीबारही केला.

बीबीसीला ज्या प्रत्यक्षदर्शींनी मुलाखती दिल्या आहेत त्यातल्या अनेकांनी आपली ओळख जाहीर न करण्याची विनंती केली आहे. त्यांना भीती आहे की त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो.
या चर्चचा सर्वेसर्वा जॉशुआ आफ्रिका खंडातल्या सर्वात प्रभावशाली धर्मगुरूंपैकी एक होता. त्याचा जून 2021 साली अचानक मृत्यू झाला. याच्या फक्त काही दिवस आधी प्रत्यक्षदर्शींपैकी एका व्यक्तीची मुलाखत रेकॉर्ड झाली होती.
त्याच्या अंत्ययात्रेला लागोसच्या रस्त्यांवर माणसांचा जणू काही पूर आला होता.
नेते आणि सेलिब्रिटी भक्त
तो जिवंत असताना दर आठवड्याला जवळपास 50 हजार लोक त्याचं साप्ताहिक प्रवचन ऐकायला यायचे. त्याच्या चर्चला सर्वाधिक परदेशी पाहुणे भेट द्यायचे.
त्याचं ग्लोबल टीव्ही आणि सोशल मीडियाचं साम्राज्य जगातल्या सर्वात यशस्वी ख्रिश्चन नेटवर्कपैकी एक होतं. जगभरातले लाखो प्रेक्षक त्याचे कार्यक्रम पाहायचे. त्याच्या यूट्यूब चॅनला कोट्यवधी व्ह्यूज होते.
हे चर्च आजही लोकप्रिय आहे. आता त्याची सर्वेसर्वा जॉशुआची पत्नी एव्हलीन आहे. आता इथे नवीन शिष्यगण आहे.
जॉशुआचा आफ्रिकेत किती प्रभाव होता याचं एक उदाहरण म्हणजे 2013 रेकॉर्ड झालेल्या नेल्सन मंडेला यांच्या मुलीच्या एका मुलाखतीत मागे ठेवलेल्या टेबलावर जॉशुआचा फोटो दिसतो.
अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटीज जॉशुआकडे आकर्षित झाले होते. आफ्रिका खंडातले कमीत कमी 9 राष्ट्राध्यक्ष जॉशुआचे भक्त होते .
जॉशुआ दानधर्मही बराच करायचा त्यामुळे अनेक जण त्याच्याकडे आकर्षित झाले पण बहुतांश लोक त्याच्या चमत्काराने त्याच्याकडे आकर्षित झाले होते.
त्याने अगदी विचारपूर्वक आखणी करून आपल्या ‘चमत्कारांचे’ व्हीडिओ बनवले होते.

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळे आजार असलेले, गंभीररित्या जखमी झालेले लोक जॉशुआकडे यायचे आणि तो त्यांच्यासाठी प्रार्थना करायचा. त्याच्या प्रार्थनेच्या ताकदीने लोक बरे झाले असा त्याचं दावा करायचं. एचआयव्ही एड्स, कॅन्सर, अंधत्व या सगळ्यातून जॉशुआने लोकांना बरं केलं असा त्यांचा दावा असायचा.
आफ्रिकन धर्मावर बातम्या करणारे पत्रकार सॉलोमन अॅशमोस म्हणतात की, “आम्ही असं कधीच काही पाहिलं नव्हतं.”
अनेक व्हीडिओमध्ये गुप्तांगाला भयानक संसर्ग झालेले पुरुष दिसायचे. तिथले फोड फुटायचे आणि अचानक जॉशुआने हात वर करताच ते संसर्ग जादूची कांडी फिरवल्यासारखे बरे व्हायचे.
काही व्हीडिओमध्ये दिवस भरलेल्या महिला दिसायच्या ज्यांना बाळाला जन्म देताना अडचण येतेय, किंवा बाळच बाहेर येत नाहीये आणि अचानक जॉशुआ त्यांच्याजवळ गेल्यावर पटकन बाळ बाहेर यायचं.
अशा व्हीडिओच्या शेवटी ते लोक स्वतःच सांगायचे की कसं जॉशुआने त्यांचं आयुष्य वाचवलं आहे.
1990 आणि 2000 च्या दशकात एव्हेन्जेलिकल चर्चने संपूर्ण युरोप आणि आफ्रिकेत जॉशुआचे असे व्हीडिओ पसरवले.
असाच एक व्हीडिओ पाहिल्यानंतर रे यांनी आफ्रिकेत जायचं ठरवलं.
“मी समलिंगी होते आणि मला तसं राहायचं नव्हतं. मला वाटलं की मी जॉशुआकडे गेले तर मला माझ्या समलिंगी आकर्षणातून मुक्त होता होईल. तो मला बरं करेल. जर त्याने माझ्यासाठी प्रार्थना केली तर मी समलिंगी राहाणार नाही.”
2000 च्या सुरुवातीला रे सारखे अनेक तरूण जॉशुआला भेटायला आपआपले देश सोडून आले. तेव्हा त्यांचा तिकिटाचा खर्च चर्च ग्रुप्स आणि ख्रिश्चन धार्मिक संस्थांनी केले.
या संस्था तरूण मुलांना चमत्कार पाहायला स्वखर्चाने लागोसला पाठवायच्या. पण एकदा चर्चचं नाव मोठं झाल्यानंतर जॉशुआ या तीर्थयात्रांचे पैसे वसूल करायला लागला.
नायजेरियाच्या बिसोला यांनी 14 वर्षं त्या आश्रमात काढली आहेत. त्या म्हणतात की पाश्चात्य देशातल्या भक्तांना आकर्षित करणं हा जॉशुआच्या धोरणांचा भाग होता.
“तो श्वेतवर्णीय लोकांचा वापर स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी करायचा.”

जॉशुआच्या जवळच्या वर्तुळात वावरणाऱ्या लोकांनी म्हटलं की या तीर्थयात्रा, टीव्हीवर प्रवचनं देणं, वर्गणी गोळा करणं, देणग्या आणि परदेशात जाऊन कार्यक्रमात हजेरी लावणं या सगळ्यात त्याने लाखो डॉलर्स कमावले.
गरिबीतून सुरुवात करून तो आफ्रिकेतला सर्वात श्रीमंत धर्मगुरू बनला. अगोमोह पॉल एकेकाळी जॉशुआचा उजवा हात समजले जायचे. त्यांनी 10 वर्षं त्या आश्रमात काढल्यानंतर ती जागा सोडली.
ते म्हणतात, “तो माणूस प्रचंड हुशार होता. त्याने जे जे केलं, त्याची धोरणीपणाने आखणी केली होती.”
व्हीडिओत दिसणारे त्याचे चमत्कार खोटे होते असं पॉल म्हणतात.
पॉल आणि इतर काही लोकांनी म्हटलं की, “जे लोक अशा चमत्कारांनी बरे व्हायचे त्यांना आधीच नाटक करण्यासाठी पैसे दिलेले असायचे, कधी कधी त्यांना आहे त्यापेक्षा जास्त त्रास होतोय असं म्हणा असं सांगितलेलं असायचं.”
कधीकधी त्या लोकांना नशेची औषधं दिलेली असायची तर कधी अशी औषधं दिली जायची ज्यामुळे त्यांना तात्पुरतं बरं वाटायचं आणि मग त्यांच्याकडून वदवून घेतलं जायचं की जॉशुआमुळे त्यांना बरं वाटलं.
काहींना खोटं सांगितलं जायचं की ते एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. नंतर त्यांना सांगितलं जायचं की जॉशुआच्या प्रार्थनेने ते बरे झाले आणि आता त्यांना एड्स नाही.
रे यांनी जेव्हा पहिल्यांदा हे चमत्कार पाहिले तेव्हा त्यांनाही हे खरेच वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून आपसूक अश्रू गळायला लागले.
मग रेची ‘निवड’ केली गेली. जॉशुआ आपल्याकडे आलेल्या भक्तांपैकी काही जणींना त्याच्या ‘शिष्य’ होण्यासाठी निवडायचा.
हे शिष्य त्याच्याबरोबर आश्रमात राहायचे. त्याची सेवा करायचे.

रेला वाटलं की ती जॉशुआकडे राहून धार्मिक गोष्टी शिकेल आणि तो तिला तिच्या समलैंगिकतेतून ‘बरं’ करेल. तो तिला लोकांना प्रार्थनेने कसं बरं करायचं हेही शिकवेल.
पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच.
“आम्हाला वाटलं आम्ही स्वर्गात आहोत पण आम्ही खरंतर नरकात होतो आणि नरकात फार वाईट गोष्टी घडल्या.”
रे यांच्यासह जॉशुआच्या 16 माजी शिष्यांनी साक्ष दिली की त्याने त्यांचं लैंगिक शोषण केलं आहे किंवा त्यांच्यावर बलात्कार केला आहे.
काहींनी म्हटलं की हे नियमितपणे, अगदी आठवड्यातून दोनदा किंवा चारदा व्हायचं.
काही जणींनी सांगितलं की त्यांच्यावर अत्याचार झाले. त्या रक्तबंबाळ झाल्या.
व्हिक्टोरिया (बदललेलं नाव) जवळपास पाच वर्षं आश्रमात होत्या. त्या म्हणतात की ज्यांचं लैंगिक शोषण व्हायचं अशा मुली जॉशुआ हेरायचा. मग त्याचे विश्वासू नायजेरियन शिष्य त्या मुलींना त्याच्या बेडरूममध्ये हजर करायचे.
व्हिक्टोरिया त्याच्या चर्चमध्ये रविवारचे धार्मिक शिक्षण वर्गात जायच्या. तिथे जॉशुआची नजर त्यांच्यावर पडली. काही महिन्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना आश्रमात पाठवलं जिथे त्यांच्यावर बलात्कार झाला.
नंतर त्यांना आश्रमात राहावं लागलं.
जॉशुआच्या विश्वासू शिष्यांवर या मुलींना जॉशुआकडे घेऊन येण्याची जबाबदारी होती. त्यापैकी एक होत्या बिसोला.
“जॉशुआने मला कुमारिका हेरून त्यांना त्याच्याकडे आणायला सांगितलं होतं म्हणजे तोच सर्वात आधी त्यांच्या संभाग करेल,” बिसोला म्हणतात.
बिसोला या मुलींना अनेकदा धमकीही द्यायच्या. त्यांच्यावरही जॉशुआने अनेकदा बलात्कार केल्याचं त्या सांगतात.
जॉशुआने आपलं लैंगिक शोषण केलं, आपल्यावर बलात्कार केला हे सांगणाऱ्या अनेक जणींनी म्हटलं की त्यांचं शोषण झालं तेव्हा त्यांचं वय 18 पेक्षा कमी होतं. या गुन्ह्याला नायजेरियात मृत्यूदंडाची शिक्षा आहे.
जेसिका कैमू आता नामिबियात पत्रकार आहेत. त्या म्हणतात जॉशुआने त्यांच्यावर बलात्कार केला तेव्हा त्या फक्त 17 वर्षांच्या होत्या.
“मी किंचाळत होते आणि तो माझ्या कानात पुटपुटत होता की लहान बाळासारखं वागणं सोडून द्यावं. मला इतका मानसिक धक्का बसला की मी रडू शकले नाही.”
त्या म्हणतात की त्या आश्रमात पाच वर्षं शिष्य म्हणून राहाताना हे वारंवार झालं.

हीच कहाणी अनेक महिलांनी बीबीसीला सांगितली आहेत. तर इतर पाच पुरुष शिष्यांनी, ज्यांना जॉशुआने अशा लैंगिक अत्याचारानंतर पुरावे नष्ट करण्याचं काम दिलं होतं, त्यांनीही दुजोरा दिला आहे.
या महिलांचे अनुभव इतके भयानक आहे की ते छापण्यासारखे नाहीत. एका महिलेने सांगितलं की तिला वारंवार नग्न करून तिच्या गुप्तांगात विविध गोष्टी घुसवण्यात आल्या. दुसऱ्या महिलेने सांगितलं की तिच्याबाबतीत हे सुरुवातीला दोनदा झालं तेव्हा ती 15 वर्षांचीही नव्हती.
“त्याने माझ्यासोबत जे केलं ते शब्दात सांगता येण्यासारखं नाहीये. त्याने मला आयुष्यभराच्या जखमा दिल्या,” त्या महिलेने म्हटलं.
अनेक महिलांनी बीबीसीला सांगितलं की जेव्हा त्यांच्यावर बलात्कार झाले त्यातून त्या गर्भवती राहिल्या. अशा महिलांना त्याच आश्रमात जबरदस्ती गर्भपात करायला लावले जायचे. या 12-मजली आश्रमात एका मजल्यावर ‘क्लीनिक’ होतं. इथे हे गर्भपात व्हायचे.
दक्षिण आफ्रिकेतल्या सिहले म्हणतात, “सगळं काही गुपचूप केलं जायचं.” सिहले आश्रमात राहात होत्या आणि त्यांचा तीनदा गर्भपात केला गेला असं त्या म्हणतात.
“ते तुम्हाला काहीतरी प्यायला द्यायचे आणि तुम्ही आजारी पडायचा. किंवा ते तुमच्या योनीमार्गात धातूचे चिमटे घुसवून तुमचा गर्भपात करायचे. ते तुमचं गर्भाशयही ओढून बाहेर काढतील अशी शक्यता असायची.”
सिहले आपल्या मुलाखतीदरम्यान पूर्णवेळ रडत होत्या. जेसिका यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. जेसिका यांनी म्हटलं की आपला पाच वेळा जबरदस्तीने गर्भपात केला.
बिसोला म्हणतात की त्यांनी ‘डझनभर’ गर्भपात पाहिले. त्या म्हणतात की कित्येकदा त्या आश्रमाच्या सर्वात वरच्या मजल्यावर जायच्या आणि तिथे रडत देवाकडे दयेची याचना करायच्या की त्याने त्यांची सुटका करावी.

फोटो स्रोत, JourneyMan Pictures
जॉशुआचे शिष्य त्याची हवी ती सेवा करायचे. त्याचं अंग मालिश करून द्यायचे, त्याचे कपडे घालून द्यायचे, तो खोलीत आला की अत्तर शिंपडायचे, जेवणाआधी त्याच्या हातात प्लास्टिकचे ग्लोव्ह्ज घालायचे म्हणजे त्याच्या हातांना जेवणाचाही स्पर्श होणार नाही.
जॉशुआचा आग्रह असायचा की त्याच्या शिष्यांनी त्याला ‘डॅडी’ म्हणावं.
गोंधळात टाकाणारी आश्रमाची इमारत
या 12 मजली आश्रमाची रचना अशी होती की कोणीही गोंधळात पडेल.
रे म्हणतात, “तो जिन्यांचा भुलभुलैया होता.”
2014 साली इथे अनेकांचे जीवही गेले होते.
इथेच एक 6 मजली गेस्ट हाऊस होतं. आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची इथे राहण्याची व्यवस्था होती. पण ही इमारत कोसळली. कमीत कमी 116 लोकांचे जीव गेले.
स्थानिक प्रशासनाच्या अहवालात म्हटलं की या इमारतेच्या पायाभरणीत चूक होती आणि इमारतीचं बांधकाम तकलादू होतं त्यामुळे इमारत कोसळली. पण या घटनेसाठी कोणालाही दोषी ठरवलं गेलं नाही.
बीबीसीने ज्यांची मुलाखत घेतली त्यापैकी काहींनी सांगितलं की प्रत्यक्षात मृतांचा आकडा अनेक पटींनी जास्त असू शकतो कारण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नायजेरियन नागरिकांची दखल कोणी घेतली नाही. हे नागरिक तिथे काम करत असत.
त्यांनी असंही म्हटलं की चर्चच्या सदस्यांनी रात्रीच्या अंधारात कोणालाही कळू न देता काही मृतदेह पुरून टाकले.
त्यांनी असं म्हटलं की जॉशुआने बचाव पथकालाही तिथे येण्यास मज्जाव केला.
संवादाच्या साधनांवर नजर
रे म्हणतात की त्या आश्रमातून सुटल्यानंतर त्यांना कळलं की त्यांचं कुटुंब आणि त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना इमेल पाठवत होते. त्यांनास आश्रमात असताना हे मेल कधीच मिळाले नाहीत.
जॉशुआ त्याच्या शिष्यांना इमेल आणि फोनचा अत्यंत मर्यादित वापर करू द्यायचा.
अगोमोह पॉल म्हणतात, “त्याला सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं असायचं, सगळे लोक त्यांच्याच नियंत्रणात असावे असं वाटायचं.”
“त्याला लोकांच्या मनावर ताबा मिळवायचा असायचा.”

जॉशुआचे शिष्य दिवसभर खडतर काम करायचे. त्यांना त्या कामाचा कोणताही मोबदला मिळायचा नाही. त्यांची झोपही पूर्ण व्हायची नाही. रात्रीच्या वेळीही हे शिष्य झोपतात तिथले लाईट चालू असायचे.
जर कोणाला परवानगीशिवाय झोप लागली किंवा डुलकी आली तर त्याची भयानक शिक्षा असायची. जॉशुआचे नियम कोणी जाणता-अजाणता मोडले तर त्याचीही शिक्षा कठोर असायची.
त्याच्या 19 माजी शिष्यांनी सांगितलं की त्यांनी अशा नियम मोडणाऱ्यांचा शारीरिक छळ होताना पाहिला आहे किंवा त्यांच्यावर हिंसक हल्ले केले जायचे.
कधी कधी या शिष्यांना स्वतःच कपडे काढून स्वतःला फटके मारून घेण्यासाठी भाग पाडलं जायचं. हे शिष्य इलेक्ट्रिक वायर्सनी किंवा घोड्याला मारण्याच्या छडीने स्वतःला मारून घ्यायचे.
अगदी सात वर्षांच्या लहान मुलांनी असे फटके स्वतःला मारून घेतल्याचं काहींनी आपल्या मुलाखतीत सांगितलं.
या आश्रमाच्या परिसराला 12 फूट उंचीच्या भिंतींचं कंपाऊंड होतं. सशस्त्र सुरक्षारक्षक तिथे पहारा देत असायचे. पण तरीही त्या आश्रमात शिष्यांनी बांधून ठेवायची ती त्यांनी टोकाची अंधनिष्ठा किंवा पराकोटीचं भय की ते पळून गेले तर जॉशुआ त्यांचं काय करेल.
रे म्हणतात, “तो एक मानसिक तुरुंग होता. एवढा मानसिक छळ सोसल्यानंतर आपण आपली सारासार विचारबुद्धी गमावून बसतो.
डॉ अलेक्झांड्रा स्टाईन युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या मानद फेलो आहेत आणि फॅमिली सर्व्हायवल ट्रस्टच्या सदस्य आहेत. हा ट्रस्ट अशा धर्मगुरूंच्या कचाट्यात सापडलेल्या लोकांसाठी काम करतो.
त्यांना अनेक स्कोन पीडित भेटलेले आहेत. त्यांनी डॉ अलेक्झांड्रा स्टाईन यांना सांगितलं की जॉशुओने त्याच्या बळींवर जबरदस्ती केली, तो त्याच्या शिष्याना स्ट्रेस, भीती, अपराधीपणा आणि लाज अशा भावनांद्वारे नियंत्रित करायचा.
रे म्हणतात की त्या मानसिक छळाने त्यांना आयुष्यभर पुरणारे मानसिक व्रण दिले आहेत.
त्या सांगतात की जॉशुआने तिला दोन वर्षांसाठी एक शिक्षा दिली ज्यात तिला आश्रम परिसर सोडून जाण्याची परवानगी नव्हती आणि आतमध्ये कोणालाही तिच्याशी बोलायला परवानगी नव्हती.
“मी पूर्णपणे एकटी पडले होते. माझं मानसिक स्वास्थ्य ढळलं होतं. मी पाच वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.”
इतक्या मानसिक तणावानंतर रे यांना वाटलं की आता पण स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे.
रे म्हणतात, “ही त्याची मोठी चूक होती. आता त्याचं माझ्या मनावर नियंत्रण नव्हतं. माझी विचारशक्ती जागृत झाली होती.”
चर्चच्या शिष्यांसोबत रे एकदा मेक्सिकोला गेल्या, तिथून बाकींच्याची नजर चुकवून पळून गेल्या.
त्यानंतर त्या कधीही जॉशुआला भेटल्या नाहीत ना त्याच्या चर्चमध्ये गेल्या.
त्यांचं आयुष्य आता फार वेगळं आहे पण त्यांना एक दुःख आहे. ज्याने त्यांच्यावर इतके अत्याचार केले त्याला कायद्याने शिक्षा झाली नाही.
“त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा होण्याआधीच तो मेला. मला या गोष्टीचं फार दुःख आहे. इतर पीडितांनाही याचं वाईट वाटत असणार.”
बीबीसीने स्कोनशी संपर्क साधून या आरोपांवर त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली नाही.
त्यांनी इतकंच म्हटलं की टीबी जॉशुआ यांच्याबाबत आधी केलेले दावे खोडसाळ आहेत.
“प्रेषित जॉशुआ यांच्यावर असे आरोप करणं नवीन नाही. पण या दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य आढळून आलेलं नाही,” त्यांनी आम्हाला लिहून पाठवलं.
(अतिरिक्त वार्तांकन मॅगी अँडरसन, येमीसी अडेगोके, इन्स वॉर्ड)
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.




