डीपसीकबाबत महत्त्वाच्या 5 प्रश्नांची 5 उत्तरं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, केली एनजी आणि ब्रॅन्डन ड्रेनॉन
- Role, बीबीसी न्यूज
"डीपसीकची निर्मिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील अभूतपूर्व आणि प्रभावी घटना आहे."
अशा शब्दात मार्क अँड्रीसेन यांनी डीपसीकचं वर्णन केलंय.
हे अँड्रीसेन कोण आहेत, तर अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील भांडवली गुंतवणूकदार आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत.
चीनचं हे नवीन कृत्रिम बुद्धिमत्तेचं मॉडेल अमेरिकेत सध्या आघाडीवर असलेल्या 'चॅट जीपीटी'इतकं चांगलं असल्याचं डीपसीकने म्हटलं आहे.
शिवाय, ते विकसित करण्यासाठी लागणारा खर्चही तुलनेनं फार कमी असल्याचा दावा करण्यात आलाय.
प्रतिस्पर्धी कंपन्या या प्रकारची अॅप, मॉडेल विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च करतात.
पण डीपसीक अॅप 60 लाख डॉलर्सपेक्षाही कमी रकमेत विकसित करण्यात आलं असल्याचा दावा या अॅपच्या संशोधकांनी केला आहे.
डीपसीक काय आहे?
डीपसीक या चिनी कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीची स्थापना हांगझाऊ या चीनमधल्या आग्नेय भागातील शहरात झाली.
कंपनी 2023 मध्ये स्थापन झाली असली तरी त्यांचं लोकप्रिय ॲप अमेरिकेत 10 जानेवारी 2025 ला लाँच झालं असल्याचं सेन्सॉर टॉवर या प्लॅटफॉर्मने सांगितलं आहे.
डीपसीकचे संस्थापक लिआंग वेनफेंग कोण आहेत?
डीपसीकला भांडवली मदत करण्यासाठी लिआंग वेनफेंग यांनी हेज या फंडाचीही स्थापना केली. त्यातून आलेल्या निधीतून डीपसीकचा अर्धा खर्च ते भागवू शकले.
वेनफेंग 40 वर्षांचे असून ते माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी एनव्हिडिया ए 100 (Nvida A100) या अमेरिकन कंपनीच्या चिपचं एक स्टोअर उभारलं होतं. एनव्हिडियाच्या चिपची चीनला निर्यात करण्यावर आता बंदी आहे.
तज्ज्ञांच्या मते, वेनफेंग यांच्याकडे जवळपास 50,000 चीप संग्रही होत्या. त्यामुळेच त्यांना डीपसीक लाँच करता आली. स्वस्त आणि कमी दर्जाच्या चिप्सबरोबर जोडलेल्या या चिप्स अजूनही आयातीसाठी उपलब्ध आहेत.
अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चीनचे पंतप्रधान ली किआंग यांच्यातील बैठकीत लिआंग दिसले होते.
डीपसीक कोण वापरतं?
हे ॲप ॲपल स्टोअरवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.
ॲपची सेवा मोफत वापरता येत असल्याने अल्पावधीतच ॲपल स्टोअरच्या सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या ॲप्सच्या यादीत त्याने जागा कमावली.
पण काही लोकांनी ॲपवर साईन अप करताना अडचणी येत असल्याचंही सांगितलं आहे.
सर्वाधिक रेटिंग मिळालेलं मोफत ॲप म्हणूनही या ॲपला अमेरिकेत मान्यता मिळतेय.
डीपसीक ॲप काय करतं?
चॅट जीपीटीप्रमाणेच डीपसीकमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेता येते.
हे ॲप 'तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आणि तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी' बनवलं गेलं आहे, असं ॲपल स्टोअरवर दिलेल्या ॲपच्या माहितीत म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
या ॲपमुळे "लिखाणाला एक चांगलं व्यक्तिमत्त्व मिळतं" असं रेटिंग देणाऱ्या एका वापरकर्त्यानं म्हटलंय.
पण हे ॲप एक राजकीय प्रश्नाचं उत्तर देणं टाळत असल्याचं बीबीसीच्या लक्षात आलं आहे.
4 जून 1989 ला चीनमध्ये तियानमेन स्क्वेअर इथं घडलेल्या नरसंहाराविषयी विचारलं असता डीपसीकनं उत्तर दिलं, "माफ करा. मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मी लोकांना मदत करण्यासाठी आणि कुणालाही त्रास होऊ नये अशी उत्तर देण्यासाठी बनवण्यात आलेला कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला सहकारी आहे."


एनव्हिडियासारख्या अमेरिकन कंपन्यांना फटका का बसतोय?
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असणाऱ्या अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा डीपसीकच्या उभारणीसाठी कमी खर्च आल्याचा दावा केला जातोय. त्यात कोट्यवधी डॉलर्सचा फरक दिसून येतो. त्यामुळे अमेरिकेच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरच्या प्रभावावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कंपनीच्या कमी खर्चाच्या दाव्यानं आर्थिक बाजारात 27 जानेवारीला फार मोठी ढवळाढवळ केली. नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक 3 टक्क्यांनी खाली आला. त्याचा प्रभाव जगभरातील चिप मार्केट आणि डेटाचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनाही सोसावा लागला.

फोटो स्रोत, Getty Images
याचा सर्वाधिक फटका एनव्हिडिया या अमेरिका स्थित सेमीकंडक्टकर चिप बनवणाऱ्या कंपनीला झाला असल्याचं म्हटलं जातंय.
एनव्हिडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्क्याने घसरली. त्यामुळे कंपनीचं सोमवारी 600 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही कंपनीला एका दिवसांत सोसावं लागलेलं हे सर्वाधिक नुकसान होतं.
त्याआधी शेअर मार्केटच्या बाजारात एनव्हिडिया पहिल्या क्रमांकावर असणारी कंपनी होती. मात्र, सोमवारी कंपनीची किंमत 3.5 लाख कोटी डॉलर्सवरून 2.9 लाख कोटी डॉलर्सवर आल्यामुळे एनव्हिडिया ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली, असं फोर्ब्सने म्हटलं आहे.
एनव्हिडियाने तयार केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सपेक्षा कमी गुणवत्तेच्या चिप्स डीपसीकमध्ये वापरल्या जातात.
मोठी गुंतवणूक आणि सर्वोत्तम दर्जाचा माल वापरूनच कृत्रिम बुद्धिमत्तेवर ताबा मिळवता येऊ शकतो या समजुतीला डीपसीकच्या यशामुळे तडा बसला आहे. त्यामुळे अशा चीपची भविष्यात किती गरज पडू शकते यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











