AI ते क्रिप्टोकरन्सी : तंत्रज्ञान क्षेत्रातले 'हे' बदल 2025 मध्ये ठरू शकतात 'गेमचेंजर'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बेन मॉरिस आणि झो क्लेनमन
- Role, बीबीसी
2024 मध्ये एका बिटकॉइनची किंमत 1 लाख अमेरिकन डॉलरपर्यंत जाऊन पोहोचली. याचवर्षी मागच्या काही काळापासून चर्चेत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आपल्या खिशापर्यंत येऊन पोहोचला. तुम्ही ज्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर ही बातमी वाचत आहात त्यातही एआयने शिरकाव केला आहे.
तंत्रज्ञानाच्या जगात असे अभूतपूर्व बदल होत असताना 2025 मध्ये आणखीन कोणकोणते अविष्कार होऊ शकतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
बीबीसी टेक्नॉलॉजी ऑफ बिझनेसचे संपादक बेन मॉरिस आणि बीबीसी टेक्नॉलॉजीचे संपादक झो क्लेनमन या दोघांनी मिळून, येत्या वर्षात कोणते ट्रेंड्स असतील याचा एक अंदाज बांधला आहे.
बीबीसी टेक्नॉलॉजी ऑफ बिझनेस एडिटर बेन मॉरिस
2022 च्या अखेरच्या टप्प्यात क्रिप्टोकरन्सीचं भविष्य अंधुक दिसत होतं. असं होण्याला कारणंही तशीच होती.
क्रिप्टोकरन्सी व्यवसायातल्या मोठ्या कंपन्यांपैकी एक असणारी एफटीएक्सही कंपनी कोसळली होती. या कंपनीच्या ग्राहकांनी गुंतवलेले तब्ब्ल 8बिलियन अमेरिकन डॉलर्सचा काही हिशेबच नव्हता.
मार्च 2024मध्ये या कंपनीचे सह-संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांना ग्राहक आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
या महाघोटाळ्यामुळे क्रिप्टोकरन्सीवरचा बहुतांश लोकांचा विश्वास उडाला होता.
त्यामुळे आता येणाऱ्या भविष्यात क्रिप्टोकरन्सी हे केवळ एका ठराविक वर्गाचंच चलन राहील आणि काही उत्साही लोकच त्यात गुंतवणूक करण्याचं धाडस दाखवतील असं एकूण चित्र होतं.
मात्र, त्यानंतर काहीच महिन्यांनी या उद्योगात पुन्हा एकदा उत्साह संचारला. क्रिप्टोबाबत बाजारात तयार झालेल्या या सकारात्मक वातावरणामागे, 5 नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिळवलेला विजय होता.

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प क्रिप्टोकरन्सीबाबत सकारात्मक असतील अशी भावना अनेकांमध्ये होती. किमान आतापर्यंत तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विश्वास सार्थ ठरवला आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी सांगितले की, वॉल स्ट्रीट रेग्युलेटरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पॉल अॅटकिन्स यांना नामांकित केलं आहे. पॉल हे याआधी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) कमिशनर राहिले आहेत.
पॉल अॅटकिन्स क्रिप्टोकरन्सीचे समर्थक आहेत. त्यांच्याआधी या पदावर असलेल्या गॅरी जेन्सलर यांच्यापेक्षा क्रिप्टोबाबत कितीतरी अधिक सकारात्मकता पॉल यांच्यात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नियुक्तीच्या घोषणेमुळे, बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीची किंमत तब्बल 1 लाख अमेरिकन डॉलरपर्यंत जाऊन पोहोचली.
स्टँडर्ड चार्टर्ड येथे डिजिटल मालमत्ता संशोधनाचे जागतिक प्रमुख जेफ्री केंड्रिक म्हणाले की, "ट्रम्प यांच्या विजयामुळे 2025मध्ये क्रिप्टोबाबत सकारात्मक नियम बनवले जातील अशी कल्पना करता येऊ शकते. यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी बनवण्यात आलेले काही नकारात्मक निर्बंध रद्द होऊ शकतात. आणि यामुळेच बँका आणि इतर संस्था या क्षेत्रात येऊ शकतील."
अशा निर्बंधांचं उदाहरण देताना जेफ्री केंड्रिक यांनी यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या एका नियमाचा हवाला दिला. या सेक्युरिटी अँड एक्स्चेंज (SEC) ने बनवलेल्या SAB 121 नियमामुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांना क्रिप्टोकरन्सीमध्ये उतरणं अवघड झालं होतं. 2022 पासून हा नियम लागू करण्यात आला होता.
असे निर्बंध कमी केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिलेल्या एका आश्वासनाची पूर्तता होऊ शकते. जुलै महिन्यात ट्रम्प म्हणाले होते की, "अमेरिकेला क्रिप्टोकरन्सीची राजधानी बनवणार."
जर डोनाल्ड ट्रम्प यांनी खरोखर हे करून दाखवलं तर, 2021 सालच्या त्यांच्याच भूमिकेवरून त्यांनी घेतलेला सर्वात मोठा युटर्न म्हणून याकडे बघितलं जाईल. त्यावर्षी ट्रम्प यांनी बिटकॉइन हा एक मोठा घोटाळा (स्कॅम) असल्याचं म्हणाले होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक वैयक्तिक आयुष्यात उतरेल - झो क्लेनमन
वेगवेगळ्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) टूल्सनी आपल्या मोबाईलमध्ये प्रवेश केला आहे. त्यासोबतच अॅपल, सॅमसंग, गुगल सारख्या मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या उपकरणांमध्ये इंटरनेट सर्च करणारे, फोटो एडिट करणारे आणि भाषांतर करणारे एआय टूल्स लॉन्च केले आहेत.
आपण एआय युगाच्या सुरुवातीचा काळ पाहतोय, नजीकच्या भविष्यात एआय अधिकाधिक व्यापक होणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक पातळीवर उतरून त्या व्यक्तीचं आयुष्य सोपं करण्यासाठी एआय वापरलं जाणार आहे. थोडक्यात काय तर माणसांच्या डिजिटल आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून एआय उदयास येईल.
अर्थात माणसांनी तसं करण्याची परवानगी दिली तरच ते शक्य होणार आहे. कारण यासाठी अविश्वसनीय बदलांवर माणसांचा विश्वास असणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ तुमची दैनंदिनी व्यवस्थापित (डायरी मॅनेजमेंट) करण्याचं काम सुद्धा एआय अतिशय चोख आणि सहजगत्या करू शकतं. पण प्रश्न असा आहे की तुम्ही एआयला तसे करण्याची परवानगी द्याल की नाही? कारण एआयचा मानवी आयुष्यात किती हस्तक्षेप असावा? त्याला काही मर्यादा असावी का? असे प्रश्नही सध्या निर्माण झाले आहेत.
कारण एआय अधिक प्रभावी होण्यासाठी त्याला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातले तपशील लागतील. तुम्हाला कुणाला भेटायला आवडत नाही, तुमचे प्रेमसंबंध कुणासोबत आहेत? ते कसे आहेत? तुम्हाला एखादं नातं गुपित ठेवायचं आहे का? असे बारीक तपशील एआय मागेल आणि मग प्रश्न तोच असेल की तुम्ही ही सगळी माहिती तंत्रज्ञानाला देऊ शकाल का?
तुमच्या समुपदेशन सत्रांचा आणि डॉक्टरांसोबत झालेल्या चर्चेचा आशय तुम्हाला एआयने सांगितला तर चालेल का? कारण ही सगळी माहिती अत्यंत खाजगी आहे. आरोग्याचे तपशील अत्यंत गोपनीय असतात आणि चुकून एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे हे तपशील सार्वजनिक झाले तर त्यातून निर्माण होणारी नाचक्की मोठी असू शकते. आणि या सगळ्या तंत्रज्ञानाची मालकी ज्या महाकाय टेक्नॉलॉजी कंपन्यांकडे आहे, त्या कंपन्यांना ही सगळी माहिती देणं तुम्हाला पसंत असणार आहे का?
मायक्रोसॉफ्ट ही कंपनी नेमकं हेच करण्याचा जोरकस प्रयत्न करत आहे. 2024 मध्ये ही कंपनी अशाच एका वादात सापडली होती.
मायक्रोसॉफ्टने बनवलेलं एक टूल वापरकर्त्याच्या लॅपटॉपचा काही सेकंदांच्या अंतराने स्क्रिनशॉट घेत होतं. उदाहरणार्थ लॅपटॉप वापरताना तुम्ही एखादी गोष्ट पाहिली आणि काहीवेळाने ती गोष्ट नेमकी कुठे बघितली हे तुम्हाला आठवत नसेल तर, सेकंदासेकंदाला स्क्रिनशॉट घेणारं हे टूल तुम्हाला ते आठवण्यासाठी मदत करू पाहत होतं.
वादात अडकल्यानंतर मायक्रोसॉफ्टने या टूलमध्ये काही बदल केले. मात्र त्या बदलांसोबत ते नवीन टूल कधीच लॉन्च झालं नाही. मायक्रोसॉफ्टने नेहमी या टूलचं समर्थनच केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मायक्रोसॉफ्टच्या एआय विभागाचे प्रमुख मुस्तफा सुलेमान यांनी मला सांगितलं की, "मला वाटतं की आपण एका मूलभूतपणे नवीन युगाकडे वाटचाल करत आहोत. जिथे तुमच्या दैनंदिन जीवनात नेहमीच उपस्थित असणाऱ्या एका साथीदाराची सवय तुम्हाला करून घ्यावी लागेल. हा साथीदार अतिशय चिकाटीने तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत असेल."
ही सगळी आव्हानं असून देखील सीसीएस इनसाइट या तंत्रज्ञान संशोधन कंपनीचे मुख्य विश्लेषक बेन वूड यांना वाटतं की, 2025मध्ये अधिकाधिक वैयक्तिक सेवा पुरवणारं एआय तंत्रज्ञान निर्माण होईल आणि बाजारात येईल.
बेन वूड म्हणतात की, "तुमचे ईमेल्स, मेसेजेस, सोशल मीडियावरून तुम्ही एकमेकांशी साधलेला संवाद या सगळ्यांवरून नवनवीन माहितीचे स्रोत एआयसाठी खुले होतील. त्यामुळे हे तंत्रज्ञान सतत अपडेट होत राहील. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचं संवादकौशल्य, त्यांच्या गरजा आणि आवडीनिवडी हेरून नवनवीन एआय टूल्स बनवले जातील."
बेन वूड यांना हेही वाटतं की तुमच्या वैयक्तिक माहितीबाबत एआयला खुली सूट मिळाल्यामुळे मोठे बदल देखील होऊ शकतात.
वूड म्हणतात, "विश्वास हाच कळीचा मुद्दा ठरेल."
डेटा(माहिती)चा वेग वाढेल - बेन मॉरिस
एआयमधली गुंतवणूक जेवढी वाढेल, तेवढ्याच मोठ्या संख्येने एआयच्या डेटा सेंटर्सची गरज देखील वाढेल.
एआयला प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांचं संचालन करण्यासाठी भरपूर संगणकीय शक्ती आवश्यक असते. आणि हे संगणक देखील अद्ययावत चिप्स आणि सर्व्हर्सनी सुसज्ज असावे लागतात.
सीसीएस इनसाइटच्या आकडेवारीनुसार, पुढील पाच वर्षांत गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यासारख्या सर्वात मोठ्या डेटा वापरकर्त्यांद्वारे डेटा सेंटरमध्ये १ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाऊ शकते.
प्रॉपर्टी सर्व्हिसेस कंपनी सॅविल्सच्या मते, केवळ युरोपमध्ये, 2024 ते 2028 दरम्यान, डेटा सेंटरची क्षमता दरवर्षी सरासरी 9 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
परंतु त्या नवीन सुविधा लंडन, फ्रँकफर्ट आणि अॅमस्टरडॅम सारख्या सध्याच्या डेटासेंटर असलेल्या शहरांमध्ये बांधल्या जाण्याची शक्यता कमी आहे.
या शहरांमध्ये मालमत्तेच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम यावर होऊ शकतो. सॅविल्सच्या आकडेवारीनुसार लंडनमध्ये एक एकर जमिनीची अंदाजित किंमत 17 मिलियन युरोपर्यंत असू शकते. याशिवाय या शहरांना होणारा वीजपुरवठा देखील कमी असल्याने डेटासेंटर्स साठी इतर पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
यूकेमध्ये केंब्रिज, मँचेस्टर आणि बर्मिंगहॅम सारखी शहरे डेटासेंटरच्या पुढच्या लाटेची केंद्र बनू शकतात. याशिवाय युरोपमधल्या प्राग, जेनोवा, म्युनिक, डसेलडॉर्फ आणि मिलान यांसारख्या शहरांचा देखील विचार केला जाऊ शकतो.
नव्याने बांधल्या डेटासेंटर्स पैकी बहुतांश ठिकाणी एनव्हीडीया(Nvidia)ने बनवलेल्या कम्प्युटर चिप्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एआयसाठी वापरल्या जाणाऱ्या चिप्स बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये एनव्हीडीया ही कंपनी सगळ्यात पुढे आहे.
मार्च 2024मध्ये एनव्हीडीयाने बनवलेली ब्लॅकवेल चिप 2025मध्ये मोठ्या संख्येने निर्यात केली जाण्याची शक्यता आहे.
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजमधील वरिष्ठ सेमीकंडक्टर विश्लेषक विवेक आर्य यांच्या मते, नवीन चिपमुळे टेक कंपन्यांना एआयला चार पट वेगाने प्रशिक्षित करता येईल आणि एआय सध्याच्या संगणक चिप्सपेक्षा 30 पट वेगाने काम करेल.
काही अहवालांनुसार, एनव्हीडियाचे सर्वात मोठे ग्राहक असलेल्या मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, मेटा आणि कोअरवीव्ह या कंपन्यांना हे तंत्रज्ञान सगळ्यात आधी मिळण्याची शक्यता आहे.
आर्य यांना असं वाटतं की, '2025मध्ये पुरवठा मर्यादित असल्याने', इतर ग्राहकांना ही सुपर चिप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.











