गुगल, अॅमेझॉन सारख्या कंपन्या नफ्यात; मग कर्मचाऱ्यांना का काढलं जातंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, क्रिस्टीना जे ऑर्गाझ
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
जगभरातील सर्वांत मोठ्या टेक कंपन्या म्हणून ज्या संस्थांचा नावलौकिक आहे त्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होताना दिसत आहे. कंपन्यांच्या नफ्यात विक्रमी वाढ होत आहे मग या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन का काढत आहेत.
अमेरिकेच्या शेअर बाजाराचा वेग याच कंपन्या ठरवतात आणि वॉल स्ट्रीटचे लाडक्या देखील याच कंपन्या आहेत. 'द मॅग्निफिसंट 7' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपन्यांच्या विक्री, नफा आणि दरांमध्येही वाढ सुरुच आहे.
अभ्यासकांच्या मते या कंपन्या यावर्षी एकत्रितपणे 12% आणि 2025 मध्ये 12% अधिक विक्री करतील. त्यांच्या स्पर्धेतील इतर उद्योगांच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक आहे.
Google ची मूळ कंपनी अल्फाबेट, Apple, Amazon, Meta आणि Microsoft यांनी एकत्रितपणे सुमारे 327 अब्ज अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. ही कमाई गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.6% अधिक आहे. उदाहरणादाखल हा आकडा कोलंबिया किंवा चिलीच्या एकूण जीडीपीच्या एवढा आहे.
तरीही हा विशिष्ट गट कर्मचारी कपातीचा सामना करत आहेत. टेस्ला, एनव्हिडिया अशा कंपन्यांचाही यात समावेश आहे. तसंच त्यांनी गेल्यावर्षीही कर्मचारी कपात केलेली आहे.
अॅक्टिव्हिजन ब्लिझार्डबरोबर 69 अब्ज अमेरिकन डॉलरचा खरेदी करार केल्यानंतर मायक्रोसॉफ्टनं जुलै 2023 मध्ये कर्मचारी कपात केली आणि 2024 मध्ये पुन्हा ते कपात करत आहेत. त्यात 1900 लोकांची कपात केली जाईल.
अॅमेझॉनबाबतही तसंच काही आहे. गेल्यावर्षी त्यांनी 9000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. यावर्षीही ते त्यांच्या ट्विच प्लॅटफॉर्मवरून 35 टक्के कर्मचारी कपात करतील तर अॅमेझॉन प्राइममधून 100 जणांची कपात केली जाईल.
हे कमी होतं की काय म्हणून इतर अनेक लहान-सहान कंपन्याही यात सहभागी झाल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे 122 कंपन्यांमधून जवळपास 32 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.
Despidos.fyi वेबसाइटनं ही माहिती दिल्याचं रॉयटर्सनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे अजूनही जवळपास 11 महिने शिल्लक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
तंत्रज्ञान उद्योगांतील प्रसिद्ध कंपन्यांचं उदाहरण द्यायचं झाल्यास यावर्षी पेपल मधील 2,500 कर्मचारी कमी होतील. तर , Spotify मधील 1500 कर्मचारी eBay मधील 1,000 लोकांची कपात होईल. तर स्नॅपचॅटच्या 500 जणांचा यात समावेश असेल.
या सर्वांची तुलना अनेकांनी 2000 सालच्या सुरुवातीला घडलेल्या घटनांशी केली. त्यावेळी इंटरनेटच्या उदयामुळं डॉट-कॉम तंत्रज्ञानाचा बुडबुडा तयार झाला होता.
ज्युलियस बेयरचे मुख्य विश्लेषक मॅथ्यू रचेटर यांच्या मते, ही तशा प्रकारची स्थिती नाही. कारण मेगा-कॅप उद्योगांच्या शेअरचे दर अद्याप 2000 मधील बुडबुड्याच्या वेळी असलेल्या पातळीपर्यंत पोहोचलेले नाहीत.
बेयर यांच्या मते, "मॅग्निफिसंट 7" हे प्रचंड भांडवल असलेल्या कंपन्या आहेत. त्यामुळं कोणत्याही समस्येच्या स्थितीत, त्या स्वतःचीच मदत करू शकतात.
मग कपातीच्या दुसऱ्या लाटेमागचे कारण काय?
1. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक बदल
ODDO BHF AM मधील कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थापक ब्रिस प्रुनास यांच्या मते, "तंत्रज्ञान क्षेत्राच्या इतिहासाचा विचार करता, त्यात अशा मोठ्या कंपन्यांच्या प्रगती आणि पतनाचाही समावेश आहे. त्यांच्यावर परिणाम होतो आणि पुढच्या पिढीच्या चांगल्या कंपन्या त्यांची जागा घेतात."
डॉटकॉम मध्ये हेच झालं होतं. या दशकात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) मॉडेलमधील प्रचंड वाढ एका क्रांतीचं प्रतीक आहे.
"उदाहरणादाखल लँग्वेज कंपनी डुओलिंगो पाहा. क्वार्क वेबसाइटनुसार, त्यांच्या काही कपात केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये लेखक आणि भाषांतरकार आहेत. त्यांची जागा अल्गोरिदम घेणार आहे.
एआयचा वेग प्रचंड आहे. एका व्यक्तीला ज्या लिखाणासाठी 60 ते 90 मिनिटं लागतात ते एआय 10 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात करू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
या वर्षाच्या सुरुवातीला गोल्डमॅन सॅक्सच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, एआय कदाचित 30 कोटी पूर्णवेळ नोकऱ्यांची जागा घेऊ शकतं.
ईटोरोचे ज्येष्ठ विश्लेषक झेवियर मोलिना यांच्या मते, "आम्ही हे यापूर्वीच 2000 च्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अडचणीच्या काळात पाहिलं होतं. अशा प्रकारच्या अडचणींमुळं कंपन्यांना त्यांच्या रचनेत बदल करावे लागतात."
"एकीकडं आम्ही धोरणात्मक बदल आणि विभाग बंद होताना पाहत आहोत. तर दुसरीकडं कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत नवा दृष्टिकोन पाहायला मिळत आहे. मोलिना यांच्या मते, "यामुळं अनेक प्रक्रियांमध्ये काही नोकऱ्या संपुष्टात येतील."
हा उत्पादकता वाढवण्याचा एक प्रकार आहे.
2. 2022 च्या आठवणी आणि प्रकल्प बंद होणे
कन्सल्टिंग फर्म चॅलेंजर, ग्रे अँड क्रिसमस, इंकच्या एका रिपोर्टनुसार तंत्रज्ञान क्षेत्रानं 2023 मध्ये 1,68,032 कर्मचाऱ्यांची कपात केली. सर्वच उद्योगांमध्ये सर्वाधिक कपात झाली.
महासाथीच्या काळात मिळालेल्या यशानं निर्माण झालेल्या उत्साहामुळं सिलिकॉन व्हॅलीत अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्यांना पाहिजे तसं मनासारखं घडेल, असा विचार करत कंपन्या विस्तार करत गेल्या.
पण तसं झालं नाही. त्यामुळं याचा परिणाम म्हणजे 2022 आणि 2023 मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाली.
नव्या प्रकल्पांच्या विरोधात असं काही घडण्याचं आणखी एक कारण म्हणजे, प्रचंड महागाईच्या तुलनेत युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्हनं वाढवलेले व्याजदर हेही होतं.
कर्ज घेणं आता अधिक महाग झालं असून, अनेक तंत्रज्ञान कंपन्यांना प्रचंड भांडवलाची गरज असते. विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात.

फोटो स्रोत, Getty Images
ए अँड जी फोंडोस मध्ये डीआयपी व्हॅल्यू कॅटलिस्ट फंडचे व्यवस्थापक अँड्रेस अलेंदे म्हणतात की, "नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळं अनेक योजनांची मर्यादेची पातळी वाढली आहे. त्याची इतर काळात गुंतवणूक केली जाऊ शकते. नंतरच्या काळात त्यात वाढ होऊन, त्यातून चांगला नफा कमावण्याची इच्छा असते."
"मात्र आता अधिक महागड्या वित्तपुरवठ्याच्या प्रभावामुळं गुंतवणूक संपुष्टात आली आहे. अखेरीस तेच जास्तीत जास्त तंत्रज्ञान प्रकल्प बंद पडण्याचं कारण ठरतं," असंही ते म्हणाले.
कपातीबरोबर कंपन्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात शक्य तेवढ्या चांगल्या स्थितीत राहण्याच्या प्रयत्नात आहेत.
ओडीडीओचे प्रुनास या विचाराशी सहमत आहेत. तज्ज्ञांच्या मते, "'मेगा-कॅप' (मेगा-कॅप कंपन्या) च्या खाली, अनेक लहान कंपन्या अत्यंत कठिण परिस्थितीता सामना करत आहेत. तेच त्यांच्या मनुष्यबळ कपातीचं कारण ठरतं."
3. एक दुष्टचक्र
अगदी मेगा कॅप कंपन्यांनीही त्यांच्या गुंतवणूकदारांची प्रचंड नफ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे.
पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, "तंत्रज्ञान क्षेत्रातलं चक्र असंच असतं. अचानक बदलणारं पण वेगवान आणि लवचिकही. लवकरच यापैकी अनेक कंपन्या पुन्हा नव्या योजनांचा अवलंब करून नवे बदल करतील. जे वाचतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अत्यंत आशादायक अशा संधी असतात," असं अलेंदे म्हणाले.
"नवं चक्र सुरू होण्याच्या आधीच आम्हाला आधीपासूनच काही संकेत दिसायला लागले आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील अडचणी इतर क्षेत्रांतील वापर आणि गुंतवणुकीवर प्रभाव पाडू शकतात. कारण शक्यतो तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या अत्यंत उच्च उत्पन्नाच्या गटातील असतात," असं ए अँड जी तज्ज्ञ सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
लहान कंपन्यांमध्ये काय घडतं, तर त्यांच्या समोर टिकून राहण्याचं आव्हान असतं. दुसरीकडं मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काय होतं? कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडं अधिक मार्जीन आणि मोठ्या प्रमाणात भांडवल असतं. या दोन्हींमध्ये असलेला फरक आपल्या लक्षात यायला हवा. विश्लेषकही याच्याशी सहमत आहेत.











