फेसबुकची 20 वर्ष: 19 वर्षाच्या पोराने तयार केलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं असं बदललं जग

फोटो स्रोत, Getty Images
4 फेब्रुवारी 2004 ला अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणाने विद्यापीठातल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक ऑनलाईन डेटाबेस बनवला, तोही त्यांच्या फोटोंचा वापर करुन.
त्याला त्याने नाव दिलं TheFacebook.com. त्याला फक्त विद्यापीठातल्या तरुण-तरुणींना फोटोद्वारे एका आभासी विश्वात एकमेकांशी कनेक्ट करायचं होतं.
आज फेसबुकवर आपल्यासारखे सुमारे 3 अब्ज ॲक्टिव्ह युजर्स आहेत, आणि तो तरुण आज जगातल्या सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक आहे.
पण खरंच त्याच्या या कंपनीने गेल्या 20 वर्षांत आपलं जग इतकं कसं बदललं की आपण आजकाल प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा ऑनलाईन विश्वातच जास्त रमताना दिसतो?
फेसबुकचा आजवरचा प्रवास कसा राहिलाय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यात फेसबुक काय काय करेल? हेच समजून घेऊया.
फेसबुकने सोशल मीडियाचा चेहरा कसा बदलला?
फेसबुकपूर्वी सोशल मीडिया नव्हतं असं नाही. तुम्हाला ऑर्कुट आठवत असेल, तसंच एक मायस्पेसही होतं. मग फेसबुक एवढं लोकप्रिय कसं झालं?
फेसबुक जेव्हा सुरू झालं, तेव्हा एकाच ठिकाणी एखाद्या पोस्टला लाईक, कमेंट, शेअर किंवा टॅग करणं शक्य होतं, असा दुसरा कोणताच प्लॅटफॉर्म नव्हता.
फेसबुकने नेमकं हेच केलं, शिवाय फोटो आणि अगदी व्हीडिओ पोस्ट करण्याची सोय लोकांना करून दिली, जेणेकरून लोक त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातले क्षण इथे जगाला सांगू लागले.

फोटो स्रोत, MYSPACE
यामुळे आधी एकाच विद्यापीठातले विद्यार्थी फेसबुकवर होते, नंतर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या विद्यापीठांमधल्या मित्रमैत्रिणींना यावर जोडलं, आणि पाहता-पाहता पहिल्याच वर्षी 10 लाख युजर्स फेसबुकवर ॲक्टिव्ह झाले. सध्या फेसबुक हा जगातला सगळ्यात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
तब्बल २ अब्ज युजर्स रोज फेसबुक वापरतात. आणि जगात सगळ्यात जास्त युजर्स कोणत्या देशात आहेत माहितीय? अर्थात आपलाच देश फेसबुक वापरकर्त्यांच्या संख्येत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतात सुमारे 31 कोटी 50 हजार लोक फेसबुक वापरतात. भारतानंतर सगळ्यात जास्त फेसबुक वापरतकर्ते अमेरिकेत आहेत.
आता फेसबुक इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपेक्षा वेगळं कसं ठरलं?
आपल्याला फेसबुकचं व्यसन कसं जडलंय, हे वास्तव आहे. तुम्ही म्हणाल, छे छे. आम्हाला नाही. आम्ही इन्स्टाग्राम वाले किंवा आम्ही तर फक्त व्हॉट्सॲप वापरतो. तर मंडळी या सगळ्या गोष्टी आता फेसबुकच्याच पालक कंपनी मेटाच्या आहेत.
फेसबुकने खरंतर तुमचं प्रोफाईल उघडताना तुमच्याकडून आपसूकच तुमची बरीच खासगी माहिती घेतली.
तुमची जन्मतारीख, तुमचे नातेसंबंध, तुमचे फोटोस, तुम्ही कुठे फिरता, काय खाता, काय पाहता वगैरे. आणि या सगळ्यातून फेसबुक तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीच्या गोष्टी दाखवू लागलं, तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राशी पुन्हा कनेक्ट करायला मदतही केली.
पण यामुळे झालं असं की फेसबुकला आपलं व्यक्तिमत्व इतकं चांगलं कळलं की आपल्या मनावर त्याचा परिणामही होऊ लागला आणि त्याच आधारे फेसबुक आपल्याला जाहिराती दाखवू लागलं, आपल्या विचारांच्या गोष्टी आपल्यालाच विकू लागलं.

फोटो स्रोत, FACEBOOK
2012 ला फेसबुकने एक अब्ज युजर्सचा आकडा गाठला आणि अजूनही रोज हा आकडा वाढतोच आहे. आजही असे अनेक लोक आहेत जे फोन हातात घेतला की आधी फेसबुकच्या निळ्या रंगाच्या अॅपवर क्लिक करतात.
आपली वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय मतं आता फेसबुकवरच्या मजकुरातून ठरवली जातायत, असं 2016मध्येच एका Cambridge Analytica Scandal मधून उघडकीस आली होती.
पण यातून काही चळवळी आणि मोहिमाही उभ्या राहिल्या. संयुक्त राष्ट्रांच्या 2018च्या एका रिपोर्टनुसार, म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर झालेला ऑनलाईन हिंसाचार रोखण्यात फेसबुक अपयशी ठरलं होतं. फेसबुकनेदेखील हा रिपोर्ट मान्य केला होता.
फेसबुकने इंटरनेटला राजकीय स्वरूप दिलं?
ग्रामपंचायतीपासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत फेसबुक वापरलं जातं.
राजकीय नेते त्यांच्या प्रचारासाठी, मतदार त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. प्रत्येक नेत्याचं फेसबुक अकाउंट असतं आणि त्या अकाउंटवरून ते सामान्य नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात.

फोटो स्रोत, REUTERS
अगदी भारतातही 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर सगळेच पक्ष फेसबुकचा कसा वापर करतायत, हे उघड झालं.
फेसबुकमुळे खाजगी माहिती सुरक्षित राहिलेली नाही का?
फेसबुकने हे सिद्ध केलं की इंटरनेटवर तुमच्या फोटो, व्हिडिओ किंवा पोस्टला मिळणारे लाईक आणि डिसलाईक किती महत्वाचे आहेत.
ऑनलाईन एखादं बटन दाबून तुम्ही जगाला तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही, तुम्हाला कोणती गोष्ट खरेदी करायची आहे आणि कोणती गोष्ट खरेदी करायची नाही हे सगळं सांगत असता. तुमच्या याच माहितीचा वापर जाहिरातदार करत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
फोटो काढण्यापासून ते लाईव्ह व्हिडिओ करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी मोफत कशा मिळतायत? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तर हे अजिबात मोफत नाहीये.
फेसबुक वापरण्याच्या बदल्यात तुम्ही तुमची अत्यंत खाजगी माहिती जाहिरातदारांना देत असता. मुळात फेसबुकची मालकी असणारी मेटा (Meta) ही कंपनी जगातल्या सगळ्यात मोठ्या जाहिरातदार कंपन्यांपैकी एक आहे.
जगात जाहिरातींसाठी जेवढा पैसा खर्च होतो त्यातला सगळ्यात मोठा हिस्सा दोन कंपन्यांना मिळतो. एक म्हणजे गूगल आणि दुसरं म्हणजे मेटा.
फेसबुक इंटरनेटवर राज्य करू पाहतंय का?
फेसबुक नंतर मार्क झकरबर्ग यांनी अनेक वेगवेगळ्या कंपन्या खरेदी करून सोशल मीडिया क्षेत्रात खूप मोठं साम्राज्य तयार केलंय. आधी Whatsapp, नंतर Instagram आणि Oculus सारख्या कंपन्या खरेदी करून इंटरनेटक्षेत्रात एकाधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत.
मेटाने दिलेल्या माहितीनुसार सध्या जगभरात तब्बल 3 अब्ज लोक रोज त्यांचं एकतरी प्रॉडक्ट वापरतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला ज्याप्रमाणे संशोधन करून फेसबुक तयार झालं होतं नंतर तसं घडलं नाही.

फोटो स्रोत, REUTERS
इंटरनेटवर राज्य करण्यासाठी मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या स्पर्धक कंपन्यांना खरेदी करण्यास सुरुवात केली किंवा मग स्पर्धकांची हुबेहूब नक्कल करून त्यांना हरवण्यासाठी प्रयत्न केले गेले.
उदाहरणार्थ स्नॅपचॅटमध्ये काही काळानंतर गायब होणाऱ्या स्टोरीजची आयडिया असो किंवा मग टिकटॉकला उत्तर म्हणून इन्साग्रामवर रिल्स आणणं असो, स्पर्धकांच्या लोकप्रिय सुविधा मेटाने कॉपी केल्या आणि या क्षेत्रात वर्चस्व राखलं.
आता माणसाच्या मेंदूलाच्या जागी वापरल्या जाऊ शकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मेटाव्हर्स (Metaverse) सारख्या प्रकल्पांमध्ये फेसबुक मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे यापुढे डिजिटल जगाचं भविष्य एकाच कंपनीकडून नियंत्रित केला जाण्याचा धोका तज्ज्ञांना वाटतो.
पुढच्या 20 वर्षात काय होईल?
पुढच्या 20 वर्षात जगातली सगळ्यात लोकप्रिय सोशल मीडिया वेबसाईट राहण्यासाठी फेसबुकला संघर्ष करावा लागणार आहे.
मेटावर्सचा वापर करून एका नवीन आभासी जगाची निर्मिती करण्याचा प्रयत्न Meta कडून केला जातोय.
सध्या AI चा वापर करून मेटा त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या Apple ला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
पण नवीन पिढी फेसबुक व्यतिरिक्त इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरत आहे, फेसबुकच्या युजर्सची संख्या कमी होत आहे त्यामुळे ही कंपनी आता पुढे काय करते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








