पॉर्न, सोशल मीडियाने वेढलेलं बालपण, सायबर जगातल्या पालकांनी काय करायला हवं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मुक्ता चैतन्य
- Role, लेखिका
पुण्यातल्या एका शाळेत दहा बारा वर्षांच्या मुलांनी एका मुलावर लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली आणि सोशल मीडियासह सगळीकडे लोक हवालदिल झाले.
सदर घटनेतल्या ‘बुली’ झालेल्या मुलाने आईला शाळेनंतर घडलेला प्रकार सांगितला म्हणून प्रकरण पुढे तरी आले. पण मुलांनी बुली करण्याचे म्हणजे एखाद्या दुबळ्या मुलाला एकत्र झुंडीने येऊन त्रास देण्याचे, छळण्याचे प्रकार शाळा कॉलेजमधून सर्रास घडतात.
फारच कमी मुलं घडलेला प्रकार घरी सांगतात आणि फारच कमी शाळा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न असतात. किंवा घडल्याच समजा तरी त्याची लपवालपवी न करता योग्य पावले टाकतात.
घडलेल्या घटनेतल्या बुली करणाऱ्या मुलांना त्या वर्तनाचा इतिहास असल्याचं आणि सीसीटीव्ही फुटेज बघत असताना मुलं हसत होती किंवा काही मुलांनी ते नियमित पॉर्न बघत असल्याचं सांगितलं असंही शेअर झालेल्या पोस्टवरुन समजतं.
मुलांकडून असं का घडतं?
मुलांचं वर्तन हा विविधस्तरीय विषय आहे. त्यात घरातलं वातावरण, आईबाबांचे परस्पर संबंध, त्यात आपलेपणा आहे की नाही, घरातला पालकांचा पॉवर गेम, सत्तावादी पालकत्व, मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव करुन न देता पाठी घालण्याची पालकांची वृत्ती, घरगुती हिंसा, मुलांवर राग काढण्याची पालकांची सवय, पालक आणि पाल्य विसंवाद अशी अनेक कारणं असतात, असू शकतात आणि यातच आता हातातल्या फोनने भर घातलेली आहे.
मुलांच्या हातात कोरोनाने फोन दिला असं हल्ली सर्रास म्हटलं जातं पण हे सपशेल चूक आहे. आणि मोठ्यांच्या जगानं स्वतःची जबाबदारी कोरोनावर आणि फोनवर ढकलण्याचे उद्योग आहेत.
फारतर आपण असं म्हणू शकतो की कोरोनामुळे ज्या मुलांच्या हातात फोन आलेले नव्हते त्याही मुलांच्या हातात फोन आले.
मुलांच्या हातात फार पूर्वीपासून फोन आहेत. मग ते स्वतःचे असतील नाहीतर पालकांचे, आजीआजोबांचे. आणि त्यावर मुलं काय करतात याचा पत्ता मोठ्यांच्या जगाला अनेकदा नसतो.
मुलं मोबाईलवर गेम्स खेळतात, सर्च करतात, चॅटिंग करतात तसेच ते पॉर्न बघतात.
पॉर्न आणि मुलं
अनेकदा मुलांपर्यंत पॉर्न घरातल्या मोठ्यांच्या फोनमधूनच पोचतं हेही वास्तव आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, मोबाईलमुळे प्रत्येक व्यक्तीला आभासी जगात भटकण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. एक प्रकारचं ‘आयसोलेशन’.
या खासगीकरणामुळे अनेकदा पालकही त्यांच्या त्यांच्या फोनवर काय बघत असतात याचा पत्ता एकमेकांना नसतो. त्यातच पालकांमध्ये माध्यम शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे त्यामुळे आपण पॉर्न फोनवर बघत असू तर नंतर त्या लिंक्स, क्लिप्स डिलीट केल्या पाहिजेत हे अनेक पालकांना समजत नाही. मुलं मोबाईल घेतात तेव्हा थेट पॉर्न साईट्सवर जाऊन पोचतात.
दुसरं म्हणजे ऑनलाईन जगात ‘तसलं’ जग बघता येतं हे मुलांना फार लवकर समजतं. त्याविषयी घरात पालकांशी, शाळेतही कसलाही संवाद नसल्यामुळे आपण जे काही बघतोय ते मुळात बघायला हवं का, त्याचे आपल्या मनावर काय परिणाम होऊ शकतात या कशाचीही विचार कुणीही केलेला नाही.
बहुतेक पालक माझी मुलं ‘तसलं’ काही बघत नाही याच विचारात असतात. घरातल्या ‘संस्कारी’ वातावरणावर त्यांच्या अतीच विश्वास असतो. तो असायला ही हरकत नाही पण मोबाईल देताना काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे हेही ते स्वीकारत नाहीत. आणि मग सायबरच्या जगात एकटी पडलेली मुलं त्यांना जमेल, झेपेल त्या पद्धतीने ते जग बघायला, त्यात स्वतःला शोधायला सुरुवात करतात.

फोटो स्रोत, Getty Images
इथे अजून एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे 'एज अप्रोप्रिएटनेस' - वयानुरूप गोष्टी करण्याचा. योग्य वयात योग्य गोष्टी करण्याचा. पालक याबाबत आग्रही नसतात. मूल आठवीत जात नाही तर त्याच्या हातात दुचाकीची किल्ली दिली जाते. पण ही फक्त दुचाकीची किल्ली असते का? तर नाही.
आपल्याला पाहिजे ते मिळू शकतं, आपण काहीही केलं तरी चालतं हा संदेश आपण मुलांपर्यंत पोचवतो. हे तुझं वय नाही. योग्य वय येईतो कळ काढावी लागेल हे आपण मुलांना सांगतो का? हल्ली मुलं दहा आणि बाराव्या वर्षी डेटिंगला सुरुवात करतात.
अनेकदा पॉर्न साईट्सवर सोशल मीडियावरच्या सॉफ्ट पॉर्नमध्ये जे बघतात त्याचा प्रभाव त्यांच्यावर असतो. अशावेळी त्यांच्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडबद्दल मोकळेपणाने बोलताना 'परवानगी/कन्सेंट' बद्दल आपण मुलांशी बोलतो का? पॉर्न च्या जगात जे दाखवलं जातं ते एकतर खोटं आणि 'स्क्रिप्टेड' असतं किंवा शोषणावर आधारित असतं हे सांगतो का? नाही. कारण पॉर्नविषयी काय बोलायचं याबाबत पालक आणि शिक्षकच गोंधळलेले असतात.
इंटरनेटच्या जगातले आदर्श
इथे एक गोष्ट लक्षात घेऊया, मिलेनिअल पिढी कार्टून्स आणि आर्ट क्राफ्टच्या युट्युब चॅनल्सबरोबर वाढली आहे, पण आजचे टिनेजर्स इंटरनेट इन्फ्लुएन्सर्सबरोबर वाढत आहेत आणि ते सगळ्यात धोकादायक आहे.
प्रत्यक्ष जगात आदर्श नाहीत, कुटुंबात संवाद नाही, माध्यम आणि लैंगिक शिक्षण व्यवस्थेने अजूनही स्वीकारलेलं नाही अशा परिस्थितीत ही किरशोरवयीन किंवा त्याहीपेक्षा लहान मुलं इंटरनेटच्या जगात त्यांचे आदर्शही शोधत असतात आणि त्यांचे प्रश्नही. हे वयही चटकन प्रभावाखाली येण्याचं असतं.
त्या ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे असणारा इन्फ्लूएंसार सांगतोय त्या गोष्टी योग्य आहेत का, भल्याच्या आहेत का, त्या गोष्टी ‘फॉलो’ केल्या तर काय होईल, त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात या कशाचाही विचार मुलांच्या मनात अनेकदा येत नाही कारण असा विचार करण्यासाठी जे ट्रेनिंग मनाला आणि मेंदूला आवश्यक आहे तेच या मुलांना मिळत नाहीये. पालक एकतर मुलांसाठी निर्णय घेतात किंवा मुलांच्या जगात शिरायला त्यांना वेळच नसतो.
सगळा फोकस अभ्यास या एका गोष्टीभोवती फिरतो आहे. अभ्यास महत्वाचा आहेच पण मुलांमध्ये निर्णय क्षमता, सद्सदविवेक निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न होतात का हा मोठा प्रश्न आहे. आणि हे प्रयत्न मुलांना समोर बसवून होत नाहीत तर कृतीतून होतात.
मुलं टिपकागदासारखं सगळं सतत टिपत असतात. हे टिपताना चांगला, वाईट असा विचार ते करतील असं नाही, शिवाय एखाद्या गोष्टीकडे ते कशा पद्धतीने बघतील हे मोठ्यांच्या हातात नाही.

एक उदाहरण पाहू - व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर काहीतरी विषयावरुन चर्चा आणि पुढे भांडणं होतात. तिथली रागवारागवी संपली की घरातले मोठे किंवा आईबाबा एकमेकांशी त्याविषयी बोलत असतात. हे बोलत असताना समोरच्याचं काहीही ऐकून न घेता आपण त्या व्यक्तीचं तोंड कसं बंद केलं, त्याला यावं ऐकवलं, त्यावं ऐकवलं असं सगळं सांगत असतात.
मुलं अर्थातच हा संवाद ऐकत असतात. ते त्यात सहभागी झाले नाहीत तरी याच्या नोंदी ते घेत असतात. आता या नोंदी ते कशा घेतील सांगता येत नाही.
दुसऱ्याचं काहीही ऐकून न घेता आपण त्याचं तोंड बंद करायचं असतं, त्यासाठी कशीही आणि कुठलीही भाषा वापरली तरी चालू शकते असा समज मुलं करुन घेऊ शकतात. कारण घडलेल्या गोष्टीतले सगळे तपशील त्यांच्याकडे नसतात.
म्हणजेच आपण मुलांना कळत नकळत बौद्धिक असहिष्णुता शिकवत जातो हे मोठ्यांच्या अनेकदा लक्षातही येत नाही. संस्कार हे असेही होत असतात हे विसरुन चालणार नाही.
मोबाईल स्क्रीनची सवय
आता राहता राहिला प्रश्न मुलांच्या हातातल्या मोबाईलचा. इथेही मोठ्यांच्या जगाने भरपूर माती खाल्लेली आहे असं म्हणावं लागेल. मूल जन्माला येत नाही तर त्याच्या डोळ्यासमोर आपण म्हणजे मोठे मोबाईल धरतात.
इंडियन पेडिएट्रिक असोसिएशन पासून जागतिक आरोग्य संस्थेपर्यंत सगळ्यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे की मूल दोन वर्षांचं होईपर्यंत त्यांच्या पुढे मोबाईलचा स्क्रीन नको. पण आपल्याकडे परिस्थिती काय असते बघा.
मुलं वळायला लागत नाही त्याआधी मोबाईल बघायला शिकतं. ‘मोबाईल सुरु केला की कसं गप्प बसतं, पटापट जेवतं, टीव्ही आणि मोबाईल चालू केला की छान जेवण जातं’ याचं पालकांना कौतुक असतं.
हे कौतुक मुलं गेमिंग करायला लागल्यावरही असतं. ‘त्याची बोटं किती पटपट चालतात, कसले भारी गेम्स खेळतो, आम्हाला येणार नाही ते त्याला येतं..’ असले कौतुक संवाद घरोघरी ऐकायला येतात.
मूल आठवीत जाईस्तोवर कुणीही त्या मुलाच्या हातातल्या मोबाईलवर कसलाही आक्षेप घेत नाही किंवा त्या मोबाईलमुळे काही परिणाम होऊ शकतात का याचा विचार करत नाही.
खरी लढाई सुरु होते ती मुलं टीनएज मध्ये गेली की. किंवा त्याआधी थोडं. आता महत्त्वाची वर्षं आहेत, फोन कमी झाला पाहिजे याची जाणीव अचानक पालकांना होते आणि ते मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावू बघतात.
जन्माला आल्यापासून ज्या स्क्रीनसमोर ते दिवसातला बराचसा काळ घालवत असतात तो स्क्रीन काढून घेतला जाणार या विचाराने मुलंही बिथरतात आणि मग घरघरातून वेगळीच लढाई आणि संघर्ष सुरु होतो.
साधा विचार करु, आपल्या ज्या सवयी गेली दहा बारा वर्ष आहेत, त्या सवयी अचानक बदलता येतात का? मोठ्यांना जर त्यांच्या सवयी एका दिवसात बदलता येत नाहीत तर लहान मुलांकडून आपण ही अपेक्षा कशी करणार?
ते अधिकारी पदावर नसतात त्यामुळे एका टप्प्यानंतर पालक जे काही सांगतील ते त्यांना ऐकावं लागतं आणि मग त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.
डिजीटल जगाविषयीची साक्षरता
पुण्यातल्या शाळेत एक घटना घडली आणि सगळे हादरुन गेले. थोडे दिवस याची चर्चा होईल आणि परत मुलांच्या हातातला फोन त्यांच्या हातात तसाच राहील.
मुलांच्या हातात इंटरनेट, सोशल मीडिया, गेमिंग आणि मोबाईल देताना या डिजिटल जगाविषयी त्यांना साक्षर केलं पाहिजे या विचारापर्यंत आपण कधी पोचणार? कारण मुद्दा फक्त पॉर्न कॉन्टेन्टचा नाहीये. गेमिंग, सायबर बुलिंग, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असं चोहो बाजूंनी ‘एक्सपोजर’ त्यांना आहे. आणि रोज उठून रील्स वर येणाऱ्या कॉन्टेन्टचा विचार कसा करायला हवा याच कुठलंही प्रशिक्षण नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आज आठ आणि दहा वर्षांच्या मुली इंस्टवरच्या रिल्स बघून स्वतःचं स्क्रीन केअर रुटीन तयार करतात. त्याकडे पालक कौतुकाने बघत त्यांना हवी असतील ती प्रॉडक्टस विकत आणून देतात. या सगळ्यात त्या मुलींच्या मनात बॉडी इमेजचे किती प्रश्न तयार होऊ शकतात याचा विचार महागडी स्किन केअर प्रोडक्टस विकत आणताना केला जातोय का?
जेव्हा वयात येणारी मुलं पॉर्न ऍडिक्ट होतात तेव्हा पुढे जाऊन ते जेव्हा प्रत्यक्ष नात्याला सुरुवात करतील तेव्हा ते नातं सांभाळण्यासाठी ते तयार असतील का याचा विचार व्हायला नको का?
इंटरनेटच्या जगाचं एक्स्पोजर आपण रोखू शकत नाही आपण काय करु शकतो तर ‘माध्यम विवेक’ मुलांमध्ये विकसित व्हावा यासाठी प्रयत्न करु शकतो. चीनने नुकतंच सुपरफास्ट इंटरनेट आणलेलं आहे.
या सुपर फास्ट इंटरनेटमध्ये आपलं नजिकचं भविष्य हे व्हर्चुअल रिऍलिटी, ऑगमेंटेड रिऍलिटी आणि हॉलो ग्राम्सचं आहे.
विचार करा, आज फोनच्या छोट्या स्क्रीनवर मुलं पॉर्न बघता आहेतं हेच पॉर्न उद्या होलोग्राम्स मध्ये मुलांच्या अवतीभवती नाचायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आपण मुलांना कसं वाचवणार आहोत? पोकेमॉन गो गेममध्ये याची बारीकशी झलक आपण बघितली होती.
शिक्षेने न सुटणारे प्रश्न
आपल्यासमोरचे प्रश्न वाटतात तेवढे सोपे नाहीयेत. मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्याचे हे प्रश्न आहेत. आणि ते फक्त बुली होणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनाचे नाहीत तर जी मुलं बुली करतात त्यांनाही योग्य मार्गावर कसं आणता येईल याचे आहेत.
मुलांना दोष देणं आणि त्यांना गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात उभं करणं त्यामानाने सोपं आहे, पण त्यांच्यावर काम करुन, त्यांना सक्षम बनवणं, त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव करुन देणं कठीण आहे कारण त्यासाठी पालकांना अनेक प्रकारचे त्याग आणि बदल त्यांच्या जगण्यात करावे लागणार आहेत, त्याची तयारी पालकांची आहे का? हे म्हणजे बाबा दिवसरात्र सिगारेटी फुंकणार पण मुलाने फुंकायच्या नाहीत अशी अपेक्षा करण्यासारखं आहे.
मुलांचं वर्तन पालक, शिक्षक आणि सामाजातील इतर घटक यांच्यावर अवलंबून असतं हे आपण कधी समजून घेणार? मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा तर पालकांना स्वतःचाही स्क्रीन टाइम कमी करावा लागणार आहे का त्याची तयारी? मुलांना माध्यम आणि लैंगिक शिक्षण देण्यासाठी आधी पालक, शिक्षकांना माध्यम शिक्षित व्हावं लागेल.
नुसतं हादरून, घाबरून, काळजीत पडून किंवा मुलांना शिक्षा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. खरंतर आपण पालक का होतो आहोत इथपासून आता सुरुवात करावी लागणार आहे अशी एकूण आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे. पण निदान ‘सायबर पालकत्वा’साठी तरी आपण स्वतःची तयारी करणार आहोत का?
मुलांच्या जगाशी तुटलेला बंध परत जोडून मुलांना सावरुन घ्यायचं असेल तर विविध स्तरांवर सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे. पुढच्या पिढीवर बोट उगारताना तीन बोटं आपल्या दिशेने असतात हे कधीही विसरु नये.
(मुक्ता चैतन्य या 'सायबर मैत्र' या संस्थेच्या संस्थापिका आहेत.)
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








