सेक्सटिंग म्हणजे काय, लैंगिक अभिव्यक्ती की गुन्हा, कायदा काय सांगतो?

सेक्सटिंग, पॉर्न, लैंगिक, सेक्स्टॉर्शन

फोटो स्रोत, Getty Images

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा कसोटी कर्णधार टीम पेन यानं राजीनामा दिला. महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह भाषेत मेसेज आणि फोटो पाठवल्याचा त्याच्यावर आरोप होता. हे सेक्सटिंगचं प्रकरण होतं आणि त्यावेळी ते बरंच गाजलंही होतं.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतही अशीच घटना समोर आली. सासू-सासऱ्याची बॉयफ्रेंडच्या मदतीनं हत्या करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.

सोशल मीडियावर ओळखीनंतर सेक्सटिंग होऊन मग त्याचं रुपांतर लैंगिक संबंधांपर्यंत पोहोचलं आणि या संबंधांमध्ये अडचण ठरणाऱ्या सासू-सासऱ्यांची महिलेनं हत्या केली, असं या घटनेत समोर आलं.

दर काही दिवसांच्या-महिन्यांच्या आड ‘सेक्सटिंग’ शब्द कुठे ना कुठेतरी डोकं वर काढत असतो.

‘सेक्सटिंग’ हा शब्द तुमच्याही कानावर अधून-मधून पडत असेलच. सायबर क्राईमच्या घटनांमध्ये बऱ्याचदा ‘सेक्सटिंग’ शब्दाचा उल्लेख येतो.

अशावेळी तुमच्या मनात कधी असे प्रश्न आलेत का, की सेक्सटिंग म्हणजे नेमकं काय आहे किंवा गुन्ह्यांशी संबंधित या शब्दाचा उल्लेख येतो, मग सेक्सटिंग हाही गुन्हा आहे का?

हे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर त्याचं उत्तर आम्ही या लेखातून देणार आहोत.

सेक्सटिंग म्हणजे काय, हा शब्द आला कुठून?

सेक्सटिंग म्हणजे मेसेजेसच्या माध्यमातून आकर्षक, मादक, लैंगिक भावना चाळवणारे, लैंगिक पूर्ती करणारे शब्द, संवाद, फोटो, व्हिडीओ यांची देवाणघेवाण करणे.

‘सेक्स’ आणि ‘टेक्सटिंग’ या दोन शब्दांना एकत्र करून ‘सेक्सटिंग’ शब्द निर्माण झाला आहे. स्मार्टफोन यायच्या आधी मोबाईलवरून SMS ची सोय जेव्हा उपलब्ध झाली त्यानंतर सेक्सटिंगला सुरुवात झाली.

हा शब्द नेमका कुठून आला, याबाबत बीबीसी मराठीनं लेखिका आणि तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांच्याशी संवाद साधला. ‘पोर (पॉर्न) खेळ : पोर्नोग्राफी आणि गेमिंगचा चक्रव्यूह’ हे पुस्तक मुक्ता चैतन्य यांनी लिहिले आहे.

सेक्सटिंग, पॉर्न, लैंगिक, सेक्स्टॉर्शन

फोटो स्रोत, Getty Images

मुक्ता चैतन्य यांच्या माहितीप्रमाणे, 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन संडे टेलिग्राफ मॅगझीनमध्ये या विषयावर लेख आला होता, ज्यात ‘सेक्सटिंग’ हा शब्दप्रयोग वापरला गेला होता.

त्यानंतर 2009 मध्ये न्यू ऑक्सफर्ड अमेरिकन डिक्शनरीत वर्ड ऑफ द इयर म्हणून या शब्दाचा विचार झाला होता. आणि ऑगस्ट 2012 मध्ये Merriam-Webster’s Collegiate Dictionary मध्येही या शब्दाची नोंद करण्यात आली.

हातातल्या मोबाइलवरच्या SMS पासून सेक्सटिंगची सुरुवात झाली असली तरी आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या सुविधा आल्यानंतर याचं लोण झपाट्याने पसरलं.

2009 साली स्नॅपचॅटने केलेल्या सर्वेक्षणात 14 ते 17 वयोगटातल्या 4 टक्के मुलामुलींनी स्वतःचे लैंगिक भावना चळवणारे फोटो इतरांना पाठवले असल्याचं नोंदवलं होतं. तर याचा वयोगटातल्या 15 टक्के मुलामुलींनी त्यांना असे फोटो मिळाल्याचं सांगितलं होतं. आज ही आकडेवारी प्रचंड वाढली आहे.

मुक्ता चैतन्य
फोटो कॅप्शन, मुक्ता चैतन्य यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ

JAMA Pediatrics मध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसासर प्रत्येक 10 टिनेजर्स पैकी एक जण सेक्सट्स पाठवत असतो. हे सर्वेक्षण जगभरातील एक लाख दहा हजार टिनेजर्सवर करण्यात आले होते.

भारतीय कायद्यात ‘सेक्सटिंग’ हा स्पष्ट उल्लेख नसला, तरी दोन-तीन वर्षांपूर्वी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील सायबर क्राईमच्या यादीत ज्या 24 गुन्ह्यांची नावं आहेत, त्यात ‘सेक्सटिंग’चाही समावेश करण्यात आलाय. त्यात ‘सेक्सटिंग’बद्दल म्हटलंय की, “सेक्सटिंग म्हणजे ईमेल किंवा मोबाईलद्वारे लैंगिक फोटो, व्हीडिओ, मजकूर पाठवण्याची क्रिया आहे.”

सायबर क्राईमच्या यादीत जर सेक्सटिंगचा समावेश असेल, तर कायद्याने गुन्हा आहे का?

भारतात सेक्सटिंग गुन्हा आहे का, कायदा काय सांगतो?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सायबर सुरक्षा क्षेत्रातील वकील अॅड. महेंद्र लिमये यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली.

अॅड. महेंद्र लिमये यांच्या माहितीनुसार, “सेक्सटिंग असा स्वतंत्रपणे कायद्यात नमूद नाही. मात्र, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध तरतुदींअंतर्गत सेक्सटिंग प्रकारातून गुन्हा घडल्यास कारवाई होऊ शकते.”

अॅड. लिमये पुढे म्हणतात की, “मुळात सेक्सटिंग हा प्रकार जर दोन व्यक्तींच्या परस्पर सहमतीतून खासगी ठिकाणी होत असेल, तर त्याल कायद्यान्वये कारवाईची शक्यता नाही. मात्र, हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडल्यास, तसंच या दोन व्यक्तींमधील कुणाही एका व्यक्तीनं त्यातील मजकू, फोटो, व्हीडिओ जाहीर केल्यास, तिथं कारवाईशी शक्यता निर्माण होते.”

यावेळी अॅड. लिमये हे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील 66-E या कलमाबद्दल म्हणजे खासगीपणाच्या उल्लंघनाच्या तरतुदीबद्दल माहिती देतात.

“माहिती तंत्रज्ञान कायद्यातील 66-E नुसार, जर संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता, त्या व्यक्तीबद्दल माहिती, फोटो इतरत्र पसरवल्यास संबंधित व्यक्तीच्या खासगीपणाचं उल्लंघन होऊन तो गुन्हा ठरतो.”

"यात अल्पवयीन मुलांबाबत असं खासगीपणाचं उल्लंघन असल्यास त्यासंबधी कायद्यान्वये सुद्धा कारवाईची शक्यता नाकारता येत नाही," असं अॅड. लिमये म्हणतात.

सेक्सटिंग का करावं वाटतं?

बऱ्याचदा सेक्सट्स पाठवण्याची कारणं सुरुवातीला वेगळी असतात. तो आणि ती एकमेकांच्या प्रेमात असतात. तो आणि ती यांचे विवाह बाह्य संबंध असतात आणि प्रत्यक्ष भेटीगाठी नियमित शक्य नसतात. लग्न ठरलेलं असतं, तारीखही ठरलेली असते. ऑनलाईन ओळख झालेली असते आणि सेक्सट्स पाठवल्यावर समोरच्या व्यक्तीने त्याबद्दल आक्षेप नोंदवलेला नसतो. त्यामुळे मग सेक्सट्स पाठवण्यात काही धोका नाही असं वाटायला लागतं आणि मग चक्र सुरू होतं.

अल्पवयीन मुलांमध्येही सेक्सटिंगचं प्रमाण प्रचंड आहे. एकमेकांच्या लैंगिक भावना चालवणारे मेसेजेस, फोटो आणि व्हीडिओ एकमेकांना गंमत म्हणून, थ्रिल म्हणून, पिअर प्रेशरने पाठवणं ही खूप कॉमन गोष्ट व्हायला लागली आहे. यात दरवेळी फॉर्वर्डेड फोटो किंवा व्हिडीओज असतील असं नाही. तर स्वतःचेही फोटो आणि व्हीडिओ पाठवण्याचं प्रमाण मोठं आहे.

सेक्सटिंग, पॉर्न, लैंगिक, सेक्स्टॉर्शन

फोटो स्रोत, Getty Images

अशाप्रकारे ‘सेक्सटिंग’ का करावं वाटतं, याबद्दल मुक्ता चैतन्य काही कारणं सांगतात –

  • सेक्सटिंग करण्याचा प्रमुख कारण म्हणजे गुप्त राहता येतं.
  • बऱ्याचदा सेक्सटिंग सहमतीने केली जाते. त्यामुळे ते अनेकांना अधिक सोयीस्कर वाटतं. म्हणजे, जोडीदाराबरोबरचे लैंगिक जीवन समाधानकारक नसेल किंवा जोडीदारच नसेल, तर सेक्सटिंगचा पर्याय चाचपडून पाहिला जातो.
  • अनेकदा फॅन्टसीजही असतात. सेक्सटिंगमध्ये केवळ लिहायचं-बोलायचं असतं, प्रत्यक्षात कृती नसते. त्यामुळे व्यभिचाराचं लेबल लागणार नाही, असं अनेकांना अनेकदा वाटतं. त्यामुळे हा पर्याय सोयीस्कर वाटतो.
  • अनेकजणांना एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींचं आकर्षण असतं. आपली सामाजिक व्यवस्था त्यासाठी पूरक नाहीय. किंबहुना, त्यावर बोलणंही आपल्या सामाजिक चौकटीत बसत नसल्यानं, लोकांना सेक्सटिंगसारखा पर्याय सोयीचा वाटतो. प्रत्यक्ष न भेटण्याचा पर्यायही सेक्सटिंगमध्ये त्यांना मिळतो.
  • अल्पवयीन मुलांमध्ये बऱ्याचदा पिअरप्रेशरमुळे सेक्सटिंग होतं. ग्रुपमध्ये स्वीकारार्हता मिळावी, यासाठी लहान मुलं याकडे वळतात.

सेक्सटिंगचे परिणाम काय?

एकमेकांच्या सहमतीने जरी सेक्सटिंग असेल तरी ती घातक ठरू शकते, असं मत मुक्ता चैतन्य व्यक्त करतात.

सेक्सटिंगमुळे होणारे परिणाम –

  • पाठवलेल्या मेसेज किंवा फोटो-व्हीडिओंच्या आधारे पैशांची मागणी करणं. म्हणजेच, सेक्स्टॉर्शन.
  • ब्लॅकमेल करून इतर लोकांचे फोटो किंवा व्हीडिओंची मागणी करणं.
  • बदनामीच्या धमक्या देऊन इच्छा पूर्ण करून घेणं.
  • रिलेशनशिप किंवा लग्नासाठी ब्लॅकमेल करणं.
सेक्सटिंग, पॉर्न, लैंगिक, सेक्स्टॉर्शन

‘कुठल्याही स्थितीत सेक्सटिंग टाळलं पाहिजे’

लेखिका मुक्ता चैतन्य म्हणतात की, “जर तुम्ही अल्पवयीन असाल, तर बऱ्याचदा सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवरील अज्ञात व्यक्तीसोबतही सेक्सटिंग करतात. त्यामुळे अल्पवयीन मुलांनी तर हे कुठल्याही स्थितीत सेक्सटिंग टाळलं पाहिजे.

“जर तुम्ही अॅडल्ट असाल म्हणजे 18 वर्षांवरील असाल, तरीही काळजी घेतलीच पाहिजे. आपल्याकडे पोर्नोग्राफिक कंटेट पाहायला परवानगी आहे, पण तयार करायला आणि व्हायरल करायला परवानगी नाहीय. त्यामुळे जर तुम्ही तुमचे न्यूड व्हीडिओ तयार करत असाल तर तो कायद्याला मान्य नाही.

“चॅटिंग करत असताना आताच मेसेज कर, आताच फोटो पाठव, व्हीडिओ कॉल कर, अशा गोष्टींचा दबाव दिसून आला, तर सतर्क राहणं आवश्यक आहे.”

शेवटी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, सेक्सटिंगचं काही काळानं आवड निर्माण होते आणि परिणामी त्याचं व्यसनात रुपांतर होण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळीच सावध झाले पाहिजे, असंही मुक्ता चैतन्य सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)