टीम पेनचा सेक्स्टिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा

टीम पेन, ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, PATRICK HAMILTON

फोटो कॅप्शन, टीम पेन

महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह भाषेत केलेल्या मेसेज अर्थात सेक्स्टिंगप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने राजीनामा दिला आहे.

2017 मध्ये टीम पेन आणि क्रिकेट टास्मानियाची महिला कर्मचारी यांच्यादरम्यान हे संभाषण झालं होतं. पेनने शुक्रवारी पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टीम पेनने अत्यंत आक्षेपार्ह शब्दात महिला कर्मचाऱ्याला संदेश पाठवले. संदेशासह काही फोटो आणि आणि ग्राफिक्सही पाठवले.

टीम पेनने पत्रकार परिषदेत मनोगत वाचून दाखवलं. ते असं, "माझी पत्नी, कुटुंबीय आणि सदरहू महिला कर्मचारी यांना झालेल्या त्रासासाठी मी माफी मागतो.

याप्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा मलिन झाली. त्यासाठी मी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे.

याप्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी युनिटद्वारे चौकशी झाली. या चौकशीत मी सहभागी झालो आणि पूर्ण सहकार्य केलं.

या चौकशीत तसंच क्रिकेट टास्मानियाच्या एचआर चौकशीत मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमावलीचा भंग केला नसल्याचं स्पष्ट झालं.

दोषमुक्त झालो असलो तरी या घटनेचा मला तेव्हा आणि आताही पश्चाताप होतो आहे. मी माझ्या कुटुंबीयांशी, पत्नीशी बोललो. त्यांनी मला माफ केलं आहे, त्यांचा पाठिंबा मोलाचा आहे.

माझ्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसंच खेळाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. मी ऑस्ट्रेलियाचं कसोटी कर्णधारपद सोडणं हा योग्य निर्णय आहे. अशेस मालिकेच्या तयारीवर याप्रकरणाचा कोणताही परिणाम होऊ नये असं मला वाटतं.

ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद भूषवणं हा माझ्यासाठी अत्युच्य सन्मानाचा क्षण होता. माझे सहकारी आणि मी यांनी एकत्र मिळून मैदानात जे यश मिळवलं त्याचा मला अभिमान वाटतो. ते मला समजून घेऊन माफ करतील अशी आशा आहे.

ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांची मी माफी मागतो. भूतकाळातील माझ्या वर्तनामुळे खेळाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे.

क्रिकेट चाहते आणि जगभरातील क्रिकेट वर्तुळाची मी माफी मागतो", असं पेनने म्हटलं आहे.

8 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पारंपरिक अशेस मालिका सुरू होत आहे. पेनने राजीनामा दिल्याने ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार कोण असणार यासंदर्भातही उत्सुकता आहे.

2018 मध्ये चेंडू कुरतडल्याप्रकरणी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी टीम पेनकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.

36 वर्षीय पेनने 35 टेस्ट, 35 वनडे आणि 12 ट्वेन्टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 23 टेस्टमध्ये पेनने ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी हाताळली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)